पूराने सगळं हिरावून नेलं, मात्र झालेली नुकसान भरपाई मिळवण्यासाठी हे वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
पाऊस काळ बनून आला आणि डोळ्यांसमोर आयुष्याचा मांडलेला खेळ उद्ध्वस्त झाला. हीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. कोकण, रायगड, चिपळूण यांपासून ते थेट सांगली, सातारा, कोल्हापूरपर्यंतचे अनेक जिल्हे पुराचे तडाखे सोसत आहेत.
कोकणातील अनेक भागांंत दहशतीच्या दरडी कोसळल्या, तर दुसरीकडे अनेक गावांत साचलेल्या पाण्यामुळे अनेक संसार रस्त्यावर आले.
तीन दिवस थैमान घालणाऱ्या या मृत्युतांडवात स्वतःचा जीव वाचवणं हे मुख्य उद्दिष्ट होतं, अनेकांचं हे ध्येय पूर्ण झालं असलं तरी आपल्या कुटुंबातील सगळ्यांना गमावलेले दुर्दैवी लोक आक्रोश करून विचारतायत “सांगा कसं जगायचं?”
हळूहळू चिपळूण, रत्नागिरी येथिल पाणी ओसरलं, तळीयेतही मदतकार्य सुरु झालं, मात्र त्यानंतर या निसर्गाच्या प्रकोपाची खरी जाणीव झाली. कारण ज्यांचे जीव वाचले त्यांच्याहाती आज इतर काहीही नाही. घर, त्यातील वस्तु, गाडी, सामान, बाजारपेठांमधील दुकानदारांची आयुष्यभराची पुंजी सारंकाही पुराने आपल्यासोबत ओढून नेलं.
या सर्वांसाठी सरकारने मदतीची पॅकेज उपलब्ध करून दिली असली तरी या मदतीपर्यंत पोहोचायचं कसं? याचं उत्तर आजही अनेकांना ठाऊक नाही. गाव असो वा शहर, पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येकाला भरपाईची दाद मागण्याचा हक्क आहे, त्यासाठी सरकार, विमा कंपन्या यांनी तरतुदही केली आहे. मात्र गरज आहे ती तुमच्या प्रयत्नांची!
१. त्वरित पंचमाना करून घ्या
पूर ओसरताच शासकीय यंत्रणांकडून पंचनाम्यांचे आदेश दिले जातात. प्रामुख्याने जिल्ह्याधिकारी कार्यालयांसाठी हे आदेश असल्याने ग्रामपंचायत, तलाठी, मंडल अधिकारी यांच्यामार्फत गावांत तर सिटी सर्वेक्षण यांच्यामार्फत शहरांमध्ये पंचनामे केले जातात.
अनेकदा पुरांमुळे झालेली हानी, कुटुंबियांचे निधन यांमुळे भावनिकदृष्ट्या ही परिस्थिती अवघड आहे, मात्र तरिही अशावेळी संयमाने पंचनामा करणाऱ्यांना सहकार्य करा.
घर, घरातील सामान, गाडी, वस्तु यांचे एकूण किती आणि कसे नुकसान झाले आहे यांची सविस्तर, खरी माहिती द्या.
२. झालेल्या नुकसानाचे पुरावे जमा करा
पूर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानाचे फोटो, व्हिडिओ काढून संग्रही ठेवणं शक्य असेल तर ही काळजी नक्की घ्या.
पुरात अनेकांचे मोबाईल वाहून जातात, मात्र परिसरातील ज्यांच्याकडे मोबाईल असेल त्यांच्या मदतीने शक्य असतील तर पुरस्थितीचे फोटो काढून ठेवा. तुमचे नुकसान झाल्याचा हा बोलका पुरावा तुम्हाला मदत मिळण्यासाठी निश्चित फायदेशीर ठरतो.
नुकसानीचे हे पुरावे शासकीय मदतीतही ग्राह्य धरले जात असल्याने ते महत्वाचे आहेत.
अशा परिस्थितीत फोटो काढणं शक्य नसलं तरी घाबरून जाऊ नका. फक्त झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती पंंचनामे करणाऱ्यांपर्यंत पोहोचवा.
–
हे ही वाचा – मुंबईतील प्रत्येकाने वाचावा असा लेख: जलमग्न मुंबई, निसर्ग पूरक व्यवस्थापन आणि आपण
–
३. शासकीय ओळखपत्र जपून ठेवा
आधारकार्ड, पॅनकार्ड या शासकीय ओळखपत्रांची खरी किंमत अशा परिस्थितीत अधिक लक्षात येईल, कारण कोणतीही मदत मिळवण्यासाठी तुमचे ओळखपत्र वारंवार तपासले जाते.
पुराच्या पाण्यात सगळीकागदपत्र वाहून गेली असली तरी काळजी करू नका. मोबाइल, इमेल अशा कोणत्या साधनांत आपण ही कागदपत्र सेव्ह करून ठेवली आहेत का?हे नीट आठवून ठेवा. इंटरनेटवर सुरक्षितरित्या सेव्ह केलेली कागदपत्र ऑनलाईन स्वरुपात जरी मिळाली तरी तुमचा मदतीचा पुढील मार्ग जास्त सोपा होऊ शकेल.
यासाठी आपला फोन, गुगल ड्राइव्ह, जी मेल येथे साठवून ठेवण्यावर भर द्या, अर्थात ही कागदपत्र सुरक्षितरित्या साठवण्याकडे अधिक लक्ष द्या.
४. पाठपुरावा करा, माध्यमांशी संपर्क साधा
शासनाने जाहीर केलेले पॅकेज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही ठराविक काळापर्यंत वाट पहावी लागते कारण संपूर्ण राज्यात एकाच वेळी ही प्रक्रिया सुरु असल्याने थोडाफार उशीर होणे अपेक्षित असते.
मात्र दीर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतरही जर शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही, तर शांत बसू नका. सातत्याने पाठपुरावा करा. यामध्ये तुमच्या स्थानिक प्रशासनाची संपर्क साधता येईल.
त्यानंतरही जर प्रतिसाद मिळत नसेल तर स्थानिक माध्यमांना याबाबातची माहिती देता येईल.
दुकानांच्या नुकसान भरपाईसाठी…
१. दुकानं, कारखाने यांचं झालेलं नुकसान पाहणं कोणत्याही व्यावसायिकासाठी अत्यंत कठीण! मात्र या संकटातूनही सावरून पुन्हा उभं रहायचं असेल तर नुकसान भरपाई मिळवणं गरजेचं आहे.
त्यासाठी आपलं दुकान, कारखाना यांचा विमा काढला आहे का? याची शहानिशा करा. कोणतीही आपत्ती सांगून येत नाही तरी शक्य असल्यास तातडीने विमा काढून ठेवा.
विम्याची कागदपत्रं, नोंदणीचे पुरावे हे ऑनलाईन संग्रही ठेवा.
२. नुकसान झाल्यानंतर लवकरात लवकर विमा कंपन्यांशी संपर्क साधा. त्यांच्याकडूने केल्या जाणाऱ्या पंचनाम्याला सहकार्य करा. त्यात झालेल्या नुकसानाची खरी माहिती द्या.
विमान्याच्या पंचनाम्यात नुकसानाचे फोटो, व्हिडिओ कंपनीला पाठवा, त्यानंतरच एकूण नुकसानाची शहानिशा झाल्यानंतर तुम्हाला त्याची भरपाई मिळेल.
दुकानांचा विमा काढला नसेल तर नुकसान भरपाई मिळत नाही हे लक्षात घ्या.
गाड्यांचं नुकसान
पुराच्या पाण्यात वाहून जाणा-या गाड्या, किंवा पाण्यात पुर्णतः बुडालेल्या बसेस पाहिल्यावर धडकी भरली होती. मात्र पाणी ओसरल्यानंतर या गाड्यांच्या मालकांना आपलं रडू आवरेनासं होतं.
कष्टाच्या कमाईतून घेतलेल्या वाहनाची वाताहात पाहिल्यानंतर तातडीने त्याचा भरपाईसाठी प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
बहुतांश खाजगी गाड्यांना विमाकवच असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.
थर्ड पार्टी आणि कॉम्रेहेन्सिव्ह या दोन प्रकारात गाड्यांचे विमा काढले जातात. थर्ड पार्टी विम्याचं संरक्षण असणा-यांना बहुतांश वेळा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई मिळत नाही. संपुर्ण विमा संरक्षण असणाऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळते.
नुकसान झाल्यानंतर विमा कंपन्यांशी संपर्क साधत नुकसान भरपाई फॉर्म भरणे गरजेचे असते. गाडीचा नंबर, खरेदीची तारिख, विमा संरक्षण पॉलिसीची कागदपत्र यांच्या प्रति जोडणं गरजेचं आहे.
विमा कंपनीच्या सर्व्हेयरकडून जागेवर गाडीच्या दुरुस्तीचा अंदाज घेण्यात येतो. अन्यथा टो व्हॅनव्दारे गाडी गॅरेजला पाठवून तेथेही हा सर्व्हे करण्याची सोय केली जाते.
गाडीसाठी जीव पणाला लावू नका
पाण्यातील गाडी बाहेर काढण्यासाठी वाहत्या पाण्यात जाण्याचे धाडस करू नका. गाडीपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे.
पाणी ओसरल्यानंतर जमिनीचा, चिखलाचा अंदाज घेत गाडीपर्यंत पोहोचा. मात्र त्यावेळीही इतरांच्या मदतीने गाडी धक्का मारत चिखलाबाहेर काढा. यावेळी गाडी सुरु करण्याचा अनाठायी प्रयत्न करू नका, यामुळे इंजिनमध्ये अधिक बिघाड होत दुरुस्तीच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता असते.
तज्ञांनी गाडीची पाहणी केल्यानंतर त्याची नुकसान भरपाई मिळेल, मात्र त्याकरिता स्वतःचा जीव धोक्यात घालू नका.
पुराच्या संकटाने अनेकांचे संसार आज उघड्यावर पडले आहेत. मात्र या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी शासनासह खाजगी विमा कंपन्याही मदतीला उभ्या आहेत. गरज आहे ते त्या मदतीपर्यंत पोहोचण्याची!
स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा यांच्याशी सातत्याने साधलेल्या संपर्कातून, योग्य प्रक्रिया पुर्ण करत तुम्हाला नुकसान भरपाई नक्कीच मिळू शकेल.
तुमच्या परिचयातील ज्यांनी या पुराच्या संकटात आपलं सर्वस्व गमावलं आहे, त्यांना आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.