Site icon InMarathi

सगळ्यांना रडवणाऱ्या कांद्याचा वापर करून, त्याने एका माऊलीचा जीव वाचवला होता…

onion indian railways inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतीय रेल, जगातील तिसरे सगळ्यात मोठे रेल्वे नेटवर्क. आत्तापर्यंत नैसर्गिक आपदांमुळे होणाऱ्या दुर्घटना सोडल्या, तर प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे हा बराच सुरक्षित पर्याय आहे.

याव्यतिरिक्त भारतीय रेल्वे अजून एका कारणासाठी जगभरात ओळखली जाते. ते म्हणजे इमर्जन्सीमध्ये त्वरित मदत प्राप्त करून देणे.

हल्ली ट्विटचा वापर करून मदत मिळवणं अगदी सहज शक्य होतं. अगदी काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने ट्विट करून भारतीय रेल्वे करताना, सहप्रवासी व्यक्तीसाठी इमर्जन्सी वैद्यकीय मदत मागितली होती. त्याने ट्विटरवर मंत्र्यांना टॅग केलं आणि भारतीय रेल्वेला टॅग केलं. त्याला अवघ्या अर्ध्या तासात मदत मिळाली सुद्धा.

 

 

हे इंटरनेट आणि मोबाईल असलेल्या काळातच घडणं शक्य आहे, असं तुम्हाला वाटत असेल. पण तसं नाहीये. मोबाईल आणि इंटरनेट सेवा नसताना सुद्धा भारतीय रेल्वेने गरजूंपर्यंत मदत पोचवल्याचे अनेक किस्से आहेत.

एकदा तर चक्क कांद्याची मदत घेऊन एका व्यक्तीला मदत मिळवून देण्यात आली होती. होय, बरोबरच वाचलंय! कांदा, जो सगळ्यांना रडवतो त्याच्यामुळे कोणाचे तरी प्राण वाचले होते, तेसुद्धा मोबाईल इंटरनेट नसलेल्या काळात. कसे ते पाहूया.

 

 

घडलं काय होतं?

ही गोष्ट आहे, १९९३ सालची. इस्रो साइंटिस्ट, शंतनू दासगुप्ता आपल्या ७८ वर्षीय वृद्ध आई बरोबर, रेल्वेतून त्रिवेंद्रमवरून नागपूरला चालले होते. प्रवासाच्या सुरुवातीला तर सगळं ठिकच होतं, पण गाडी आंध्रप्रदेशात पोचल्यानंतर, अचानक त्यांच्या आईला अस्वस्थ वाटू लागलं, घाम येऊ लागला आणि अशक्तपणा जाणवू लागला.

आईची बिघडती तब्येत बघून शंतनू घाबरले आणि त्यांनी ट्रेन तिकीट एक्सामिनर (TTE) आणि सुप्रिंटेंडंट यांना बोलावलं. TTE ला थोडं वैद्यकीय शिक्षण प्राप्त असल्याने, त्यांच्या आईला काय होतंय हे जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले. अशातच त्यांच्या आईला मळमळू लागलं आणि उलटी झाली.

आईची तब्येत आणखी खराब होतेय हे पाहून, लवकरात लवकर हालचाल करावी लागणार होती हे त्या दोन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं होतं.

पुढील स्टेशन विजयवाडा, ते आणखी अर्ध्या तासावर होतं, तिथे जाऊन मदत मिळवण्यात बराच वेळ लागू शकतो, तो पर्यंत त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते, गोष्ट हाताबाहेर जाऊ शकते हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

विजयवाड्याला फोन करून कळवणार तरी कसं, की मदत तयार ठेवा, कारण तेव्हा तर मोबाईल फोनही नव्हते.

 

 

TTE ने आपलं प्रसंगावधान राखत, त्वरित हालचाल सुरु केली. त्याने रेल्वे पॅन्ट्रीतुन एक मोठा कांदा मागवला. कागदावर एक संदेश लिहिला. तो कागद कांद्याला गुंडाळला आणि त्याला अजून ३-४ वृत्तपत्र अजून गुंडाळली. जणू काही कांद्याचा एक चेंडू तयार केला.

पुढे एक छोटं गाव येणार होतं, तिथे लाईनमन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उभा राहणार होता, हे TTE ला माहित होतं. त्याच्या मार्फतच आपल्याला काही मदत मिळाली तर मिळू शकेल अशी त्याची अशा होती. आणि तसंच घडलंही.

 

===

हे ही वाचा – रेल्वे-रुळांच्या आवाजातील बदलावरून संभाव्य अपघात टाळणाऱ्या अवलियाची कहाणी!

===

कांदा धावून आला

पुढील स्टेशनवर जो लाईनमन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत उभा होता, TTE ने तो कांद्याचा चेंडू त्याच्याकडे फेकत, त्याला ओरडून आतील संदेश पाहण्यास सांगितलं. असं काही होण्याची ही बहुदा पाहिलीच वेळ असावी म्हणून लाईन मनने सुद्धा वेळ न दवडता, तो चेंडू उचलून संदेश पहिला आणि त्वरित धावत पळतच आत गेला.

तिथून त्याने पुढील स्टेशन, विजयवाडा येथे फोन करून तिथल्या स्टेशनमास्टरला सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली आणि येणाऱ्या गाडीत पेशंट आहे, तर तयार राहा असं सांगितलं.

ट्रेन जेव्हा विजयवाड्याला पोहोचली, तेव्हा तिथे शंतनूच्या आईला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी एक अँबुलन्स, स्ट्रेचर, वॉर्डबॉय हे सगळे उपस्थित होते. गाडी थांबताच त्वरित हालचाल करण्यात आली आणि शंतनू दासगुप्ता यांच्या आईला दवाखान्यात दाखल करण्यात आलं.

 

 

गोष्ट इथवरच थांबत नाही, पुढे शंतनू यांनी या प्रसंगाबद्दल जेव्हा सांगितलं आहे, तेव्हा ते म्हणालेत, की TTE आणि सुप्रिटेंडंट यांनी इतकं प्रसंगावधान राखून तत्परता दखवून हालचाली केल्या नसत्या, तर त्यांच्या आईला वाचवणं कठीण झालं असतं.

त्या घटनेनंतर उपचार घेऊन, पूर्ण बरी होऊन, त्यांची आई १०० वर्ष आयुष्य होईपर्यंत जगली. शंतनू TTE बरोबरच, सुप्रिटेंडंट, लाईन मन आणि पुढील स्टेशनवर मदत घेऊन हजर राहणारे स्टेशन मास्तर आणि समस्त भारतीय रेल्वे यांचे आभार मानतात.

इतकं मोठं नेटवर्क चालवणं काही बाहुला बाहुलीचा खेळ नसतो. अनेक हात आपला प्रवास सुखकर बनवण्यासाठी दिवस-रात्र राबत असतात. आज भारताच्या कोपऱ्या कोपऱ्याला जोडण्याचं काम भारतीय रेल्वे करते आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version