Site icon InMarathi

त्रासदायक, पण टाळता न येणाऱ्या लोकांशी डिल करण्याच्या ८ कमाल टिप्स…

mtr im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण दररोज अनेक व्यक्तींना भेटतो. काहींना भेटणे आपल्याला आवडते, तर काहींना भेटणे एखाद्या परिक्षेसारखे वाटते. कारण? कारण हे की काही व्यक्तींचा स्वभाव अगदी लोण्यासारखा मऊ असतो तर काहींचा स्वभाव आपल्याला कधीच कळत नाही. कोणत्या गोष्टींवरून त्यांचा संताप होईल, काय म्हणतील, कोणती गोष्ट त्यांना खुपेल, त्यांचा इगो कधी दुखावेल हा अंदाज आपल्याला बांधता येत नाही.

अशा व्यक्तींना आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न केला, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या आपल्या समोर येतातच. कधी बॉस म्हणून, कधी कलिग म्हणून तर कधी मित्र, मैत्रीण किंवा जोडीदार म्हणून. या व्यक्तींना तोंड देणे म्हणजे आपली ऊर्जा व वेळ नको त्या ठिकाणी वाया घालवणे होय.

या व्यक्ती बरेचदा इतक्या जवळच्या असतात की आपण त्यांच्याशी संबंध तोडून टाकू शकत नाही. तर अशावेळी काय करावे? संबंध तर टिकवायचेत पण आपला मूड आणि घरातील, ऑफिसमधील वातावरण सुद्धा नीट ठेवायचेय, काय उपाय करावा? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही घेऊन आलोय.

 

 

खाली दिलेल्या टिप्स वापरून आपण या प्रश्नाचं कायमचं उत्तर मिळवू शकता. काय आहेत त्या टिप्स, चला जाणून घेऊया.

१. सोडून द्या

एखाद्या व्यक्तीची आपल्याला इतकी भीती वाटते किंवा ती व्यक्ती इतकी नकोशी असते, की तिला भेटण्याच्या निव्वळ विचारानेच आपण अस्वस्थ व्हायला लागतो. ती व्यक्ती काय म्हणेल, आपल्याशी कशी वागेल असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात.

कधी कधी अशा व्यक्तीच्या म्हणण्याचा आपल्याला इतका संताप येतो, की आपण नको ते त्यांना बोलून बसतो आणि नंतर आपण आपली पातळी सोडल्यामुळे आपल्याला अपराधीपणाची भावना जाणवते किंवा आपण अजून संतापतो ज्याने आपली ऊर्जा नष्ट होते.

 

 

अशावेळी त्या व्यक्तीच्या म्हणण्याकडे, त्याच्या कंमेंट्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याचे म्हणणे सोडून द्यावे. त्यावर प्रतिवाद करून आपला वेळ वाया घालवू नये. याने मनःशांती राहते.

२. संवाद जगवा

कधी कधी नात्यांमधील संवाद संपला की समज-गैरसमज आणि नकारात्मकतेचे भाव निर्माण होतात. त्यामुळे, ती व्यक्ती वाईट वागत असण्यामागे काही कारणे असू शकतात हा साधा विचार आपण करत नाही, आणि त्यांना उलट जिव्हारी लागेल असे बोलून बसतो.

एखाद्या व्यक्तीची चिडचिड जर सतत वाढताना आढळत असेल, ती व्यक्ती दिवसेंदिवस तिच्यासोबत कोणाचेही जगणे कठीण करत असेल तर बसून शांतपणे त्या व्यक्तीशी संवाद साधा, तिला समजून घ्या.

 

 

३. माणुसकी जपा

एखादी व्यक्ती तुमच्यावर चिडल्याने तुम्ही सुद्धा चिडूनच उत्तर द्यायला हवे, हा काही नियम नाहीये. त्यामुळे, ती व्यक्ती रागाच्या भरात तुमच्याशी वाईट पद्धतीने बोलली असेल, तर तुम्ही शांत पणे उत्तर द्या.

अनेकदा, ही चिडलेली माणसे, समोरच्या व्यक्तीचे शांत उत्तर ऐकून स्वतः शांत होतात, भानावर येतात. त्यामुळे, तुम्ही आपली पातळी सोडू नका, नेहमी माणुसकी जपा.

 

 

४. अशावेळी संभाषण टाळा

एखाद्या नात्याला खुलवण्यासाठी, टिकवण्यासाठी जसे संभाषण आणि संवाद महत्वाचे असतात तसेच ते न करणेही महत्वाचे असते. एखाद्या व्यक्तीला कोणत्या गोष्टींमुळे राग येऊ शकतो, कोणते असे ट्रिगर पॉईंट्स आहेत ते ओळखा. शक्यतो त्या विषयांवर बोलणे टाळा.

५. तुम्ही शांत असल्याचे भासवा

एखादी व्यक्ती अगदी फारच वाईट वागत असेल तरीही शांत राहा. तुमच्या मनात कितीही उद्रेक असेल तरीही त्याला बाहेर येऊ देऊ नका. त्याकडे दुर्लक्ष करायला शिका.

कधी कधी या व्यक्ती मुद्दाम तुमचा मूड खराब करण्यासाठी किंवा तुमचे काम बिघडवण्यासाठी तुम्हाला त्रस्त करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यातच आपला फायदा आहे हे लक्षात घ्या आणि शांत राहा.

 

 

६. गमतीत घ्या

कधी कधी अनेक चित्र विचित्र व्यक्तींचा आपल्याला सामना करावा लागतो. या व्यक्ती खूप अहंकारी सुद्धा असू शकतात. त्या स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना लहान समजतात.

अशी व्यक्ती तुमच्या समोर येऊन तुमचा अपमान करत असेल, तुम्ही नीट बोललात तरी तुम्हाला इग्नोर करत असेल, तर विनोदाचा वापर तुम्ही करू शकता. कधी कधी असे स्मार्ट उत्तर दिल्याने अशा व्यक्तींचे मतपरिवर्तन होते.

 

 

७. सकारात्मक विचार

एखादी व्यक्ती तुमच्याकडे बघून नाराजीचे हावभाव करत असेल किंवा तुमच्याशी तुसडेपणाने बोलत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर एकदा जरा वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करून बघा.

त्या व्यक्तीला तिच्या बॉसचा सामना करावा लागला असेल म्हणून तिचा मूड खराब असेल, किंवा ती व्यक्ती अतिरिक्त कामामुळे वैतागून स्वतःशी बोलताना असे हावभाव करत असेल असा विचार करून बघा.

 

 

कधी कधी एखाद्याला ओळखण्यात तुमची सुद्धा चूक होऊ शकते हे विसरू नका आणि सकारात्मक विचार करून बघा.

===

===

८. आत्मचिंतन

 

एखादी व्यक्ती तुमच्याशी चांगले किंवा वाईट वागण्यामागे काही कारणे असू शकतात हेही ध्यानात घ्या. तुम्ही, त्या व्यक्तीचे मन दुखावले असेल किंवा तुमच्याकडून नकळत काही चूक झालेली असल्याची शक्यताही तुम्ही नाकारू शकत नाही. त्यामुळे, इतरांना आपल्या मतांच्या तराजूत तोलण्याआधी स्वतःचे परीक्षण करा, आत्मचिंतन करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version