‘अपशकुनी हिरो’ म्हणून लोक बच्चनजींना टाळत होते तेव्हा या अभिनेत्याने दिली संधी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
हिंदी चित्रपटसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, शहनशहा अमिताभ बच्चन यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान अनन्यसाधारण आहे.ते पडद्यावर आले की लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचे काम बघतात. कुठलीही भूमिका असो, ते पात्र जिवंत करण्याची हातोटी बच्चनजींकडे आहे.
अनेक नवोदित अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायला मिळणे ही सुवर्णसंधी मानतात. त्यांच्याबरोबर काम करण्याचे स्वप्न अनेक लोक बघतात. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान हे अढळ आहे. त्यांची सफलता तर प्रत्येकाला माहित आहे. पण या यशासाठी त्यांनी किती संघर्ष केला आहे किंवा किती कष्ट घेतले आहेत ते बऱ्याच लोकांना ठाऊक नाही.
एक काळ असा होता की अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीत काम मिळणे व त्यांचे स्थान निर्माण करणे कठीण झाले होते. केवळ चित्रपटसृष्टीतच नाही तर त्याआधी सुद्धा त्यांच्या वाट्याला खूप संघर्ष आला. आणि चित्रपटसृष्टीत पाय ठेवल्यावर तर सुरुवातीला त्यांच्या संघर्षात वाढ झाली आणि त्यांच्या वाट्याला फक्त अपयश आले.
अमिताभ यांचे बंधू अजिताभ यांनी त्यांचे काही फोटो काढून ते ख्वाजा अहमद अब्बास यांना पाठवले होते. त्या काळात ते सात हिंदुस्थानी चित्रपटासाठी अभिनेत्यांच्या शोधात होते. त्यांनी त्या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांची निवड केली. त्यावेळेला अब्बास यांना अमिताभ बच्चन यांचे वडील कोण आहेत याची कल्पना नव्हती.
अब्बास यांनी अमिताभना सांगितले की या चित्रपटासाठी त्यांना पाच हजार रुपये मानधन मिळेल. ते अमिताभ यांनी स्वीकारले. ज्यावेळेला करारावर सही करण्याची वेळ आली तेव्हा अब्बास यांना कळले की अमिताभ हे कवी हरिवंशराय बच्चन यांचे सुपुत्र आहेत.
सत्य कळल्यावर अब्बास यांनी अमिताभना स्पष्ट सांगून टाकले की जोवर त्यांचे वडील त्यांना चित्रपटात काम करण्याची परवानगी देत नाहीत तोवर ते त्यांना काम देणार नाहीत. ही अट अमिताभ यांना मान्य होती. त्यामुळे त्यांना सात हिंदुस्थानी मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६९ साली आलेला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. परंतु मीरा कुमारी यांनी हा चित्रपट बघून अमिताभ यांच्या कामाची स्तुती केली होती.
चित्रपटांमध्ये लहान सहान भूमिक करत असतानाच त्यांना मॉडेलिंगची कामे देखील मिळत होती परंतु अमिताभ यांना मॉडेलिंग करण्यात रस नव्हता. अभिनेते जलाल आगा यांची एक जाहिरात कंपनी होती. ही कंपनी विविध भारतीसाठी जाहिराती बनवण्याचे काम करीत असे.
जलाल आगा अमिताभ यांना वरळीच्या एका छोट्याश्या रेकॉर्डिंग सेंटरला नेऊन एक दोन मिनिटांच्या जाहिरातीसाठी त्यांचा आवाज रेकॉर्ड करत. या कामाचे अमिताभ ह्यांना पन्नास रुपये मिळायचे. त्या काळी पन्नास रुपये ही रक्कम सुद्धा कमी नव्हती.
भूक भागवण्यासाठी अमिताभ वरळीच्या सिटी बेकरीमध्ये मध्यरात्री जाऊन तुटलेली बिस्किटे, टोस्ट अर्ध्या दरात घेऊन येत असत. असे अगणित वेळेला अमिताभ ह्यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळात रात्रभर उघडे राहत असलेल्या कॅम्पस कॉर्नरमधील हॉटेलात जाऊन टोस्ट खाऊन पोट भरले आहे. रात्री असे पोट भरायचे व सकाळी उठून परत काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु करायचे, अशी त्यांची त्याकाळची दिनचर्या होती.
अमिताभ यांना लहान सहान कामे मिळत होती पण हाती यश लागत नव्हते. सुनिल दत्त -वहिदा रेहमान ह्यांच्या रेश्मा और शेरा ह्या चित्रपटात अमिताभ बच्चन ह्यांनी एका मुक्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. सुरुवातीला अमिताभ बच्चन ह्यांना डायलॉग दिले होते पण त्यांचे संवाद नंतर विनोद खन्नांना देण्यात आले असे म्हणतात.
–
हे ही वाचा – अभिनयाच्या परीक्षेत नापास झालेला हा विद्यार्थी बनला ‘झक्कास’ अभिनेता!
–
कलकत्त्याच्या घरातून बाहेर पडून मुंबईत येऊन काहीतरी करून दाखवायचे असे मनाशी ठरवलेल्या अमिताभ यांनी आईवडिलांकडून कुठलीही मदत घेणार नाही असा निश्चय केला होता. परंतु त्यांना केवळ दोन चित्रपटात काम मिळाले, ते मानधन किती दिवस पुरणार होते? त्यांच्याकडे मुंबईत राहण्यासाठी जागा नव्हती. त्या वेळेला अन्वर अली त्यांच्या मदतीला धावून आले.
अन्वर अली हे प्रसिद्ध अभिनेते मेहमूद यांचे भाऊ होते. त्यांनी व अमिताभ यांनी सात हिंदुस्थानीमध्ये एकत्र काम केले होते. त्यांनी अमिताभ यांना त्यांच्या घरात राहण्यास जागा दिली. दोघेही काम मिळवण्यासाठी एकत्र फिरत असत.
अमिताभ यांनी तेव्हा काही चित्रपटांमध्ये काम देखील केले, परंतु त्यातील केवळ मोजकेच चित्रपट यशस्वी ठरले. इतर चित्रपट सपशेल अयशस्वी ठरले. लोक अमिताभ यांना टाळू लागले. त्यांना काम मिळणे कठीण झाले.
काही लोकांनी तर त्यांना परत घरी जाऊन कवी होण्याचा सल्ला देखील दिला. नशीब काही त्यांची साथ देत नव्हते. निराश होऊन अखेर त्यांनी आईवडिलांकडे परत दिल्लीला जाण्याचा विचार केला. परंतु अचानक त्यांच्यापुढे एक संधी साधून आली.
अभिनेते मनोज कुमार हे देशभक्त म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या जवळजवळ सगळ्याच चित्रपटांमध्ये देशप्रेमाचे दर्शन घडत असे. त्यांच्या देशभक्तीमुळे लोकांनी त्यांचे नाव भारत असे ठेवले होते. त्यांच्या चांगुलपणाचे अनेक किस्से सांगितले जातात. असा एक किस्सा त्यांनी स्वतःच एका इंटरव्यूमध्ये सांगितला होता.
अमिताभ बच्चन यांना कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सतत अपयश पचवावे लागत होते. लोक त्यांना अपशकुनी हिरो म्हणू लागले होते आणि त्यांना काम देण्यास तयार नव्हते. निराश होऊन अमिताभ जेव्हा मुंबई सोडून जाण्यास निघाले होते तेव्हा मनोज कुमार यांनी अमिताभ यांची भेट घेऊन त्यांना ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
मनोज कुमार यांनी त्या इंटरव्यू मध्ये असेही सांगितले की, जेव्हा लोक अमिताभना अपयशी म्हणून नावे ठेवत होते त्यावेळी देखील मनोज कुमार यांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रतिभेची पारख केली होती. त्यांना पूर्ण खात्री होती की एक दिवस अमिताभ बच्चन हे खूप मोठे स्टार होतील. त्यांनी रोटी कपडा और मकानचे दिग्दर्शन केले व अमिताभ यांनी तो चित्रपट स्वीकारला.
१९७४ साली आलेला हा चित्रपट यशस्वी ठरला आणि त्याबरोबरच आलेल्या जंजीर चित्रपटापासून अमिताभ बच्चन यांच्या जबरदस्त इनिंगला सुरुवात झाली. त्यांची ही घोडदौड आजही कायम आहे. आजही अनेक लोक केवळ एखाद्या चित्रपटात अमिताभ बच्चन आहेत म्हणून तो चित्रपट बघतात.
आज वयाच्या ७८व्या वर्षी देखील ते न थकता , तरुणांना लाजवेल अश्या उत्साहाने काम करताना दिसतात. हिंदी सिनेमाच्या इतिहासात अमिताभ बच्चन यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे ह्यात शंका नाही. हे उत्तुंग यश मात्र त्यांना सहज मिळाले नाही. यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली आहे, किती अपयश पचवले आहे हे मात्र विसरून चालणार नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.