Site icon InMarathi

डिलिव्हरी बॉय, कॉल सेन्टरमध्ये काम: स्टार अॅक्टर बनलेल्या ‘राणे’च्या संघर्षाची कहाणी!

harshwardhan rane featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

चित्रपटसृष्टीत नेपोटिझमची चर्चा जोरदार असतानाच आपल्या दर्जेदार कामाने शांतपणे काही नावं इथे चाहतावर्गही निर्माण करत असतात. कसलीही फिल्मी पार्श्वभूमी नसणारा हर्षवर्धन नावाचा हॅण्डसम हंक जेव्हा आपल्या लूक आणि अभिनयाच्या जोरावर इथे स्थान निर्माण करतो तेव्हा त्याची दखल तर घ्यायलाच हवी…

 

 

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांना घेऊन हिंदी चित्रपट बनविण्याची एक लाट आली होती. पाकिस्तानी मालिकांमधून भारतात लोकप्रिय झालेले काही चेहरे हिंदी चित्रपटात नायक, नायिका म्हणून घेतले गेले. यापैकीच एक नाव म्हणजे, मावरा होकेन. मावराच्या हासिल, मै बुशरा, शरिक-ए-हयात या मालिका भारतातही लोकप्रिय झाल्या होत्या.

मावरासोबत मराठमोळा कलाकार

मावराला घेऊन हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात आली, तो चित्रपट म्हणजे सनम तेरी कसम. या चित्रपटात तिच्याबरोबर एक नवीन नाव झळकू लागलं होतं हर्षवर्धन राणे याचं! मराठमोळं नाव ऐकून अनेकांची उत्सुकता ताणली गेली. पदार्पणातच हर्षवर्धनला हार्टथ्रोब म्हणून ओळखलं जाऊ लागलं. प्रस्थापित मावरापेक्षाही हर्षवर्धन भाव खाऊन गेला.

 

 

आज पुन्हा एकदा हर्षवर्धन चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, हसिन दिलरुबा हा चित्रपट. तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी सोबत हर्षवर्धनची लक्षवेधी भूमिका आहे. सध्या हसिन दिलरुबाची जोरदार चर्चा असून हर्षवर्धनच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

घरच्यांची इच्छा

हर्षवर्धनचा इथे येईपर्यंतचा स्ट्रगल फारच खडतर आहे. हर्षवर्धनचे वडील महाराष्ट्रीयन, तर आई तमिळ आहे. हैद्राबादमधे जन्मलेला हर्षवर्धन ग्वाल्हेरमधे लहानाचा मोठा झाला. अभिनयाचं वेड पहिल्यापासून होतंच. मात्र घरातून इतर मध्यमवर्गीय घरांप्रमाणेच विरोध होता.

याचं कारण होतं, त्याच्या घरातलं प्रचंड अभ्यासू वातावरण. आई शिक्षिका, वडील चांगल्या हुद्द्यावर आणि बहिण एमबीए. हर्षवर्धनही अभ्यासात हुशार होता त्यामुळे इतर मुलांप्रमाणेच त्यानंही अभ्यास करून, चांगले मार्क्स मिळवून पुढे उत्तम पगाराची नोकरी करावी असं घरच्यांना वाटत होतं.

 

 

त्याच्या मनात मात्र भलतंच होतं…

हर्षवर्धनच्या मनात मात्र वेगळंच चाललं होतं. पंधरा सोळाव्या वर्षीच त्याने घर सोडलं. खिशात होते फक्त दोनशे रुपये आणि सोबतीला अभिनयात शिखर गाठायचं स्वप्न होतं.

त्याने अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रयत्न चालू केले. बॅरी जॉन ॲक्टिंग स्टुडिओमधे त्याने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. नाटकांत काम करायला सुरवात केली. हैद्राबादमधील काही थिएटर ग्रुपमधे त्याने कामं केली, मात्र त्याला कायम मोठ्या पडद्याची ओढ होती. त्यामुळे त्याने हैद्राबाद सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.

२००८ साली त्याला पडद्यावरचा पहिला ब्रेक मिळाला, सब टिव्हीवरच्या लेफ्ट राईट लेफ्ट मालिकेच्या रुपात. या भूमिकेनं त्याने तरूणाईतलं फॅन फॉलोईंग मिळविलं, जे नंतर नंतर वाढतचच गेलं; ते आजतागायत कायम आहे.

 

 

मोठ्या पडद्यावर त्यानं २०१० साली तेलगू चित्रपटातून पदार्पण केलं. पुढची दोन चार वर्षं त्याने तमिळ, तेलगू चित्रपट केले. त्यानंतर त्याला ‘सनम तेरी कसम’ मिळाला आणि त्याने हिंदी चित्रपटात हिरो म्हणून पदार्पण करून इतकी वर्षं बघितलेलं स्वप्न सत्यात उतरलं.

इंग्लिशशिवाय पर्याय नाही म्हणून…

त्याचा हा प्रवास खूपच खडतर होता, त्याला कोणीतरी सांगितलं, की इंडस्ट्रीत टिकायचं असेल, तर इंग्लिश बोलता आलं पाहिजे. केवळ कामचलावू इंग्लिश नाही, तर उत्तम सफाईदार असं इंग्लिश.

खिशात पैसे नसल्याकारणानं कोचिंग क्लास लावणं शक्यच नव्हतं. मग त्याने एक शक्कल लढविली. चक्क कॉल सेंटरमधे नोकरी करण्याचा निर्णय घेतला. कारण कॉलसेंटरमधे इंग्रजीत संभाषण करण्याचं ट्रेनिंगही दिलं जायचं आणि नोकरी करून त्याला कमाईही करता येणार होती.

ही नोकरी मात्र मिळविण्यासाठी इंग्रजीतून संवाद साधता येणं गरजेचं होतं. यासाठी मग त्याने इंटरनॅशनल न्यूज बघायला सुरवात केली. त्यांचे उच्चार काळजीपूर्वक ऐकून तसं बोलण्याचा सराव केला. पाच सहा महिने सातत्याने प्रयत्न करून त्याने कॉलसेंटरचा इंटरव्ह्यू देता येईल इतपत इंग्रजी संभाषणाचा सराव केला आणि नोकरीही मिळवली.

 

 

डिलिव्हरी बॉय म्हणूनही केलं आहे काम

अर्थात कॉल सेंटरमधली नोकरी ही काही त्याची पहिली नोकरी नव्हती. त्याने अगदी मिळतील त्या नोकर्‍या करत इथे टिकाव धरला. त्याला त्याचा पहिला ब्रेक मिळेपर्यंत. त्याने कुरियर बॉयपासून टेलिफोन बूथपर्यंत आणि वेटरपासून डीजे, सायबर कॅफे अटेंडंट अशा असंख्य नोकर्‍या केल्या.

२००२ ते २००४ ही दोन वर्षं त्याने पैशासाठी पडेल ते काम केलं. मात्र ही कामं करताना अभिनय करण्याचं स्वप्न बघणं सोडलं नाही. तो कुरियर बॉय म्हणून काम करत होता त्या काळात त्याने त्याचा आवडता हिरो जॉन अब्राहमच्या घरी हेल्मेट होमडिलिव्हर केलं होतं. साक्षात जॉनच्या हातात ते हेल्मेट ठेवताना त्याला प्रचंड आनंद झाला होता. आजही त्या आठवणीने तो तितकाच रोमांचित होतो.

 

 

सामाजिक भान

ही सगळी पार्श्वभूमी असल्याने तो यश मिळूनही डोक्यात हवा न गेलेला आणि अजूनही पाय जमिनीवर असणारा अभिनेता आहे. याची झलक अलिकडेच दिसली. कोविडची झळ पोहोचलेल्यांना मदत करण्यासाठी त्यानं त्याची लाडकी बाईक विकून ती पूर्ण रक्कम दिली.

इतर कलाकारांप्रमाणे प्रायोजक मिळवत मोठ्या रकमेचा चेक देणं त्याला शक्य होतं, मात्र मध्यमवर्गीय संस्कार अजूनही टिकून असल्याने एखाद्याला मदत करायची तर ती स्वत:च्या खिशात हात घालून आणि स्वत: काहीतरी त्याग करून हे पक्कं आहे. त्याचा हा स्वभावच त्याला इंडस्ट्रीच्या बाहेरचा असूनही आपलेपणाचा अनुभव देतो.

हर्षवर्धनचा, लीड म्हणून बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट ‘सनम तेरी कसम’ असला तरीही त्याला त्याआधी संजय लीला भन्साळींच्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’साठी विचारणा करण्यात आली होती. स्क्रिनटेस्टनंतर त्याची निवडही पक्की करण्यात आली होती, मात्र या चित्रपटासाठी त्याला अकरा महिन्यांचा करार करावा लागणार होता.

या करारामुळे तो पूर्ण अडकून जाणार असल्याने त्याने हा चित्रपट सोडला आणि तो पुढे रणवीर सिंगला मिळाला.

 

 

जर हर्षवर्धनने रामलीला चित्रपट केला असता, तर आज तो अव्वल स्थानावर असता. मात्र त्याने फ्लॉप झालेल्या ‘सनम तेरी कसम’मधून पदार्पण केलं असलं तरीही आज तो अ श्रेणीतला अभिनेता म्हणून गणला जातो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version