Site icon InMarathi

नील आर्मस्ट्राँग नाही, हा ‘वेगळाच माणूस’ चंद्रावर पोहचणार होता, पण…

alexei leonov inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नील आर्मस्ट्राँग यांचे नाव माहिती नाही असा माणूस विरळाच! चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती म्हणून आपण नील आर्मस्ट्राँग यांना ओळखतो. अमेरिका आणि रशिया यांच्यात विस्तव जात नाही हे तर सगळ्या जगाला ठाऊक आहे. दोन्ही देश एकमेकांना सतत टक्कर देत असतात. या दोन्ही देशांतील अंतराळ मोहिमांबाबत असलेली स्पर्धा तर जगजाहीर आहे.

चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्यात तर अमेरिकेने बाजी मारली. अपोलो मिशन यशस्वी करून दाखवले. पण यात रशियन्स देखील कुठेही मागे नव्हते. कुठेतरी गडबड झाली म्हणून, नाहीतर चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याचा मान रशियाला मिळाला असता आणि नील आर्मस्ट्राँग ऐवजी अलेक्सी लियोनोव्ह यांना आपण चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारी व्यक्ती म्हणून ओळखले असते.

 

 

शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व रशिया या दोन महासत्तांमध्ये अंतराळ मोहिमांसाठी तीव्र स्पर्धा होती. या काळात अलेक्सी लियोनोव्ह यांचा रशियाच्या अंतराळ मोहिमांमध्ये अत्यंत महत्वाचा सहभाग होता.

अलेक्सी लियोनोव्ह यांनी जरी चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवण्याचा विक्रम केला नसला, तरीही अंतराळात पहिल्यांदा स्पेसवॉक करण्याचा विक्रम मात्र त्यांच्याच नावावर आहे. कॉस्मोनॉट अलेक्सी लियोनोव्ह यांनी पहिल्यांदा अंतराळात १२ मिनिटे ९ सेकंद स्पेसवॉक करून इतिहास रचला होता.

 

 

अलेक्सी लियोनोव्ह यांचा जन्म ३० मे १९३४ रोजी सायबेरियातील अल्ताई भागात झाला होता. त्यांच्या बालपणी स्टॅलिनची हुकूमशाही होती त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्या वाईट परिस्थितीची चांगलीच झळ बसली.

खरं तर त्यांचा ओढा कलेकडे होता, परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आर्टस् कॉलेजची भरमसाठ फी परवडणारी नव्हती.

म्हणूनच त्यांनी युक्रेनियन प्रीपेरिटरी फ्लायिंग स्कुलमध्ये प्रवेश घेतला आणि १९५५ साली त्यांनी पहिल्यांदा सोलो फ्लाईट करण्यात यश मिळवले. हे करत असताना त्यांनी रीगा येथे चित्रकलेचे पार्ट टाइम शिक्षण देखील घेतले.

यानंतर त्यांनी फायटर पायलट होण्यासाठी पुढे दोन वर्षांच्या ऍडव्हान्स कोर्सला प्रवेश घेतला आणि ३० ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन ते ११३ पॅराशूट एव्हिएशन रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाले.

रशियाने अंतराळ मोहिमा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर २० सोव्हिएत एअरफोर्स पायलट्सची अंतराळ मोहिमांच्या प्रशिक्षणासाठी निवड केली. या वीस पायलट्समध्ये अलेक्सी लियोनोव्ह ह्यांची देखील निवड झाली होती. १९६०च्या पहिल्या कॉस्मोनॉट ट्रेनिंग ग्रुपची सुरुवात झाली.

 

===

हे ही वाचा – नासाच्या एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे! वाचा

===

१९६५ साली अमेरिकेच्या आधीच रशियाने अवकाशात पहिला उपग्रह सोडला होता. त्यांनी अमेरिकेच्या आधीच अंतराळात पहिल्यांदाच अवकाशयानातून अंतराळवीर अवकाशात धाडले होते.

अवकाशात पहिल्यांदाच स्पेसवॉक करण्याचा प्रयोग रशियाने करायचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी Voskhod -१ मिशनची निवड केली होती. पण दुर्दैवाने ते मिशन अयशस्वी ठरले. मात्र Voskhod -२ च्या मिशनमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला.

अलेक्सी लियोनोव्ह यांनी १८ मार्च १९६५ रोजी अवकाशयानाच्या बाहेर येत १२ मिनिटे आणि ९ सेकंद इतका वेळ स्पेसवॉक केले. परंतु या प्रयोगात लियोनोव्ह यांचा स्पेससूट अवकाशात असलेल्या व्हॅक्युममध्ये प्रचंड फुगला आणि त्यांना अवकाशयानात परत जाणे कठीण झाले.

त्यांनी कसाबसा त्यांच्या स्पेससूटमधील व्हॉल्व उघडून प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला आणि ते कसेबसे कॅप्सूलच्या आत जाऊ शकले. या मिशनसाठी लियोनोव्ह यांनी अठरा महिन्यांचे वेटलेसनेस ट्रेनिंग घेतले होते.

आपल्या पहिल्या स्पेसवॉकचे वर्णन करताना २००५ साली दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, त्यांच्या आजूबाजूला, वर-खाली सगळीकडे तारेच तारे होते. सूर्याचा प्रकाश खूप प्रखर होता आणि चेहऱ्यावर त्यांना सूर्याची उष्णता जाणवत होती. त्या स्पेसवॉकची त्यांच्या मनावर कोरली गेलेली आठवण म्हणजे अवकाशात असलेली भयाण शांतता होती.

 

 

अवकाशात इतकी शांतता होती, की त्यांना हृदयाचे ठोके देखील ऐकू येत होते. अवतीभवती सगळीकडे तारे होते. आणि ते कुठल्याही प्रयत्नांशिवाय अवकाशाच्या पोकळीत तरंगत होते.

या मिशन नंतर पृथ्वीवर परत येताना अवकाशयानात काहीतरी बिघाड झाला आणि लियोनोव्ह, त्यांचे सहकारी बेलायेव्ह यांना इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यांनी अवकाशयान जमिनीवर सुखरूप उतरवले परंतु ते सायबेरियाच्या दाट जंगलात कुठेतरी उतरले होते जिथे दूरदूरपर्यंत मानवी वस्ती नव्हती. सायबेरियाच्या त्या गोठवणाऱ्या थंडीत त्या दोघांनी दोन रात्री काढल्या आणि नंतर शोधपथकाने त्यांना शोधून तिथून बाहेर काढले.

असं म्हणतात की १९७० साली रशियाच्या रॉकेट कार्यक्रमाचे प्रमुख वासिली मिशिन हे लियोनोव्ह यांच्यावर नाराज होते. वासिली यांचे म्हणणे होते की जगातील पहिले स्पेस स्टेशन सॅल्यूट -१ मध्ये काम करताना लियोनोव्ह यांची ड्रॉईंग पेन्सिल स्पेस स्टेशनच्या व्हेंटिलेशन सिस्टीममध्ये तरंगत गेली आणि ती तिथे अडकली. यामुळे ते चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती होऊ शकले नाहीत.

 

 

अमेरिकेच्या अपोलो अंतरिक्ष कार्यक्रमामुळे सोव्हिएत संघ त्यांच्या पहिल्या मून मिशनसाठी संपूर्ण गोपनीयतेने काम करत होता. रशियाची चंद्रावर उतरण्यासाठीची तयारी प्रचंड गोपनीयतेने सुरु होती. या मिशनमध्ये लियोनोव्ह यांची निवड झाली होती आणि चंद्रावर उतरण्यासाठी त्यांना लुनार लॅन्डरच्या ऐवजी एक रशियन फायटर एमआय -४ हेलिकॉप्टरमधून उतरण्याचे ट्रेनिंग दिले होते.

ट्रेनिंग दरम्यान ठरले होते, की ते हेलिकॉप्टरच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाच्या ११० मीटर उंचीवरून लँडिंग करतील. या दरम्यान हेलिकॉप्टरचे इंजिन बंद करून ते ऑटो रोटेशनमध्ये लँड केले जाईल असेही निश्चित करण्यात आले होते.

ही सगळी तयारी सुरु असताना सोव्हिएतच्या स्पेस प्रोग्रॅमचे प्रमुख डिझायनर सर्गेई कोरोलोव्ह यांचे अचानक अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोव्हिएत स्पेस प्रोग्रॅमचे अतोनात नुकसान झाले आणि अमेरिकेने यात बाजी मारली.

अमेरिकेचे मिशन यशस्वी झाले आणि रशियाने त्यांचे हे मिशन रद्द केले. जर सर्गेई कोरोलोव्ह यांचे अकाली निधन झाले नसते, तर चंद्रावर उतरणारी पहिली व्यक्ती म्हणून आज आपण अलेक्सी लियोनोव्ह यांचे नाव घेतले असते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version