Site icon InMarathi

सिगरेट नंतर जे हमखास वापरलं जातं, ते Happydent ‘असं’ जन्माला आलंय!

happydent inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोणत्याही वस्तूची विक्री ही प्रामुख्याने त्याची गरज, गुणवत्ता यामुळे होत असते. मात्र काही वस्तूंच्या जाहिराती इतक्या कल्पक असतात, की त्या बघून वस्तू विकत घेण्याची इच्छा निर्माण होतेच. अशा प्रोडक्ट्सची विक्रमी विक्री सुद्धा होते.

भारतीय जाहिरातींमध्ये ‘हमारा बजाज’, ‘ठंडा मतलब – कोका कोला’, ‘अमूल – द टेस्ट ऑफ इंडिया’सारखी उदाहरणं आहेत, ज्यांनी ९० च्या दशकात केवळ त्या वस्तूंना आणि पर्यायाने भारतीय जाहिरात क्षेत्राला सुद्धा सुगीचे दिवस आणले होते.

२००१ ची सुरुवात ही जाहिरातींच्या बदलत्या स्वरूपाने झाली. जाहिरातींमध्ये वेगवेगळे प्रयोग होण्यास सुरुवात झाली होती. जाहिरातींच्या प्रयोगांमध्ये ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गमच्या जाहिराती या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. प्रामुख्याने सिगरेट प्यायल्यानंतर तोंडाचा येणारा वास आपल्या पालकांपासून लपवण्यासाठी तरुण पिढी ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गम खाताना दिसते.

 

 

खरं काम वेगळंच होतं…

‘चिकल’ या पदार्थापासून तयार झालेलं ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गम हे तोंडाची काळजी घेणं, दात अधिक शुभ्र करणं, शुद्ध श्वास म्हणजेच ‘फ्रेश ब्रिदिंग’साठी मदत करत असतं. साखर विरहीत असल्याने, ‘प्लाक ऍसिड’ कमी करण्यास मदत करतं आणि कोणतेही ‘साईड इफेक्ट’ नसल्याने डॉक्टर सुद्धा याचं सेवन करण्याची परवानगी देत असतात.

जाहिरात तयार करतांना त्या वस्तूचं कुठलं वैशिष्ट्य डोळ्यासमोर ठेवायचं, हे त्या कंपनीच्या आणि जाहिरात करणाऱ्या कंपनीवर अवलंबून असतं.

प्रख्यात लेखक प्रसून जोशी यांनी जेव्हा ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गमच्या जाहिरातींवर काम केलं तेव्हा त्यांनी दात पांढरे शुभ्र होणं या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आणि त्यानुसार जाहिराती लिहिल्या. ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गम खाल्ल्यानंतर दात इतके शुभ्र होतात की, दातांमधून लाईट लागतो ही संकल्पना प्रसून जोशी यांना सुचली, त्यानंतर ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गमने कधीच मागे वळून बघितलं नाही.

 

 

हॅप्पीडेन्टचा इतिहास

‘प्रेफेटी वॅन मेल्ले’ या कंपनीचं असलेलं हे उत्पादन नेदरलँडच्या वॅन मेल्ले आणि इटलीच्या प्रेफेटी या दोन कंपन्यांच्या २००१ मधील एकत्रीकरणानंतर जगभरात लाँच करण्यात आलं होतं.

चुईंग गम आणि चॉकलेट्स तयार करणं, हा या उद्योग समूहाचा प्रमुख व्यवसाय आहे. नेदरलँडमध्ये प्रमुख कार्यालय असलेल्या ‘प्रेफेटी वॅन मेल्ले’ला भारतात ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गमची सुरुवात करतांना भारतीय मानसिकता ओळखेल अशा जाहिरात लेखकाची आवश्यकता होती. प्रसून जोशी सरांच्या लिखाणात त्यांना ती मानसिकता दिसून आली.

 

 

१९३२ पासून चुईंग गम तयार करण्याच्या व्यवसायात असलेल्या ‘प्रेफेटी वॅन मेल्ले’ला जाहिरातींकडून असलेल्या अपेक्षा साफ होत्या. ‘ब्रूकलिन’ या नावाने आपली ओळख असलेल्या या कंपनीने १९७१ मध्ये ‘हॅप्पीडेंट’ चुईंग गमची निर्मिती करायला सुरुवात केली होती.

२००१ मध्ये भारतात विस्तार करतांना ‘प्रेफेटी वॅन मेल्ले इंडिया’ या कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनी ने ‘हॅप्पीडेंट’ला भारतात लाँच करतांना ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ हे नाव द्यायचं ठरवलं.

‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गममध्ये काही प्रमाणात ‘बेकिंग सोडा’ असतो, ज्यामुळे दात स्वच्छ होतात आणि पांढरेशुभ्र दिसतात.

 

 

‘प्रेफेटी वॅन मेल्ले’ ग्रुपने ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गम नंतर चुपा चुप्स, मेंटोस, फ्रीस्क, कॉईला, बिग बबुल, सेंटर फ्रुट आणि स्मिन्टसारखी चॉकलेट्स, चुईंग गम बाजारात आणली आणि या क्षेत्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

कालांतराने कंपनीने ‘हॅप्पीडेंट वेव्ह’, ‘कम्प्लिट केअर’, ‘व्हाईट एक्साईलीट’सारखी आयुर्वेदिक सत्व असलेल्या चॉकलेट्स, चुईंग गम ची सुद्धा निर्मिती करण्यास सुरुवात केली. भारत, इंडोनेशिया, इटली, टर्की, ब्राझील, स्पेन, पोर्तुगाल आणि व्हिएतनाम या देशांमध्ये आज ही कंपनी उत्पादन आणि विक्री करत आहे.

‘हॅप्पीडेंट व्हाईट’कडून लाईट लागतो असंच का चित्रित करण्यात आलं?

भारतीय लोकांमध्ये चुईंग गम म्हणजे फक्त श्वासामधून येणारा वास कमी होणे, अशीच एक प्रतिमा होती. ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गम हे त्याहीपेक्षा अधिक फायदेशीर आहे, त्याच्या सेवनाने तुमचा आत्मविश्वास वाढेल हे सांगण्यासाठी कंपनीने “दातो तले, दिया जले”सारखे कॅम्पेन तयार केले.

 

 

तरुण वर्गाला आकर्षित केलं…

भारतातील मोठा तरुण वर्ग लक्षात घेऊन, सगळ्या जाहिरातींमध्ये तरुण मुलांनाच घेण्याचं ठरवलं गेलं. स्वच्छ दात आणि श्वासांमुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत बोलतांना संकोच करणार नाही, हा विश्वास निर्माण करण्यात ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गमच्या जाहिराती यशस्वी झाल्या होत्या.

या जाहिराती बघितल्यावर, प्रत्येक जण जाहिरात तयार करणाऱ्या क्रिएटिव्ह लोकांचं कौतुक करू लागला. एका दमदार जाहिरातीच्या जोरावर कंपनीची विक्री ९० टक्क्यांनी वाढली होती.

प्रसून जोशी यांनी तयार केलेल्या ‘बल्ब हाऊस’च्या जाहिरातीचा मागच्या १०० वर्षातील जगातील सर्वात चांगल्या २० जाहिरातींमध्ये समावेश करण्यात आला होता ही भारतीय जाहिरात क्षेत्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

 

 

२००८ मध्ये काळाची पाऊलं ओळखून ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गमने ‘वेबचटनी’ या संस्थेसोबत करार केला. ३ मिनिटांच्या विडिओ जाहिरातींमधून तरुण पिढीचं लक्ष पुन्हा एकदा वेधलं आहे.

विनोदबुद्धीने तयार करण्यात आलेल्या ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गमच्या सर्वच जाहिराती लोकांच्या मनात हॅप्पीडेंटची प्रतिमा मोठी करत होत्या. निश्चितच या जाहिरातींचा फायदा कंपनीची विक्री वाढवण्यात झाला.

सध्याच्या आरोग्यासाठी सतर्क असलेल्या लोकांसाठी ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ने ‘साखर विरहित’ असण्याबद्दलची माहिती मांडण्याण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपल्या जाहिराती तयार केल्या.

‘दातांची, तोंडाची काळजी घेण्यासाठी उपयुक्त’ ही संकल्पना वापरून सध्या ‘हॅप्पीडेंट व्हाईट’चं प्रमोशन विविध डिजिटल माध्यमांवर सुरू आहे. जाहिरात या कंपनीचं अस्तित्व, ठरवू शकतात हे ‘हॅप्पीडेंट व्हाईट’ चुईंग गमच्या उदाहरणावरून आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version