Site icon InMarathi

‘सिंधू’ हैं हम, ‘वतन’ हैं ‘बॅडमिंटन’ हमारा… ‘फुलराणी’चं यश दिसतंय, त्याग सुद्धा समजून घ्या!

p v sindhu inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी क्रिकेटच बघणाऱ्या अनेक भारतीयांना, बॅडमिंटन कशाशी खातात हे नेमकं कळूही शकणार नाही. उन्हळ्याच्या सुट्टीत, रात्रीचा टाइमपास म्हणून बॅडमिंटन खेळताना सुद्धा घामटा निघतो. नकोनकोसं होऊन जातं, आणि पी. व्ही. सिंधू, गेली १० वर्ष सातत्याने हाच खेळ खेळतेय; खेळतेय नव्हे तर जगतेय. तेसुद्धा देशाचं प्रतिनिधित्व करत, जागतिक पातळीवर!

अवघ्या २६ व्या वर्हसी तिने मिळवलेलं यश आपल्या सगळ्यांना दिसतंय; प्रतिस्पर्ध्याने तिच्याकडे धाडलेलं फूल, अर्थात शटल सिंधूला दिसत असेल, त्याहूनही स्पष्ट दिसतंय हे यश आपल्याला. रिओ ऑलिम्पिकमधली २२ वर्षांची कोवळी पोर, देशासाठी पदक घेऊन आली. तिनेच या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा कांस्य पदकावर नाव कोरलं आणि इतिहास घडवला.

 

 

सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकावर आपलं नाव कोरणारी ती पहिली भारतीय महिला ठरलीय. गेले काही दिवस तिचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे, ती याच कारणासाठी…

तिचं हे यश दिसत असलं, तरी त्यासाठी तिने केलेला त्याग, तिची अविश्रांत मेहनत आपल्याला कधीच दिसू शकणार नाही. या स्पर्धेतील रौप्य पदक विजेती मीराबाई चानू हिला डॉमिनोजने आयुष्यभरासाठी फुकट पिझ्झा देण्याचं सांगितलं असल्याचं तुम्हाला माहित असेल. आहेत की नाही ते हुशार? कारण त्यांना पक्कं ठाऊक आहे, अशा खेळाडूंसाठी हे असले पदार्थ वर्ज्यच!

जे जिभेला चांगलं वाटतं, ते शरीराच्या आरोग्यासाठी कधीच चांगलं नसतं, हे आपण आजी, आई वगैरे मंडळींकडून नेहमीच ऐकलं असेल. हाच त्याग सिंधूनेही केलाय. काहीही, कितीही आवडत असलं, तरी जिभेवर ताबा ठेवणं.

देशाला मान ताठ करायला लावणारी ही ‘फुलराणी’ अवघ्या २६ वर्षांची आहे. म्हणजेच तिच्या वयाची मंडळी गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसोबत बाबू-शोना, करत असताना किंवा घराची जबाबदारी वडिलांच्या खांद्यावरून स्वतःच्या खांद्यावर घेतली म्हणून अभिमान बाळगत असताना, ती देशाचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जावं यासाठी झटतेय.

 

 

त्यासाठी तिने काय पणाला लावलंय असा प्रश्न विचाराल, तर त्याचं उत्तर आहे, स्वतःचं बालपण आणि तारुण्य…

अंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरुवात करण्यापासून ते ऑलिम्पिकचं स्वप्न पाहण्यापर्यंत कित्येक खेळाडूंची अवघी कारकीर्द संपून जाते. सिंधूचं तसं तर झालं नाहीच, उलट सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये तिने पदक पटकावलंय.

एक पायरी पुढे गेलो की रौप्य पदक निश्चित होणार आणि सुवर्णपदकाचं दार सताड उघडं होणार, हे माहित असताना तो सामना हरणं सोपं नाही. हा सामना हरल्यावर, पुन्हा मागे फिरून रौप्य पदकाच्या सामन्यात आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी करणं सुद्धा सोपं नाही. ‘सिंधू’ हे नाव धारण करणारी भारतीय महिलाच ते करू शकते. जे तिने करून दाखवलंय. हे कांस्य फार फार मोठंय… आभाळाएवढं!!

 

 

पुल्लेला गोपीचंद हे नाव सिंधूचे परीक्षक म्हणून माहिती असणं, प्रकाश पदुकोण म्हटलं की बडमिंटनच्याही आधी दीपिका आठवणारी काही मंडळी या देशात आहेत. अशा या देशात, सायना नेहवालने बॅडमिंटनला नव्याने ‘प्रकाश’झोतात आणलं आणि तेच कार्य अधिकाधिक पुढे नेण्याचं काम आज सिंधू सुद्धा करतेय…

रिओ ऑलिम्पिकहून अधिक गर्व या पदकाबद्दल वाटतो आणि वाटत राहील, याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, यावेळी तिच्यावर असणारा दबाव! तिच्या वयाची इतर मंडळी साध्या जबाबदाऱ्यांचं ओझं पेलण्याचा कसाबसा प्रयत्न करत असताना, तिने मात्र थेट १३० करोड लोकांच्या अपेक्षांचं ओझं तिच्या सक्षम खांद्यांवर पेललं.

उपांत्य सामना हरल्यावर, खचून न जाता त्याच खांद्यांची ताकद दाखवत, तिने कांस्य पदकावर नाव कोरलं. भारताच्या पदकांच्या छोट्याशा यादीत भर घातली जाईल याची काळजी घेतली. तिच्या परीक्षकांचा, स्वतः चांगले व्हॉलीबॉलपटू असणाऱ्या पालकांचा आणि विशेषतः तिच्यासाठी पैसा ओतणाऱ्या प्रायोजकांचा भ्रमनिरास होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी तिने घेतली.

 या प्रायोजकांच्या अपेक्षांचं ओझं, कदाचित १३० करोड भारतीयांपेक्षा कणभर जास्तही असेल, नाही का?

 

 

अभ्यासापलीकडे जाऊन, क्रिकेट हा सुद्धा करियरचा पर्याय असू शकतो, हे आज अनेकांनी हळूहळू मान्य करायला सुरुवात केली आहे. त्यातच आता बॅडमिंटन या खेळाची भर पडण्याच्यादृष्टीने पावलं टाकली जायला हरकत नाही. सिंधू आणि सायनासारख्या, भारतीय महिला, महिला सक्षमीकरणासह हेसुद्धा काम नकळतपणे आणि चोख पार पडतायत असं म्हणायला हवं.

त्यामुळे, “माझ्या मुलगा/मुलगी अगदीच करिअर फोकस्ड आहे. बॅडमिंटनपटू होण्याचं स्वप्न आहे” असे संवाद पालकांच्या ओठी रुळू लागलेत, अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईलही. अर्थात, ही असामान्य कामगिरी करण्यासाठी अनेक आवडत्या गोष्टींना तिलांजली देऊन, सामान्यांपेक्षा वेगळं जीवन जगावं लागतं, हे ध्यानात ठेवावं लागेलच!

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version