Site icon InMarathi

रहमानने मायकल जॅकसनच्या भेटीला नकार का दिला? वाचा काय होती त्याची अट!

michael jackson and a r rahman inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अल्लाह रक्खा रहमान उर्फ ए आर रहमान म्हणजे भारतीय संगीतक्षेत्राला लाभलेली एक सुंदर देणगी आहे. त्याने जगभरात भारतीय संगीताला एक नवी ओळख दिली. जो शब्दांत कमी पण आपल्या संगीताद्वारे जास्त व्यक्त होतो, असा हा प्रतिभावान संगीतकार भारतातल्या लोकांचा लाडका तर आहेच परंतु भारताबाहेर सुद्धा रहमानच्या चाहत्यांची कमतरता नाही.

 

 

ए आर रहमानचा जन्म ६ जानेवारी १९६६ रोजी चेन्नईमध्ये झाला. जन्माच्या वेळेला त्याचे नाव दिलीप कुमार असे होते. रहमानला त्याच्या वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला आहे.

त्याचे वडील आर के शेखर हे मल्याळी चित्रपटांचे संगीतकार होते. परंतु रहमान केवळ ९ वर्षांचा असतानाच त्याच्यावरील पितृछत्र हरपले. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर रहमानच्या संपूर्ण कुटुंबाला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले.

सत्तरच्या दशकात रहमानच्या कुटुंबाने धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला. रहमानने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अगदी लहानपणापासूनच संगीतसाधना सुरु केली. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मास्टर धनराज यांच्याकडे झाले.

वयाच्या अकराव्या वर्षांपासून रहमानने त्याचा बालमित्र शिवमणीबरोबर बँड रूट्ससाठी की-बोर्ड वाजवण्यास सुरुवात केली. त्याने काही काळ संगीतकार इलियाराजा यांच्याबरोबर काम केले.

रहमानने त्याचे पहिले गाणे १९९१ साली रेकॉर्ड केले. त्याचा पहिला स्टुडिओ त्याच्या घराच्या मागच्या अंगणात होता. सुरुवातीला त्याने जाहिराती आणि डॉक्युमेंटरीजना संगीत दिले. नंतर त्याने दाक्षिणात्य चित्रपटांना संगीत दिले.

 

 

त्याचा पहिला हिंदी चित्रपट १९९२ साली आलेला रोजा हा होता. रोजाची सुमधुर गाणी आजही रसिकांच्या मनात आहेत. त्यानंतर रहमानने त्याच्या खास वेगळ्या उच्च दर्जाच्या संगीताने रसिकांच्या मनावर अशी मोहिनी घातली जी आजही कायम आहे.

आज आपण रहमानचे संगीत न सांगता ओळखू शकतो. १९९७ साली भारताला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली तेव्हा रहमानने “वंदे मातरम” हा अल्बम बनवला. हा अल्बम खूप यशस्वी ठरला.

रहमानचे संगीत रसिकांच्या हृदयाला स्पर्शून जाते. म्हणूनच त्याला १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, १ दा गोल्डन ग्लोब पुरस्कार, सहा वेळा तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, ६ वेळा नॅशनल फिल्म अवॉर्ड. १ दा ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्टस् पुरस्कार आणि इतर अगणित पुरस्कार मिळाले आहेत.

२३ फेब्रुवारी २००९ ची सकाळ भारतीयांसाठी एक सुंदर बातमी घेऊन आली. रहमानला एक नव्हे तर दोन ऑस्कर पुरस्कार मिळाल्याच्या बातमीने रहमानच्या आणि भारताच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला.

 

 

स्लमडॉग मिलियनेयर या चित्रपटाच्या संगीतासाठी रहमानला या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाली.

अर्थात हा पुरस्कार मिळण्याआधी सुद्धा “मोझार्ट ऑफ मद्रास” म्हणून रहमानच्या संगीताची कीर्ती भारताबाहेर पोहोचली होती.

मायकल जॅकसनला भेटण्याआधी…

तर अशा या रहमानची कीर्ती किंग ऑफ पॉप मायकल जॅकसनच्या कानावर पडली नसती तरच नवल! हे दोन महान कलाकार एकमेकांना भेटू इच्छित असतीलच. परंतु रहमानने मात्र मायकल जॅकसनला भेटायला एक अट घातली होती. त्याची अट अशी होती की जोवर तो ऑस्कर पुरस्कार मिळवत नाही तोवर तो मायकल जॅक्सनला भेटणार नाही.

 

 

फार कमी लोक दिलेल्या वचनाला जागतात आणि त्यात जर स्वतःला वचन दिले असेल, तर त्या वचनाला बांधील फार कमी लोक असतात. पण रहमानने मात्र ऑस्कर मिळवून दाखवण्याचे स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले आणि मायकल जॅक्सनला भेटण्यासाठीची अट देखील पूर्ण केली.

या घटनेबद्दल रहमान म्हणतो, की त्याने मॅनेजरला मायकल जॅक्सनची भेट घेण्याचा विचार बोलून दाखवला होता. तो मायकल जॅक्सन आणि रहमानची भेट घडवू शकेल का? असं त्याला विचारक होतं. त्याचा मित्र म्हणाला, की “मी मायकल जॅक्सनला मीटिंगविषयी इमेल पाठवू शकतो.” परंतु तेव्हा ती भेट काही कारणाने होऊ शकली नाही.

जेव्हा रहमानला स्लमडॉग मिलियनेयर चित्रपटाच्या संगीतासाठी ऑस्कर नामांकन मिळाले तेव्हा त्याच्या मॅनेजरने त्याला सांगितले की मायकल जॅक्सनने रहमानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

 

तेव्हा अचानक रहमानने ठरवले, की जर त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला तरच तो मायकल जॅक्सनची भेट घेईल, अन्यथा किंग ऑफ पॉपला प्रत्यक्ष भेटण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहील. सुदैवाने रहमानला एक नव्हे तर दोन ऑस्कर मिळाले आणि दोन महान संगीतकार एकमेकांना भेटले.

तो त्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता, असं त्या भेटीविषयी सांगताना रहमान नेहमी म्हणतो. मायकल जॅक्सनने त्याचे ते खास ग्लोव्ज आणि गॉगल घालून रहमानसाठी दार उघडले. या दोघांनी चक्क दोन तास गप्पा मारल्या. या भेटीत संगीताबरोबरच प्रेम, द्वेष अशा अनेक विषयांवर ते बोलले.

“जय हो” या गाण्याविषयी सुद्धा त्यांची चर्चा झाली. त्याने रहमानला सांगितले की जसे रहमानचे संगीत हृदयातून जन्माला येते, त्याचप्रमाणे त्याचा डान्स देखील त्याच्या हृदयातून येतो. असे बोलून तो लगेच उठला आणि त्याने रहमानला डान्स स्टेप्स करून दाखवल्या. हे बघून रहमान निशब्द झाला होता.

 

 

रहमानला ऑस्कर मिळाल्यानंतर भारतात जल्लोषाचे वातावरण होते. भारत सरकारने त्याला पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. इतका यशस्वी संगीतकार असूनदेखील रहमानचे पाय आजही जमिनीवर आहेत. नम्रता त्याच्या स्वभावातून आणि वागण्यातून पदोपदी जाणवते. रहमानचे संगीत आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करते. या महान संगीतकाराला मानाचा मुजरा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version