आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कृपेमुळे आपल्या सगळ्यांनाच सवय झाली ती वेबसिरिजची, आणि त्याहीपेक्षा अधिक सवय झाली ती म्हणजे बोल्ड सीन्स आणि शिवराळ भाषेची.
आजकाल सर्रास सिनेमात किंवा वेबसिरिजमध्ये अत्यंत टोकाच्या शिव्या ऐकायला मिळतात. सेक्रेड गेम्सपासून नुकत्याच आलेल्या समांतरपर्यंत प्रत्येक वेबसिरिजमध्ये तुम्हाला ‘अ’ पासून ‘झ’ पर्यंत सगळ्या शिव्या बिनदिक्कत ऐकायला मिळाल्या.
सुरुवातीला हे सगळं वेगळं वाटायचं, बघायला पण मजा यायची, पण नंतर तोचतोचपणा झाला आणि त्या शिवराळ भाषेची आता किळस यायला लागली.
नाना पाटेकर यांना एकदा मुलाखतीत त्यांच्या शिवराळ भाषेबद्दल विचारलं होतं तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं होतं की शिवी हासुद्धा एक भावनेचा प्रकार आहे, जेव्हा तुम्हाला अत्यंत राग येतो तेव्हा २ अर्वाच्य शिव्या घालून आपण मोकळे होतो त्यामुळे आपल्या मनातल्या रागाचा निचरा होतो. पण म्हणून उठसूठ शिव्या घालणे हेदेखील योग्य नाही आणि नेमकी हीच गोष्ट सध्या आपल्याला कलाकृतीतून पाहायला मिळत आहे, आणि यामुळेच सध्या शिव्या ही गोष्ट हा आयुष्याच्या अविभाज्य भाग बनली आहे.
रस्त्यावर चालताना गर्दीतून कुणी धक्का मारला किंवा बाईकने बाजूने येऊन कट मारला तर आपसूकच आपल्या तोंडातून एक मस्तपैकी शिवी हासडली जातेच पण या शिव्यांच्या उगम नेमका कुठे झाला? आणि जास्तीकरून शिव्या या स्त्रियांशी संबंधितच का असतात? पुरुष मंडळी यातून कशी सही सलामत सुटली आहेत याविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
‘द गाली प्रोजेक्ट’ हे नेमकं काय प्रकरण आहे?
लोकांची वाढती शिवराळ भाषा आणि खासकरून सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या शिव्या आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून दिल्या जाणाऱ्या शिव्या हे सगळंच पाहता मुंबईच्या एका तरुणीने मध्यंतरी ‘द गाली प्रोजेक्ट’ सुरू केला होता, ती तरुणी म्हणजे नेहा ठाकूर.
सध्या लोकांच्या आयुष्यात इतके वेगळे प्रॉब्लेम्स आहेत की जरा काही खुट्ट झालं की आपल्या तोंडून मवाळ भाषेत का होईना शिवी येतेच, या शिव्यांच्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी नेहाने हा प्रोजेक्ट सुरू केल्याचं स्पष्ट केलेलं आहे!
जेव्हा दोन पुरुषांमध्ये बाचाबाची सुरू असते तेव्हा त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या शिव्या ह्या बहुतांशकरून महिलांवरुनच असतात, पण याच अर्वाच्य शिव्यांऐवजी काही सौम्य शिव्या वापरू शकतो ज्यामुळे समोरच्याला जास्त वाईटही वाटणार नाही आणि आपला हेतुही साध्य होईल हेच या ‘गाली प्रोजेक्ट’चं उद्दिष्ट आहे.
शिवाय याच प्रोजेक्ट बाबतीत बोलताना तमन्ना मिश्रा हिनेसुद्धा स्पष्टीकरण दिलं की या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या दोघी लोकांना शिव्या देण्यापासून विरोध करत नाहीत, तर या प्रकल्पातून वेगळ्या शिव्यांचे पर्याय उपलब्ध करून देण्याचं काम केलं जात आहे.
शिव्यांचा संग्रह कसा तयार झाला?
या प्रोजेक्ट दरम्यान काम करताना, या तरुणीने एक गुगल फॉर्म बनवला आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवून त्यांना त्यात वेगवेगळ्या शिव्या लिहून पाठवण्यास सांगितले, तेव्हा त्यांना जाणवलं की मिळालेल्या ८०० शिव्यांच्या यादीत तब्बल ४० % शब्द हे जातिवाचक आणि लिंगभेदक होते.
त्यांनंतर त्यांनी या शब्दांवर अभ्यास करून मित्रांशी चर्चा करून त्याविषयी माहिती सोशल मीडियावर द्यायला सुरुवात केली ज्यांच्यामध्ये काही निर्मळ शिव्यांचा समावेश होता, पण नंतर काही लोकांनी या शिव्या वाचून शिव्या दिल्याचा फील येत नाही अशीही तक्रार केली.
तमन्ना आणि नेहा या दोघी त्यांच्यापरीने लोकांच्या शिव्या देण्याच्या मानसिकतेत बदल करायचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे हे प्रयत्न आणि प्रोजेक्ट हे अजूनही प्राथमिक पातळीवरच आहेत, यामध्ये आणखीन प्रगती होऊन यातून बदल घडू शकतील अशी त्यांची अपेक्षा आहे.
शिव्यांची निर्मिती किंवा उगम कुठून झाला असावा?
काही भाषातज्ञांच्या मते जेव्हा भाषेची निर्मिती झाली तेव्हाच शिव्यांचा जन्म झालेला आहे. असं नेमकं कारण घटना किंवा काळ सांगता येणं कठीण आहे जेव्हा शिव्यांची सुरुवात झाली.
हिंदी साहित्यिक पद्मश्री पुरस्कार सन्मानित उषा किरण खान यांनी याबाबतीत स्पष्टीकरण दिलं असून त्यांच्या मते जेव्हा सामाजिक विकास झाला तेव्हाच चांगल्या आणि वाईट गोष्टींची कॉन्सेप्ट जन्माला आली, याचदरम्यान शिव्या द्यायला सुरुवात झाली असावी असा त्यांचा अंदाज आहे.
खरंतर भारतात वेगवेगळ्या लोकगीतातसुद्धा शिव्यांचा वापर केला जायचा असं काही तज्ञांच्या अभ्यासावरुन स्पष्ट झालेलं आहे. कोकणातला शिमगा किंवा एकंदरच कोकणातली शिवराळ भाषा आपल्याला काही नवीन नाहीत.
गडकिल्ल्यांवरची वीरगळ, सतीशिळा याप्रमाणे ‘गद्धेगळ’ हासुद्धा महाराष्ट्रातला एक कुतुहलाचा भाग आहे. वीरगळमध्ये जसं एखाद्याविषयी कौतुकाने त्याच्या वीरतेचं वर्णन केलेलं असतं तसंच एखाद्याबद्दल वाईट साईट वर्णन करायचं असेल तर ‘गद्धेगळ’मध्ये त्याबद्दल लिहिल्याचं आपल्याला माहीत असेलच.
हा सगळा हजारो वर्षांपूर्वीचा शिव्यांचा इतिहास असला तरी नंतर जेव्हा मानवाचा प्रवास सुरू झाला आणि एकमेकांशी संपर्क वाढला तेव्हा त्यात आणखीन भर पडली आणि हळू हळू शिव्या हा जगण्याचा एक भागच बनल्या.
शिव्यांच्या इतिहासात महिलांचा उल्लेख कधीपासून वाढला?
प्राचीन काळात जेव्हा स्त्री पुरुष समानतेचं महत्व घटू लागलं आणि स्त्रीयांच्या सुरक्षेची जबाबदारी पुरुषांवर आली, कालांतराने युद्धात मुलींचा व्यापार होऊ लागला आणि एकंदरच स्त्रीयांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहायला सुरुवात झाली तेव्हाच शिव्यांमध्ये महिलांचा उल्लेख व्हायला सुरुवात झाली असा तज्ञांचा अंदाज आहे.
आदिवासी जमातीतही स्त्रीयांवरून शिव्या देण्यात भर पडली होती, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा अपमान करायचा असेल तर त्याच्या घरातील स्त्रीयांना घालून पाडून बोलून लैंगिक शिव्या द्यायचा हा प्रकार आदिवासी जमातीत जास्त व्हायचा.
हा सगळा इतिहास आपण जाणून घेतला तर आपल्याला एक गोष्ट नक्की जाणवेल की शिव्या ह्या काही आत्ताच निर्माण झाल्या आहेत असं नाही, बऱ्याच वर्षांपासून त्या प्रचलित होत्या आणि माणूस जसजसा प्रगत झाला तसतशा शिव्यादेखील डेव्हलप होत गेल्या.
सध्या सगळीकडेच खऱ्या आयुष्यात आणि फिल्मी दुनियेतही शिव्यांचा अतिरेक वाढला आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे माणसाची प्रगती हासुद्धा आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.