Site icon InMarathi

हॉर्लिक्स: आजचं मुलांचं एनर्जी ड्रिंक महायुद्धातील सैनिकांना दिलं जाण्याचं ‘हे’ आहे कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

ऑस्ट्रियाचे युवराज फ्रांझ फर्डिनांड यांच्या हत्येनंतर पहिल्या विश्वयुद्धाची सुरुवात झाली. इतिहासातील मोठ्या युद्धांपैकी एक असे मानले जाणारे पहिले विश्वयुद्ध २८ जुलै १९९४ ते ११ नोव्हेंबर १९१८ असे ४ वर्ष चालले.

दोस्त राष्ट्रे व केंद्रवर्ती सत्ता अशा २ गटात युद्धाची विभागणी झाली. ज्यात दोस्त राष्ट्रांमध्ये फ्रान्स, रशिया आणि ब्रिटन असून केंद्रवर्ती सत्तेमध्ये जर्मनी आणि ऑस्ट्रिया – हंगेरी यांचा समावेश होता.

याच युद्धादरम्यान ब्रिटिश सैनिकांना त्यांच्या तंदुरुस्तीसाठी हॉर्लिक्स देण्यात येत असे. त्यांना पूरक आहार मिळावा हा यामागील उद्देश होता.

 

 

जगभरात प्यायलं जाणार हे पेय सुरुवातीच्या काळात हॉर्लिक्स पावडर लहान बाळांना अन्न व पोषण मिळावं यासाठी दिले जायचे. पण नंतर त्यात बार्ली माल्ट, ओट्स व दूध हे पदार्थ घालून ते अजून पौष्टिक बनवण्यात आले.

हे ही वाचा दोघांचं भांडण – सगळ्यांचा लाभ! भावांच्या भांडणातून स्थापन झाले जगप्रसिद्ध शूज ब्रँड्स

१८७३ मध्ये अमेरिकेमधील शिकागो शहरातील जेम्स आणि विल्यम हॉर्लिक या दोन भावांनी ही पावडर तयार करून त्याचे पेटंट घेतले. प्रथम त्याचे नाव ‘डायस्टोइड’ असे ठेवण्यात आले होते आणि नंतर ते हॉर्लिक्स करण्यात आले.

आजही १४५ वर्षांनंतर हे पेय जगभरात लोकप्रिय आहे. ५ जून १८८३ मध्ये त्यांनी हे दुधात मिक्स करून पाहिले आणि त्याचेही त्यांनी पेटंट घेतले. त्यांच्या या पेयामुळे त्यांना संशोधक मानले जाते. त्याची चव आणि पोषणयुक्त गुणांमुळे हॉर्लिक्स जगभरात फार कमी वेळेत लोकप्रिय झाले.

पहिल्या महायुद्धांनंतर ब्रिटिश सैन्य भारतात येताना सोबत हॉर्लिक्स घेऊन आले. यावेळी भारतीयांना पहिल्यांदा हॉर्लिक्स हा प्रकार काय ते समजला. १९४० च्या काळात भारतात हॉर्लिक्स हे फार उच्च समाजातील पेय समजले जात असे.

 

 

भारतात प्रथम हॉर्लिक्स पंजाब , मद्रास, बंगाल या भागात पिण्यास सुरुवात झाली आणि नंतर संपूर्ण भारतभर हे प्रमाण वाढतच गेले. भारतासोबतच फिलिपिन्स, मलेशिया आणि युनाइटेड किंग्डममध्ये देखील ते लोकप्रिय झाले.

हॉर्लिक्सच्या दृष्टीने भारत ही त्यांच्यासाठी फार मोठी बाजारपेठ आहे. भारतीय कुटुंबांमध्ये हे एक पूर्ण पोषण देणारे पेय मानले जाते. याचमुळे हॉर्लिक्स कंपनीने भारतासाठी हे पेय बनवताना इतर देशांपेक्षा यात थोडे बदल केले.

भारतीयांसाठी त्यांनी माल्ट सोबतच चॉकलेट, मध, व्हॅनिला आणि वेलची असे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे हॉर्लिक्स बाजारात आणले. तसेच लहान मुलं, महिला आणि वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी त्यांच्या पोषण आणि चवीनुसार उत्पादने आणली.

१९३० च्या त्यांच्या जाहिरातीनुसार असे म्हणणे होते, की १ ग्लास दुधातून हॉर्लिक्स प्यायल्यास पोषणासोबतच शांत झोपही लागते. तसेच लहान मुलांना हे दिल्यास त्यांची उंची वाढण्यास, ताकद येण्यास आणि बुद्धी तल्लख होण्यास देखील मदत होते.

दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान अमेरिका, ब्रिटिश आणि इतर सैनिकांसाठी हॉर्लिक्सने पावडरचे गोळ्यांमध्ये रूपांतर केले, जे खाल्ल्यावर सैनिकांची कमी वेळेत ताकद भरून निघायची. ही गोळी त्यांच्या किटमधील महत्वाचा घटक होता.

 

 

इतक्या वर्षांच्या परंपरेत त्यांनी चव, लोकांचा विश्वास, त्यातून मिळणारे पोषण याचं सातत्य कायम ठेवले. यामुळेच हॉर्लिक्स हा एक ब्रॅण्ड म्हणून पाहिला जातो.

भारतातील इतर अनेक पेयांसोबत त्यांची स्पर्धा कायमच होते परंतु कायम नवनवीन गोष्टी देण्याच्या प्रयत्नांमुळे भारतीयांची त्यांना पसंती मिळाली आहे. नव्यानेच काढलेला हॉर्लिक्स केसर बदाम हा फ्लेवर ग्राहकांना खूप आवडतो आहे.

लहान मुलांसाठी जुनियर हॉर्लिक्स, स्तनपान करणाऱ्या मतांसाठी मदर्स हॉर्लिक्स, स्त्रियांसाठी वूमन्स हॉर्लिक्स आणि तरुणांसाठी लाईट हॉर्लिक्स असे काही विशेष प्रकार बाजरात आणले.

महिलांसाठीचे प्रथमच आरोग्यदायी पेय म्हणूनही हॉर्लिक्सकडे पाहिले जाते. भारतात जाहिरातीसाठी त्यांनी वेगवेगळ्या वयातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे आरोग्यसाठी उपयोगी असून महिलांना कामातील धावपळीमुळे जी दमछाक होते त्यावरही हा उपाय आहे अशा गोष्टींनी आकर्षित केले.

या पेयांसोबतच त्यांनी पटकन तयार होणारे नूडल्स, नाष्टा असे प्रकारही भारतीयांसाठी आणले. १९९३ मध्ये हॉर्लिक्स बिस्कीट आणि २००९ मध्ये हॉर्लिक्स न्युट्री बार सुरु केले. सोबतच २०११ मध्ये हॉर्लिक्स गोल्ड हे या सर्व पेयांमधील उच्च प्रतीचे पेय म्हणून सुरु करण्यात आले.

 

 

२००३ मध्ये हॉर्लिक्स विझकिड्स या कार्यक्रमातून ते भारत, नेपाळ, बांगलादेश व श्रीलंकामधील २५ दशलक्ष मुलांपर्यंत पोहोचले आहेत. मुलांमधील क्षमता ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हि स्पर्धा सुरु करण्यात आला होता.

अनेक मुलांना या स्पर्धेबद्दल कुतूहल होते आणि त्यांच्यात फार लोकप्रिय झाली होती. कला, साहित्य, चित्रकला आणि अतिरिक्त अभ्यासक्रमांच्या क्षेत्रात ३० हून अधिक कार्यक्रमांसह, हॉर्लिक्स विझकिड्स ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी इंटरस्कूल फिएस्टा असून मुलांना जागतिक व्यासपीठावर त्यांची कौशल्य दर्शविण्याची संधी देते.

२०१३ मधील हॉर्लिक्स विझकिड्स बंगलोरमध्ये आयोजित करण्यात आले होते ज्यात वेगवेगळे प्रकल्प, प्रशिक्षण व करमणुकीचे खेळ यांचा समावेश केला होता. १२०० हुन अधिक शाळांमधील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता.

विशाखापट्टणम, जयपूर, दिल्ली, हैद्रबाद व भुवनेश्वर येथील पाच विद्यार्थिनी हॉर्लिक्स विझटीम २०१३ ची पदवी मिळवली. या विजेत्या विद्यार्थ्यांना जर्मनीला जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि सोबतच प्रत्येकी १ लाख रुपये बक्षिस मिळाले.

 

 

हॉर्लिक्सने घरातील माता व कुटुंबातील व्यक्तींच्या कुपोषण संदर्भातील जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम केला. ज्यात हॉर्लिक्सच्या प्रत्येकी एका बाटलीच्या विक्रीवर कंपनी कढून या कार्यक्रमासाठी एका रुपयाचे योगदान देण्यात येईल.

हे ही वाचा अनंत अडचणींमधून मार्ग काढत ३६ वर्ष टिकवला आईस्क्रीम ब्रँड – फक्त २ कारणांच्या जोरावर!

या कार्यक्रमात ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांच्या मतांमध्ये मुलांना योग्य पोषण मिळण्याविषयीची जनजागृती वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

जगातील सर्वात प्रथम आरोग्यदायी पेय बनवण्यापासून सुरु झालेल्या हॉर्लिक्सच्या प्रवासात त्यांनी दोन विश्वयुद्धात अनेक सैनिकांना लढाई करताना तंदरुस्त ठेवण्याचे काम केले आहे. त्यांच्या याच प्रवासात आजही जगभरातील अनेक मातांची घरातील सर्वांसाठी पोषक आहार म्हणून हॉर्लिक्सलाच पसंती दिली जाते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version