क्रिकेटचे नेल्सन मंडेला – सर फ्रँक वॉरेल : प्रत्येक क्रिकेटरसिकाने वाचावा असा प्रवास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – महेश खरे
===
क्रिकेटला ‘सद्ग्रहस्थांचा खेळ’ (जंटलमनस् गेम) म्हटलं जातं, त्यात पूर्वीच्या क्रिकेटपटूंच्या दिलदारपणाचा मोठा वाटा आहे. वेस्ट इंडिजने जगाला लिअरी कॉन्स्टंटाईन, जॉर्ज हेडली, गारफिल्ड सोबर्स, क्लाईव्ह लॉइड, विव्हिअन रिचर्डस, मायकेल होल्डिंग, माल्कम मार्शल, ब्रायन लारा असे अनेक थोर क्रिकेटपटू दिले.
या सर्वांमध्ये आपल्या सज्जनपणा आणि मैदानावरील कामगिरी अशा दोन्ही कामगिरीमुळे उठून दिसणारा महान खेळाडू म्हणजे सर फ्रँक वॉरेल. एव्हर्टन विक्स, क्लाईड वॉलकॉट आणि फ्रँक वॉरेल हे क्रिकेट इतिहासातील प्रसिद्ध त्रिकूट, तीन ‘डब्ल्यू’ म्हणून लोकप्रिय होते.
बार्बाडोस बेटांवर १ ऑगस्ट १९२४ रोजी जन्मलेल्या फ्रँक वॉरेल यांना अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभले. पण या कालावधीत त्यांनी जगभरातील लोकांचे मन जिंकून घेतले.
वेस्ट इंडिजचा संघ इतर संघांप्रमाणे एका देशातील खेळाडूंचा नसून कॅरिबिअन प्रदेशातील वेगवेगळे पंधरा देश आणि बेटांवरील खेळाडूंचा असतो. सुरुवातीच्या काळात या संघात गोऱ्या खेळाडूंचे वर्चस्व असे, कर्णधारही गोराच असे. १९४६-४७च्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अष्टपैलू खेळाडू फ्रँक वॉरेलने आपल्या शैलीदार खेळाने सर्वांचे मन जिंकून घेतले.
१९५१ मध्ये तर त्यांची निवड ‘विस्डेन क्रिकेटिअर ऑफ द इअर’ म्हणून करण्यात आली. वेस्ट इंडिजमधील प्रसारमाध्यमे आणि क्रीडारसिकांच्या जोरदार मागणीमुळे त्यांच्याकडे १९६०-६१ च्या ऑस्ट्रेलिआ दौऱ्यात कर्णधारपद सोपवण्यात आले.
वेस्ट इंडीजचे ते पहिले कृष्णवर्णीय कर्णधार होते. त्यामुळे त्यांचा उल्लेख क्रिकेटचे नेल्सन मंडेला असाही केला जातो.
गुणवान असूनही एकसंध नसलेल्या या संघाची फ्रँक वॉरेल यांनी अत्यंत कुशलपणे बांधणी केली. ५ कसोटी सामन्यांच्या या दौऱ्यामध्ये वेस्ट इंडिजचा संघ २-१ अशा फरकाने हरला असला, तरी त्यांनी आपल्या खेळाने ऑस्ट्रेलियन क्रीडारसिकांची मने जिंकून घेतली.
एक कसोटी अनिर्णित राहिली, तर दुसरी कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिली ‘बरोबरीत सुटलेली’ कसोटी (टाय टेस्ट) म्हणून अजरामर झाली.
या दौऱ्यामध्ये वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी मैदानावर उत्तम कामगिरी आणि खिलाडूवृत्तीचे जे दर्शन घडवले त्याचा सूत्रधार त्यांचा कर्णधार फ्रँक वॉरेल होता. एका प्रसंगी पंचांच्या निर्णयावर नाखुषी दाखवणाऱ्या गॅरी सोबर्स या लोकप्रिय खेळाडूची वॉरेल यांनी खरडपट्टी काढली होती.
ही कसोटी मालिका संपल्यावर मेलबोर्न येथे हजारो ऑस्ट्रेलियन क्रीडारसिकांनी रस्त्यांमध्ये गर्दी आणि जल्लोष (टिकर टेप फेअरवेल) करून वेस्टइंडियन खेळाडूंना निरोप दिला. या मालिकेचा चषकही ऑस्ट्रेलियन कर्णधार रिची बेनॉ याला फ्रँक वॉरेल यांच्या हस्ते देण्यात आला.
सज्जनपणाने खेळत असले तरी फ्रँक वॉरेल हे अतिशय धाडसी कर्णधार होते. कसोटी निकाली व्हावी यावर त्यांचा भर असे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या १५ कसोटींपैकी ९ सामने त्यांचा संघ जिंकला तर २ हरला. उरलेल्या ४ पैकी २ मध्ये चौथ्या खेळीमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचे ९ खेळाडू बाद झाले होते. आणखी एक कसोटी ही क्रिकेट इतिहासात जगप्रसिद्ध अशी बरोबरीत सुटलेली (टाय टेस्ट) पहिली कसोटी होती.
===
हे ही वाचा – खांद्याला चेंडू लागला, अंपायरने सचिनला आऊट दिलं. तो क्षणभर स्तब्ध झाला आणि…
===
सामना सुरू असताना ते अतिशय शांत आणि संतुलित मनःस्थितीत असत. अनेकदा संघातील खेळाडू एकापाठोपाठ एक असे बाद होत असतानाही फ्रँक वॉरेल ड्रेसिंग रूममध्ये निवांत डुलकी घेत असत. यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या आधीचे ‘कॅप्टन कूल’ असे त्यांचे वर्णन करता येईल.
त्यांचा स्वभाव आनंदी आणि काहीसा मिश्किलही होता. टीका होत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मावळत नसे. पण आपली मते निर्भीडपणे आणि प्रसंगी आपल्या देशबांधवांच्या नाराजीची पर्वाही न करता व्यक्त करण्यासही ते कचरत नसत. खेळाप्रमाणेच त्यांची शैक्षणिक कारकीर्द लक्षणीय होती. त्यांनी मँचेस्टर विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.
एक दिलदार कर्णधार म्हणून लोकप्रिय असलेले फ्रँक वॉरेल उत्तम अष्टपैलू खेळाडूही होता. फलंदाज म्हणून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३९ तर कसोटीमध्ये ९ शतके काढली आहेत.
पाचशे धावांची भागीदारी दोनदा करणारे ते पहिले फलंदाज आहेत. (नंतर भारताच्या रवींद्र जडेजाने हा पराक्रम गाजवला आहे.)
हा पराक्रम त्यांनी वयाच्या विशीमध्येच गाजवला होता. पहिल्या पंचशतकी भागीदारीत त्यांचा वाटा ३०८ (नाबाद) तर जॉन गोडार्ड यांचा २१८ (नाबाद) धावांचा होता. त्यांनी ४०४ मिनिटांमध्ये ५०२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या वेळी त्यांनी ३३५ मिनिटांमध्ये ५७४ धावांची भागीदारी केली त्यामध्ये त्यांचा वाटा २५५ धावांचा तर वॉलकॉट यांचा ३१४ धावांचा होता.
चौफेर धावा मिळवण्याच्या फ्रँक वॉरेल यांच्या कौशल्यामुळे विरुद्ध संघाच्या कर्णधाराची क्षेत्ररचना करताना तारांबळ उडत असे. क्रिकेट इतिहासाचे व्यासमहर्षी मानल्या गेलेल्या नेव्हिल कार्ड्स यांनी फ्रँक वॉरेल यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचे दिलखुलास कौतुक केले होते.
तडाखेबंद फलंदाजीपेक्षा कौशल्यपूर्ण नजाकतभऱ्या फलंदाजीवर त्यांचा भर असे. त्यांच्या शैलीची तुलना काव्याशी केली जात असे. पहिल्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन खेळी संपेपर्यंत नाबाद राहिलेले ते पहिले वेस्ट इंडियन खेळाडू आहेत. गोलंदाज म्हणून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३४९ व कसोटीमध्ये ६९ बळी घेतले आहेत.
१९६२मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आला असताना वेगवान गोलंदाज चार्ली ग्रिफीथ याचा चेंडू भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यावर आदळून ते प्राणघातकरित्या जखमी झाले. यावेळी फ्रँक वॉरेल यांनी रुग्णालयात धाव घेऊन कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी रक्तदान केले. त्यांच्या या खिलाडूवृत्तीचा गौरव करण्यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बेंगॉल द्वारा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून सर फ्रँक वॉरेल दिवस साजरा करण्यात येतो.
२००९ पासून त्रिनिदाद ॲन्ड टोबॅगो या कॅरेबियन देशामध्ये सर फ्रँक वॉरेल मेमोरिअल ब्लड ड्राईव्हचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचा शुभारंभ नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
१९६३मध्ये यशाच्या शिखरावर असतानाच फ्रँक वॉरेल यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या पुढच्या वर्षीच त्यांना इंग्लंडच्या राणीकडून ‘सर’ ही पदवी देण्यात आली. निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलिआ आणि भारताच्या दौऱ्यावर त्यांनी वेस्टइंडिज संघाच्या व्यवस्थापकाची (मॅनेजर) भूमिका बजावण्यास सुरुवात केली.
भारतात असतानाच त्यांना रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिआ) असल्याचे निदान झाले. दौरा संपवून जमैका येथे गेल्यावर १३ मार्च १९६७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या सज्जन खेळाडूच्या स्मृतिप्रीत्यर्थ लंडनमधील सुप्रसिद्ध वेस्टमिनिस्टर ॲबे या चर्चमध्ये प्रार्थनासभा झाली. एखाद्या खेळाडूसंदर्भात अशी सभा या चर्चच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली. वॉरेल यांच्या मृत्यूनंतर इंग्लंडमधील रॅडक्लिफ गावातील टाऊन हॉल या इमारतीवरील झेंडा त्यांच्या सन्मानासाठी अर्ध्यावर उतरवण्यात आला. त्यांच्या गौरवार्थ तेथे एका रस्त्याला ‘वॉरेल क्लोज’ असे नाव देण्यात आले आहे.
सर फ्रँक वॉरेल यांच्या गौरवार्थ १९८८ मध्ये बार्बाडोसमध्ये टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर मार्च २००२ मध्ये सेंट्रल बँक ऑफ बार्बाडोसने त्यांचे रेखाचित्र असलेली ५ डॉलर्स मूल्य असलेली विशेष नोट चलनात आणली गेली. असा मान मिळालेले ते एकमेव क्रिकेटपटू असावेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.