“गटारी नाही रे भाऊ, ‘गतहारी’…” या दिवसाबद्दल फार माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
श्रावण सुरु होणार म्हटलं, की दोन गोष्टी अगदी हमखास आठवतात, एक म्हणजे ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ हे गाणं आणि दुसरं म्हणजे, ‘गटारी अमावस्या! गटारी म्हणजे मज्जा, मस्ती, भरपेट मांसाहार आणि मदिरापान, अर्थात दारू पिणं. पण गटारी म्हणजे फक्त एवढंच असतं का? आणि मुळात गटारी आणि गटार यांचा काही संबंध असतो, की नसतो हेच आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसतं.
गटारी अमावास्येचं ‘खरं नाव’ आहे, ‘गतहारी’ अमावस्या! गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजे गताहार. गत म्हणजे गेलेला, म्हणजेच गताहारचा अर्थ होतो गेलेला/त्यागलेला आहार.
श्रावण महिन्यात दारू, मांसाहार या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. म्हणजेच श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही. थोडक्यात काय, तर हा आहार गेलेला असतो. म्हणून श्रावण सुरु होण्याच्या आधीची म्हणजेच आषाढाची अमावस्या गताहारी, साजरी केली जाते आणि पुढच्या महिन्याभरात जे जेवण त्यागायचं आहे, ते भोजन यादिवशी केलं जातं.
श्रावणात मांसाहार करू नये कारण…
श्रावण महिन्यात मांसाहार करायचा नाही, हे मोठ्यांनी सांगितलं, आपण ऐकलं आणि त्यानुसार इतरांनाही सांगितलं अशी ही पद्धत पुढे चालू असते. पण श्रावणात मांसाहार का करत नाहीत, हे तुम्हाला माहित आहे का? हिंदूसणासुदीला चालणाऱ्या अनेक प्रथांना शास्त्रीय महत्त्व असतं, हे आपण विसरून चालणार नाही.
असंच एक शास्त्रीय कारण आहे, ज्यामुळे श्रावणात मांसाहार वर्ज्य असतो. या दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनक्षमता कमी झालेली असते. थोडक्यात काय, तर साधं खाणं पचवणं सुद्धा कठीण होऊन जातं. मांसाहार पचण्यास मुळातच अधिक कठीण असतो, त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणंच योग्य ठरतं.
गताहारी अमावास्येविषयी थोडंसं…
आपण साजरी करतो, ती अमावस्या गटारी नसून गताहारी आहे, हे कळलं असेल किंवा ठाऊक असेल, तरी याविषयी या आणखी काही गोष्टी तुम्हाला कदाचित ठाऊक नसतील.
विविध नावं…
गटारी हे जरी या दिवसाचं चुकीचं नाव असलं, तरी गताहारी हे काही या अमावास्येचं एकमेव नाव नाही. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये याला वेगळं नाव देण्यात आलं आहे.
आपलं शेजारी राज्य असणाऱ्या गुजरातमध्ये आणि उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये, आषाढी अमावास्येला ‘हरियाली’ अमावस्या म्हटलं जातं. तसंच दक्षिणेला तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यात, या दिवसाला चुक्कला अमावस्या असं म्हटलं जातं. उत्तरपूर्वेकडील ओडिसा राज्यात या अमावास्येचं नाव चितलगी अमावस्या असं आहे.
दीप पूजनाचं महत्त्व
गटारी अमावस्या म्हणजे नॉनव्हेज आणि दारूवर सढळहस्ते ताव मारा, एवढंच आपल्याला ठाऊक असतं. पण या दिवशी दीपपूजनाला विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रात गताहारी अमावास्येला, दीप अमावस्या असंही म्हटलं जातं.
मग मंडळी, यंदाच्या गताहारी अमावास्येला, पेटपूजेसह दिव्याची पूजा सुद्धा करणार ना? खाण्यापिण्याची मज्जा तर कराच, पण आपली परंपरा असणाऱ्या, गताहारी अमावास्येला आपल्या चालीरीती सुद्धा नक्कीच जपा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.