Site icon InMarathi

लोक अदालत मध्ये न्यायदान करणाऱ्या तृतीयपंथी चांदणी गोरे यांच्याविषयी…

chandani gore featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तृतीयपंथीय म्हटलं, की नाकं मुरडणं ही गोष्ट आजही अगदीच सामान्य आहे. समोर एखादी तृतीयपंथी व्यक्ती आली, की रस्ता बदलायचा आणि दुसरीकडेच निघून जायचं हे आजही घडत असलेलं आपण अगदी सर्रास पाहतो.

हेच तृतीयपंथी काही ठिकाणी मात्र अगदी आवर्जून लागतात, मग ते लग्नात असोत किंवा लहान बाळाला आशीर्वाद देण्यासाठी असोत, तिथे मात्र हे तृतीयपंथीयच हवेत, ही विचारसरणी सुद्धा ताजी आहे. काळ, तंत्रज्ञान आणि इतर बऱ्याच गोष्टी पुढे गेल्या, तरीही काही गोष्टींमध्ये फारसा फरक पडलेला नाही, त्यातीलच ही एक बाब!

 

 

अर्थात, या नियमालाही अपवाद आहेत. ज्या समाजात स्थान मिळवण्यासाठी झगडावं लागतं, झटावं लागतं त्याच समाजाचं न्यायदान होत असलेल्या लोक अदालातमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं, ही मोठी गोष्ट आहे. तीच साध्य केली आहे, चांदणी गोरे नावाच्या पुण्यातील एका तृतीयपंथीय व्यक्तीने!

‘पुणे तिथे काय उणे’ असं आपण नेहमीच वाचतो, ऐकतो, बघत असतो; त्याचंच एक जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे, न्यायालयात महत्त्वाचं स्थान पटकावणाऱ्या चांदणी गोरे!

 

===

हे ही वाचा – मृत्यूनंतरही हेटाळणी थांबत नाहीच… ‘त्यांच्या’ अंत्यसंस्काराचा विधी हेच दाखवून देतो

===

या चांदणी गोरे नेमक्या कोण आहेत आणि त्यांचा हा प्रवास कसा होता, हे आज जाणून घेऊयात.

न्यायाधीशांच्या पंक्तीत बसण्याचा मान

चांदणी गोरे यांना लोक अदालतमध्ये फार महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना लोक अदालतच्या पॅनलचं सदस्यत्व देण्यात आलं आहे. त्यामुळेच आज न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा तृतियपंथीयांना योग्य स्थान देण्यात आले असून, त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे, असं म्हणायला हवं.

मागील काही वर्षांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून चांदणीने मोठे काम केलं आहे. निर्भया या संस्थेमार्फत, लैंगिक शोषणामुळे पीडित व्यक्तींसाठी चांदणीजी काम करत होत्या.

हे काम करत असतानाच, त्यांनी सिम्बायोसिसच्या लॉ कॉलेजमध्ये सुद्धा काम करायला सुरुवात केली होती. पॅरा लीगल व्हॉलेंटिअर म्हणून काम करत असताना त्या बरंच काही शिकत होत्या.

 

 

लीगल केअर आणि लिटरसी सेंटरमधील कुठलंही काम करता येईल, यासाठीचं योग्य प्रशिक्षण त्यांना मिळालं. याचं श्रेय शिरीष कुलकर्णी आणि अदिती माने यांना जातं. त्यांच्याकडून मिळालेलं प्रशिक्षण पुरेपूर वापरता येईल याचा प्रयत्न चांदणी गोरे यांनी सुरु ठेवला.

लॉ कॉलेजच्या संचालिका डॉ. शशिकला गुरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या खऱ्या अर्थाने तयार झाल्या आणि त्यांची नियुक्ती न्यायालयीन कामकाजात करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील प्यूपिल्स कोर्टाच्या पॅनलमध्ये आज त्यांची नियुक्ती झाली आहे. कौटुंबिक आणि दिवाणी खटले सामंजस्याने सोडवण्याचं काम हे पॅनल करणार आहे.

चांदणी यांचा त्या पॅनलमध्ये असलेला सहभाग, ही सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

 

 

या पॅनलचा भाग झाल्यामुळे, न्यायधिशांच्या सोबतीने बसण्याची संधी चांदणी गोरे यांना लाभली आहे. ही अभिमानाची गोष्ट असल्याचं त्याही मनापासून व्यक्त करतात. चांदणी यांच्या रूपात पहिल्या तृतीयपंथी व्यक्तीला हा मान मिळाला आहे, याचा त्यांना अधिक अभिमान वाटतो. तृतीयपंथी व्यक्ती इतरांसारख्याच सामान्य आहेत, आणि त्यांनाही योग्य मान दिला जातो, हे या निर्णयामुळे सिद्ध झालं असल्याचं चांदणी यांचं म्हणणं आहे.

सामाजिक कार्यासाठी राजकारणात प्रवेश

चांदणी गोरे यांचा सामाजिक कार्यातील प्रवास राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा झाला असल्याचं पाहायला मिळतं. २०१९ च्या मार्च महिन्यात त्यांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला वर्गाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं.

उच्चशिक्षित असणाऱ्या चांदणी गोरे यांना ही जबाबदारी देऊन, तृतीयपंथी समजालासुद्धा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलं होतं.

 

 

राजकारण नव्हे समाजकारण

राजकीय पक्षातील पद स्वीकारलं असलं, तरीही या पदाचा वापर हा, समाजकार्य पुढे नेण्यासाठीच करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटलं होतं. राजकारण करणे हा मुख्य हेतू नसून, त्या माध्यमातून सामाजिक कार्य अधिक जोमाने पुढे नेता येईल, याचा आनंद चांदणी गोरे यांना झाला होता.

राजकीय विश्वात आपली छबी निर्माण करून, त्या माध्यमातून समाजासाठी अधिकाधिक उत्तम कार्य करता येईल, असा प्रयत्न असल्याचं त्यावेळी त्यांनी ठासून सांगितलं होतं. आज थेट न्यायालयीन कामकाजात सहभागी होत त्यांनी त्यांच्या या उत्कृष्ट कार्यात एक पाऊल पुढे टाकलं आहे, असं नक्कीच म्हणायला हवं.

न्यायव्यवस्थेत चांदणी यांचा झालेला समावेश ही तृतीयपंथींना मिळणाऱ्या न्यायाची नांदी ठरावी आणि ‘त्यांचा’ही सामाजिक प्रवास उत्तमरीतीने सुरु व्हावा अशी अपेक्षा… आणि चांदणी यांना शुभेच्छा!

 

===

हे ही वाचा – ज्यांच्या टाळ्यांची घृणा वाटायची, त्याच हातांनी अनेकांचं पोट भरणारी तृतीयपंथीयांची ही प्रेरणादायी कहाणी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version