Site icon InMarathi

शाहरुखचा ‘तो’ अवतार बघून सनी देओलची ‘पॅन्ट फाटली’..वाचा नेमकी भानगड काय?

sunny deol featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बॉलिवूड हे एक असं क्षेत्रं आहे जिथे लोकं ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ म्हणत वर्षानुवर्षे मैत्री निभवतात तर काही लोकं एका घटनेमुळे इतके खट्टू होतात की एकमेकसोबत कधीच काम करणार नाही अशी शपथ घेतात!

अभिनेता असो, अभिनेत्री असो किंवा दिग्दर्शक असो प्रत्येकाचा कोणाशीतरी छत्तीसचा आकडा असतोच. आमीर शाहरुख सलमान या तिघांनी आजतागायत एकत्र काम केलेलं नाही, एका जुन्या सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून सोडलं तर असा एकही दिग्दर्शक किंवा निर्माता नाही ज्याला या तिघांना एकत्र घेऊन सिनेमा काढायचं धाडस होईल.

 

 

शाहरुखने पण आजवर कधीच अजय देवगण आणि अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केलेली नाही, ऐश्वर्या रायने कधीच आमीरसोबत काम केलेलं नाही, कारणं भले काहीही असतील पण आजही कित्येक प्रेक्षक या कलाकारांनी एकत्र बघण्यासाठी आसुसलेले आहेत.

हे ही वाचा शाहरुख म्हणतो, इच्छा असूनही मी कधीच अक्षय कुमारसोबत काम करणार नाही…!!

तुम्हाला हे माहितीये का की ढाई किलो का हाथ घेऊन फिरणाऱ्या सनी देओलने चक्क यश चोप्रा यांच्यासोबत काम न करण्याची शपथ घेतली होती, आणि त्याला कारणीभूत ठरला तो किंग खान शाहरुख खान!

ही गोष्ट आहे १९९३ च्या डर चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानची. शाहरुख हा नुकताच फिल्म इंडस्ट्रीत आला होता आणि लोकांनी त्याला चांगलाच पसंतही केला होता, हा तो काळ होता जेव्हा मोठमोठे अॅक्टर हे खलनायकाची, निगेटिव्ह भूमिका करायला तयार नव्हते.

तेव्हा बऱ्याच मोठ्या स्टार्सनी धुडकावलेले निगेटिव्ह रोल्स स्वीकारून शाहरुख बॉलिवूडचा बेताज बादशहा बनला. दिवाना, बाजीगर सारखे सिनेमे करून त्यावेळेस शाहरुख तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला होता. त्याच्या सिनेमाच्या चॉईसमुळे आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्यामुळेच त्याने आज स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

 

 

१९९३ च्या डर सिनेमात खरंतर मुख्य भूमिकेत होता सनी देओल आणि जुही चावला, शाहरुख निगेटिव्ह भूमिकेतच होता, पण सिनेमाचा टोन अशाप्रकारे सेट करण्यात आला होता की शाहरुखच या सिनेमाचा हीरो असून त्याच्या कृत्यांना या सिनेमात एकाप्रकारे ग्लोरीफाय करण्यात आलं होतं!

नेमकी हीच गोष्ट सनीला खटकत होती, कारण त्या काळात सनी बऱ्यापैकी मोठा स्टार होता, त्याची डायलॉग डिलिव्हरी, त्याचं पिळदार शरीर, आणि एकंदरच त्याची पर्सनॅलिटीमुळे लोकांनी सनीला डोक्यावर घेतला होता.

८० आणि ९० चं दशक गाजवणाऱ्या सुपरस्टार सनीसोबत शाहरुख काम करण्यास तयार होता, पण एकंदर यश चोप्रा यांच्या डोक्यात काही वेगळी समीकरणं सुरु होती. या सिनेमातलं शाहरुखचं पात्र निगेटिव्ह शेडमध्ये दाखवायचं होतं शिवाय त्याला एक इमोशनल टचदेखील द्यायचा होता.

म्हणूनच यातल्या शाहरुखच्या ‘राहुल’ या पात्राला विक्षिप्त दाखवून एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर लोकांच्या मनात तयार केला गेला, यश चोप्रा या प्रयोगात यशस्वी झाले, शाहरुखचा स्टार म्हणून प्रवास सुरू झाला, निगेटिव्ह भूमिकांकडेसुद्धा चांगल्या नजरेने बघितलं जाऊ लागलं.

या सगळ्यात सनी देओल आणि यश चोप्रा यांच्यात मात्र दरी निर्माण झाली ती कायमचीच. या सिनेमात सनी देओल हा एक कमांडर दाखवला होता आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे यश चोप्रा यांनी त्याच्या पात्राला अजिबात न्याय दिलेला नाही.

 

 

सिनेमातल्या बऱ्याच सीन्समध्ये शाहरुख खलनायक असूनही त्याला एका हीरोप्रमाणे सादर केलं जात होतं, तर सनीचं पात्र इतकं दमदार असून ते शाहरुखच्या पात्रापुढे नेहमीच कमकुवत दाखवलं गेलं होतं.

सिनेमात स्वित्झर्लंडमधल्या एका सीन विषयी सनीने बऱ्याच मुलाखतीत चर्चा केली आहे. या सीनमध्ये जेव्हा सनी आणि शाहरुखमध्ये झडप होते आणि सनी शाहरुखला बेदम मारतो त्यानंतरही शाहरुख उठून सनीच्या पोटात सुरा खुपसतो.

या सीनमुळे सनी देओल बराच नाराज होता. त्याच्या म्हणण्यानुसार “जर तो एक कमांडर असेल आणि त्याच्याकडून एखादा सामान्य माणूस बेदम मार खात असेल तरीही तो त्याला सुरा कसा मारेल? आणि जर कमांडर असूनही याबाबतीत तो अपयशी ठरला तर त्याला कमांडर दाखवणंसुद्धा चुकीचंच ठरेल.”

 

 

याविषयी सनीने आपलं मत यश चोप्रा यांच्याजवळ व्यक्त केलं, पण यश चोप्रा यांनी सनीचं मत धुडकावून लावलं आणि तो सीन असाच शूट होईल असंही सांगितलं. यशजी वयाने आणि अनुभवाने आपल्यापेक्षा मोठे असल्याने आणि या क्षेत्रात मुरलेले असल्याने सनीने त्यांच्याशी वाद न घालण्याचे ठरवले आणि तो या सीनसाठी तयार झाला.

सनी जितका ऑनस्क्रीन तापट डोक्याचा आहे तितकाच तो खऱ्या आयुष्यातही चिडका आहे, एखादी चुकीची गोष्ट आपल्यासमोर घडत असेल तर त्याला ते सहन होत नाही असं त्याने मुलाखतीत सांगितलं आहे.

शाहरुखसोबतचा तो सीन शूट करतानाही सनीला ते अजिबात मान्य नव्हतं, पण केवळ यश चोप्रा यांच्याखातर आणि आपण दिलेल्या शब्दाखतर सनी त्याच्या मनाविरुद्ध हा सीन करायला तयार झाला.

जेव्हा शाहरुख सनीच्या पाया पडून गयावया करत असतो तोच हा सीन, हा सीन शूट करताना सनीचा संताप अनावर झाला होता, रागाने त्याने आपले हात जीन्सच्या खिशात घातले आणि मुठी आवळल्या आणि त्यामुळे सनीच्या जीन्सचे खिसेच फाटले.

खरंतर सेटवरच्या बऱ्याच लोकांना सनीच्या या रागाचा अंदाज आला होता पण कुणीच त्याबद्दल काहीच बोललं नाही.

 

 

नंतर सिनेमा प्रदर्शित झाला आणि यश चोप्रा यांच्या अपेक्षेप्रमाणे मुलीला ब्लॅंक कॉल करून सतत पिडणारा आणि तिला ब्लॅकमेल करणारा राहुल हा तरुणांचा आयडॉल बनला, सिनेमातल्या खलनायकाला हीरो बनवण्यात यश चोप्रा यशस्वी झाले.

या सगळ्यात सनी देओलने मात्र शाहरुख आणि चोप्रा कॅम्पपासून फारकत घेतली ती कायमची, नंतर बऱ्याच वर्षांनी यमला पगला दिवानासाठी त्याने यश चोप्रा बॅनरखाली काम केलं पण डरनंतर सनीने कधीच शाहरुखसोबत काम केलं नाही.

बऱ्याच मुलाखतीत त्याने हे स्पष्टदेखील केलं की शाहरुखबद्दल त्याच्या मनात आकस नाही, पण त्याला जे पटलं नाही तेच त्याने केलं.

‘डर’ मधल्या राहुलने शाहरुखला सुपरस्टार बनवला, तरुण मुलं त्याचं अनुकरण करू लागली, त्याचं ते अडखळत बोलणं, त्याची स्टाईल लोकं कॉपी करू लागले. एका व्हिलनवर लोकं प्रेम करायला लागले.

 

 

अर्थात नंतर फक्त रोमॅंटिक सिनेमेच करून शाहरुखने त्याच्यात जो चार्म होता तो घालवला. सतत काहीतरी नवं करू पाहणाऱ्या शाहरुखला यश चोप्रा आणि करण जोहर यांनी एका साच्यात बसवलं आणि ‘अॅक्टर’ बनायला आलेला शाहरुख ‘सुपरस्टार’ म्हणून नावारूपाला आला!

===

हे ही वाचा खुद्द शाहरुखने काउंटरवर उभं राहून त्याच्या या सिनेमाची तिकिटं विकली होती!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version