आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
टाटा परिवाराचं नाव प्रत्येक भारतीय हा नेहमीच आदराने घेतो. देशावर कोणतंही संकट आलं तरीही टाटा परिवारातील सदस्य हे नेहमीच मदतीसाठी पुढे येतात असा आपला इतिहास सांगतो.
नैसर्गिक आपत्ती जसं की पूर, भूकंप किंवा कोरोना सारखी जागतिक महामारी असो टाटा उद्योग समूहाने नेहमीच सढळ हाताने मदत केली आहे. देशाला मदत करण्याची टाटा परिवाराची ही परंपरा १०० वर्ष जुनी आहे हे एका उदाहरणातून लक्षात येईल.
जमशेदजी टाटा यांचे थोरले सुपुत्र दोराबजी टाटा हे टाटा स्टीलचा कारभार बघत होते. दोराबजी टाटा हे उद्योगात तर निपुण होतेच, पण त्याशिवाय ते खेळाचे सुद्धा चाहते होते. पुण्यातील ‘डेक्कन जिमखाना’चे ते पहिले प्रेसिडेंट होते.
जमशेदजी टाटा यांच्या निधनानंतर १९०७ मध्ये सुरू केलेल्या ‘टाटा स्टील’ची धुरा दोराबजी यांच्यावर येऊन ठेपली होती. तरीही त्यांनी क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. १९२० मध्ये होऊ घातलेल्या ऑलम्पिक स्पर्धांच्या अनुषंगाने भारतातील पहिल्या ‘अथेलेटिक्स मीट’चं आयोजन दोराबजी टाटा यांनी करायचं ठरवलं.
===
हे ही वाचा – शब्दांनी नव्हे तर कृतीतून अपमानाची परतफेड कशी करावी हे सांगणारी टाटांची ही कथा
===
१९१९ मध्ये आयोजित केलेल्या या ‘अथेलेटिक्स मीट’मध्ये देश भरातील क्रीडापटू सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. ६ धावपटू हे ऑलम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत या निष्कर्षावर या समितीचं एकमत झालं. विशेष बाब म्हणजे हे सहाच्या सहा खेळाडू शेतकरी कुटुंबातील होते. दोराबजी टाटा आणि समितीने त्या सहा खेळाडूंना १९२० मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला.
भारतातून खेळाडूंना बाहेर पाठवण्याची ती पहिलीच वेळ असल्याने समितीला राज्यपालांची परवानगी घेणं बंधनकारक होतं.
दोराबजी टाटा यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही परवानगी आणली आणि तेव्हा ‘भारतीय ऑलम्पिक कमिटी’ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळाडूंना आर्थिक सहकार्य करणं, प्रोत्साहन देणं आणि त्यांचं मूल्यमापन करणं हे या कमिटीचं काम असेल हे ठरवण्यात आलं.
१८९६ मध्ये सर्वप्रथम आयोजित करण्यात आलेल्या आणि जगात प्रतिष्ठेची असलेल्या ऑलम्पिक खेळात सहभागी होण्यासाठी भारतीय क्रीडापटू तयार व्हायला तेव्हापासून सुरुवात झाली होती.
भारतीय खेळाडूंमध्ये प्रतिभा आहे, त्यांना फक्त संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे हे दोराबजी टाटा यांच्या लक्षात आलं होतं. पण, त्यापुढे अजून एक आव्हान उभं होतं.
‘अथेलटिक्स मीट’ने पात्र ठरवलेल्या सहा खेळाडूंची ऑलम्पिक खेळासाठी दुसऱ्या देशात जाता येईल अशी आर्थिक परिस्थिती नव्हती. १९२० च्या त्या काळात प्रत्येक खेळाडूला ३५,००० रुपये स्वतःला खर्च करणं अपेक्षित होतं. तत्कालीन भारत सरकारकडून खेळाडूंना पूर्ण आर्थिक मदत होण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद तेव्हा अस्तित्वात नव्हती.
===
हे ही वाचा – आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं? हे रतन टाटांच्या या गोष्टी वाचून समजतं
===
डेक्कन जिमखाना, पुणेचे प्रेसिडेंट असलेल्या दोराबजी टाटा यांनी वर्तमानपत्रात जाहिरात करून या सहा खेळाडूंना ऑलम्पिकला पाठवण्यासाठी पैसे गोळा करायचं ठरवलं.
सरकारी अनुदानातून प्रत्येक खेळाडूला सहा हजार रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. या सर्व प्रयत्नातून केवळ तीन खेळाडूंचा खर्च भरून निघत होता. त्यावेळी दोराबजी टाटा पुढे आले आणि त्यांनी बाकी ३ खेळाडूंना आर्थिक मदत केली. त्यांचं अँटवर्प ऑलम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आशिया खंडातून ऑलम्पिकला खेळाडू पाठवू शकणारा भारत हा एकमेव देश होता.
भारताने ऑलम्पिकमध्ये पाठवलेले हे सहा खेळाडू तेव्हा पदक घेऊन येऊ शकले नाहीत. पण, त्यांनी भारतातील इतर खेळाडूंच्या मनात एक आशा निर्माण केली होती हे नक्की. त्यानंतर ‘भारतीय ऑलम्पिक कमिटी’ ही दरवर्षी होणाऱ्या स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करायची आणि त्यांच्या प्रवासाची व्यवस्था बघायची.
१९२८ मध्ये अँमस्टरडॅम येथे खेळवण्यात आलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूने पहिलं सुवर्ण पदक कमावलं. भारतीय हॉकीचे स्टार खेळाडू आणि कर्णधार ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर सलग सहा वर्ष भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदकावर आपली मक्तेदारी सिद्ध केली होती.
दोराबजी टाटा यांच्या १९१९ मध्ये घेतलेल्या मेहनतीचं फळ देशाला दहा वर्षांनी बघायला मिळत होतं.
आजपर्यंत भारताने ऑलम्पिकमध्ये एकूण २८ पदकं जिंकली आहेत. यामध्ये ९ सुवर्ण पदकं, ७ रौप्यपदकं तर १२ कांस्यपदकं यांचा समावेश आहे.
दोराबजी टाटा यांच्या क्रीडा क्षेत्रातील इतर योगदानाबद्दल ‘ड्रीम ऑफ अ बिलियन’ या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. नलिन मेहता आणि बोरिया मुझुमदार यांनी संयुक्तपणे हे पुस्तक लिहिलं होतं.
मुंबईत जन्म झालेल्या दोराबजी टाटा यांचं शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून झालं होतं. इंग्लंडमध्ये क्रीडा क्षेत्राला देण्यात येणारं महत्त्व दोराबजी टाटा यांनी बघितलं होतं. भारतात परत आल्यानंतर दोराबजी यांनी क्रीडा क्षेत्राबद्दलची भारत सरकार आणि लोकांची मानसिकता बदलण्याचा नेहमीच यशस्वी प्रयत्न केला.
दोराबजी टाटा यांच्या या योगदानामुळे त्यांना इंडियन ऑलम्पिक असोसिएशनचं प्रेसिडेंट पद सुद्धा देण्यात आलं होतं. १९२८ पर्यंत हे पद भूषवल्या नंतर दोराबजी टाटा यांनी स्वतःच या पदाचा राजीनामा दिला आणि इतर व्यक्तींना सुद्धा ही संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती.
===
हे ही वाचा – स्वतः एक उद्योजक असूनही दुसऱ्या यशस्वी उद्योजकाचे चरणस्पर्श करणारी आदर्श ‘मूर्ती’
===
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी आंतरशालेय क्रिकेटमध्ये केलेली ६६४ धावांची भागीदारी सर्वांनाच माहीत आहे. १४ वर्षीय सचिन आणि विनोद कांबळी यांचं तेव्हा जगभरातून सार्थ कौतुक झालं होतं. १९८६ मध्ये ही आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय दोराबजी टाटा यांनी घेतला होता.
दोराबजी टाटा आणि रतन टाटांसारखी व्यक्तिमत्त्व ही आपला उद्योग सांभाळून देशाच्या प्रगतीसाठी जे प्रयत्न करतात त्यातून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कंपनी, व्यक्तीने शिकण्यासारखं आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.