…म्हणून चक्क सचिन आणि गांगुली ‘भारताच्या दोन वेगळ्या संघांकडून’ खेळत होते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील गॅबा टेस्ट क्वचितच कुणी भारतीय विसरू शकेल. प्रमुख गोलंदाज, महत्त्वाचे खेळाडू नसताना सुद्धा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ती टेस्ट मॅच जिंकली होती. शिवाय सिरीज सुद्धा आपल्या नावे केली होती.
त्यावेळी ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लँगरने स्टेटमेंट दिलं होतं, ‘१३० करोड लोकसंख्या असलेल्या देशातून ते ११ खेळाडू आले होते. म्हणजे ते नक्कीच सर्वोत्तम होते. म्हणून भारतीयांना कधीही कमी लेखू नका.’ भारताच्या ‘ब’ संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीवर हरवले.
या टेस्ट मॅचनंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात वेगवेगळे दोन कर्णधार खेळवायच्या चर्चेला उधाण आलं. विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करणं, रोहितचा आयपीएलमधील रेकॉर्ड या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला जाऊ लागला.
शेवटी भारताचे दोन वेगळ्या फॉरमॅटमध्ये दोन कर्णधार तर अस्तित्वात आले, पण त्याचं कारण मात्र वेगळं होतं. क्रिकेटमधले मुख्य खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जात असल्याने, श्रीलंका दौऱ्यावर दुय्यम फळीतील दुसरा संघ पाठवण्यात आला.
इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मुख्य संघ गेला तर श्रीलंकेच्या दौऱ्यावर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली दुसरा संघ गेला.
शिखर धवन नेतृत्व करत असलेल्या संघात अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करून मोकळे झाले आहेत. त्यामुळे या संघाला ‘ब’ संघ म्हणायची चूक करावी की नाही, हा प्रश्न आहेच. मुद्दा हा, की भारताचे दोन संघ एकाचवेळी दोन वेगवेगळ्या देशात खेळत आहेत.
भारतीय क्रिकेट संघ दोन वेगवेगळ्या देशात दोन वेगवेगळ्या स्पर्धा खेळत आहे हे पहिल्यांदाच घडत नाहीये…
कधी खेळले दोन संघ
याआधी २३ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी एक आणि कॅनडामध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सहारा कपसाठी एक असे दोन वेगवेगळे संघ भारताचे प्रतिनिधित्व करत होते.
१९९८ मध्ये ‘फर्स्ट अँड लास्ट टाईम’ क्रिकेटचा समावेश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत केला गेला होता. त्याचवेळी भारताची पाकिस्तान सोबत सहारा कप ही मालिका आयोजित केली गेली होती.
यावर तोडगा म्हणून भारताने दोन वेगवेगळे संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. अजय जडेजाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे हे मुख्य खेळाडू मलेशियाला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी गेले, तर अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्यंकटेश प्रसाद आणि जवागल श्रीनाथ हे कॅनडाला गेले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटसाठी एकूण १६ संघ सहभागी झाले होते. भारताचे दुर्भाग्य म्हणजे भारत ग्रुप स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर झाला.
ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सेमी फायनलमध्ये जागा मिळवली होती. कॅनडावर विजय मिळवून सुद्धा अँटीग्वासोबत निकाल न लागल्यामुळे भारताला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं.
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत या एकमेव राष्ट्रकुल स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. तिथे कॅनडामध्ये पाकिस्तानने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने बढती आघाडी घेतली होती.
राष्ट्रकुल स्पर्धेतून लवकर माघारी आल्यामुळे बीसीसीआयने तेंडुलकर, जडेजा, कुंबळे आणि रॉबिन सिंग यांना शेवटच्या दोन सामन्यांसाठी कॅनडाला पाठवण्याचं ठरवले. पण तिथे पाकिस्तान बोर्डाने याच्यावर रडगाणं सुरू केलं. बीसीसीआयने मात्र आधीच हे चार खेळाडू उशिराने कॅनडाला येतील हे जाहीर केलं होतं, त्यामुळे बीसीसीआय सुद्धा माघार घेण्यास तयार नव्हती.
शेवटी द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर सचिन आणि जडेजा यांना कॅनडाला जायला परवानगी मिळाली.
ही अडचण सुटत नाही तेवढ्यात नवीन अडचण समोर आली. जडेजा कॅनडाला पोहोचला पण सचिन मात्र बीसीसीआयच्या संपर्कातच नव्हता. तिथे जडेजा चौथा सामना खेळत होता तेव्हा सचिन कुटुंबासोबत खंडाळ्यात होता. शेवटी सचिन शेवटचा पाचवा सामना खेळण्यासाठी कॅनडाला गेला. तोवर चौथा सामना जिंकून पाकिस्तानने मालिकेत औपचारिकता शिल्लक ठेवली होती.
पाचव्या सामन्यात अझरुद्दीनचे शतक आणि सचिनच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला २५६ धावांचे लक्ष्य दिले. पण आमिर सोहेलच्या ९७ आणि सईद अन्वरच्या ८३ धावांच्या जोरावर पाकिस्तानने भारताचा ५ विकेटने पराभव करत सिरीज ४-१ ने जिंकली.
आजची परिस्थिती मात्र १९९८ पेक्षा वेगळी आहे. त्यावेळी बीसीसीआयने आपला मुख्य संघ विभागून दोन संघ तयार केले होते. परिणामी दोन्ही स्पर्धा हरण्याची नामुष्की ओढवली होती.
आज मात्र मुख्य संघ इंग्लडमध्ये असताना, तेवढ्याच ताकदीचा दुसरा संघ राहुल द्रविडच्या देखरेखीखाली श्रीलंकेत गेला आहे. एकूणच भारत तेव्हा सुद्धा दोन संघ खेळवण्याची क्षमता असणारा होता, आणि आज सुद्धा आहे. आज अधिक ताकदीने दोन्ही संघ खेळू शकतायत हे मात्र खरं!
तेव्हा आज सारखे माध्यम आणि सुविधा असत्या तर नक्कीच ते दोन संघ सुद्धा जिंकून आले असते.
तूर्तास लंकेत गेलेला भारतीय संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत आहे.बाकी इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय संघ कसा परफॉर्मन्स देतील हे बघायला सारेच उत्सुक आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.