आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
जगभरात अनेक ठिकाणी आपण वाचतो की विशिष्ट गोष्टींसाठी ‘नो एन्ट्री’ असा फलक लावलेला असतो. काही ठिकाणी पुरुषांसाठी, महिलांसाठी, लहान मुलांसाठी, प्राण्यांसाठी विशिष्ट फलक असतात. काही ठिकाणी पोषाखासंबंधी नियम सांगणारे फलक लावलेले असतात. त्या त्या ठिकाणी हे नियम पाळण्याशिवाय पर्याय नसतो.
अशाच एका ठिकाणाबद्दल थोडंसं…
ग्रीस मधील एगियन समुद्रामधील माऊंट एथॉस हे अत्यंत प्राचीन ठिकाणांपैकी एक आहे. येथे रशियन भिक्षुक जवळपास १००० वर्षांपासून राहत आहेत. सर्वात मोठे बेट असणाऱ्या या ठिकाणी महिलांना आणि प्राण्यांमधील माद्यांनाही प्रवेश निषिद्ध आहे.
हा पर्वत ग्रीसमध्ये असून तो ‘इस्टर्न आर्थोडॉक्स चर्च’द्वारे चालवला जातो. तिथे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही. ग्रीसमधून बोटीने जाणं हा एकमेव पर्याय आहे. तसेच तिथे गेल्यावर तुम्हाला प्रथम तुमच्या पासपोर्टची एक प्रत माऊंट अथॉसच्या ऑफिसमध्ये द्यावी लागते. दिवसाला साधारण १०० भिक्षुक आणि १० सामान्य पुरुष तीन रात्रींच्या मुक्कामासाठी येतात. ही मंडळी येथील २० मठांपैकी एकात राहतात.
माऊंट एथॉसचा इतिहास
असं म्हणतात की पूर्वापार ख्रिश्चन, दुसऱ्या शतकात तिथे आले आणि नंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी दररोज प्रार्थना करण्याची प्रथा सुरु केली.
येथील मठ हे आजही पूर्वीच्या काळानुसारच आहेत ज्यात रेडिओ, टीव्ही अशा गोष्टी अजिबात नाहीत. तसेच येथे येणाऱ्या प्रवाशांमधील कोणाकडेही फोन किंवा कार दिसणार नाही. त्यामुळे येथे राहणाऱ्यांचे आयुष्य फार शांत आहे. पहाटे ३.३० च्या प्रार्थनेसाठी ते चेस्टवूड लाकडाचा वापर करतात. त्याच्या आवाजाने त्यांना जाग येते. यावरून असाही निष्कर्ष आहे, की माऊंट एथॉस हे चर्चच्या घंटेपेक्षाही जुन्या काळातील आहे.
===
हे ही वाचा – विचित्र वाटेल, पण घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलांना हे मंदिर देतं आश्रय….!!
===
इथे येणारे लोक आपल्या घड्याळातील वेळ सात तास मागे ठेवतात. तसेच संपूर्ण जगात १६ व्या शतकातील ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर होत असताना, माऊंट एथॉसमध्ये रोमन साम्राज्यातील ज्युलियन कॅलेंडरचा वापर होतो. त्यामुळे त्यांच्या कॅलेंडर नुसार ते १३ दिवस मागे आहेत.
महिलांना प्रवेश नाही
महिलांना १००० वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रवेश निषिद्ध असून त्यांना या बेटाच्या ५०० मीटर अंतरावर सुद्धा येऊ दिलं जात नाही. यामागील महत्वाचे कारण म्हणजे पुरुषांच्या मठांमध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो.
ब्रह्मचर्य पाळण्यासाठी स्त्रियांना दूर ठेवणे हा पर्याय निवडला जातो. माऊंट एथॉस हे बेट असले, तरी ते एक मठ म्हणूनच ओळखले जाते.
व्हर्जिन मेरी जेव्हा सायप्रसला जायला निघाली, तेव्हा ती एथॉस पर्वतावर उतरली होती. तिला ती जागा इतकी आवडली की तिने तिच्या मुलाला सांगितलं, की ती जागा तिच्यासाठी ठेवावी. त्याने ही गोष्ट मान्य केली आणि या जागेला ‘द गार्डन ऑफ द मदर ऑफ गॉड’ या नावाने ओळखले जाऊ लागले. ती एकमेव महिला माऊंट एथॉसवर महिलांचे प्रतिनिधित्व करते.
मांजरी वगळता इतर पाळीव प्राण्यांच्या माद्यांनाही येथे प्रवेश निषिद्ध आहे. येथे आजूबाजूच्या परिसरात बऱ्याच मांजरी आहेत. हजार वर्षांहून अधिक काळ तिथे कुणीही स्त्री गेलेली पाहिली नाही. प्रसिद्ध ब्रिटिश प्रवासी रॉबर्ट कर्झन यांनी व्हिक्टोरियन काळात माऊंट एथॉसला भेट दिली तेव्हा त्यांना एक अनाथ मुलगा भेटला ज्याला तेथील भिक्षुकांनी वाढवले होते.
महिलांचा प्रवेश करण्याचा प्रयत्न
येथे महिलांना बंदी असूनही काहीवेळा महिलांनी यायचा प्रयत्न केला आहे. १९४६ ते १९४९ दरम्यान झालेल्या ग्रीक युद्धात माऊंट एथॉसने शेतकऱ्यांच्या कळपासाठी एक अभयारण्य दिले. प्राण्यांवर छापा टाकण्यासाठी आलेल्या मुली आणि महिलांनी प्राण्यांचा पाठलाग करताना एथॉसमध्ये प्रवेश केला.
१९५३ मध्ये ग्रीक महिला मारिया पोइमेनिडोने पुरुषांचे कपडे घालून एथॉसला तीन दिवसांची भेट दिली. त्यामुळे असा कायदा करण्यात आला की जी महिला एथॉसमध्ये प्रवेश करेल तिला १२ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होईल. म्हणूनच इथे १८ वर्षांखालील वयोगटात असणाऱ्या मुलांसाठी सुद्धा निराळे कायदे आहेत. दाढी-मिशा आल्या नसतील, तर त्यांना माऊंट एथॉसमध्ये प्रवेश दिला जात नाही.
महिलांनी वेषांतर करून या पर्वतावर प्रवेश मिळवू नये, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
माऊंट एथॉसमध्ये आजही पिवळा झेंडा फडकवतात ज्यात दोन डोकी असलेला गरुड असून, त्याने तलवार आणि क्रॉस धारण केलेला आहे. हा झेंडा मध्ययुगीन पॅलेओलॉगचा झेंडा असून तो बायझंटाईन साम्राज्याचा शेवटचा सत्ताधारी असणाऱ्या राजवंशच्या काळातील आहे.
रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले. माऊंट एथॉस हे पृथ्वीवरील शेवटचे ठिकाण आहे जिथे राहणाऱ्या व्यक्ती रोमन साम्राज्याच्या झेंड्याखाली राहतात.
आजही जगात अशा काही जागा आहेत, जिथे महिलांना जाण्यास मज्जाव आहे. काही ठिकाणी महिला तिथे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा वाद चालूच असून त्या विरोधासोबतच त्यामागील कारण काय आहे हे शोधणं देखील महत्वाचं ठरतं.
माऊंट एथॉसवर स्त्रियांना प्रवेश नसणं, याचं कारण तिथे असणारं भिक्षुकांचं वास्तव्य असं सांगितलं जातं. आता ही गोष्ट योग्य की अयोग्य, हे ज्याचं त्याने ठरवावं, मात्र गेली अनेक वर्षं, ही प्रथा पाळली जातेय हे मात्र खरं…!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.