घरच्यांनी शॉक देऊन त्याला ‘पुरुष’ असल्याचं सिद्ध करायला भाग पाडलं पण…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत – हा प्राचीन काळात सुद्धा सगळ्यात सहिष्णू आणि सगळ्याच प्रकारच्या जीवांना सामावून एकत्र बांधणारा – सर्वसमावेशक देश असल्याचे अनेक पुरावे आहेत. आपल्या प्रत्येक ग्रंथात तृतीयपंथी लोकांचा उल्लेख आढळतो.
खजुराओची मंदिरं बघायला गेलात, तर तिथल्या शिल्पकला सुद्धा भारत किती सहिष्णू आणि सगळ्यांना सामावून घेणारा होता हे सांगतात.
भारत जर इतका सर्वसमावेशक होता, इथे जर कोणा बरोबरच भेदभाव केल्या जात नव्हता तर मग ही तृतीय पंथीयांबद्दलची गलिच्छ मतं लोकांची कशी काय निर्माण झाली असावी हा आपल्याला प्रश्न पडू शकतो.
कारण जसा जसा काळ बदलत गेला हे सगळंच बदलत गेलं आणि ब्रिटिश काळापासून भारतात समलैंगिकतेवर प्रश्न उपस्थित करण्याचं ज्ञान लोकांच्या मनात रुजवलं जाऊ लागलं आणि ह्याचे अनेक पुरावे अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकात दिलेले आहेत.
एक देश, जो तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाला साजरा करायचा तो त्यांना आता आपल्या केवळ “अस्तित्वासाठी” कोसू लागला, वाळीत टाकू लागला.
तृतीयपंथाबद्दल असलेल्या तीटकाऱ्याला इंग्रजीत “होमोफोबिया” असं म्हणतात. ह्या होमोफोबियामुळे, भारतात ७५ – ८०% गे आणि लेस्बियन पुरुष आणि स्त्रियांना, केवळ समाजात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध, स्वतःच्या नैसर्गिक रचनेविरुद्ध जाऊन “नॉर्मल”,”स्ट्रेट” लोकांसारखं लग्न करून, मुलं- बाळ जन्माला घालावी लागतात, हे भारताचं दुर्दैव आहे!
जिथे तृतीय पंथीयांना आपलेच प्रियजन, जन्मदात्रे, वाळीत टाकून अक्षरशः मरण्यासाठी ढकलून देतात; जिथे ३७७ सारखी कलमं समलैंगिक नात्यांना बेकायदेशीर ठरवतात, त्या देशात, एखादा हायप्रोफाईल राजपुत्र समोरून येऊन आपण गे असल्याचं स्वीकारतो, हे किती मोठं धाडसी कृत्य म्हणावं लागेल!
आज आपण ह्याच खऱ्या अर्थाने शूर असलेल्या राजपुत्राची गोष्ट जणून घेणार आहोत.
गुजरातच्या राजघराण्यातील राजपुत्र मानवेंद्र सिंह गोहिल हे, पब्लिकली आपल्या अस्तित्वाचा स्वीकार करणारे, जगातील पहिले राजपुत्र ठरले आहेत. राजपिला, गुजरात येथील ६५० वर्षांहून अधिक मोठा इतिहास असणाऱ्या गोविंदा वंशाचे, ३९ वे वंशज असलेल्या राजपुत्र मानवेंद्र सिंह यांचा प्रवास अतिशय खडतर फार होता.
विचार करा, एक राजा, जो अगदी पुराणातल्या राजांप्रमाणे, इतिहासातील शूरवीर योद्धांप्रमाणे पराक्रमी, धाडसी, विशेषतः थोर “पौरुषत्व” असावा अशी राजपरिवाराची, प्रजेची, आणि समाजाचीही अपेक्षा असते तिथे एखादा राजपुत्र आपण “गे” आहोत हे सगळ्यांसमोर स्वीकारतो तेव्हा काय चित्र असेल?
विरोध, बंड, राजघराण्याची शान, मान आणि प्रतिष्ठेला, कुळाच्या दैदिप्यमान इतिहासाला धुळीत मिळवल्याबद्दल राजपुत्राला आपल्या हक्काच्या प्रॉपर्टीतून बेदखल केलं जाणं, हेच सगळं आपल्या डोक्यात येतं नाही? आणि ते खरं ही आहे, जिथे पौरुषत्वाची व्याख्याच अजब आहे तिथून ह्या व्यतिरिक्त कसली अपेक्षा करणार?
मानवेंद्र सिंह सोबतही हेच झालं. त्यांच्या मातोश्रींनी पत्रकार परिषद घेऊन, आता आपला आणि राजपुत्र सिंह यांचा काहीही संबंध नसल्याचं व आपण त्यांना आपल्या समस्त प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचं जाहीर केलं.
प्रॉपर्टीतून बेदखल करण्याआधी, मानावेंद्र सिंह यांनी जेव्हा आपल्या जवळच्या काही लोकांना आपल्या सेक्शुअल ओरिएन्टेशनबद्दल कल्पना दिली, तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांना अनेक डॉक्टर्स, मानसोपचार तज्ज्ञ, सायकोलॉजिस्ट, बाबा, फकीर यांच्या सगळ्यांकडे नेऊन आणलं.
त्यांची एकच अपेक्षा होती, कि त्यांच्या मुलाला कोणी तरी “बरं” करेल. मानवेंद्र सिंहांना हा “आजार” बरा करण्यासाठी, अत्यंत वेदनाकाराक शॉक ट्रीटमेंटला सुद्धा सामोरे जावं लागलं.
कोण्या बाबाने सांगितल्याप्रमाणे, त्यांचं मांसाहारी जेवण बंद करून, त्यांना पूर्ण शाकाहारी डायट दिलं गेलं आणि त्यांचं बाहेर जाणंही बंद केलं गेलं. ह्या सगळ्या काळात, मानवेंद्र सिंह यांना आपल्या सोबत हे काय होत आहे, आपल्याला मुली आवडत नसून, समलिंगी पुरुष का आवडतात, हा प्रश्न त्यांना भेडसावून सोडत होता.
ह्या सगळ्या मानसिक ताणामागे आणि ह्या गोंधळामागे ‘लैंगिक शिक्षणाची कमतरता’ हे एकच कारण होतं. जर शाळेतूनच त्यांना योग्य शिक्षण दिलं गेलं असतं, स्त्री, पुरुष ह्या लिंग प्रकारांव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकार असतात, हे वेळीच शिकवलं गेलं असतं, तर त्यांचा स्वतःच्या अस्तित्वाला मान्य करण्यात इतका गोंधळ उडालाच नसता. आयुष्य थोडं, का होईना सोपं झालं असतं.
मानवेंद्र सिंहांना ह्या सगळ्या मानसिक प्रतारणांना तर सामोरे जावंच लागत होतं पण त्यांना बरं करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी एक खूप मोठा निर्णय घेतला होता, तो म्हणजे त्यांचं लग्न.
वयाच्या २५ व्या वर्षी, मनात इतकी सगळी वादळं उठत असताना, त्यांचं राजस्थानची राजकुमारी चंद्रिका कुमारी ह्यांच्याशी लग्न लावण्यात आलं. पण, ते काही फार काळ टिकलं नाही. अवघ्या १५ महिन्यांत त्यांचा घटस्फोट झाला.
मानावेंद्रसिंह यांना, आपली स्वतःची ओळख मान्य करून घेण्यात भारतातील पहिले LGBTQ ऍक्टिव्हिस्ट आणि पत्रकार अशोक राव रवी यांनी भरपूर मदत केली.
मानवेंद्रना अशोक राव रवींबद्दल त्यांच्या “बॉम्बे दोस्त” ह्या मॅगझीनमधून माहिती मिळाली. रवी त्या वेळी, हमसफर फाउंडेशन अंतर्गत तृतीयपंथीयांच्या मदतीचे कार्य करत होते.
आपल्या परिवाराशी बरीच चर्चा करून, त्यांच्याकडे आपल्या हक्काची प्रॉपर्टी मागण्यात त्यांना आत्तापर्यंत थोडं यश मिळालं होतं. त्यांना राजपिला, गुजरात येथील जमीन देण्यात आली. तिथे पाणी, वीज ह्यापैकी काहीच सुविधा उपलब्ध नव्हत्या.
त्यांनी तिथली सगळी दुरुस्ती करून घेतली आणि तिथेच, हमसफर फाउंडेशन पासून प्रेरित होऊन, मानवेंद्र सिंह यांनी, लक्ष्य ट्रस्ट स्थापन केली. ह्या ट्रस्ट अंतर्गत त्यांनी ३७७ कलम हटवण्यासाठी आपलं खूप मोठं योगदान दिलं.
लक्ष्य ट्रस्ट ही LGBTQ कम्युनिटी साठी, विशेषतः गे पुरुषांना HIV आणि AIDS पासून बचाव करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देते, सोबतच HIV/AIDS पॉझिटिव्ह लोकांची तिथे विशेष काळजी घेतली जाते. ज्या जमिनीवर १९६० पर्यंत एक राजमहाल उभा होता, आज तिथे LGBTQ सदस्यांना आसरा दिला जातो.
मानवेंद्र सिंह हे आपल्या LGBTQ कम्युनिटी साठीच्या योगदानामुळे आणि जगातील पहिले गे राजपुत्र असल्याचं पब्लिकली मान्य करून, जगाशी लढण्यामुळे त्यांना OPRAH WINFREY शो मध्ये ३ वेळा आमंत्रित केलं गेलं होतं.
धैर्याने कार्य केल्याने आणि परिस्थितीला घाबरून पळून न जाता तिला तोंड देऊन मार्ग काढल्याने पुरुष खरा पौरुषत्व सिद्ध करू शकतो, हे मानवेंद्र सिंह यांनी जगाला दाखवून दिलं. त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि मिळून मिसळून जगा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.