आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
एकीकडे तात्याविंचू, एकीकडे चौकट राजा, एकीकडे श्रीयुत गंगाधर टिपरे, तर एकीकडे ‘लगे रहो मुन्नाभाई’ सिनेमातील महात्मा गांधी; या माणसाचे किती निरनिराळे चेहरे आपण पाहिले आहेत. बरं तसं पाहायला गेलं तर, ना एखाद्या हिरोला शोभेल अशी चेहरेपट्टी, ना एखाद्या व्हिलनसारखा राकट चेहरा!
होय तेच ते, दिलीप प्रभावळकर… मनोरंजन विश्वामधील एक हरहुन्नरी आणि एव्हरग्रीन व्यक्तिमत्व!
आजही लोकांना धडकी भरवणाऱ्या तात्यविंचूचा हा बोलवता धनी आणि हलक्याफुलक्या वातावरणात, सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणारा बोक्या सातबंडेचा जन्मदाता! अशा या भन्नाट कलाकाराचा आज वाढदिवस… सर्वप्रथम या उत्कृष्ट कलाकाराला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
हसवाफसवीमधून प्रभावळकरांनी लोकांना पोट धरून हसायला भाग पाडलं. हसून हसून लोकांची पुरेवाट होईल, याची पुरेपूर काळजी घेतली. कॅमेऱ्यासमोर जितका दर्जेदार अभिनय त्यांनी केला, तितकाच किंवा कणभर अधिक दर्जा त्यांनी अभिनयात राखला तो नाट्यरसिकांसमोर सादरीकरण करताना.
त्यांच्या भूमिका प्रेक्षक आणि चाहते कधीही विसरणार नाहीत. याचं कारण म्हणजे कुठल्या भूमिकेत कधीपर्यंत अडकून राहायचं हे या माणसाला उत्तमरीत्या कळलंय. एखादा खेळाडू त्याचा सर्वोच्च खेळ करत असताना निवृत्त झाला, तर तो कायम स्मरणात राहतो. तसंच अभिनेत्याचंही असतं. प्रसिद्धी, पैसा मिळत असतो, पण कुठे आणि कधी थांबावं हे ज्याला कळतं तो जिंकला.
हसवाफसवी ऐन रंगात असताना, प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून असताना त्यांनी ७५० प्रयोगांमध्येच हसवाफसवी थांबवली. याविषयी मध्यंतरी एका मुलाखतीत ते म्हणाले होते, की भूमिकेबद्दल प्रेक्षकांनी टीका सुरु केली अशी परिस्थिती निर्माण होण्याच्या आत त्यांना थांबायचं होतं. आज रसिकांच्या मनात हसवाफसवीच्या ज्या आठवणी आहेत, त्या सगळ्या चांगल्या आठवणी आहेत.
त्यांच्या जवळपास सगळ्याच भूमिका आजही लोकांना स्मरणात आहेत, त्याचं कारण हेच असावं कदाचित; एखाद्या भूमिकेतून कधी बाहेर पडायचं हे त्यांना कळलं. खरंतर म्हणूनच प्रभावळकर हे एक उत्तम नट आहेत, उत्तम कलाकार आहेत.
त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाला होता, तो रुईया कॉलेजच्या रंगभूमीवरून… केमिस्ट्रीच्या अभ्यासक्रमात पदवी घेत असताना, त्यांनी अभिनायाकडे सुद्धा लक्ष दिलं आणि आज मोठं नाव कमावलं आहे.
आज एक उत्तम कलाकार म्हणून सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला हा अभिनेता, शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा अत्यंत काटेकोर होता. शिक्षण पूर्ण केलं तर पोटापाण्याचा प्रश्न सुटेल आणि मग अधिक जोमाने अभिनयाकडे लक्ष देता येईल, हे त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं होतं. शिक्षणाचा योग्य पाठपुरावा आणि अभिनयावरील निष्ठा यांचा योग्य मिलाफ साधल्यामुळेच, हा अभिनेता सगळ्यांच्या मनातील राजा माणूस बनला.
अशा या दमदार कलाकाराला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा अभिष्टचिंतन…!! या अप्रतिम कलाकाराची कारकीर्द अशीच बहरत राहो आणि आपल्यासारख्या रसिकांना उत्तम कलाकृती अनुभवण्याची संधी मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.