त्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट होतं; पण आज मात्र स्थान नाही! वाचा यामागची कारणं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
क्रिकेट आणि भारत हे एक वेगळंच नातं आहे. क्रिकेटचा जनक असणाऱ्या इंग्लंडमध्येही लोक जेवढं प्रेम करत नसतील, एवढं प्रेम भारतीय मंडळी क्रिकेटवर करतात. वनडे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक अशा मोठमोठ्या स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत. विंडीज आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी सुद्धा क्रिकेटवर राज्य केलंय. असं असूनही या खेळाला ऑलिंपिक्समध्ये मात्र स्थान नाही.
असं नेमकं का? क्रिकेट ऑलिंपिक्समध्ये कधी खेळलं गेलं होतं का? असे प्रश्न पडत असतील ना? त्यांची उत्तरं हवी असतीलच. कारण क्रिकेट हा विषय अगदीच जिव्हाळ्याचा आहे राव आपल्या… मग आज हीच उत्तरं जाणून घेऊयात.
दोन संघ ऑलिंपिक्समध्ये खेळले आहेत क्रिकेट
होय, दोन संघ चक्क ऑलिंपिक्समध्ये क्रिकेट खेळले आहेत. फार जुनी गोष्ट आहे, पण क्रिकेट या खेळाला सुद्धा ऑलिंपिक्समध्ये स्थान मिळालं होतं, याचा दाखला म्हणून अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
खरं तर १८९६ साली क्रिकेटचा ऑलिंपिक्समध्ये पहिल्यांदा समावेश होणार होता. पण पुरेशा देशांनी सहभाग घेतला नाही, म्हणून स्पर्धेतून क्रिकेटची विकेट गेली. अथेन्समध्ये होणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेटचा सहभाग करून घेतला गेला नाही.
पुढे ४ वर्षांनंतर मात्र क्रिकेटचा सामना ऑलिम्पिक स्पर्धेत खेळला गेला. सुरुवातीला ग्रेट ब्रिटन, बेल्जीयम, हॉलंड आणि फ्रान्स या चार देशांचा सहभाग या स्पर्धेत होणार होता. अगदी बरोबर वाचली आहेत तुम्ही ही नावं… फ्रान्स आणि बेल्जीयम, ज्यांचा क्रिकेटशी काही संबंध सुद्धा नाही, असे हे दोन देश, जे थेट ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट खेळणार होते.
===
हे ही वाचा – ही व्यक्ती नसती, तर भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक मैदानावर उतरताच आलं नसतं! वाचा
===
ही ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये होणार होती, म्हणजेच ते स्पर्धेचे यजमान होते. त्यामुळेच फ्रान्सचा सहभाग क्रिकेटमध्येही करण्यात आला होता. बेल्जीयम आणि हॉलंडला मात्र सहयजमान पदाची संधी मिळाली नाही. यजमान पदाची माल गळ्यात ना पडलेल्या या देशांनी क्रिकेटमधून माघार घेतली.
अवघा एकच सामना
दोनच संघ स्पर्धेत उरले. प्रत्येकी १२ खेळाडू असणाऱ्या या संघांचा एक सामना या स्पर्धेत खेळवण्यात आला. हा सामना २ दिवस चालला. अपेक्षेप्रमाणेच हा सामना ग्रेट ब्रिटनने जिंकला. मात्र हा ऑलिम्पिकमधील क्रिकेटचा पहिला आणि शेवटचा सामना ठरला.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर १९०४ साली सुद्धा पुन्हा क्रिकेटचा सहभाग या स्पर्धेत व्हावा यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र ते अयशस्वी झाले.
क्रिकेट खेळणाऱ्या देशांची संख्या
जगभरात आज १०० हून अधिक देशांमध्ये क्रिकेट खेळलं जातं. हे देश ICC चे सदस्य आहेत. मात्र टेस्ट हा क्रिकेटचा सर्वोत्तम प्रकार खेळण्याची परवानगी असणारे, केवळ बाराच देश आहेत. म्हणजे मग ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याची स्वप्नं पाहणं तसं कठीणच…
अर्थात हा झाला एक भाग. याव्यतिरिक्त अनेक अडचणी आहेत, ज्यामुळे क्रिकेटचा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग ही सोपी गोष्ट ठरणार नाही.
आर्थिक गणितं
क्रिकेटचा सहभाग या स्पर्धेत करून घ्यायचाच असेल, तर टी-२० किंवा सध्या नव्याने ट्रेंडिंग असणारा टी-१०, १०० बॉल्स क्रिकेट अशा स्पर्धांचा यासाठी विचार करावा लागेल. असं झाल्यास दर चार वर्षांनी ऑलिंपिक्समध्ये क्रिकेट खेळवण्यात येईल. याचा थेट परिणाम दर २ वर्षांनी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपवर नक्कीच होऊ शकतो.
अमाप पैसा मिळवून देणारी स्पर्धा रद्द करण्याची किंवा दोन स्पर्धांमधील कालावधी वाढण्याची गरज पडणार असेल, तर ही आर्थिक गणितं ICC मान्य करेल का, हा प्रश्न उभा राहतोच.
===
हे ही वाचा – या पठ्ठ्याने ऑलिम्पिक्समध्ये अनवाणी धावून सुवर्णपदक पटकवल्याची गोष्ट जगाला सदैव प्रेरणा देत राहील!
===
जगप्रसिद्ध खेळ नसणं
पूर्णवेळ क्रिकेट खेळणारे देश हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके कमी आहेत. जगभरात या खेळाचे चाहते असणं ही जरा कठीणच बाब आहे. मग ‘जगात भारी’ नसणारा हा खेळ, ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर उतरवणं खरंच शक्य आणि फायदेशीर आहे का?
थोडक्यात काय, तर क्रिकेटचे चाहते जगभर पसरलेले असलेले, तरी क्रिकेट हा खेळ मात्र जगप्रसिद्ध नाही. म्हणूनच ऑलिम्पिक म्हणजे थोडी अवघड परीक्षा आहे. खरं की नाही मंडळी?
मैदानं आणि पैशांचा अभाव
मोजक्या देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळाची मैदानं जगभर असतील,अशी अपेक्षाच करणं चुकीचं आहे. ऑलिंपिक्सच्या स्पर्धा मात्र जगभरातील विविध देशांमध्ये होतात. अशा देशांमध्ये क्रिकेट खेळवायचं, म्हणजे मैदानं कमी पडणार हे सांगण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही.
समजा अशा देशांमध्ये क्रिकेटच्या मैदानांची निर्मिती झालीच, तरी त्यासाठी पैसा खर्च करावाच लागणार. याशिवाय ऑलिम्पिकचे सामने संपल्यानंतर, ही मैदानं तशीच पडून राहणार. क्रिकेटची आवडच नसणाऱ्या देशांमध्ये या मैदानांचं नक्की करायचं काय, हा प्रश्न निर्माण होतोच. त्यामुळे असे देश पैसे खर्च करण्यासाठी तयार नसतील, तर त्यांचं तरी काय चुकीचं आहे म्हणा?
आयपीएलसारख्या स्पर्धांचा अडथळा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI सारखी संस्था ही क्रिकेटमधील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी संस्था आहे. आज आयपीएलसारखी स्पर्धा जर ऑलिम्पिकच्या काळात होणार असेल, तर एवढा मोठा आर्थिक फायदा नाकारून BCCI आयपीएल न खेळवण्याची तयारी दाखवेल का?
ऑलिम्पिक हा प्रतिष्ठेचा विषय ठरतो. त्यामुळे मग, ऑलिम्पिकची समिती सुद्धा अशावेळी माघार घेणार नाही. म्हणजेच अर्थ आणि प्रतिष्ठा अशा दोन्ही गोष्टींचा जिथे संबंध आला, तिथे वादविवाद निश्चित! हेदेखील एक महत्त्वाचं कारण ठरतं, ज्यामुळे क्रिकेटचा सहभाग ऑलिम्पिक स्पर्धेत केला जाऊ शकत नाही.
काय म्हणता मंडळी, पटली की नाही ही कारणं? क्रिकेट आणि ऑलिम्पिकचं नातं न जुळण्याची आणखीही काही कारणं असू शकतात असं तुम्हाला वाटतं का? असतील तर तीदेखील कमेंटमधून नक्की शेअर करा. एरवी, क्रिकेटचा सहभाग ऑलिम्पिकमध्ये होवो अथवा न होवो, आपलं क्रिकेटवरील प्रेम काही कमी होणार नाहीये, नाही का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.