Site icon InMarathi

१०० पेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या देशाचा डोलारा चक्क दोन खांबांवर टिकून आहे!

sealand inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

या जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. अशा गोष्टींबद्दल ऐकले, की त्यांच्या खरेपणाविषयी मनात शंका येते. अशीच एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे सिलॅन्ड नावाचा देश. हा इतका छोटा देश आहे, की त्याला मायक्रोनेशन म्हणतात. हा एक अपरिचित देश आहे. या देशाबद्दल फार कुणाला माहिती नाही.

 

 

सिलॅन्डची जन्मकथा

१९६६ च्या ख्रिसमस ईव्हला पॅडी रॉय बेट्स हा निवृत्त ब्रिटिश सैन्य अधिकारी इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावरून त्याची छोटी बोट घेऊन नॉर्थ सीमध्ये निघाला. घरी कुणालाही न सांगता ऐन सणाच्या दिवशी तो मध्यरात्री गुपचूप घराबाहेर पडला होता, कारण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच शिजत होते.

त्याला त्याच्या बायकोला, जोआनला ख्रिसमसची खास भेट द्यायची होती; एक अशी भेट जिची कल्पना देखील कुणी करू शकणार नाही.

पॅडी रॉय बेट्स बोटीतून नॉर्थ सीमध्ये सात मैल अंतर कापून एका ठिकाणी पोहोचला. तिथे एक हुक आणि दोरीच्या साहाय्याने एका दुर्लक्षित इमारतीवर चढला. ती इमारत म्हणजे समुद्रात दोन खांबांवर बांधलेला एक प्लॅटफॉर्म होता, जो बऱ्याच वर्षांपासून वापरात नव्हता.

त्या प्लॅटफॉर्मवर चढल्यावर त्याने त्यावर स्वतःचा मालकी हक्क जाहीर केला आणि त्याठिकाणचे नाव सिलॅन्ड असे ठेवून ते ठिकाण जोआनला ख्रिसमसची भेट म्हणून दिले.

पॅडी रॉय बेट्सने त्याच्या बायकोला दिलेली ही भेट म्हणजे कुठला आलिशान राजमहाल किंवा पॉश हॉटेल नव्हते. ती इमारत म्हणजे १९४० च्या दशकात दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान थेम्स नदीच्या आणि इसेक्स भागाच्या संरक्षणासाठी बांधलेले रफ्स टॉवर्स किंवा हिज मॅजेस्टीज फोर्ट होते. हे टॉवर्स म्हणजे जर्मन हवाई हल्ले रोखण्यासाठी बांधलेले अँटी-एयरक्राफ्ट प्लॅटफॉर्म होते.

 

 

या इमारतीला नंतर पॅडी रॉय बेट्सने एक स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले, तर हा जगातील सर्वात लहान देश आहे. जरी हे ठिकाण इंग्लंडच्या किनाऱ्यापासून जवळ असले तरीही ते इंग्लंडच्या सागरी सीमेच्या बाहेरच्या समुद्री भागात असल्याने त्या ठिकाणाला इंग्लंडचा भाग समजले जात नाही. परंतु या देशाला कुठलीच आंतरराष्ट्रीय मान्यता नाही.

===

हे ही वाचा – एका देशात जेवायचं आणि दुसऱ्या देशात झोपायचं… अजब गावाची गजब गोष्ट…!

===

या छोट्याशा देशाविषयी थोडंसं…

असा हा ‘प्रिन्सिपालिटी ऑफ सिलॅन्ड’ हा देश ‘नॉर्थ सी’मध्ये आहे. नॉर्थ सी म्हणजे अटलांटिक महासागराचाच एक समुद्र होय जो ग्रेट ब्रिटन, नॉर्वे, जर्मनीची दोन राज्ये आणि नेदरलँड्स यांच्या मध्यभागी आहे.

इंग्लिश खाडी नॉर्थ सीला अटलांटिक महासागराशी जोडते. तर हा सिलॅन्ड नावाचा देश हा इंग्लंडच्या सफोल्क प्रदेशापासून १२ किमी आत समुद्रात आहे. हा देश म्हणजे कुठलीही जमीन नसून, दोन खांबावर उभा असलेला एक प्लॅटफॉर्म आहे.

 

 

या प्लॅटफॉर्मला एचएम फोर्ट रफ्स किंवा रफ्स टॉवर असे म्हणतात. हे रफ्स टॉवर म्हणजे ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात शस्त्रास्त्रे आणि युद्धासाठी बांधलेला सागरी किल्ला होय. ही इमारत गाय अँसन माऊंसेल नावाच्या एका ब्रिटिश सिव्हिल इंजिनिअरने बांधली होती.

या सगळ्या रफ्स फोर्ट्सना ‘हिज मॅजेस्टीज फोर्ट्स’ किंवा माऊंसेल सी फोर्ट्स असे म्हणतात. इसेक्समधील हार्वीच बंदराच्या सुरक्षेसाठी आणि जर्मन हवाई हल्ले परतवून लावण्यासाठी हे टॉवर्स बांधण्यात आले होते.

दोन टेनिस कोर्ट मिळून जितकी जागा होईल, तेवढे या देशाचे क्षेत्रफळ आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रफ्स टॉवर्सवर शेकडो ब्रिटिश सैनिक तैनात होते. त्यांच्याजवळ अँटी एयरक्राफ्ट बंदुका आणि इतर अनेक शस्त्रास्त्रे होती. हे सैन्य नाझी जर्मन लढाऊ विमानांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवत असे.

दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र रफ्स टॉवर्सचे काहीच काम उरले नाही. दुसऱ्या महायुद्धात असे अनेक टॉवर्स बांधण्यात आले होते. महायुद्ध संपल्यानंतर हे टॉवर्स नष्ट केले गेले, फक्त हे टॉवर मात्र तसेच राहिले आणि नंतर दुर्लक्षित झाले.

१९६७ साली पॅडी रॉय बेट्स याने रफ्स फोर्ट्सचा ताबा घेऊन, त्याला एक स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. स्वतःला त्या राष्ट्राचा मालक घोषित केले. बेट्स याने हे फोर्ट्स एका पायरेट रेडिओ चॅनलकडून हस्तगत केले, कारण तिथे त्याला स्वतःचे रेडिओ स्टेशन सुरु करायचे होते.

 

 

दुसऱ्या महायुद्धानंतर हे रफ्स टॉवर दुर्लक्षित होते आणि उपयोगात नव्हते तेव्हा १९६५ साली जॅक मूर, त्याची मुलगी जेन यांनी त्या ठिकाणी वंडरफूल रेडिओ स्टेशन सुरु केले. पण या रेडिओ स्टेशनला परवाना नसल्याने ते एक पायरेट रेडिओ स्टेशन ठरले होते.

२ सप्टेंबर १९६७ रोजी रफ्स टॉवरवर, मेजर पॅडी रॉय बेट्स याने ताबा मिळवला, कारण त्याला तिथे स्वतःचे रेडिओ इसेक्स नावाचे एक रेडिओ स्टेशन सुरु करायचे होते. मात्र त्याच्याकडे सगळी उपकरणे असून देखील त्यांनी रेडिओ स्टेशन सुरु केले नाही.

त्यानंतर त्यांनी रफ्स टॉवर हे एक वेगळे राष्ट्र म्हणून घोषित केले आणि त्याचे नाव प्रिन्सिपालिटी ऑफ सिलॅन्ड असे ठेवले. बेट्सने स्वतःला त्या राष्ट्राचा राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच मालक म्हणून घोषित केले.

 

 

१९७५ साली बेट्सने या राष्ट्राची घटना देखील लिहिली तसेच राष्ट्रीय झेंडा, राष्ट्रगीत ,चलन आणि पासपोर्ट देखील काढले. इंग्लिश ही या देशाची अधिकृत भाषा आहे. सिलॅन्ड डॉलर हे इथले चलन आहे. एका सिलॅन्ड डॉलरची किंमत एक अमेरिकन डॉलर इतकी आहे.

सध्या या राष्ट्राची लोकसंख्या फक्त २७ आहे. आजवर या देशाचे केवळ ३०० पासपोर्ट इश्यू करण्यात आले आहेत. लोकांनी या देशासाठी भरपूर अनुदान दिले. देशाचा संपूर्ण खर्च अनुदानावर चालतो. जरी हा देश जगात सगळ्यात लहान असला तरीही या देशात इंटरनेटची सुविधा तसेच इतर आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे.

९ ऑक्टोबर २०१२ ला पॅडी उर्फ पॅट्रिक रॉय बेट्स यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मायकल हा उत्तराधिकारी आहे. केवळ दोन खांबांवर अख्खा देश कसा उभा राहतो हे बघण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी भेट देतात.

===

हे ही वाचा – या रेल्वे स्टेशनला नावच नाही…! यामागची कहाणी वाचाच…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version