आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारतीय फिल्म इंडस्ट्रीत ज्याप्रमाणे कल्ट क्लासिक आणि मास्टरपीस सिनेमे बनले तसेच काही ट्रॅशी फिल्म्ससुद्धा बनल्या, आणि याच काही टुकार सिनेमांच्या मांदियाळीतला अजरामर सिनेमा म्हणजे कांती शहा दिग्दर्शित ‘गुंडा’!
साधारपणे कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि लॉजिक या सगळ्याच्यापालिकडची कलाकृती कोणती असेल तर ती ‘गुंडा’! ज्या काळात जेम्स कॅमेरूनने टायटॅनिकसारखा अव्वल दर्जाचा सिनेमा जगाला दिला त्याकाळात भारतात ‘गुंडा’ सारखा सिनेमा बनवला गेला आणि प्रदर्शित केला गेला, हाच खूप मोठा अपमान होता!
सिनेमातली पात्रं स्क्रीनवर येऊन कॅमेराशी नजर मिळवून थेट लोकांशी संवाद साधतात, याला फोर्थ वॉल ब्रेक करणं असं म्हणतात, ही गोष्ट कादर खानसारख्या दिग्गज लेखक अभिनेता आणि दिग्दर्शकाने ‘घर हो तो ऐसा’ या सिनेमात करून दाखवली होती.
गुंडामध्येसुद्धा अशीच कॉन्सेप्ट वापरली गेली होती, पण एकंदरच यातले संवाद, कथा आणि लॉजिक कशाशीच ताळमेळ नसल्याने ती गोष्ट लोकांच्या पचनी पडणं जरा कठीणच होतं नाही का?
त्या काळातल्या मुरलेल्या अभिनेत्यांनी आणि खासकरून बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांनी या सिनेमात काम केलं होतं, मुकेश ऋषि, शक्ति कपूर, मोहन जोशी, हरिश पटेल, दीपक शिर्के अशी भलीमोठी कलाकारांची फौज यात होती. शिवाय गरिबांचा अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाणारे मिथुनदा तर यात मुख्य हिरोच्या भूमिकेत होते.
सिनेमातला प्रत्येक व्हिलन जेव्हा कॅमेरासमोर येऊन स्वतःविषयी माहिती एका काव्याच्या माध्यमातून देत असे, जसं या सिनेमाचा मुख्य व्हिलन आला की त्याच्या तोंडी “मेरा नाम है बुल्ला, रखता हूं खुल्ला!” हे वाक्य हमखास येणारच.
–
हे ही वाचा – बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात!
–
मोहन जोशी जेव्हा समोर यायचे तेव्हा “मेरा नाम है पोते, जो अपने बापके भी नहीं होते” हा अजरामर डायलॉग म्हणायचे. खरंतर गुंडा हा काही ब्लॉकबस्टर सिनेमा नाही, थेटरात फार मोजक्याच लोकांनी हा सिनेमा बघितला असावा, पण त्यांना याची कदापि जाणीव नसावी की आपण एक इतिहास रचणारा सिनेमा बघत आहोत.
आपला प्रेक्षकवर्ग तेव्हा एवढा सुजाण नव्हता, म्हणूनच त्यांनी ‘गुंडा’सारखा टाइमलेस क्लासिक सिनेमा तेव्हा नाकारला आणि आजच्या जमान्यात त्याला कल्ट क्लासिकचा दर्जा प्राप्त झाला आहे.
एका भ्रष्ट राजकरण्याला ‘कफनचोर’ म्हणून संबोधणारा गुंडा हा सिनेमा तेव्हाही काळाच्या पुढे होता आजही काळाच्या पुढेच आहे. कारण गुंडा या सिनेमाला सिनेमा म्हणून मां देणारा मनुष्यप्राणी अजूनही या धर्तीवर प्रकट व्हायचा बाकी आहे.
कांती शहा आहे तरी कोण?
एका मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेल्या मुंबईतल्या जुहूच्या परिसरात लहानाचा मोठा झालेल्या कांती शहाला सुरुवातीपासूनच शिक्षणात रस नव्हता, म्हणूनच ११ वी नंतर त्याने शिक्षणाला आणि शाळेला राम राम ठोकला.
शिक्षणात काहीच रस नसलेला आणि काहीच न करू इच्छिणाऱ्या पोराला आई वडिलांनी घराबाहेरचा रस्ता दाखवला, आणि कांतीने बाहेरचा रस्ता धरला, काही महीने त्याने एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम केलं पण तेदेखील काही महिन्यापुरतंच!
उल्हासनगरमधून उशीचे अभ्रे, रुमाल विकत घेऊन सांताक्रुज स्टेशनवर येऊन ते विकायचंही काम कांती याने केलं, असे बरेच विचित्र उद्योग त्याने केले. अखेर प्रोडक्शन डिपार्टमेंटमधल्याच एका मित्राने कांती शहाला प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून कामावर नेमलं.
यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही, कांती शहा यांनी गुंडासारखे बरेच विचित्र सिनेमे केले, त्यामुळे त्यांचं नाव कधीच ए लिस्टर्स कलाकारांसोबत जोडलं गेलं नाही, पण आज याच काही विचित्र आणि वादातीत सिनेमांच्या जोरावर कांती शहाने स्वतःचं नाव तयार केलं!
एका ओळीत स्क्रिप्ट सांगणारा फिल्ममेकर :
सर्वसाधारणपणे कोणताही लेखक किंवा दिग्दर्शक एक हार्ड बोऊंड स्क्रिप्ट घेऊन कोणत्याही अभिनेत्याला किंवा कलाकाराला कथा सांगतो, पण कांती शहा हे वेगळंच रसायन, संपूर्ण सिनेमा यांच्या डोक्यात सुरू असायचा आणि ते अभिनेत्याला सांगताना फक्त एका ओळीत त्याच्या पात्राची तोंडओळख करून द्यायचे.
गुंडासारखा सिनेमासुद्धा त्यांनी असाच तयार केला होता, अभिनेता दीपक शिर्के यांनी या सिनेमात व्हिलन साकारला होता, तेव्हा त्या पात्राची ओळख करून देताना कांती शहा यांनी शिर्के यांना एकच डायलॉग ऐकवला होता तो म्हणजे –
“बुल्ला तूने खुल्लम खुल्ला लंबू आटा को मौत के तवे में सेंक दिया. उसकी लाश को वर्ली के गटर में फेंक दिया.”! हा डायलॉग ऐकून दीपक यांनी लगेच सिनेमा करायला होकार दिला.
खरंतर कांती शहा यांनी त्यावेळेस कोणतीही स्क्रिप्ट तयार केलेलीच नव्हती सगळ्याच कलाकारांना एका ओळीत कथा ऐकवून सिनेमा करण्यासाठी पटवणारा हा असा फिल्ममेकरही काळाच्या पुढचाच होता.
जेव्हा कांती शहाने सेन्सॉर बोर्डला उल्लू बनवलं :
तुम्ही गुंडा बघितलेला असो किंवा नसो, त्यातले ते डबल मीनिंग डायलॉग्स, भडक बोल्ड सीन्स आणि एकंदरच भंजाळलेले कलाकार प्रत्येकालाच ठाऊक असतील.
आजच्या काळात जेव्हा ‘उडता पंजाब’ किंवा ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’सारख्या सिनेमांवर सेन्सॉर बोर्डने कात्री चालवली तेव्हा हेच सेन्सॉर बोर्ड गुंडा सिनेमाच्यावेळी झोपलं होतं का? असाही सवाल सोशल मीडियावर केला जातो.
सर्वार्थाने गुंडा हा खूप प्रॉब्लेमॅंटिक सिनेमा होता आणि आहे तरी त्या काळात तो रिलीज कसा होऊ दिला गेला? यामागेसुद्धा दिग्दर्शक कांती शहा याने कशी शक्कल लढवली त्याविषयी आपण जाणून घेऊया!
–
हे ही वाचा – सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!
–
शूटिंग पूर्ण झाल्यावर कांतीने गुंडा सिनेमा सेन्सॉर बोर्डकडे सर्टिफिकेशनसाठी पाठवला, तिथल्या लोकांनी तो सिनेमा बघितला त्याला १८+ चं प्रमाणपत्र देण्यासाठी सिनेमात एकूण ४० कट दिले.
राजकीय भाष्य, बाळाला हवेत फेकून झेल घ्यायचा सीन आणि असेच काही आपत्तिजनक सीन्स काढून टाकून फिल्म ए सर्टिफिकेटसकट प्रदर्शित करायचे आदेश सेन्सॉर बोर्डने दिले. कांती शहा तयार झाले आणि ए सर्टिफिकेटसकट हा सिनेमा प्रदर्शित केला.
सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी मुंबईच्या एका सिनेमागृहात काही महिला हा सिनेमा पाहण्यासाठी गेल्या आणि तो बघताना त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली.
सिनेमातली हिडीस दृश्य, आपत्तीजनक संवाद, आणि एकंदरच सिनेमाची क्वालिटी बघता असा सिनेमा रिलीज कसा होऊ दिला असं म्हणत लोकांनी याविरुद्ध तक्रार केली.
सेन्सॉर बोर्डकडे हा सिनेमा हटवण्याची मागणी करण्यात आली, आणि त्यांनी तो रिलीज झालेला सिनेमा पुन्हा बघून तो हटवण्यात आला.
हे असं झालं तरी कसं? ज्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डने बघून सर्टिफिकेट दिलं तोच सिनेमा हटवण्याची वेळ बोर्डावर का आली? तर कांती शहा या माणसाने सेन्सॉरबोर्डच्या कटला थेट केराची टोपली दाखवली होती.
सेन्सॉर बोर्डच्या सांगण्याप्रमाणे जे कट देण्यात आले ते करूनच कांती शहाने फिल्म पुढे पाठवली, पण सिनेमागृहात प्रदर्शित करताना ओरिजनल, कट नसलेलाच सिनेमा रिलीज केला गेला.
खरंतर जेव्हा सर्टिफिकेशनसाठी सिनेमा पाठवायचा होता तेव्हा कांती शहा सिनेमाच्या तयारीत व्यस्त होते, त्यामुळे सेन्सॉर बोर्डने जे जे सांगितलं ते सगळं त्यांनी मान्य केलं आणि सिनेमाला सर्टिफिकेट मिळालं पण नंतर त्यांनी याच निर्णयाला केराची टोपली दाखवली, आणि सिनेमा जसाच्या तसा प्रदर्शित केला.
याच प्रिंटच्या आधारावर सिनेमाची डीव्हीडीसुद्धा रिलीज केली गेली आणि त्यामुळेच हा सिनेमा आजही सगळीकडे आहे तसा कोणताही कट न देता बघायला मिळतो.
भारतात रिलीज झालेल्या बी ग्रेड सी ग्रेड सिनेमांपैकी गुंडा हा लोकांनी सर्वात जास्त पसंत केलेला सिनेमा. सिनेमा या संकल्पनेचा अपमान म्हणूनच या सिनेमाकडे पाहिलं जातं. आजही यातले किळसवाणे सीन्स आणि डायलॉग बघताना आपल्याला हसू आवरत नाही.
मधूनच येणारा रनवेचा बॅकड्रॉप, सिनेमाच्या व्हिलनची सततची तीच तोंडओळख करून देणारी ओळ, भडक दृश्यं, महिलांना एका प्रकारे objectify करणं हे सगळं ठासून भरलेल्या या सिनेमाला आजही यूट्यूबवर सर्वात जास्त व्यूज आहेत.
आजही गुंडा या सिनेमाचा फॅनबेस हा इतर कोणत्याही भारतीय सिनेमापेक्षा सर्वात जास्त आहे. सिनेमा कसा असू नये यासाठीच गुंडा ओळखला जातो पण तरी अशा सिनेमाला प्रदर्शनानंतर मिळालेलं अभूतपूर्व यश बघून कोणीही तोंडात बोटं घालेल.
प्रत्येक फ्रेम परफेक्ट असावी असा विचार मांडणाऱ्या जेम्स कॅमेरूनच्या टायटॅनिकच्या काळातच ‘गुंडा’ सारखा ‘सिनेमा’ येऊन गेलाय आणि आपल्या सेन्सॉरबोर्डने तो रिलीज होऊ दिलाय हाच एक खूप मोठा विनोद आहे!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.