आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ किंवा ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ या म्हणी तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील. या म्हणींचा तसा एकमेकींशी अर्थाअर्थी काही संबंध नाही, पण ज्या दोन गोष्टींचा उल्लेख या म्हणींमध्ये आहे त्यांचा मात्र एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे.
त्या दोन गोष्टी आहेत नारळ आणि स्त्री. तुम्ही म्हणाल यात काय संबंध ? तर मित्रांनो याच लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
खरंतर स्वयंपाकात नारळाचा सढळहस्ते वापर करत महिला रुचकर जेवण बनवतात. त्यासह कोकोनट ऑइल, क्रीम यांचा वापर करत महिला सौंदर्यही राखतात.
रोजच्या जीवनात नारळाशी घट्ट नातं असलेल्या महिलांना नारळ फोडण्याची संधी मात्र नाही.
एरवी घरात पूजा, व्रतवैकल्य असलं की महिलांच्या उत्साहाला पारावार उरत नाही. पुजेची तयारी, सामग्रीची खरेदी यांपासून ते थेट पूजा, सण पार पडेपर्यंतच्या प्रत्येक जबाबदाऱ्या महिला आपल्या खांद्यावर यशस्वीरित्या पेलतात.
घरातील व्रतवैकल्य ते अंतराळातील यशस्वी झेप अशा प्रत्येक बाबतीत आघाडीवर असलेल्या महिलांना कधी मंदिरात नारळ फोडताना पाहिलं आहे का? अर्थातच नाही, मात्र असं का? याचा विचार केलाय?
काय असतील यामागची कारणे? चला जाणून घेऊ.
मित्रांनो तुम्ही पाहिले असेल, आपल्या घरी आलेल्या सवाष्ण स्त्रीची ओटी ‘खणा-नारळाने’ भरण्याची आपल्याकडे परंपरा आहे आणि अजूनही ती तेवढ्याच आत्मियतेने सुरू आहे.
नारळ हा बाहेरून टणक आणि आत पाणी अशा स्वरुपात असतो, जो स्त्रीच्या उदराचे प्रतीक आहे. स्त्रीच्या उदरातून नवीन जीव जन्माला येतो त्यामुळे वंशवृद्धी होते. ही वंशवृद्धी वाढती रहावी म्हणून स्त्रीने नारळ ( स्त्री उदराचे प्रतीक ) वाढवू नये/फोडू नये अशी धारणा रूढ झाली असावी. याच मान्यतेमुळे स्त्रियांना मंदिरांमध्ये नारळ फोडायची परवानगी नाही.
–
हे ही वाचा – हिंदू संस्कृतीत “औक्षण” करण्यामागचे शास्त्र जाणून घ्या
–
हिंदू धर्मात पूजेसाठी श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही देव-देवतांची पूजा नारळाविना अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की नारळ वाहिल्याने धनासंबंधी समस्या दूर होते. पण असं असूनही नेहमी मंदिराचे पंडित किंवा घरातील पुरुषांनाच नारळ फोडताना बघितले असतील. स्त्रियांना ही संधी कधीही दिली जात नाही.
अशी आहे आख्यायिका
महिलांना नारळ फोडू न देण्यामागे कहाणी अशीही सांगितली जाते, की ब्रह्मऋषी विश्वामित्र यांनी विश्व निर्मित करण्यापूर्वी नारळाची निर्मिती केली होते. याला मानवाचे प्रतिरूप मानले गेले. नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे. स्त्री बीजरुपात बाळाला जन्माला घालते म्हणून स्त्रियांनी नारळ फोडणे अशुभ मानले आहे.
असेही मानले जाते, की जेव्हा भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा ते आपल्याबरोबर तीन गोष्टी घेऊन आले – लक्ष्मी, नारळ वृक्ष आणि कामधेनु, म्हणून नारळाच्या झाडाला श्रीफळ असे देखील म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजेच नारळ लक्ष्मी आणि विष्णूचे फळ!
नारळात त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अधिवास असतो. श्रीफळ हे भगवान शिवाचे अतिशय आवडते फळ आहे.
नवं घर, नवे वाहन किंवा कोणत्याही वस्तूची खरेदी केल्यानंतर नारळ फोडूनच तिचं स्वागत केलं जातं. अशावेळी घरातील महिला नारळ पुरुषांच्या हाती सरकवतात. पुरुषांकडून नारळ फोडल्यानंतरच त्याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो.
स्त्रियांना गृहलक्ष्मी मानले जाते. त्यांच्या हातून कोणतीही वाईट गोष्ट घडू नये या उद्देशाने धार्मिक विधींमध्ये त्यांना नारळ फोडण्याची परवानगी नाही कारण नारळ हे मानवी देहाचे प्रतीक आहे.
गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत असेही म्हटले जाते, की त्यांच्या गर्भात नवीन जीवाचे बीज जन्म घेत असताना त्यांनी दुसरे बीज नष्ट करणे योग्य नाही कारण स्त्री ही सृजनकर्ती आहे.
कारण काहीही असो, स्त्री आणि नारळ हे सृजनकर्ते आहेत. नारळ हे मानवी देहाचे प्रतीक मानले जात असल्याने दोघेही नवीन जीव जन्माला घालतात. अशावेळी एका सृजनकर्त्याने दुसर्या सृजनाला नष्ट करणे योग्य नाही याच उद्देशाने आणि नारळ फोडणे हे बळी देण्याचे देखील प्रतीक असल्याने हिंदू मंदिरांमध्ये स्त्रियांना नारळ फोडू दिला जात नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.