Site icon InMarathi

ज्यावर खरा हक्क भारताचा आहे त्या “पाकव्याप्त काश्मीर” बाबत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!

kashmir inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर| इंस्टाग्राम

===

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून भारताला कायम एक डोकेदुखी आहे. ती म्हणजे पाकिस्तानच्या रुपात मिळालेला खोडसाळ आणि बदमाश शेजारी! ह्या पाकिस्तानने १९४७ ते आजपर्यंत अशी एकही संधी सोडली नसेल की ज्यामुळे भारताला त्रास होईल किंवा सीमेवर अशांतता पसरेल.

काश्मीर खोऱ्यात तर दहशतवादी घुसवून, तिथल्या स्थानिकांना, काश्मिरी पंडितांना तिथून निघून जाण्यास भाग पाडले. आता तर तिथल्या स्थानिकांची डोकी भडकावून त्यांना बंड करण्यास चिथावणी दिली जात आहे.

भारतावर अनेक दहशतवादी हल्ले झाले, काश्मीरमध्ये किंवा सीमेवर सतत हल्ले होत असतात, सैन्यातील लोकांना त्रास दिला जातो, त्यांच्यावर दगडफेक, गोळीबार, बॉम्बफेक केली जाते, ह्या सगळ्याच्या मागे पाकिस्तान आहे हे एक वास्तव आहे.

काश्मीर साठी पाकिस्तानचे हे सर्व प्रयत्न वर्षानुवर्षे सुरु आहेत तरी आजवर काश्मीर त्यांना मिळू शकले नाही आणि मिळणारही नाही. पण बदमाशी करून, घुसखोरी करून त्यांनी काश्मीरचा काही भाग ताब्यात घेतलाच! जो आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखतो.

 

quora.com

ह्या भागावरचा हक्क पाकिस्तान सोडायला राजी नाही आणि पूर्वीपासून हा भाग भारताचा हिस्सा असल्याने भारताने ह्या भागावरचा हक्क सोडण्याचा प्रश्नच येत नाही.आज आपण ह्या पाकव्याप्त काश्मीर विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्या भागाला आपण पाकव्याप्त काश्मीर असे म्हणतो त्यालाच हे पाकिस्तानी लोक ‘आझाद काश्मीर’ म्हणतात.

१. युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख Pakistan administered Kashmir म्हणजेच पाकिस्तान प्रशासित काश्मीर असा करतात. पाकव्याप्त काश्मीरच्या सीमा चीन आणि अफगाणिस्तान ह्या देशांना लागून आहे.

२. पाकव्याप्त काश्मीर वर इंग्रजांचे राज्य नव्हते. ब्रिटीशांच्या काळात काश्मिरचे महाराजा हरीसिंह ह्यांच्या शासनाखाली हा प्रदेश होता. म्हणूनच तांत्रिकदृष्‍ट्या हा भाग कधीही ब्रिटीशांच्या राज्यात आला नाही.

३. फाळणीच्या वेळी जम्मू आणि काश्मीर राज्याला पर्याय देण्यात आला होता की पाकिस्तान किंवा भारतात विलीन व्हावे. परंतु महाराजा हरीसिंह ह्यांचे म्हणणे होते की  काश्मीर हे एक स्वतंत्र राज्य राहील.

४.  जेव्हा फाळणी नंतर पाकिस्तानच्या पठाण आदिवासी लोकांनी जम्मू व काश्मीर वर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने ह्यात आपला कुठलाही हात नसल्याचे सांगितले होते.

पण हे सर्वांनाच ठावूक आहे की पाकिस्तानला काश्मीरवर ताबा हवा असल्याने त्यांनी हा हल्ला केला होता. शिवाय पुरावे सुद्धा पाकिस्तानच्या विरूद्धच बोलतात.

 

en.wikipedia.org

५. पाकव्याप्त काश्मीरचे क्षेत्रफळ १३,२९७ स्क्वेअर किमीचे आहे. ह्या भागाची लोकसंख्या ४.६ लाख इतकी आहे. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबाद आहे.

६. महाराज हरी सिंह ह्यांनी जेव्हा पाकिस्तानी पठाण आदिवासींनी काश्मीर वर हल्ला केला तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबेटन ह्यांच्याकडे मदतीची मागणी केली.

ह्याचे उत्तर म्हणून लॉर्ड माउंटबेटन ह्यांनी असे उत्तर दिले की,

आमच्या सरकारची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर जम्मू आणि काश्मीर मध्ये कायदा व सुव्यवस्था अंमलात यावी. ह्या भागातील अतिक्रमण हटवले जावे आणि राज्याच्या विलीनीकरणाची प्रक्रिया जनमत चाचणीचा निकाल ग्राह्य धरून पूर्ण केली जावी.

अखेर २६ ऑक्टोबर १९४७ साली जम्मू व काश्मीरचे शासक महाराजा हरी सिंह ह्यांनी जम्मू व काश्मीरच्या भारतात विलीनीकरणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या.

७. जम्मू आणि काश्मीर मध्ये २६ ऑक्टोबर हा दिवस ‘विलय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी लोक फटाक्यांची आतिषबाजी करतात, भारतीय राष्ट्रगीताचे गायन करतात आणि झेंडावंदन केले जाते.

८. असे म्हणतात की १९४६ साली पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना कोह्ला ब्रिज वर थांबवण्यात आले होते. त्यांना काश्मीर राज्यात येण्यास मनाई करण्यात आली होती.

तरीही नेहरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यात प्रवेश केला असता त्यांना महाराजा हरी सिंह ह्यांनी अटक केली होती.

 

zeenews.india.com

९. पण काश्मीर विभक्त हवा असे मानणारे मात्र ह्या दिवसाला काळा दिवस मानतात.

१०. पाकव्याप्त काश्मीरचा उत्तरेकडील भाग जो चीनच्या ताब्यातला भूभाग म्हणून नकाशावर दाखवला जातो, तो १९६३ मध्ये झालेल्या Sino-Pakistan कराराचा परिणाम आहे. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानने हा भूभाग चीनला भेट म्हणून दिलेला आहे.

तेव्हापासून ह्या भागाला नकाशात “१९६३ मध्ये पाकिस्तानद्वारे चीनकडे सोपवण्यात आलेला भाग” असे दाखवले जाते.

११. पाकव्याप्त काश्मीरचे असे म्हणणे आहे की त्यांचे स्वतंत्र सरकार आहे आणि त्यांची सरकार द्वारा निर्माण केलेली व संचालित केलेली विधानसभा आहे. परंतु जगभरात हे सर्वांना माहित आहे की ह्या भागावर पाकिस्तानचे नियंत्रण आहे.

१२. पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्र्पती हे राज्याचे प्रमुख आहेत व त्यांचे पंतप्रधान हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांच्याच हाताखाली त्यांची मंत्रीपरीषद काम करते.

 

dainikhindustan.com

१३. पाकव्याप्त काश्मीरची स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. त्यांचे स्वतःचे हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा आहे.

१४. दक्षिण आशियातील सर्वात मोठी व खतरनाक दहशतवादी संघटना ‘लष्कर –ए- तैयबा’ चे अनेक ट्रेनिंग कॅम्प ह्या पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहेत.

१५. मुंबई वर २६ नोव्हेंबरला जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यात एकमात्र जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसब ह्याला पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबाद येथेच सागरी युद्धाचे प्रशिक्षण दिले होते.

हे प्रशिक्षण देण्याचे अधिकार व जागा सर्व पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे.

१६. पाकव्याप्त काश्मीर मध्ये कुठलीही माध्यमे स्वतंत्र नाहीत. जी माध्यमे येथे काम करतात ती सर्व पाकिस्तान सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. ह्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गोष्टींना काहीही थारा नाही. पाकिस्तान सरकारने हे अधिकार तिथे कोणालाही दिलेले नाहीत.

 

squeezu.com

१७. ह्या ठिकाणी फक्त ‘आझाद काश्मीर’ रेडियोचेच प्रसारण करण्यास परवानगी आहे. इतर कुठलेही रेडियो स्टेशन ह्या ठिकाणी प्रसारित होत नाहीत.

१८. पाकव्याप्त काश्मीर मधील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ह्या ठिकाणची अर्थव्यवस्था मुख्यत्वेकरून शेतीवर आधारित आहे. अर्थव्यवस्थेला थोडीफार मदत पर्यटनाद्वारे सुद्धा होते.

असे म्हणतात की ब्रिटीश मिरपुरी समुदायाद्वारे ह्या ठिकाणी लोकांना वेळोवेळी आर्थिक मदत केली जाते.

१९.  भारत पाकिस्तान मध्ये आजवर जी युद्धे झाली त्याला कारणीभूत हा पाकव्याप्त काश्मीरचाच मुद्दा आहे. फक्त १९७१ सालच्या युद्धाचे कारण वेगळे होते. १९७१ च्या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली.

२०. पाकव्याप्त काश्मीर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांसाठी फक्त एक इगो प्रॉब्लेम म्हणून उरला आहे. नाहीतरी ह्या भागामुळे दोन्ही देशांतील अर्थव्यवस्थेला तसा काही फारसा फरक पडणार नाही. पण ओरीजीनली भारताचा हा भाग असल्याने भारताने आपले म्हणणे मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही.

पाकिस्तानने बदमाशी करून, कारस्थान करून ह्या भागावर ताबा मिळवला आहे. अतिक्रमण केले आहे. परंतु पाकिस्तानचा एकंदर मुजोर रोख बघता ते सुद्धा ह्या बाबतीत मागे हटणार नाहीत.

एक मात्र आहे, ज्या दिवशी कुठल्याही देशातील सरकार ह्या बाबतीत सौम्य भूमिका घेईल, त्या दिवशी त्या पक्षाने आत्महत्या केल्यासारखे होईल. म्हणूनच दोन्हीपैकी कुठलाही देश ह्यावर मागे हटण्यास तयार नाही.

 

pakpassion.net

२१. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेऊन फार मोठी चूक केली असे अनेकांचे म्हणणे आहे. जर भारताने त्याच वेळी कठोर भूमिका घेऊन ह्यावर उपाय केला असता, तर हा प्रश्न इतक्या वर्षांसाठी भिजते घोंगडे म्हणून राहिला नसता.

संयुक्त राष्ट्र परिषदेने ह्यात हस्तक्षेप केल्याने आजही ७० वर्षांनंतर सुद्धा हा मुद्दा विवादास्पद आहे आणि ह्यावर तोडगा निघत नाही.

२२. भारत पाकिस्तान ह्यांच्या दरम्यान १९४७ साली जे युद्ध झाले त्यात संयुक्त राष्ट्र परिषदेने हस्तक्षेप केला व दोन्ही राष्ट्रांना युद्ध बंदीचा आदेश दिला. तेव्हा संयुक्त राष्ट्र परिषदेने जनमत घेण्याविषयी सुद्धा मागणी केली होती.

पण इतर काही मुद्द्यांवर तोडगा न निघाल्याने जनमत घेतले गेले नाही आणि तेव्हापासून ते आजपर्यंत पाकव्याप्त काश्मीर हा दोन्ही देशांसाठी एक संवेदनशील व वादाचा मुद्दा आहे. ह्या मुद्द्यावरून आजही दोन्ही देशात अतिशय टोकाचा तणाव आहे.

पाकव्याप्त काश्मीर वर ताबा मिळवून सुद्धा पाकिस्तानची हाव संपत नाही. त्यांना संपूर्ण काश्मीरचा ताबा हवा आहे आणि त्यासाठी ते वाटेल त्या थराला जाऊन अतिशय वाईट प्रयत्न करीत आहेत.

एकतर स्वतःच्या देशातील अंतर्गत प्रश्न ह्यांना सोडवणे झेपत नाहीत अन वर ह्यांना काश्मीर हवे!  कळत नाही हे लोक करणार काय काश्मीर घेऊन?

 

radio.gov.pk

इतके सुपीक सिंधू नदीचे खोरे ह्यांना मिळाले, हिमालय पर्वताच्या पायथ्याचा अप्रतिम स्वर्गासारखा भाग ह्यांना मिळाला. शिवाय ह्यांनी काश्मीरच्या काही भागावर सुद्धा ताबा मिळवला.

पण हे सगळं असून सुद्धा त्याचा काय उपयोग करत आहेत?

इतका सुंदर निसर्ग ह्यांच्या वाट्याला आलाय तरी त्याची कदर न करता, हे लोक त्याचा अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयोग करत आहेत.

ते म्हणतात ना, गाढवाला सोन्याच्या भांड्यातून पक्वान्न खायला दिले तरी ते गाढव त्याचा उकीरडाच करून मोकळे होणार! पाकिस्तानचे सुद्धा काहीसे तसेच आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version