Site icon InMarathi

हॉकी नकोच… ‘क्रिकेट’ला आपला ‘राष्ट्रीय खेळ’ घोषित करावं : वाचा परखड मत!

hockey vs cricket inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर 

===

मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलं आणि ऑलिंपिक २०२० ची भारतासाठी सुरुवात जबरदस्त झाली, पण नंतर लगेच नेमबाजीमध्ये भारत पहिल्याच फेरीत भारत बाहेर पडला त्यामुळेही बऱ्याच लोकांची निराशा झाली.

एवढं होऊनही हॉकीमध्येदेखील भारताला ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला असून ७-१ ने भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने दाखवून दिलं की ते हॉकीमध्येदेखील अव्वल आहेत.

 

 

यावरून सोशल मीडियावर सगळेच भारतीय हॉकी संघावर टीका करत आहेत, ज्या देशाचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे त्याच देशाची हॉकीची टीम इतका वाईट पेरफॉर्मन्स देत असेल तर त्याला राष्ट्रीय खेळ म्हणून दिलेली मान्यता कितपत योग्य आहे? असाही सवाल सोशल मीडियावर उचलला जात आहे.

आज आपल्या देशात क्रिकेटला दिलेलं अनन्यसाधारण महत्व आणि त्याचे वेगवेगळे फॉरमॅट इतके फोफावले आहेत, की देशातल्या प्रत्येकाला वन डेपासून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येकाची नावं आणि कारकीर्द तोंडपाठ असते.

हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असूनही आपल्याला एका तरी हॉकी प्लेयरचं नाव माहित आहे का? मग आपल्याला हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ म्हणवून घेण्याचा काय अधिकार आहे?

हे ही वाचा त्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट होतं; पण आज मात्र स्थान नाही! वाचा यामागची कारणं

 

असं नाही की ऑलिंपिकमध्ये कधीच क्रिकेटचा समावेश करण्यात आला नाही, २ वेळा प्रयत्न केला गेला होता पण जास्तीकरून देशात क्रिकेट हा खेळ तेवढा लोकप्रिय नसल्याने आणि अपेक्षित एंट्रीज न आल्यानेच क्रिकेटला यात समाविष्ट करण्यात आलं नाही!

याखेरीज आणखी बरीच कारणं होती, पण एवढं होऊनही आपल्या देशातलं क्रिकेट वेड काही कमी व्हायचं नाव घेत नाही, आणि याचाच परिणाम आपल्याला ऑलिंपिकसारख्या खेळामध्ये दिसून येतो.

मी या दोन खेळांची तुलना करू इच्छित नाही पण एकंदरच क्रिकेटला दिलेलं अवाजवी महत्व आपल्या देशाच्या राष्ट्रीय खेळाचं अस्तित्व धोक्यात आणू शकतं याचा आढावा घ्यायचा प्रयत्न म्हणजे हा लेखप्रपंच!

हॉकीचा भारतीय इतिहास :

ब्रिटिशांनी क्रिकेटप्रमाणेच हॉकी हा खेळसुद्धा भारतात आणला, आणि भारतीय आर्मीमुळेच हा खेळ अधिक लोकप्रिय झाला. ‘हॉकीचे ब्रॅडमन’ म्हणून ओळखले जाणारे उत्कृष्ट हॉकीपटू ध्यानचंद यांनासुद्धा आर्मीमध्ये सर्व्ह करतानाच हॉकी खेळायची संधी मिळाली आणि मग नंतर त्यांनी पुढे इतिहास रचला तो सर्वश्रुत आहेच.

 

 

सर्वप्रथम हॉकीचा खेळ त्या काळच्या ब्रिटिशांच्या राजधानीत म्हणजे कलकत्तामध्ये खेळला गेला होता. सगळ्याच बंगाली लोकांचा आवडता खेळ म्हणजे फुटबॉल तरीही काही काळानंतर बंगाली लोकानी हॉकीलाही डोक्यावर घेतलं आणि नंतर हळू हळू हॉकी हा खेळ बंगाल, पंजाब, ग्वालियर, राजपुताना अशा भागात पसंत केला जाऊ लागला.

१८५५ मध्ये देशातलं पहिलं हॉकी क्लब कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलं. बघायला गेलं तर हॉकी हा सर्वात प्राचीन खेळ आहे, इजिप्तमध्ये ४००० वर्षांपूर्वी खेळल्या जाणाऱ्या प्रकाराशी फारच मिळता जुळता होता.

Indian Hockey Federation च्या स्थापनेनंतर १९२६ मध्ये प्रथमच न्यूझीलंड दौरा केला गेला ज्यात मेन्स हॉकी टीमने एकूण २१ सामने खेळले आणि त्यापैकी १८ सामन्यात विजयही मिळवला होता.

याच दौऱ्यात साऱ्या जगाला एक उत्तम खेळाडू पाहायला मिळाला तो म्हणजे ध्यानचंद! १९२८ पासून भारताने हॉकीच्या जोरावर ऑलिंपिक खेळात उडी घेतली आणि आपलं दरारा बरीच वर्षं कायम ठेवला.

१९२८ पासून १९८० पर्यंत भारतीय हॉकी टीमने तब्बल ८ गोल्ड मेडल ऑलिंपिक स्पर्धेत पटकावली होती, आणि आज याच देशात एकाही माणसाला हॉकीच्या टीमच्या एकाही प्लेयरचं नाव आठवत नाहीये, हे कीती मोठं दुर्दैव आहे!

 

 

आज आपण सगळेच भारत ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी का करत नाही? म्हणत गळे काढतो पण आपल्यापैकी किती लोकं हॉकीच्या मॅचेस बघायला आयपीएलसारखी गर्दी करताना दिसतात?

खरंतर क्रिकेटला आपल्या देशात मिळालेल्या ग्लॅमरमागे आपणदेखील तितकेच जबाबदार आहोत. जेव्हा एखादी बाहेरची टेनिसपटू ‘मला सचिन तेंडुलकर माहीत नाही’ असं म्हणते तेव्हा आपण सगळेच तिच्याविरुद्ध कॅम्पेन सुरू करतो, पण आपल्याला त्यांच्या देशातल्या कीती खेळाडूंची नावं माहीत आहेत हा उलट प्रश्न स्वतःला कधीच का करत नाही?

क्रिकेट हा कितीही मोठा खर्चीक खेळ असला तरी आपल्या देशात त्याला दिलेलं अवाजवी महत्व हे कीती घातक आहे हे आपल्याला ऑलिंपिकसारखे खेळ जवळ आपल्यावरच का जाणवतं?

बरं यावर तोडगा का काढला जात नाही? जसं कबड्डीसारख्या खेळाला कामर्शियल खेळ बनवून स्टँडर्ड वाढवलं गेलं, तसंच हॉकी किंवा इतर खेळांच्या बाबतीत आपण का केलेलं नाही? हॉकी हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ असूनही त्याबाबतीत इतकी उदासीनता का?

 

 

खेळाकडे फक्त पैसे कमवायचे एक मोठे साधन म्हणून बघणाऱ्या आपल्या या देशात मोठमोठे उद्योगपती, अभिनेते आयपीएलसारख्या खेळांसाठी करोडो रुपयांचा जुगार खेळतात, लिलाव लावतात, पण त्यांना त्यापैकीच काही रक्कम राष्ट्रीय खेळासाठी वापरुन त्याला पुढे आणावंस का वाटत नाही?

आज कोरोनाच्या एवढ्या भयंकर महामारीतही बायोबबलमध्ये आयपीएल खेळवली जाते पण हॉकीसारख्या खेळाला कुणीच वाली नसतो?, भारतीय क्रिकेट टीम नियम पायदळी तुडवून क्रिकेट टुरच्या नावावर जगभर फिरते आणि खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह होतात ते चालतं? पण या सगळ्यात हॉकी आणि इतर खेळाडूंना खिजगणतितही पकडत नाहीत.

 

 

हाच प्रकार जर पुढेही सुरू राहणार असेल तर हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देणंसुद्धा मला योग्य वाटत नाही, उगाच दिखावा करण्यासाठी हॉकीला आपला राष्ट्रीय खेळ म्हणवून घ्यायचं आणि वास्तवात मात्र सगळ्याच बाबतीत फक्त क्रिकेटलाच पुढे आणायचं हे कुठेतरी थांबायला हवं!

आज देशातल्या प्रत्येक शहरात, गल्लीत तुम्हाला वेगवेगळ्या खेळातले चॅम्पियन्स पाहायला मिळतील, पण त्यासाठी आपली नजर आणखीन चौफेर जायला हवी.

आज ठरवलं तर भारत पुन्हा ऑलिंपिक हॉकीमध्ये आपला दरारा निर्माण करू शकेल अशी माझी खात्री आहे, पण योग्य प्रोत्साहन, आर्थिक सहाय्य मिळून लोकांची मानसिकता बदलणं सर्वात जास्त गरजेचं आहे.

नाहीतर काही वर्षांनी डायनॉसोरसारखा हॉकी खेळही फक्त सिनेमातच बघायला मिळेल आणि तेवढ्यापुरताच मर्यादित राहील, अजूनही वेळ गेलेली नाही आपण सगळ्यांनीच याबद्दल गांभीर्याने विचार करायलाच हवा!

हे ही वाचा हॉकीचा असाही ‘जादूगार’ – ज्याच्या हॉकी स्टिकमध्ये “चुंबक” असल्याची शंका प्रतिस्पर्ध्यांना येत असे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version