Site icon InMarathi

या हिंदू माणसाने मशीद उभारली, तीदेखील चक्क ख्रिस्ती माणसाच्या पैशातून…

g gopalkrishnan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्या भारतातल्या विविधतेत जी एकता सामावलेली आहे, ती जगातल्या दुसऱ्या कुठल्याच देशात बघायला मिळत नाही. देशांचे आपले असे ऑफिशियल धर्म नियुक्त करून ठेवलेले आहेत. पण भारतात तसं काहीच नाही. आपल्या देशात धर्मनिरपेक्षता आहे, आणि त्यामुळे इथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार धर्म निवडू शकते.

भारतात दिवाळी, ईद, ख्रिसमस, बुद्धपौर्णिमा, गुरुपुरब असे सगळेच सण एकसारख्या उत्साहात साजरे केले जातात. अगदी मैला मैलावर भाषा, वेशभूषा, संस्कृती सगळेच बदलत जाते पण मनं मात्र सारखीच असतात.

 

 

भारतात सर्व धर्म समभावाचा संदेश देणारी अनेक उदाहरणे आहेत. गुरुकुंज मोझरीचं प्रसिद्ध गुरुमंदिर ज्यात भारतात असलेल्या सगळ्या धर्माच्या देवतांच्या प्रतिमा आणि चित्रे आहेत, शिर्डीचे साई बाबा जिथे हिंदू – मुस्लिम दोन्ही धर्माची लोक श्रद्धेने पूजा करायला जातात, आता याच उदहाराणांपैकी एक होण्याचा मान मिळाला आहे, तो केरळ येथील, ८५ वर्षीय गोपाळकृष्णन यांना.

यांनी आपल्या अवघ्या आयुष्यात केरळ मध्ये १११ मशिदी बांधल्या असून, चार चर्च आणि एका मंदिराची सुद्धा निर्मिती केलेली आहे. त्यांची सगळ्यात फेमस वास्तू म्हणजे ती मशीद, जी स्वतः हिंदू असलेल्या गोपाळकृष्णन यांनी ख्रिस्ती व्यक्तीच्या पैशांनी बांधली. ही नेमकी गोष्ट काय आहे, जरा जाणून घेऊया.

 

 

जी. गोपाळकृष्णन हे केरळमधील धार्मिक स्थळांची निर्मिती करणारे प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि बिल्डर आहेत. ते सध्या तिरुअनंतपुरम येथे वास्तव्यास असून, आपल्या हातून घडणाऱ्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जातात.

अनेक सुंदर घरं, इमारती बांधण्याचा अनुभव जरी असला तरी ते आपल्या धार्मिक स्थळांच्या उभारणीसाठी जास्त प्रसिद्ध आहेत.

अगदी लहानपणापासूनच त्यांचा या क्षेत्रात रस होता. त्यांचे वडील हे ठेकेदार असल्याने, त्यांचा इमारती, प्लॅन्स, या सगळ्यांशी जवळून संबंध यायचा. गोपाळकृष्णन लहान असताना आपल्या वडिलांसाठी कामाच्या साईटवर डबा घेऊन जायचे आणि तासंतास त्यांच्याबरोबर साईटवरच घालवायचे.

तिथे इमारतींचे प्लॅन्स बघणं, इमारतीचा पाया कसा रचला जातो इथपासून ते कामगारांशी कसं वागावं, आपल्याला आखून दिलेल्या बजेटमध्ये काम कसं करावं असे अनेक धडे त्यांना मिळत गेले. वास्तुकलेचं बाळकडू त्यांना अगदी आपल्या वडिलांपासूनच मिळालं हे म्हणायला हरकत नाही.

 

 

पुढे त्यांनी त्याच विषयात शिक्षण घेतलं. एक उत्तम आर्किटेक्ट झाले आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायात सामील झाले. आज त्यांच्या हातून, म्हणजे एका हिंदू व्यक्तीच्या हातून उभारल्या गेलेल्या मशिदी बघण्यासाठी जगभरातून लोक तिथे येतात.

असं झालं मशिदीचं बांधकाम

ही गोष्ट आहे १९६२ च्या उन्हाळ्याची… त्यांच्या वडिलांना पलायम जुमा मशिदीच्या पुनर्निर्माणाचा ठेका मिळाला होता आणि मशिदीच्या बांधकामासाठी तत्कालीन एजी कार्यालयाचे पीपी चुम्मर यांनी त्यांना ५००० रुपये उपलब्ध करून दिले होते. विशेष बाब अशी, की चुम्मर हे ख्रिश्चन धर्माचे होते. चुम्मर यांनीच मशिदीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या कर्जाची देखील स्वखुशीने व्यवस्था करून दिली होती.

 

 

ही मशीद लोकांना इतकी आवडली, की दुरून दुरून लोक गोपाळकृष्णन यांनी बांधलेली पलायम जुमा मशिद पाहण्यासाठी येऊ लागले.

या मशिदीची वास्तुकला केरळमध्ये बांधल्या जाणाऱ्या मशिदीच्या वास्तुकलेपेक्षा अतिशय भिन्न होती. यात इंडो-पर्शियन वास्तुकलेचा वापर केला गेला होता. केरळमध्ये मशिदी सुद्धा मंदिरांप्रमाणे बांधल्या जात, पण गोपाळकृष्णन यांनी या मशिदीत गोल घुमट आणि दोन मिनारांचा उपयोग केला.

केरळमध्ये त्याकाळात बांधली गेलेली ती पहिली इंडो-पर्शियन मशीद होती. या मशिदीच्या बांधकामाला ५ वर्षे लागली. आणि १९६७ साली, तत्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांनी त्या मशिदीचं उदघाटन केलं.

 

 

या मशिदीत वापरल्या गेलेल्या वास्तुकलेची संकल्पना त्यांना २ पुस्तकांमधून मिळाली त्यातील एक पुस्तक होत – पर्सि ब्राऊन या लेखकाचं “इंडियन आर्किटेक्चर. हे पुस्तक इस्लामिक राजवटीत भारताची वास्तुकला कोणत्या प्रकारची होती हे सांगतं.

गोपाळकृष्णन यांचा अजून एक किस्सा असाही सांगितलं जातो, की त्यांनी ६० मशिदी बांधल्यावर, त्यांच्या ख्रिस्ती मित्रांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता तो असा, की “तुम्ही इतक्या मशिदी बांधल्या, आता कधी चर्च बांधणार नाही का?” यावर ते म्हणाले होते, की “कोणी मला काम दिलं तर ते मी नक्की करेन. कारण मी सर्व धर्म समभाव या विचारसरणीवर विश्वास ठेवतो. पुढे काही दिवसांनी, एक पादरी आणि काही लोक त्यांच्याकडे गेले. त्यांनी गोपालकृष्णन यांना जॉर्ज आर्थोडॉक्स वलिया पैली चर्च बांधण्याचा आग्रह केला. आणि मी ते चर्च सुद्धा बांधले.”

 

 

या बरोबरच, केरळची सब्रिमाला मंदिराच्या वाटेवर असलेली इरुमली येथील वावर मशीद सुद्धा त्यांनीच बांधली आहे. ही मशिद पूर्ण करायला १७ वर्षांचा कालावधी लागला होता. या मोठ्या प्रोजेक्ट बरोबर, त्यांच्या घराजवळील भद्रकाली मंदिर सुद्धा त्यांनीच बांधले आहे.

गोपाळकृष्णन हे खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव मानणारे आहेत. त्यांच्या पत्नी विजयम्मा या ख्रिश्चन आहेत, तर त्यांच्या दोन्ही मुलांनी देखील आंतरजातीय विवाह केलेले आहेत. समाजापुढे आलेल्या गोपाळकृष्णन यांच्या उदाहरणावरून , कोणता धर्म श्रेष्ठ यावर भांडणाऱ्या लोकांनी काही धडे गिरवले पाहिजेत. यामुळे समाजात शांती आणि बंधुत्व टिकून, भारत एक समृद्ध देश बनेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version