Site icon InMarathi

मुक्ता टिळक, जातीय संमेलन आणि आरक्षणाचं राजकीय गणित

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आरक्षणामुळे ब्राम्हण कुटुंबातली मुलं शिकायला परदेशी जातात…

– असं विधान पुणे महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर मुक्त टिळक ह्यांनी केलं आणि एकच हलकल्लोळ माजला. त्यांनी हे विधान चित्पावन ब्राह्मणांच्या संमेलनात केलं. थोडक्यात, ज्या व्यासपीठावर हे विधान केलं गेलं, त्या व्यासपीठाची साजेसं आणि सोयीचं असंच हे विधान आहे. परंतु हे बोलणारी व्यक्ती त्या चित्पावन ब्राह्मण संघटनेची प्रतिनिधी नव्हती – तर लोकनिर्वाचित प्रतिनिधी होती. विविध संघटनांच्या लोकांनी आपापल्या सोयीचं वक्तव्य करणं हे काही नवीन नाही. पुण्यासारख्या सांस्कृतिक महानगराच्या आयुक्त पदी विद्यमान असलेल्या व्यक्तीने हे विधान करणं दुर्लक्षित करता येत नाही. त्यामुळे त्यावरून निर्माण झालेला गदारोळ योग्यच म्हणावा लागेल.

ह्या घटनेच्या निमित्ताने सोशल मीडियावर ३ विषय चर्चेत आले आहेत. स्वतः मुक्ता टिळक – त्या “टिळक” असणं, ब्राह्मण असणं – ह्या अंगाने चर्चेत आहेत. दुसरा विषय म्हणजे ‘जातीय संम्मेलनं असूच नयेत, शहाण्या माणसाने त्यांत सहभाग घेऊ नये’ – हा. आणि तिसरा, अर्थातच – आरक्षण आणि त्यामुळे होणाऱ्या तथाकथित अन्यायाचा.

 

पुणे मनपा च्या विद्यमान महापौर, सौ मुक्ता टिळक । ibnlokmat.tv

मुक्ता टिळक जे बोलल्या ते चूकच. आणि ते अनेक प्रकाराने, अनेक स्तरावर चूक आहे. त्याचा निषेध होतोय – तो ही अनेक स्तरांतून, खुद्द ब्राह्मण असलेल्या अनेकांकडून होतोय हे सुखावह आहे. परंतु ह्या टीकेत टिळकांचं ब्राह्मण असणं, त्यांचं “टिळक” असणं, त्या निमित्ताने लोकमान्य टिळकांवर घसरणं हे चुकीचं आहे.

जेव्हा एखादा विचार व्यक्त केला जातो तेव्हा त्या मागे मानसिकता, पक्षीय/संघटनेचा विचार असतोच. परंतु जेव्हा एक राजकारणी एखादं विधान करत असतो/असते, तेव्हा त्यामागे केवळ आणि केवळ राजकारणच असतं. मुक्त टिळकांचं विधान राजकीय गणितातून आणि त्या समूहाला आकर्षित करण्याच्या मोहातूनच आलेलं आहे. त्या विधानामुळे लगेच जातीवर घसरणे, चक्क लोकमान्य टिळकांवर टीका करणे हे कोणत्याच विचारी मनुष्याला शोभणारं नाही.

ह्या निमित्ताने जातीय संमेलने भरवू नये, विचारी लोकांनी त्यात सहभागच घेऊ नये हा विचार फार आग्रहाने मांडला जातोय. त्यातल्या त्यात श्री जयंत कुलकर्णी ह्यांनी फेसबुकवर फार चांगल्या शब्दात हा विचार मांडला आहे. त्यांनी तथाकथित सवर्णांनी जातीय संघटना काढू नये आणि त्याचवेळी मागासवर्गीय, आर्थिक/सामाजिक पिछाडीवर असलेल्या लोकांच्या जातीय संघटनांच्या अस्तित्वाची गरज समजून घ्यावी, हे फार मार्मिक शब्दात लिहिलं आहे. त्या फेसबुक पोस्टमधील काही भाग इथे देण्याचा मोह आवरत नाहीये.

ते म्हणतात :

एका विधानाच्या निमित्ताने …!
———————————–
… … …

खरे तर चित्त्पावनांच्याच काय पण कोणत्याही जाती संस्थेत सहभागी व्हायला, त्यांचे सदस्य व्हायला कायद्याने बंदी नाहीच वा ते देश विरोधी कृत्यही नाही. प्रश्न आहे तो व्यक्तीच्या वैचारिक प्रगल्भतेचा ! सामाजिक स्थितीचे भान असणारा,जातीयवादाच्या उगमाचा अभ्यास असणारा, फुले-आंबेडकर किंवा अगदी सावरकरांचे साहित्य वाचलेला,शोषित कोण आणि शोषक कोण होते याची नेमकी जाणीव असलेला कोणताही संवेदनशील नागरिक अशा तद्दन जाती-आधारित संस्थांच्या कार्यक्रमाला मुळात जाणारच नाही. हा कार्यक्रमही महापौरांच्या मतदार संघातला नाही वा ज्या शहराचे त्या प्रतिनिधित्व करतात त्या पुणे शहरातलाही नाही. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून जाणे अजिबातच बंधनकारक नसतांना या बाई तिथे हजर राहिल्या. समोर ‘आपली माणसं’ पाहिल्यावर मनातले नेमकेपणाने बोलल्या. तसाही केसरी वाड्याने कायमच प्रागतिक विचारांना विरोध केलेला होता.तत्कालीन ब्रिटिश विरोधी राजकारणाच्या दृष्टीने तो केवळ अग्रक्रमाचा प्रश्न असू शकत होता पण आजही त्याच मानसिकतेने सामाजिक समस्यांकडे पाहणे योग्य नाही.

एक दोन नव्हे तर हजारो वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा समूह गटांसाठी ‘जात’ हे अजूनही वास्तव आहे–त्यांना आरक्षणाचा फायदा देणारे, आर्थिक प्रगतीच्या संधी देणारे पण अजूनही सामाजिक प्रतिष्ठा नाकारणारे आणि आडनांवावरून दूर लोटणारे ! त्यामुळेच आपल्या हित आणि हक्क रक्षणासाठी अशा समूहांच्या जाती संस्था असणे अपरिहार्य आहे हे मोकळ्या मनाने समजावून घेतले पाहिजे. त्याला उत्तर म्हणून तथाकथित सवर्णांनीही आपापल्या जाती पोटजातीच्या संघटना काढणे हे वैचारिक मागासलेपण आहे. आरक्षणाच्या बाबतीत तथाकथित सवर्ण आणि उच्चवर्णीयांच्या भावना या अर्धवट माहितीवर आधारित,सवंग आणि उथळ असतात. त्यात अभ्यासाचा अभाव तर असतोच पण आत खोलवर दबलेला जाती श्रेष्ठत्वाचा अहंकारही असतो.केवळ प्रतिक्रिया म्हणून आक्रमकपणे संघटीत होणे, कधीही न ऐकलेल्या देव देवतांच्या जयंत्या सार्वजनिकपणे साजऱ्या करणे हा अशाच संवंगतेचा भाग आहे. आम्ही घरात सर्वांचे स्वागत करतो, सर्वांच्या घरी जातो, अस्पृश्यता पाळत नाही असे म्हणणारा हा वर्ग आपापले विशिष्ट सण, कुळधर्म, कुळाचार हे सर्व ‘परंपरांच्या’ नांवाखाली यथासांग पाळताना मात्र हटकून एका ठराविक जातीलाच मेहूण, सवाष्ण, यजमान, भिक्षूक असे विशेष सन्मान देतो. अगदी समता-समरसतेच्या सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही यात विरोधाभास वाटत नाही. छापून आलेली वादग्रस्त विधाने मुक्ताताई टिळक यांनी खरोखरच केली असतील तर त्या याच वर्गाच्या प्रतिनिधी आहेत असेच मानावे लागेल!

शेवटी एकच, बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आजचा भारतीय समाज अजूनही एकसंघ आहे हे विसरता कामा नये. आरक्षणाची व्यवस्था हा गरिबी दूर करणारा उपाय नाही. सामाजिक प्रतिष्ठा गमावलेल्या वर्गांना पुन्हा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी केलेली ती एक असाधारण तरतूद आहे. शिक्षण आणि नोकरीच्या सामान संधी मिळाल्याने अशा पूर्व अस्पृश्य समूहांची आर्थिक प्रगती होते आहे हे खरे आहे पण मुख्य प्रश्न आहे तो सामाजिक प्रतिष्ठेचा. ती अजून कोसो योजनें दूर आहे. या बाबतीत पुढाकार घ्यायचा आहे तो याच तथाकथित ‘उच्च’ जाती समूहांनी आणि अशा जातीतून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी! त्यासाठी हे श्रेष्ठत्वाचे छुपे अहंकार गळून पडले पाहिजेत,अंतर्बाह्य जातविहीन बनले पाहिजे, जातीशी जोडणारे सण-वार संपले पाहिजेत, आपल्या उच्चतेचा वेळी अवेळी गौरव करणाऱ्या जाती संस्था बंद पडल्या पाहिजेत, शोषित-वंचित समूहांच्या क्रोधाला समजून घेतले पाहिजे, त्याला संयमाने आणि संवेदनशीलतेने सामोरे गेले पाहिजे, बाबासाहेबांनी लिहिलेली ओळ न ओळ वाचली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आंतरजातीय विवाहांचे स्वतःच्या घरातही मनभरून स्वागत केले पाहिजे!

आपण एका विशिष्ट ‘जातीचे’ आहोत असे अजूनही मानणाऱ्या माझ्या काही मित्रांना माझा राग येण्याचा संभव आहेच. पण एकसंघ आणि समर्थ देशाच्या उभारणीला जातिविहीन समाज हा आणि हाच उपाय आहे हे आता तरी आपण समजून घ्यायला हवे!

ह्या पुढे – अमेरिकेत जाण्यात “ब्राह्मण” आघाडीवर आहेत आणि त्या मागे “आरक्षण” हे कारण आहे – ह्यावर फेसबुकवरच, श्री अभिराम दीक्षितांनी स्वानुभवावरून एक पोस्ट लिहिली आहे. त्यातील मुख्य भाग पुढे देत आहोत –

अभिराम लिहितात –

टिळकांचे मुक्तचिंतन : अमेरिकेतून अनावृत्त पत्र

हा लेख मी उत्तर अमेरिकेतून लिहीत आहे. गेले वर्षभर मी इथे आहे. व्यवसायाच्या निमित्ताने आहे. पुण्याचाही आहे आणि मुक्ता टिळक यांच्या परिभाषेतला ब्राम्हण सुद्धा आहे. आऱक्षणा मुळे ब्राह्मण युवकाना भारतात संधी मिळत नाही – मग ते परदेशी जातात असे विधान प्रसिद्ध झाले होते. अमेरिकेतील बहुसंख्य ब्राम्हण एनआरआय हे खाजगी नोकरीत आहेत. भारतात खाजगी नोकऱ्यांत आरक्षण नसते – टिळकांचा आरक्षण मुद्दा इथेच फेल जातो.

पुढे बराच दबाव वाढल्यावर त्यांनी असे जाहीर केले की, त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. आपण त्यावर भाष्य करू – जे विधान त्यांनी अधिकृत स्वीकृत केले आहे.

ब्राम्हण तरुणांना भारतात संधी कमी असल्याने ते परदेशी जातात – असे आपले विधान मुक्ता टिळक यांनी मान्य केलेले आहे. सध्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे! मुद्दा वेगळा आहे – भारतात संधी कमी आहेत काय? अमेरिकेत जाणे म्हणजे देशोधडीला लागणे आहे काय? सुखवाद, अधिक पगार – अधिक सोयी सुविधा यासाठी शिक्षित लोक अमेरिकेत अथवा युरोपात जातात. त्यात फक्त ब्राम्हण असतात हे घोर अज्ञान आहे. जातीय टेम्भा सुद्धा आहे.

अमेरिकेचा जन्म गेल्या काही शे वर्षातला आहे . तिथे नैसर्गिक रिसोर्सेस अधिक प्रमाणात आहेत . विज्ञान आणि विज्ञान निष्ठा याला भारतापेक्षा अधिक प्राधान्य आहे (आदर्श नाही अधिक ) म्हणून तो देश अधिक श्रीमंत आहे . त्याकडे शिक्षित लोकांचा ओढा आहे . तो अधिक पैसा अधिक व्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्त देश म्हणून…!

अमेरिकेत जाणारे लोक ब्राह्मण असतात ही अंधश्रद्धा ब्राम्हण संघाने बाळगायला हरकत नाही! त्यांसाठी तो एक अभिमानाचा विषय असू शकेल! भारतात संधी कमी नाहीत – भारत संधीने गजबजलेला देश आहे.

परदेशात जाण्याचे कारण मुख्यतः: चंगळवाद आहे. आणि ती एक चांगली गोष्ट आहे. मी स्वतः: चंगळ्वादीच आहे. सुखवादी आहे. त्यामुळे माझ्या भारत प्रेमात तसूभर सुद्धा फरक पडत नाही. मस्त पैसे मिळवावेत – सुखात राहावे – ही आकांक्षा चूक नाही. योग्यच आहे. आणि अमेरिकेत येणारे सर्वजातीय भारतीय त्याच भावनेने इथे आलेले आहेत.

… … …

– डॉ अभिराम दीक्षित
क्लिव्हलंड, यूएसए

ह्या दोन्ही पोस्ट्स समोर ठेवल्या नंतर वेगळं बोलण्यासारखं फारसं काही रहात नाही…!

एकंदरीत – आपण सर्वांनी काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत.

पहिली ही की आरक्षण हे खाजगी क्षेत्रात नाही. त्यामुळे त्यातील नोकऱ्यांच्या दुष्काळामुळे कुणी बाहेर जात असेल तर तो मोठा गैरसमज आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या भारतीयांचा आकडा निश्चितच मोठा आहे. परंतु त्याचा आरक्षणाशी संबंध नाही – भारतात वर्ल्ड क्लास शिक्षण संस्था कमी आहेत, बदलत्या जगाला साजेश्या स्किल्स तयार होतील असं शिक्षण मिळण्याची सोया कमी आहे – म्हणून परदेशी जावं लागत. आणि सर्वात महत्वाचं – आरक्षणामुळे “अन्याय” होतो असं खुल्या वर्गातील लोकांना वाटतं – त्यांनी आरक्षणाचा हेतू, आरक्षणाचे लाभार्थी घटक, लाभार्थ्यांची संख्या – ह्या सर्वांची पडताळणी करून आपली मतं परत एकदा चाचपडून पहायला हवीत.

जाताजाता परत एकदा नमूद करावंसं वाटतं – एका राजकारणी व्यक्तीची मतं किती गांभीर्याने घ्यायची – हे समजून घेण्याची प्रगल्भता सर्वांमध्ये येणं गरजेचं आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved

Exit mobile version