शिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
हा खालील फोटो सौरव घोष नावाच्या कॉमेडीयनने अतिशय अभिमानाने स्वत:च्या फेसबुक वॉलवर शेअर केलाय. पण या फोटो मधलं संभाषण मात्र प्रत्येक मराठी माणसाच्या डोक्यात संताप निर्माण करणार आहे. या संभाषणात आपण पाहू शकतो त्याप्रमाणे त्याने अतिशय खालच्या पातळी मध्ये शिवाजी महाराजांवर आणि मराठी जनतेवर टीका केली आहे.
आता तुमच्या मनातही प्रश्न असेल की हा वाद नेमका काय आहे? या महाभागाने महाराजांबद्दल अशी हीन टीका का केली?
सौरव घोषने आपल्या युट्युब चॅनेलवर २ महिन्यांपूर्वी Mumbai Airports | Stand-up Comedy by Sourav Ghosh या नावाने एक व्हिडियो अपलोड केला होता, या व्हिडियोमध्ये त्याने मुंबई मध्ये दोन विमानतळ का? आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का? असे प्रश्न करत महाराजांच्या नावाने विनोद केले. मी स्वत: ती व्हिडियो पाहिली आहे.
आजवर अनेक कॉमेडीयन्सनी फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक थोर व्यक्तींच्या नावाने विनोद केले आहेत. मी इथे स्पष्ट सांगतो की मी कोणताही विनोद हा खेळीमेळीने घेणारा आहे. कारण प्रत्येक कॉमेडीयन हा काही मुद्दाम कोणाचाही संदर्भ देऊन विनोद करत नाही, त्यामागे प्रेक्षकांचे मनोरंजन हा त्याचा निखळ उद्देश असतो, असे माझे मत आहे. त्यामुळे सौरव घोषची व्हिडियो पाहताना त्याने महाराजांचे नाव घेऊन विनोद केला म्हणून मी काही offend झालो नाही. पण त्याच्या विनोदामध्ये शिवाजी महाराज, महाराष्ट्र आणि येथील लोकांबद्दल काहीसा कुत्सिक भाव मात्र जाणवला, जो त्याच्या प्रत्येक पंच मधून डोकावत होता. त्यामुळे तो असे विनोद जाणीवपूर्वक करतोय असे वाटत राहते.
असो, या माणसाने महाराजांचे नाव घेऊन विनोद केले म्हणजे त्याच्या व्हिडियोवर मराठी माणसांच्या प्रतिक्रिया येणारच होत्या. म्हणून मी सहज व्हिडियो खालील कॉमेंट्स पाहिल्या त्यात एक गोष्ट आढळली ती म्हणजे परराज्यातील लोकांनी (खासकरून बंगाली लोकांनी…कारण हा कॉमेडीयन बंगाली आहे) त्याच्या विनोदांची वाहवा केली होती, तर मराठी लोकांनी त्याला चांगलेच झापले होते. या अश्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातील जनतेकडून येणे स्वाभाविक होते. त्यातील काही प्रतिक्रिया उर्मट होत्या, काही शिवप्रेमी त्याला थेट शिव्या देत होते, तर काही सभ्य भाषेत त्याचा निषेध करत होते.
जर एखाद्या कॉमेडीयनला वाटते की लोकांनी आपले विनोद खेळीमेळीने घ्यावेत तर त्याने देखील ते खेळीमेळीनेच सादर करायला हवेत आणि त्यावर offend झालेल्या लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या तर त्यांचा राग देखील त्या कॉमेडीयने नमते घेऊन खेळीमेळीने शांत करायला हवा. सौरव घोषने देखील अश्या संतप्त प्रतिक्रियांवर संयमी भूमिका घेणे गरजेचे होते पण या महाभागाने आपली विनोदाची मर्यादा ओलांडत थेट शिवाजी महाराजांवर टीका केली. जी अर्थातच ‘डोक्यात जाण्यासारखी होती’. त्यात त्याने औरंगजेबाचा संदर्भ देऊन तर कहरच केला.
आता असं तर मुळीच नाही कि सौरव घोष सारख्या सुशिक्षित वाटणाऱ्या व्यक्तीला शिवाजी महाराज माहित नसावेत. त्याला याची ही कल्पना असावी की आपल्या या अश्या विनोदांमुळे महाराष्ट्रातील लोक नक्कीच चिडणार….मग एवढे असूनही त्याने सभ्य भाषेत निषेध करणाऱ्या प्रतिक्रियांना देखील उर्मट भाषेत “मी महाराजांवर अजून विनोद करणार, तुम्ही काय करायचं ते करा?” या आशयाच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेली ‘हीन कृती’ वाटते. आणि मुख्य म्हणजे त्याने स्वत: उपरोक्त संभाषण स्वत:च्या वॉल वर शेअर करणे त्याच्या या हीन कृतीची साक्ष देतात.
यावरून अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपल्या महापुरुषांच्या नावावर जर वाद निर्माण केला तर त्याचा फायदाच होतो असा या महाभागांचा समज झालेला दिसतो. म्हणूनच सौरव घोष सारख्या लोकांची थोर व्यक्तींच्या नावावर बेधडक टीका करण्याची हिंमत होते. त्यांना वाटतं अश्या गोष्टींमुळे आपण प्रसिद्धीस पावू आणि काही वेळाने लोक त्या गोष्टी विसरून जातील.
अशी एखादी गोष्ट घडल्यास सर्वप्रथम आपण आपल्या संतप्त प्रतिक्रिया देऊन मोकळे होते, मग त्यावर वाद सुरु होतो, त्यानंतर त्यावर राजकारण्यांकडून राजकारण होते, मग हे लोक मिडियामध्ये येतात, सारवासारव करतात आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध होतात, (म्हणजे यांचा हेतू येथे साध्य होतो.) मग काही लोक त्यांची बाजू घेतात, काही विरोध करतात. मग हे झालं की काही वेळाने प्रकरण थंड होतं, सार काही पूर्वीसारखं सुरळीत होतं, आपण देखील आपल्या महापुरुषांचा अपमान विसरून जातो, पण तो मनुष्य मात्र प्रसिध्द होतो. “यालाच पब्लिसिटी स्टंट म्हणतात बरं का..!”
मग तुम्ही म्हणालं की अश्या आगाऊ गोष्टींवर आपण प्रतिक्रिया द्यायच्याच नाहीत का? तर नाही, कारण नसताना आपण उगाच स्वत:ला offend करून घ्यायचं नाही. कारण हे लोक अगदी साधी विधान करतात, ज्यात केवळ महापुरुषांचा संदर्भ असतो. मी आजवर जेवढी प्रकरणे पाहिली आहेत त्यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये एक गोष्ट आढळून आली आहे की प्रसिद्ध पावू पाहणारे हे लोक अतिशय सौम्य भाषेत वाद निर्माण करतात (कारण त्यांना पुढे सारवासारव करण्यास वाव मिळावा) आणि आपण सामान्य माणसं स्वत:हून त्यांचा तो वाद मोठा करतो.
सौरव घोषचं उदाहरण घ्या, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याने केवळ विनोद म्हणून महाराजांचे नाव वापरले. त्याने महाराजांवर वैयक्तिक टीका केली नाही, तर विमानतळांना दिल्या गेलल्या महाराजांच्या नावांवर आक्षेप घेतला. (उद्या मिडीयामध्ये हा मनुष्य सारवासारव करताना हेच विधान वापरतो की नाही बघा आणि त्याला समर्थन देणारेहि हजारोंच्या संख्येने असतील) त्यामुळे मराठी जनतेने उगाच स्वत:ला offend करून घेण्याचे कारण नव्हते, पण काही शिवप्रेमींना हे रुचेल नसेल म्हणून त्यांनी कमेंट्स केल्या आणि सौरव घोष ने आपला डाव साधला. पण त्याची ही कल्पना त्याच्याही फारशी उपयोगी पडली नाही म्हणा, कारण दोन महिन्यात या प्रकरणाची जास्त वाच्यता झाली नाही. शेवटी नाईलाजाने या मनुष्याने मुद्दाम महाराजांवर थेट टीका करून नुकताच स्वत:च्या फेसबुक वॉलवर त्या संभाषणाचा फोटो पोस्ट केला आणि हा वाद नव्याने उकरून काढला. कारण एकच प्रसिद्धी मिळवणे! आणि हीच गोष्ट रुचण्यासारखी नाही, मुद्दाम मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न तो करत असेल तर त्याला वठणीवर आणलेच पाहिजे.
आता तुम्ही म्हणालं कि हा लेख लिहून किंवा पुन्हा त्याचा निषेध करून त्याला प्रसिद्ध करण्यास हातभार लावण्यासारखे होणार नाही का? तर नाही, यावेळेस केवळ शब्दांनी त्याचा निषेध करून भागणार नाही, तर प्रत्येक मराठी माणसाने पुढे येऊन त्याच्या युट्युब चॅनेलला रिपोर्ट करून आणि सायबर सेलमध्ये अश्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात तक्रार करून त्याला चांगलाच दणका दिला पाहिजे. त्याचं युट्युब चॅनेल म्हणजे त्याचा धंदा आहे असं म्हणा हवं तर…तोच जर बंद पडला तरच त्याला जन्माची अद्दल घडेल.
जरी चॅनेल बंद नाही झालं तरी किमान त्याची व्हिडियो तरी हटवली जाईल आणि त्याच्यासाठी ही देखी जबर शिक्षा असेल, म्हणजे उद्या शिवाजी महाराजच काय तर अन्य कोणत्याही महापुरुषाविरोधात विनोदा व्यतिरिक्त वैयक्तिक खालच्या पातळीवर टीका करण्याची हिंमत सौरव घोष सारखी प्रसिद्धी पिपासू लोक करणार नाहीत आणि तोच आपला विजय ठरेल.
मी कोणी शिवभक्त म्हणून ही मते मांडत नाही आहे, पण दिवसागणिक सौरव घोषची (त्याच्या युट्युब व्हिडियो खालील कॉमेंट्स आणि त्याचे फेसबुक पेज नक्की तपासा म्हणजे तुमच्या लक्षात येतील) हिंमत वाढत आहे आणि फाजील आत्मविश्वासासह तो अधिकच खालच्या पातळीवर टीका करत आहे, जी नक्कीच माझ्याप्रमाणे प्रत्येक मराठी माणसाला मानसिक त्रास देणारी आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.