Site icon InMarathi

‘सारे जहाँ से अच्छा’ हे अजरामर काव्य रचणाऱ्या कवीला हवा होता स्वतंत्र मुस्लिम देश

iqbal inmarathi1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

शाळेत असतानाची स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाची प्रत्येकाची आठवण म्हणजे पांढराशुभ्र गणवेश, शिस्तीत केलेलं झेंडावंदन, शाळेतील देशभक्तीपर कार्यक्रम, प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेल्या थोरामोठ्यांची भाषणं आणि एकसुरात म्हटलेलं “सारे जहाँ से अच्छा” हे देशभक्तीपर गीत!

 

 

शाळेत एकसुरात हे गीत गाताना “हिंदी हे हम, वतन है हिंदोस्तान हमारा” ह्या ओळी म्हणताना अंगावर काटा उभा राहिला नाही तरच नवल! इतर कुठलं देशभक्तीपर गाणं आठवो न आठवो, हे गाणं सगळ्यांचंच तोंडपाठ आहे. अखंड हिंदुस्थानचे वर्णन करणारे हे अजरामर गीत रचणारे कवी इकबाल यांनी नंतर मात्र पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हातभार लावला ही एक आश्चर्याची आणि दुर्दैवी गोष्ट आहे.

नियतीचा खेळ म्हणजे तराना -ए- हिंद लिहिणाऱ्या, “मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना” या ओळी रचणाऱ्या कवी इकबाल यांनीच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना पहिल्यांदा मांडली होती.

 

 

“मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना” म्हणणारे इकबाल शेवटी धर्माच्याच रस्त्याने गेले. भारतासाठी अजरामर गीत लिहिणाऱ्या इकबाल यांना पाकिस्तानचे राष्ट्रकवी म्हणून ओळखले जाते. तसेच स्वतंत्र पाकिस्तानचे स्वप्न पाहिलेला पहिला माणूस म्हणून आजही मोहम्मद इकबाल यांचे नाव प्रेषित पैगंबर व कायदेआझम जीना यांच्याच इतक्या आदराने घेतले जाते.

ज्यावेळी इकबाल यांनी तराना-ए- हिंद रचले त्यावेळी कुणाच्याही मनात स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना देखील नव्हती. त्यावेळी इकबाल यांच्याही मनात हिंदोस्तां म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तानसह अखंड भारत असाच होता. त्यामुळे “ऐ आब-ए-रूद-ए-गंगा! वह दिन हैं याद तुझको? उतरा तिरे किनारे जब कारवॉं हमारा” असे लिहिणारे , आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभिमान शब्दांत मांडणारे इकबाल पुढे जाऊन पाकिस्तानच्या निर्मितीस हातभार लावतील असे कोणाच्या स्वप्नात देखील आले नसेल.

मोहम्मद इकबाल उर्फ अल्लामा इकबाल यांचा जन्म ९ नोव्हेम्बर १८७७ रोजी पंजाबच्या सियालकोट मध्ये झाला होता. त्यांचे पूर्वज काश्मिरी पंडित होते आणि कुलगाममध्ये वास्तव्यास होते पण त्यांच्या पूर्वजांपैकी कुणीतरी पंधराव्या शतकात धर्मांतर केलं होतं.

 

हे ही वाचा – शहीद भावाच्या स्मरणार्थ बनवलेल्या सुपरहिट सिनेमाला खुद्द PM नी दिला हिरवा कंदील!

एकोणिसाव्या शतकात शीख साम्राज्याने काश्मीरवर सत्ता मिळवली तेव्हा इकबाल ह्यांचे आजोबा त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह पंजाबमध्ये स्थायिक झाले होते. काश्मीरशी असलेल्या नाळेबद्दल इकबाल ह्यांनी बऱ्याचदा आपल्या साहित्यात नमूद केले आहे.

इकबाल ह्यांचे शिक्षण वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरु झाले. त्यांनी मदरश्यातील मौलवी व स्कॉच मिशन कॉलेजमधील प्राध्यापक सय्यद मीर हसन ह्यांच्याकडून अरबी भाषेचे शिक्षण घेतले. १८९७ साली त्यांनी तत्वज्ञान, इंग्रजी वाङ्मय व अरबी भाषेत पदवी प्राप्त केली. अरबी भाषेत विशेष प्राविण्य प्राप्त केल्याने त्यांना खान बहादुरद्दीन एफ एस जलालुद्दीन मेडल मिळाले. १८९९ साली त्यांनी तर्कशास्त्रात स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली आणि पंजाब विद्यापीठातून ते पहिले होते.

इकबाल ह्यांचा तीन वेळा विवाह झाला होता. त्यांचा पहिला विवाह १८९५ साली झाला. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव करीम बीबी असे होते. त्यांना दोन अपत्ये झाली. १९१० ते १९१३ ह्या दरम्यान त्यांचा घटस्फोट झाला. त्यांचा दुसरा विवाह १९१४ साली झाला होता व त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव मुख्तार बेगम असे होते. परंतु त्यांच्या पहिल्या अपत्याच्या जन्माच्या वेळेला मुख्तार बेगम व त्यांचे नवजात अपत्य दोघेही दगावले. त्यानंतर इकबाल ह्यांनी सरदार बेगमशी तिसरा विवाह केला. त्यांना दोन अपत्ये झाली. त्यांचा मुलगा जावेद इकबाल हा पाकिस्तान सुप्रीम कोर्टात न्यायाधीश होता.

 

 

इकबाल ह्यांनी १८९९ नंतर लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर ते १९०५ साली इंग्लंडला गेले व १९०७ साली पीएचडीसाठी जर्मनीला गेले. १९०८ साली ते जर्मनीहून परत भारतात आले आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंग्रजी व तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याच दरम्यान त्यांनी लाहोरच्या चीफ कोर्टात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरु केली पण थोड्याच काळात त्यांनी प्रॅक्टिस सोडून दिली व त्यांनी लेखन सुरु केले. ते ‘अंजुमन ए हिमायत ए इस्लामचे’ ते सदस्य झाले. १९१९ साली ते ह्याच संस्थेचे जनरल सेक्रेटरी झाले. लिखाण करत असताना त्याकाळच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा त्यांच्या मनावर व लिखाणावर प्रभाव पडला.

त्यांनी १९०४ साली तराना-ए-हिंद म्हणजे ‘सारे जहाँ से अच्छा’ लिहिले. लोकांच्या मनाला ते गीत खूप भावले. लवकरच हे गीत ब्रिटिशांचा विरोधाचे साधन झाले. परंतु इकबाल यांचे भारतप्रेम थोड्याच काळात लोप पावले आणि त्यांचे सेक्युलर विचार बदलून कट्टर इस्लामवादी झाले.

ज्या व्यक्तीने प्राचीन भारतीय संस्कृतीचे गोडवे गायले त्याच व्यक्तीने नंतर १९१० साली ‘तराना ए मिल्ली’ लिहिले. ही कविता सुद्धा सारे जहाँ से अच्छा या गाण्याच्याच चालीची होती. त्या गाण्याची सुरुवात अशी आहे – “चीन ओ अरब हमारा, हिंदोस्तान हमारा, मुस्लिम है हम, वतन है सारा जहाँ हमारा”. मुस्लिम लोकांची कैफियत मांडण्यासाठी त्यांनी शिकवा लिहिले तसेच त्याचे उत्तर म्हणून जवाब ए शिकवा लिहिले.

त्यांचे हे इस्लामवादी विचार दिवसेंदिवस कट्टर होत गेले. भारतातील अनेक मुसलमान लोकांप्रमाणे त्यांच्याही मनात एक भीती होती की भारतात हिंदू जनतेची संख्या जास्त आहे त्यामुळे मुस्लिम परंपरा, मुस्लिम वारसा जतन होणार नाही. मुस्लिम दुर्लक्षित राहतील, त्यांच्यावर हिंदू समाज अन्याय करेल, राजकीय क्षेत्रात मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारे कुणीच नसेल. अशी भीती अनेक मुसलमानांच्या मनात निर्माण झाली होती.

१९३० साली इकबाल यांनी मुस्लिम लीगचे अध्यक्ष म्हणून अलाहाबादच्या सभेत भाषण दिले. या भाषणात त्यांनी सुचवले की या देशात तोवर शांतता नांदणार नाही जोवर मुसलमान लोकांना वायव्य भारताचा एक भाग त्यांचा स्वतःचा वेगळा स्वतंत्र देश म्हणून मिळणार नाही.

 

 

त्यांच्या या उघड उघड मांडलेल्या मतामुळे फाळणीच्या विचारांना आणि मुस्लिम स्वतंत्र राष्ट्राच्या आंदोलनाला खतपाणीच मिळाले आणि अखेर स्वातंत्र्य मिळताना भारताला फाळणीचे दुःख पचवावे लागले. अर्थात ज्यावेळी भारताची फाळणी झाली त्यावेळी इकबाल तो दिवस बघण्यासाठी या जगातच नव्हते.

 

 

२१ एप्रिल १९३८ साली त्यांचे दीर्घ आजाराने लाहोरमध्ये निधन झाले. तरीही पाकिस्तानने त्यांना ‘मुफक्कीर ए पाकिस्तान’, ‘हकीम -उल-उम्मत’ आणि राष्ट्रकवी म्हणून सन्मान दिला. आजही पाकिस्तानात मोहम्मद पैगंबरांनंतर कायदेआझम जीना आणि मोहम्मद इकबाल यांचे नाव घेतले जाते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version