आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भ्रष्टाचार ही आज अस्तित्वात आलेली गोष्ट नाही. आर्य चाणक्याने त्याच्या चाणक्यनितीमध्ये असे म्हटले आहे, ‘ज्याप्रमाणे पाण्यात असलेला मासा पाणी कधी पितो ते कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी कधी भ्रष्टाचार करतो ते समजत नाही.’ चाणक्याने या भ्रष्टाचारावर राजा आणि जनतेने करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत.
अनेक वेळा राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढे-चळवळी सुरू केल्या, परंतु समाजातून भ्रष्टाचार हटण्याचे नाव घेत नाही.
या दीर्घकालीन रोगाला हटवण्यासाठी समाजात जागृती करण्याची आणि नागरिकांच्या निर्भयतेची आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या चिकाटीची आवश्यकता आहे. असाच एक अभिनव प्रयत्न फिफ्थ पिलर या संस्थेच्या रूपाने झाला आहे.
आपल्या रोजच्या जीवनातून जर भ्रष्टाचार हद्दपार झाला, तर आपली किती प्रगती होऊ शकेल या विचारातून विजय आनंद यांनी २००६ साली ‘फिफ्थ पिलर’ या सामाजिक संस्थेची स्थापना देशातील भ्रष्टाचाराशी लढा देण्याच्या उद्देशाने केली.
विधिमंडळ, नोकरशाही, न्यायव्यवस्था आणि वृत्तमाध्यमे हे लोकशाहीला आधारभूत असणारे चार खांब असतात असे म्हटले जाते. देशातील नागरिकांनी एकत्र येऊन समाजाची सुधारणा होण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त शासनव्यवस्था सुरू होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, या उद्देशाने ‘फिफ्थ पिलर’ अर्थात लोकशाहीचा पाचवा स्तंभ या संस्थेचे काम सुरू झाले.
अशी वापरात आली संकल्पना
विजय आनंद हे एक माहिती तंत्रज्ञान अभियंता असून, अमेरिकेत १० वर्षे यशस्वीरीत्या काम केल्यावर आणि अनिवासी भारतीय असूनही ते भारतात सामाजिक कामाच्या ध्यासामुळे परत आले.
२००७ मध्ये एकदा आपल्या तामिळनाडूमधील घरी परतत असताना त्यांना समाजातील भ्रष्टाचाराशी लढण्याच्या एका आगळ्या मोहिमेची कल्पना सुचली. ‘शून्य रुपयांची नोट’ ही ती आगळी कल्पना होती.
समाजातील सामान्य माणूस भ्रष्टाचारामुळे आणि भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांमुळे सर्वात जास्त नडला जातो. त्याला न घाबरता या भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी बळ देणे, या लढाईत तो एकटा नाही असा धीर देणे या उद्देशाने या ‘शून्य रुपयांची नोट’ मोहिमेची सुरुवात झाली.
२००७ मध्ये सुरुवातीला २५००० अशा नोटा छापून त्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहरात वाटण्यात आल्या. ५० रुपयांच्या नोटेसारख्या दिसणाऱ्या या नोटेवर दर्शनी बाजूला महात्मा गांधींचे चित्र, भ्रष्टाचार नष्ट करा हे घोषवाक्य, फिफ्थ पिलर या संस्थेच्या मुख्य कार्यालयाचा फोन नंबर आणि इमेल, यासह ‘मी लाच घेणार व देणार नाही’ ही शपथ छापलेली आहे.
दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराशी सामना करण्याचे नागरिकांना आवाहन आणि संस्थेच्या विविध कार्यालयांचे पत्ते छापण्यात आले आहेत. या मोहिमेला लाभलेल्या उत्तम प्रतिसादानंतर, अशा आणखी नोटा छापून विविध शहरांमध्ये बाजार, बसस्थानके आणि रेल्वे स्टेशन्ससारख्या सार्वजनिक ठिकाणी वाटण्यात आल्या. पुढील सात आठ वर्षांमध्ये पंचवीस लाखांहून अधिक नोटांचे वितरण करण्यात आले.
या शिवाय बाराशेहून अधिक शाळा, महाविद्यालये आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमधून या नोटेविषयी माहिती देणारे माहिती फलक प्रदर्शित करण्यात आले. या फलकांवर पाच लाखांहून अधिक व्यक्तींनी सह्या केल्या आणि भ्रष्टाचाराशी लढण्याची शपथ घेतली. तमिळ, हिंदी, कन्नड, तेलगू आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये या नोटा छापण्यात आल्या आहेत.
अनेक नागरिकांना या अभिनव मोहिमेमुळे भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटका करून घेण्यास बळ मिळाले आहे. फिफ्थ पिलर संस्थेच्या वेबसाईटवर अशी अनेक प्रेरक अनुभवकथने वाचायला मिळतात.
फायदा झाल्याची उदाहरणं
श्री. अशोक जैन यांची कार चेन्नईमधील एका पोलिस ठाण्यात टो करून नेण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडे दीडशे रुपयांच्या दंडा व्यतिरिक्त सहाशे पन्नास रुपयांची लाच मागितली.
जैन यांनी पावतीची मागणी केल्यावर ती देण्यास पोलिसांनी नकार दिला. या प्रकारानंतर जैन यांनी त्यांचे स्नेही विनोद जैन यांना बोलावून घेतले. विनोद यांनी पोलिसांना ‘शून्य रुपयांची नोट’ दिली. ही नोट पाहताच पोलिसांनी दंडापोटी दीडशे रुपये घेऊन त्याची पावती जैन यांना दिली.
मुथुसेल्वी या महिलेने रेशन कार्डासाठी अर्ज केला असता तिच्याकडे लाच मागण्यात आली. ती देण्याची क्षमता आणि तयारी नसल्याने तिने रेशनकार्ड मिळण्यासाठी नंतर प्रयत्न केला नाही.
काही वर्षांनी मात्र तिने परत एकदा त्यासाठी अर्ज केला. याहीवेळी तिच्याकडे २००० रुपये लाच मागण्यात आली. तेव्हा तिने फिफ्थ पिलर संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिला माहितीच्या अधिकारात चौकशीची मागणी करण्यास मदत केली. अवघ्या २३ दिवसांमध्ये तिला रेशनकार्ड घरपोच मिळाले. बारा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुथुसेल्वीला रेशनकार्डाच्या लाभांचा फायदा घेता आला.
नागरिकांनी भ्रष्टाचारापुढे दबून न जाता त्याचा विरोध केला पाहिजे. ही नोट त्या विरोधाचे प्रतिकात्मक साधन आहे.
संस्थेच्या वेबसाइटवरून ही नोट डाऊनलोड करता येते. आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार हा दखलपात्र गुन्हा आहे. लाच घेण्यास बंदी आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर त्याला निलंबन आणि कारावास अशा शिक्षा होऊ शकतात. असे असूनही सामान्यपणे नागरिक भीती आणि भिडस्तपणामुळे लाच देऊन मोकळे होतात.
ही ‘शून्य रुपयांची नोट’ अशा नागरिकाला भ्रष्टाचारास विरोध करण्यास बळ देते. तो या लढाईत एकटा नाही असा धीर देते.
भारताव्यतिरिक्त आता ही संकल्पना व चळवळ परदेशांमध्येही मूळ धरते आहे. आशिया खंडातील नेपाळ व यमेन, आफ्रिका खंडातील घाना व बेनिन आणि दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको या देशांमध्ये शून्य मूल्य चलन’ या भ्रष्टाचार विरोधी कल्पनेला स्वीकारले गेले आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.