' आयुष्य गुलामगिरीत गेलं पण जाता-जाता औरंगाबाद शहर वसवणारा आफ्रिकन राजा! – InMarathi

आयुष्य गुलामगिरीत गेलं पण जाता-जाता औरंगाबाद शहर वसवणारा आफ्रिकन राजा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१६७० साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कवींद्र परमानंद ह्यांना “शिवभारत” ग्रंथाची रचना करण्याचा आदेश दिला.या ग्रंथात कवींद्र परमानंद ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रवर्णन केले आहे. या  ग्रंथात मलिक अंबर या मुस्लिम योद्ध्याचे वर्णन आढळते. परमानंद यांनी या ग्रंथात मलिक अंबरच्या शौर्याचे आणि युद्धकौशल्याचे वर्णन करत त्याची स्तुती केली आहे.

 

shivaji maharaj inmarathi

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज तसेच आजोबा मालोजी राजे या मलिक अंबरबरोबर लढल्याचे उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांत आढळतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मलिक अंबरचे वर्णन करताना कवींद्र परमानंद म्हणतात की ,”जसे भगवान कार्तिकेयांनी तारकासुराशी युद्ध करत अवतीभवती लढत असलेल्या देवांचे रक्षण केले. तसेच शहाजी राजे आणि इतर राजे मलिक अंबरच्या बरोबरीने मुघलांशी लढत होते.”

 

malik ambar inmarathi

 

कवींद्र परमानंद ह्यांनी मलिक अंबरचे वर्णन करताना “सूर्याप्रमाणेच शूर आणि शक्तिमान” हे शब्द वापरले आहेत. परंतु तो अत्यंत क्रूर मनुष्य होता असेही म्हणाले आहेत. म्हणूनच मलिक अंबरचे शत्रू त्याच्यापुढे भीतीने थरथर कापत असत असे म्हणतात. असा हा शूर योद्धा जो मृत्यूसमयी सुद्धा अस्ताला जाणाऱ्या सूर्याप्रमाणे दिसत होता तो आफ्रिकेत जन्माला आलेला एक गुलाम होता. त्यानेच औरंगाबाद ह्या शहराची स्थापना केली होती.

मलिक अंबरचा जन्म १५४८ साली इथियोपियामध्ये झाला होता.तो ओरोमो जमातीचा वंशज होता असे म्हणतात. त्याचे आधीचे नाव चापू असे होते. त्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे गरिबीला कंटाळून त्याच्या आईवडिलांनी त्याला गुलाम म्हणून विकून टाकले. त्याला विकत घेणाऱ्या मीर कासीम अल बगदादी याने त्याचे धर्मांतर करून मुसलमान केले आणि त्याचे नाव अंबर ठेवले.

अंबर लहानपणासूनच हुशार होता. त्याची ही हुशारी त्याच्या मालकापासून लपून राहिली नाही. मालकाने त्याला शिक्षण देऊन मोठे केले. नंतर अंबरला सैनिक म्हणून दुसऱ्या देशात लढण्यासाठी पाठवले गेले.

 

malik ambar 1 inmarathi

 

नंतर काही वर्षांनी त्याला येमेनला आणण्यात आले. तिथे परत त्याची विक्री झाली आणि त्याला बगदादच्या बाजारात आणले गेले. तिथेही त्याची तिसऱ्यांदा विक्री झाली आणि त्याला मक्केच्या एका मालकाने विकत घेतले. नंतर परत त्याला बगदाद मध्ये मीर कासीम अल बगदादीला विकले. या मीर कासीमने त्याला भारतात दख्खनला आणले.

भारतात आल्यावर त्याला चंगेज खान नावाच्या एका व्यक्तीने विकत घेतले. हा चंगेज खान अहमदनगरच्या सुलतानकडे मंत्री म्हणून कामाला होता आणि त्या आधी तो एक हबशी गुलाम होता.

मलिक अंबरच्या मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला त्याच्या मालकाच्या बायकोने गुलामीतून मुक्ती दिली. गुलामगिरीतून मुक्तता मिळाल्यानंतर त्याने लग्न केले. त्यानंतर त्याने काही काळ बिजापूरच्या सुलतानकडे नोकरी केली. त्याच ठिकाणी त्याला मलिक हे नाव मिळाले. त्याने बिजापूरच्या सुलतानकडची नोकरी थोड्याच दिवसांत सोडून निझामाच्या शाही सैन्यात प्रवेश मिळवला. थोड्याच काळात त्याच्या कर्तबगारीमुळे त्याने महत्वाचे आणि उच्च पद मिळवले.

 

bijapur sultan inmarathi

हे ही वाचा – शिवरायांचा हा योद्धा नसता तर अंदमान निकोबार ही बेटं भारताला कधीही मिळाली नसती

मलिक अंबरने त्याच्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे पथक उभे केले आणि त्याने निजामशाहीत प्रवेश मिळवला. तो अहमदनगरच्या निझामशाहीत मुर्तझा निजामशहा दुसरा याचा इसवी सन १६०७ ते १६२७ या काळात प्रधान होता.

तो युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत तर होताच शिवाय कर्तृत्ववान तसेच स्वामिनिष्ठ देखील होता. त्यानेच त्याच्या काळात दख्खन प्रांतातील मोडकळीस आलेल्या महसूल व्यवस्थेस नव संजीवनी दिली.

 

murtaz inmarathi

 

त्याने शेतजमीन महसूल पद्धतीत काही सुधारणा घडवून आणल्या तसेच शेतसाऱ्याचे नवे दर ठरवले. इसवी सन १६१४ नंतर महसूल हा धान्याच्या रूपात गोळा न करता पैश्यांच्या स्वरूपात भरण्याची सुधारणा त्याने घडवून आणली आणि महसुलाचा वाटा कमी केला.

हा वाटा शेतकऱ्यांच्या प्रत्येक वर्षाच्या उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा असल्याने तो शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाला. तसेच सततच्या युद्धांमुळे शासनाच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.

त्याच्या काळात उत्तरेत मुघलांकडून होणारे हल्ले थांबवण्यासाठी त्याने मोठे सैन्य तयार केले तसेच अनेक सुलतानांना निजामशाहीचे मांडलिक केले. त्याने जवळ्जवळ दहा वर्षे उत्तरेतील जहांगीरचे निजामशाही काबीज करण्याचे वारंवार होणारे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे जहांगीर मलिक अंबरला शत्रू समजत असे आणि त्याच्याविषयीचा राग चारचौघांत व्यक्त करीत असे. तो अंबरला “अपशकुनी”, “पांढऱ्या पायाचा”, “काळ्या तोंडाचा” वगैरे दूषणे देत असे.

मलिक अंबरने त्याची परंडा येथील राजधानी जुन्नर येथे हलवली आणि खडकी म्हणून एक नवे शहर वसवले. याच शहराचे नंतर औरंगजेबाने तेथील सत्ता मुघलांच्या हाती आल्यावर १६५० साली औरंगाबाद असे नामकरण केले.

 

junnar inmarathi

 

आपले बरेच आयुष्य गुलामीत काढले असले तरीही मलिक अंबर हा युद्धनीतीत पारंगत होता. त्यानेच दख्खन प्रदेशात गनिमी काव्याचा पहिल्यांदा अवलंब केला होता.

त्याने दिल्लीत शाहजहानला सत्ता काबीज करण्यात सहकार्य केले होते. शाहजहानची सावत्र आई नूर जहाँ हिला तिच्या जावयाला सत्तेवर आणायची इच्छा होती. परंतु मलिक अंबरच्या साहाय्याने शाहजहानने सत्ता मिळवली.

मलिक अंबरनेच अहमदनगरच्या सुलतानाला जनतेच्या मनातून ढासळलेले स्थान पुन्हा मिळवून दिले. कारण पूर्वी अकबराने अहमदनगरच्या सुलतानाचा पाडाव करून तिथे मुघलांची सत्ता आणली होती. त्यानंतर परत हा भाग शाहजहानच्या सत्तेखाली गेला. तेव्हा मलिक अंबरने शरणागती पत्करून मुघलांकडे अहमदनगर आणि बेरार भाग सुपूर्त केला.

 

nagar fort inmarathi

 

यानंतर मलिक अंबरने मुघलांशी लढा देताना मुघल सैन्याचे आक्रमण बऱ्याच वेळेला मोडून काढले तसेच अहमदनगरवर हल्ले देखील केले. लखुजी जाधव, मालोजी भोसले, शहाजी महाराज तसेच इतर काही मराठा सरदारांबरोबर एकत्र येऊन मलिक अंबरने अहमदरनगर किल्ला आणि अहमदनगर शहर मुघलांच्या हातून सोडवून आपल्याकडे आणले.

युद्धनीतीबरोबरच मलिक अंबरकडे दूरदृष्टी देखील होती. खडकी (औरंगाबाद)सारखे नवे शहर वसवताना त्याने आधुनिक सिंचनपद्धतीचा अवलंब केला. नव्या शहरात अनेक महाल बांधले अनेक आधुनिक सोयीसुविधांकडे बारकाईने लक्ष दिले. त्याच्या राज्यात खडकीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले तेव्हा त्याने खडकीच्या उत्तरेला असलेल्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेल्या भूगर्भातील पाण्याचा उपयोग करण्याचे ठरवले.

त्याच्या या निर्णयाला सुरुवातीला विरोध झाला. त्या पाण्याच्या ठिकाणाहून थेट खडकी शहरात पाणी यावे यासाठी त्याने कालवे बांधले आणि शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवला. ही विचारपद्धती त्या काळी नवी होती त्यामुळे याच्या दूरदृष्टीचे लोकांनी कौतुक केले.

 

british war inmarathi

 

त्याने आणखी पुढचा विचार करून स्वतःच्या अपत्यांचे मोठमोठ्या भारतीय अधिकाऱ्यांच्या परिवारात लग्न लावून दिले जेणे करून आफ्रिकन लोकांना भारतीय राजघराण्यांत स्थान मिळेल. मुघलांना टक्कर देण्यासाठी त्याकाळी ब्रिटिश, पोर्तुगीज आणि डच लोकांचे सहकार्य त्याने घेतले. ह्यांनी त्याला मुघलांशी लढण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरवली.

अशा या शूर, कर्तबगार योध्याचे १६२६ साली वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा फत्तेह खान सत्तेवर आला परंतु त्याची सत्ता फार काळ टिकली नाही. १६२९ साली फत्तेह खानाला मुघलांनी पकडून तुरुंगात टाकले.

 

aurangabaad 2 inmarathi

 

आज आपण औरंगाबाद हे शहर औरंगजेबाची दख्खनची राजधानी म्हणून ओळखतो. परंतु हे शहर वसवणारा मुघलांना धूळ चारणारा आफ्रिकन वंशाचा मलिक अंबर होता हे विसरून चालणार नाही. त्याच्या आठवणी आजही औरंगाबाद शहरात सापडतील.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?