' ११ खेळाडूंचा बळी घेणारी ती ऑलिम्पिकची रात्र आजही अंगावर काटा आणते! – InMarathi

११ खेळाडूंचा बळी घेणारी ती ऑलिम्पिकची रात्र आजही अंगावर काटा आणते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

टोकियो ऑलम्पिक २०२० मुळे सध्या भारतात क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांबद्दलसुद्धा संवाद होत आहे हे बघणं खूप सुखावह आहे. कोणत्याही खेळाडूला इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी जातांना खेळाच्या तयारी सोबतच त्याच्या देशवासीयांच्या सदिच्छांची सुद्धा तितकीच गरज असते.

जगभरातून दाखल होणाऱ्या या खेळाच्या कुंभमेळ्यात प्रत्येक खेळाडू हा सुवर्ण कमळाचं स्वप्न उराशी बाळगूनच विमानाची पायरी चढत असतो.

 

olympic games inmarathi

 

काही खेळाडू यशस्वी होतात तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. पण, आजपासून ४९ वर्षांपूर्वी म्हणजे १९७२ मध्ये जर्मनीच्या म्युनिकमध्ये अशीही एक ऑलम्पिक स्पर्धा झाली होती जिथे ११ खेळाडूंना आपला जीव गमवावा लागला होता.

एका अतिरेकी संघटनेनी दोन देशातील कटूता ही खेळाच्या मैदानापर्यंत आणली होती आणि या सर्व गोष्टींशी काही संबंध नसलेले खेळाडू नाहक बळी पडले होते. काय होतं हे पूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात.

५ सप्टेंबर १९७२ रोजीच्या म्युनिक ऑलम्पिक मध्ये भाग घेण्यासाठी इस्राईलचे ११ खेळाडू आपल्या देशातून निघाले होते. पात्रता फेरी, फिटनेस हे सगळे अडथळे पार करून हे खेळाडू जर्मनी मध्ये दाखल झाले होते.

 

olympic 2 inmarathi

हे ही वाचा ही व्यक्ती नसती, तर भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक मैदानावर उतरताच आलं नसतं! वाचा

जगभरातील इतर देशातील खेळाडू सुद्धा जर्मनी मध्ये पोहोचले होते. जर्मनी मधील स्वागत समारंभानंतर सर्व खेळाडू आपल्या हॉस्टेलमध्ये विश्रांतीसाठी गेले होते.

आजच्याइतके प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान त्या काळात नसल्याने ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ (PLO) चे ८ अतिरेकीसुद्धा त्याच वेळी खेळाडूंसारख्या ‘ट्रॅक सूट’ मध्ये हॉस्टेलमध्ये पोहोचले.

हॉस्टेल मधील सुरक्षारक्षक आणि काही विद्यार्थ्यांना हे लोक एखाद्या देशाचे खेळाडू असल्यासारखे भासले. असं झालं नसतं तर एक मोठी घटना टाळता आली असती.

पीएलओचे ८ अतिरेकी हॉस्टेल मध्ये दाखल झाले आणि त्यांनी इस्राईलच्या त्या ११ ही खेळाडूंना आपल्या ताब्यात घेतलं. सर्व खेळाडूंना आपल्या सोबत काय होत आहे? हे कळेपर्यंत त्यांचं अपहरण झालेलं होतं.

पॅलेस्टिनी अतिरेकी लोकांनी घडवून आणलेली ही घटना हा हा म्हणता म्हणता पूर्ण जगाला कळली.

इस्राईलच्या ११ खेळाडूंना मुक्त करण्यासाठी पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी आपली पहिली अट ठेवली ती अशी होती की, “इस्राईलने पॅलेस्टाईनच्या ओलीस ठेवलेल्या २३४ अतिरेक्यांची सुटका करण्यात यावी.”

 

terrorist inmarathi

 

इस्राईल सरकारने ही अट स्पष्टपणे फेटाळून लावली. पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांना हा नकार पचवता आला नाही आणि त्यांनी हा सर्व राग खेळाडूंवर काढला आणि त्यांनी निर्दयीपणे २ खेळाडूंचा खून केला.

आपली मागणी फेटाळण्याच्या निषेधार्थ पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी इतर ९ खेळाडूंना आपल्या सोबत नेऊ देण्याची दुसरी अट इस्राईल सरकार समोर ठेवली. “हॉस्टेल मधून बाहेर पडून एअरपोर्टला जाईपर्यंत आम्हाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे” अशी अट पीएलओच्या अतिरेक्यांनी ठेवली होती.

एखाद्या सिनेमात दाखवतात तशी ही परिस्थिती होती. इस्राईलच्या गुप्तचर विभागाने मधल्या काळात अतिरेक्यांना एअरपोर्टवर पोहोचल्यावर कंठस्नान देण्याचा प्लॅन केला आणि त्यांची अट मान्य केली.

अतिरेक्यांना बघताच क्षणी गोळी घालण्याससाठी जर्मनीच्या म्युनिक एअरपोर्टवर जागोजागी ‘शार्प शुटर्स’ला अंधारात लपून बसण्यासाठी सांगण्यात आलं.

म्युनिक एअरपोर्टवर जेव्हा पॅलेस्टिनी अतिरेकी पोहोचले तेव्हा शार्प शूटरने अतिरेक्यांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. हे लक्षात येताच, अतिरेक्यांनी त्यांच्या सोबत आणलेल्या सर्व ९ इस्राईली खेळाडूंना प्रत्युत्तरात मारून टाकले.

 

mossad klll inmarathi

 

ऑलम्पिकमध्ये खेळण्याचं आणि देशासाठी सुवर्ण कमळ कमावण्याचं खेळाडू, प्रशिक्षक, समिती आणि त्यांच्या कुटुंबाचं स्वप्न एखाद्या भूकंपाप्रमाणे उद्धवस्त झालं होतं. सर्व अतिरेक्यांचासुद्धा खात्मा करण्यात आला. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

इस्राईलच्या एकूण ११ निष्पाप लोकांना त्या दिवशी आपला जीव गमवावा लागला होता. ८ अतिरेकी हे इस्राईलच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीमधील विविध देशांमध्ये लपलेले अतिरेकी होते.

इस्राईलच्या ‘मुसाद’ या गुप्तहेर संघटनेवर या ८ अतिरेक्यांना मारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या चकमकीत एका जर्मन पोलिसालासुद्धा आपला जीव गमवावा लागला होता.

या घटनेचं गंभीर्य लक्षात घेता, १९७२ च्या ‘म्युनिक’ ऑलम्पिक मधील सर्व खेळ हे २४ तासांसाठी रद्द करण्यात आले होते.

इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटीचे प्रेसिडेंट ‘एव्हरी ब्रउंडेज’ यांनी झालेल्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. पण, त्यांनी “शो मस्ट गो ऑन” सारख्या सूचना देऊन स्पर्धा पुढे सुरू ठेवून यशस्वीपणे पार पाडली.

 

olympics inmarathi

हे ही वाचा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर झालेला ‘तो’ दहशतवादी हल्ला यशस्वी झाला असता तर…!

इस्राईलने या घटनेतून योग्य तो इशारा घेतला आणि तेंव्हापासून आजपर्यंत त्यांनी ‘देशाचं संरक्षण’ याकडे विशेष लक्ष दिलं आहे हे आपण बघत, वाचत असतो. ‘मोसाद’ या गुप्तचर संस्थेला इस्राईल सरकारने अधिक बळकट केलं. असा हल्ला पुन्हा कोणत्याही खेळाडूंवर कधीच झाला नाही.

या सत्य घटनेवर आधारित २००५ मध्ये स्टीफन स्पिलबर्ग यांनी ‘म्युनिक’ नावाचा सिनेमा त्याकाळात रिलीज सुद्धा केला होता.

कोणत्याही देशाचा खेळाडू हा आधी त्या खेळाचा असतो आणि मग त्या देशाचा. कारण, तो खेळाडू आहे म्हणून त्याला त्याच्या देशाच्या संघात स्थान मिळालेलं असतं. खेळाडूंवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध जागतिक पातळीवर करण्यात आला होता.

या घटनेनंतर कित्येक देशात भारतातील ‘NSG,’ सारख्या संरक्षक संस्था स्थापन करून आपल्या संरक्षक भिंती अजूनच उंच करण्यात आली होती.

 

nsg inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?