Site icon InMarathi

ऐकावे ते नवलच! चक्क एक कुत्राच या शहराचा महापौर बनलाय…

max mayor inmarathi featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

“अ डॉग इज मॅन्स बेस्ट फ्रेंड” असे म्हणतात. या जगात प्राणीप्रेमींची कमतरता नाही. घरात माणसे कमी आणि पाळीव प्राणी जास्त असेही चित्र बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. हल्ली तर ‘माणसांशी डील करण्यापेक्षा मी प्राणीच प्रेफर करतो कारण प्राणी विश्वासघात करत नाहीत’ असे म्हणणारे लोक सुद्धा अनेक सापडतील.

प्राचीन काळचे सापडलेले अवशेष सांगतात, की प्रागैतिहासिक कालीन माणूससुद्धा प्राणी पाळत होता. माणसाने पाळीव प्राणी पाळायला सुरुवात केली त्याला आज जवळजवळ बारा हजार वर्षे झाली आणि सगळ्यात पहिला पाळीव प्राणी हा कुत्राच होता.

आज तर पाळीव प्राणी म्हणजे घरातलाच एक सदस्य असतो. त्याचे लहान बाळासारखे सगळे लाड पुरवले जातात, त्याचे स्पेशल कपडे, त्याचे खास जेवण, त्याला खेळण्यासाठी खास खेळणी, त्याचा वाढदिवस अगदी औक्षण वगैरे करून -केक कापून साजरा करणे असेही अनेक उत्साही घरांमध्ये केले जाते. याबदल्यात कुत्रीसुद्धा मालकांना, घरातल्यांना जीव लावतात.

 

 

प्राचीन काळचे ग्रीक आणि रोमन लोक त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्यावर त्याचे विधिपूर्वक दफन करून त्याची आठवण म्हणून त्याची कबर तयार करत असत.

आजही काही श्वानप्रेमी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांची देखील काळजी घेतात. त्यांना बिर्याणीसारखे खास जेवण देणे, ते आजारी असतील तर त्यांच्यावर उपचार करणे ही कामे अत्यंत आनंदाने करतात. सोशल मीडियावर आपण असे अनेक व्हिडीओ बघतो.

हे ही वाचा जगातील सर्वात महागड्या कुत्र्यांच्या प्रजातींच्या या किमती पाहूनच डोळे विस्फारतात

काही उत्साही लोक तर आपापल्या ‘डॉगो किंवा किटी’चे सोशल मीडिया अकाउंट्स काढून त्यांचे व्हिडीओ, फोटो अपलोड करत असतात आणि या अकाउंट्सचे हजारो लाखो फॉलोअर्स असतात. अनेक श्वान असे ‘इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सर’ आहेत.

तर असे लोकांचे हे श्वानप्रेम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अमेरिकेच्या एका शहरात तर लोकांनी एका कुत्र्याला महापौर केले आहे. ही खरं तर अत्यंत अविश्वसनीय गोष्ट आहे पण ही खरी घडलेली घटना आहे.

अमेरिकेमधील कॅलिफोर्निया मधील “मॅक्स द सेकंड” हा श्वान चक्क एका शहराचा महापौर आहे. कॅलिफोर्नियातील आयडलवाईल्ड या शहराचा महापौर हा ‘मॅक्सीमस मायटी डॉग म्युलर द सेंकड’ हा गोंडस दिसणारा गोल्डन रिट्रिव्हर जमातीचा एक श्वान आहे.

बरं मॅक्स हा फक्त महापौरच नव्हे, तर तो एक इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सरसुद्धा आहे. इतकेच नव्हे तर त्याला अत्यंत “महत्वाची” कामे असतात.

 

 

नुकत्याच एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की ,”आम्ही आयडलवाईल्डचे महापौर आताच डेअरी क्वीनला भेट देऊन आलो आणि प्रत्येकाने एक व्हॅनिला कोन खाल्ला.”

आणखी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये महापौर मॅक्स लिहितात की ,”आज मी नवा टाय घालून मिरवत होतो. माझ्या मते ह्या टायमध्ये मी खूप छान दिसतो. मला आशा आहे तुम्हालाही मी क्युट किंवा रुबाबदारच वाटत असेन. तुम्हाला काय वाटतं? मला नक्की सांगा.”

या पोस्ट बरोबर मॅक्सचा लाल रंगाचा टाय घातलेला एक फोटो देखील अपलोड करण्यात आला होता.

 

 

आयडलवाईल्ड पाईन कोव्ह हा कॅलिफोर्नियातील एक भाग आहे जिथे महानगरपालिकेचे शासन नाही. या भागाचे व्यवस्थापन थेट तेथील केंद्र किंवा राज्य सरकार बघते. त्यामुळे या शहराचा महापौर कुठलीही मनुष्यजमातीतील व्यक्ती नसून एक श्वान आहे.

मॅक्स द सेकंडच्या आधी या शहराचा पहिला श्वान महापौर “मॅक्स द फर्स्ट” नावाचा एक श्वान होता असे मॅक्सच्या “मेयरमॅक्स” या वेबसाईटवर नमूद केले आहे.

आयडलवाईल्ड येथे ११, १२ व १३ जून २०१२ रोजी झालेल्या एका निवडणुकीत मॅक्सिमस माइटी डॉग म्युलरला बहुमत मिळाले आणि एका वर्षासाठी त्याची महापौर म्हणून नियुक्ती झाली. आयडलवाइल्डची ही पहिली वाहिली निवडणुक आयडलवाइल्ड ऍनिमल रेस्क्यू फ्रेंड्स या एका एनजीओने प्रायोजित केली होती.

आयडलवाइल्डच्या कुठल्याही स्थानिक नागरिकाला त्यांच्या पाळीव मांजर किंवा श्वानाला या निवडणुकीत उभे करण्याची परवानगी होती. या निवडणुकीत १४ श्वान आणि २ मांजरी महापौरपदासाठी उभ्या होत्या.

उमेदवारांनी प्रत्येकी एक डॉलर इतकी देणगी देऊन ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत दोन तृतीयांश मते मिळवून मॅक्स निवडून आला. त्याचा एका वर्षाचा कार्यकाल संपल्यावर देखील लोकांच्या आग्रहाखातर त्याने त्याचा कार्यकाळ परत वाढवून घेतला. लोकांचा अत्यंत आवडीचा असा हा महापौर चक्क दोन वर्षे सत्तेत होता.

दुर्दैवाने मॅक्स द फर्स्ट याचा २ एप्रिल २०१३ रोजी मृत्यू झाला आणि मॅक्स द सेकंडने त्याची गादी पुढे चालवली. केवळ दोन महिन्यांचा असल्यापासून तो महापौरपद सांभाळतो आहे.

 

 

मॅक्स द सेकंडला त्याच्या कामात त्याचे बहीण -भाऊ माईकी माइटी डॉग म्युलर आणि मिटझी मारी म्युलर मदत करतात. हे दोघेही गोल्डन रिट्रिव्हर आहेत. हे दोघे उपमहापौर म्हणून काम पाहतात.

फिलीस म्युलर असे मॅक्सच्या मालकिणीचे नाव आहे. पण जेव्हा ती फोन उचलते तेव्हा ती “हॅलो, ऑफिस ऑफ द मेयर” असेच म्हणते. तिच्या मते ती मॅक्सची मालकीण नसून त्याची मुख्य असिस्टंट आहे.

शनिवारी-रविवारी मॅक्स त्याच्या पीक -अप ट्रक मध्ये बसून हॅट किंवा टाय घालून आयडलवाईल्डच्या नागरिकांशी संवाद साधताना दिसतो.

“कमिशनर्सना त्यांच्या कामात मदत करणे, कम्युनिटीच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे, आयडलवाइल्डच्या सर्व पाळीव आणि जंगली प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे म्हणणे जगापर्यंत पोचवणे, आयडलवाइल्डच्या कम्युनिटीचा प्रचार व पसार करणे” असे मॅक्सच्या वेबसाईटवर त्याचे कामाचे स्वरूप दिलेले आहे.

 

 

पहिल्या मॅक्सचा कार्यकाळ हा फक्त दोन वर्षे होता पण दुसऱ्या मॅक्सला मात्र आयडलवाईल्डच्या नागरिकांनी आयुष्यभरासाठी महापौर म्हणून नियुक्त केले आहे. या लोकांचे श्वानप्रेम जगावेगळे आहे हेच खरे!

===

हे ही वाचा ह्या कुत्र्यांपासून जरा ‘बचके’ रहना : अत्यंत धोकादायक कुत्र्यांच्या १० जाती

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version