' महाराष्ट्रातल्या ‘होम मिनिस्टर्सना’ भुरळ घालणाऱ्या पैठणीच्या जन्माचा अज्ञात इतिहास… – InMarathi

महाराष्ट्रातल्या ‘होम मिनिस्टर्सना’ भुरळ घालणाऱ्या पैठणीच्या जन्माचा अज्ञात इतिहास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

तेरा वर्षांपासून ‘होम मिनिस्टरचा’ सन्मान करण्यासाठी येणा-या भावजींची जितकी आतुरतेने वाट पाहिली जाते तितकीच किंबहूना त्यापेक्षाही जास्त आतुरता असते ती त्यांच्याकडून देण्यात येणा-या पैठणीची!

पदरावरती जरतारीचा नाचरा मोर असलेला पैठणी शालू नेसून आपल्या सगळ्यांनाच मिरवायचं असतं.

 

sonali kulkarni inmarathi

 

पैठणी – महाराष्ट्राचं महावस्त्र असल्याचा मान असलेली, साड्यांची राणी म्हणवली जाणारी ही साडी प्रत्येक स्त्रीने कधी ना कधी पाहिलेलं एक स्वप्न असतं. नवी नवरी असो वा वयोवृद्ध नारी सगळ्यांनाच पैठणीचा भारी हेवा असतो.

कॉटन किंवा सिल्कची हातमागावरची साडी, त्यावर हातानेच विणलेलं सिल्कचं सुंदर सुबक नक्षीकाम, स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतं. सणवार असो, लग्न कार्य असो वा कुठलाही सोहळा असो पैठणी मात्र कायम असते. पण ही पैठणी सगळ्यात आधी कोणी परिधान केली होती, तिची निर्मिती कशी झाली, ती महाराष्ट्राचं महावस्त्र होण्याइतकी प्रसिद्ध कशी झाली, हे प्रश्न तुम्हाला पडलेत का हो?

आज आपण पैठणीच्या सुंदर आणि दैदिप्यमान इतिहासावरच प्रकाश टाकणार आहोत.

पैठणी, आपल्याला नावावरून लक्षात येतच कि या साडीला हे नाव पैठण गावाच्या नावावरून प्राप्त झाले आहे पण पैठणीचा जास्त उपयोग हा सातवाहन शासनात आढळून येतो.

 

saree inmarathi

 

२००० वर्षांपुर्वीचं वस्त्र

इतिहासात वेगवेगळ्या ग्रंथातून प्राचीन काळात सुद्धा पैठणीचा वापर किती जास्त होता ह्याचे पुरावे आपल्याला मिळतात. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व जल-अभ्यासक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांच्या ‘दक्षिण काशी पैठण’ पुस्तकात पैठणी संबंधी उल्लेख आढळतो. याचे धागे मोहन्जोदडो संस्कृतीशी जोडलेले असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. उत्खननावेळी पैठणीचे विणकाम करण्यात वापरल्या जाणाऱ्या आयवरी सुयांची पेटी सापडली होती.

मोरवंचीकरांच्या संशोधनानुसार सातवाहनकालीन राजवटीत या व्यवसायाला स्थैर्य मिळाले असावे. म्हणजे, पैठणीचा व्यवसाय आधीही होता का? तर होय.

पैठणी मुळातच, भारताबाहेर विकण्यासाठी आणि भारताच्या खजिन्यात भर घालण्यासाठीच मुद्दाम निर्माण केली गेली होती. तिची निर्मितीच मुळात, उद्योगाच्या दृष्टिकोनातून झाली होती. कारण, भारतीय वीणकाम आणि पैठणीचं मऊ कापड, रंग संगती, नेसण्याची पद्धत हे सगळंच परदेशी ग्राहकांना भुरळ घालायचं. इतर देशांसोबत व्यवसायाचे धागे सुद्धा घट्ट विणले जावे आणि भारताची आर्थिक स्थिती अजून बळकट व्हावी, ह्या उद्देशाने सातवाहन काळापूर्वीच्या राजांनी पैठणीची निर्मिती करून घेतली होती.  तिचा खपही प्रचंड होता.

 

paithani inmarathi

 

आज ज्याप्रमाणे, परदेशी ग्राहकांना आपल्या साड्या आवडतात त्याही पेक्षा जास्त त्याकाळातील ग्राहकांना आवडायच्या. इतकी महागातली वस्त्र घेण्यासाठी त्याकाळी फार काही औचित्य प्राप्त व्हायचं नाही, आणि भरमसाठ पैसाही नसायचा, तरी लोक पैसे साठवून जमवून वर्षातून ठराविक वेळी पैठणी मात्र नक्की घेत आणि आंतरराष्ट्रीय कापड बाजारपेठेत भारताच्या पैठणी पासूनच कापड निर्यात करण्याला सुरुवात झाली.

श्री सातकरणी आणि गौतमीपुत्र सातकरणी यांनी सातवाहन काळात, पैठणीला उद्योगरूपात एक नवीन ओळख दिली. आणि सातवाहन काळात हा उद्योग आपल्या शिखरावर होता.

रोमन साम्राज्याला पडली पैठणीची भुरळ

रोमन लोक पैठणीचे अत्यंत चाहते होते ह्याचे अनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत. सिल्क पासून बनलेलं हे वस्त्र, ज्यावर सोन्या चांदीचं सुंदर नक्षीकाम रोमन लोकांना फार आकर्षित करत.

प्लिनी या रोमन लेखकाने पहिल्या शतकात लिहिलेल्या पुस्तकात पैठणीच्या उद्योगाचा उल्लेख आहे. तर इटालीयन लेखक मार्कोपोलो यानेही पैठणी वस्त्रोद्योगाचा गौरव आपल्या पुस्तकातून केला आहे. दोन्ही लेखकांच्या वर्णनानुसार, पूर्वी रोमला, मलमल, रेशम आणि जारीपासून बनवलेल्या आणि भरपूर सोन्या चांदी सारख्या मौल्यवान धातू, महाग आणि दुर्मिळ मोत्यांचं नक्षीकाम असलेल्या ब्रोकेड’ आणि बक्रम यांची निर्यात केली जात असे. शाही रोमान्स ह्या वस्त्रांचा वापर करणे अत्यंत अभिमानास्पद समजायचे.

इतिहासात खोलवर शिरलं तर आपल्याला रोमन लोकांचं पैठणीप्रेम समजून घेता येईल. जितके भारतीय पैठणीसाठी वेडे नसतील त्याहून कैकपट अधिक रोमन लोकांना पैठणीची भुरळ होती.

काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, पैठण ज्याला “दक्षिण काशी” आणि “सगुणक्षेत्र” देखील म्हणतात, तेथे व्रत वैखल्ये पार पाडताना, वातावरण मंगलमयी होण्यासाठी पैठणी नेसण्याची प्रथा होती. तर हे रोमान्स, अनेक महिने पैठणात आणि कल्याणच्या बंदराजवळ केवळ पैठणी आपल्या देशात नेण्यासाठी ठाण मांडून बसत.

एक एक कलाकारी घडवायला अनेक कष्ट व बारीक काम करावे लागत असल्याने ज्यामुळे, ‘तासभर विणायचं आणि पोटभर खायचं’ ही म्हण प्रसिद्ध झाली असावी.

 

paithani saree inmarathi

हे ही वाचा – मानवी स्पर्शाने समृद्ध झालेलं औरंगाबादचं हे दुर्मिळ कलात्मक उत्पादन आपण टिकवायलाच हवं!

एक-एक पैठणी विणून तिचं फिनिशिंग करायला ३ महिने ते १ वर्ष इतका कालावधी लागायचा आणि रोमान्स मोठ्या धीराने या पैठण्या विकत घेण्यासाठी वाट बघत बसायचे. इतकं त्यांना पैठणीचं वेड होतं.

आक्रमणांनी केला घात

पिंपळवडारीच्या वारंवार होणाऱ्या आक्रमणानंतर या उद्योगाला उतरती कळा लागली. हा उद्योग करणारे कारागीर नाशिक, हैदराबाद आणि पुण्याला स्थलांतरित झाले. आणि तिथे हे उद्योग नव्याने होऊ लागले. काही कारागीर आपणहून तर काहींना काही राजांनी बळजबरीने आपल्या राज्यात स्थलांतरित होण्यास भाग पाडलं होतं.

मुहम्मद तुघलक ते मलिक अंबरच्या काळात या कापड उद्योगापासून १६ ते १७ लाखांचा महसूल प्राप्त होत असे.

सातवाहनांनंतर काही विणकर पश्चिम घाटात स्थलांतरित झाले, तर काही कारागिरांना वेगवेगळय़ा राजांनी सक्तीने स्थलांतरित केले. यादव राजवटीच्या काळात अनहिलपट्टणच्या राजाने अनेक विणकरांना बळजबरीने गुजरातला नेले.

औरंगजेबानेही अनेक वीणकरांना जबरदस्तीने स्थलांतरीत केल्याचेही पुरावे सापडतात.

 

aurangjeb-marathipizza

 

त्यानंतर रघुजी नाईक नावाच्या सरदाराने श्यामदा वालजी या गुजराती व्यापाऱ्याला बोलावून त्याच्यामार्फत काही सवलती देऊन कारागिरांना येवलावाडी (येवला) येथे बोलावले. तिथून येवल्याला हा पैठणीचा उद्योग पुन्हा नव्याने सुरु करण्यात आला असे संदर्भ मोरवंचीकरांच्या पुस्तकात आढळतात.

देखणा अविष्कार

इतका जुना इतिहास असला, पैठणी घडवण्याची परंपरा इतकी जुनी असली तरीही ती आज टिकून आहे. काळानुसार तिच्या रुपात, शैलीत, वीणकामाच्या पद्धतीत बदल होत गेले पण पैठणी मात्र तशीच राहिली.

आज हाताने विणलेली पैठणी दुर्मिळ झाली आहे. आजकाल वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी यंत्रांच्या साहाय्याने पैठणी वरील विणकाम केले जाते. पूर्वी सोन्या चांदीच्या तारांनी विणल्याजाणाऱ्या नाक्षीची जागा आज रेश्माच्या धाग्यांनी घेतली असली तरीही पैठणी ती पैठणीच असते.

 

saree 1 inmarathi

 

पैठणीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की तिला मध्ये एक समान रंग तर दोन्ही टोकांवर, पदारांवर एकसमान डिझाईन केलेले असते. त्यामुळे एकीकडून खराब झाली तर दुसरी कडून ती आपल्याला नेसता येते.

मधल्या काळात पैठणीचा वापर तसा कमी होत होता, पण आदेश बांदेकरांच्या “होम मिनिस्टर” कार्यक्रमात फिचर झाल्यामुळे पैठणीचा खप पुन्हा वाढल्याचे आधाळून आले आहे.

आज ५००० रुपयांपासून उपलब्ध असलेल्या पैठणींची किंमत तिचा पोत, रंग, वीणकामाची पद्धत यांनुसार लाखोंच्या घरात पोहोचली आहे. वेगवेगळ्या स्टाईल्स आणि पैठणीचे वेगवेगळे प्रकार जसे सेमी पैठणी, डिझाइनर पैठणी आपल्याला बाजारात बघायला मिळतात.

 

sai inmarathi

 

हल्लीच्या तरुणपिढीला पैठणीची इतकी भुरळ पडलीय की साड्यांसह पैठणीच्या कापडापासून तयार होणारा ड्रेस, वनपीस, जॅकेट यांपासून ते थेट मास्कपर्यंत सारं काही पैठणीमय झालेलं दिसतं.

 

paithani dress inmarathi

 

अशी होती सुरेख पैठणीची सुरेख गोष्ट. आपल्याला हा आपल्या लाडक्या पैठणीचा इतिहास जाणून घेऊन काय वाटले आम्हाला नक्की कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?