' “आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं!”, वाचा रायबाचं पुढे काय झालं? – InMarathi

“आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं!”, वाचा रायबाचं पुढे काय झालं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं”… सुभेदार तानाजी मालुसरेंनी दिलेली ही साद आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात घुमतीय. ‘लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’ या एकाच ध्येयाने उदयभानशी दोन हात करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या कानात लेकाच्या लग्नाची सनई वाजत असणार यात शंका नाही, मात्र कोंढाण्यावर भगवा फडकवणं या एकाच ध्यासाने पेटून उठलेल्या तानाजींना इतर कशाचीही फिकीर नव्हती.

लाडक्या रायबाच्या विवाहाची उत्साहाने तयारी करणाऱ्या तानाजींना अखेर हा विवाह याची देही याची डोळा पाहता आला नाहीच हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. आपली प्रतिज्ञा खरी करताना गड आला मात्र सिंह गेला.

 

tanaji inmarathi

 

तानाजींचं कतृत्व आजही गायलं जातं, मात्र त्यांचे पुत्र रायबा यांचं इतिहासातील स्थान केवळ त्यांच्या प्रतिज्ञेपुरतंच मर्यादित राहिलं का? वडिलांच्या पश्चात खुद्द शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी रायबांचं लग्न लावलं, मात्र डोक्यावर अक्षता पडल्यानंतर पुढे रायबांचं काय झालं? पराक्रमी पित्याचा हा लेक स्वराज्याच्या कामी आला का? स्वराज्यासाठी लढला असेल, तर त्याचा इतिहास आपल्याला कधीच का सांगितला जात नाही? असे प्रश्न पडल्याशिवाय रहात नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधलीत तर तुम्हाला ठाऊक नसलेला इतिहासाचा एक पैलू हाती लागेल.

लग्न झालं अन्…

नऊ वर्षीय रायबाचं लग्न हा इतिहासातील एक महत्वाचा भाग आहे. रायबाच्या लग्नाची तयारी सोडून मोहिमेवर निघालेल्या तानाजींचा एक आदर्श योद्धाच नव्हे तर आदर्श वडील म्हणूनही उल्लेख केल जातो याचं कारण म्हणजे लहागन्या रायबांना त्यांनी दिलेली शिकवण!

अजाणत्या वयात वडिलांकडून मिळालेला हा कानमंत्र रायबांनी पुढे तंतोतंत जपला.

तानाजींच्या पश्चात शिवाजी महाराजांनी स्वतः रायबाचं लग्न लावलं. पतीविरहात गुरफटेलल्या सावित्रीनेही उभारी घेत रायबासह छोट्या वधुला आपलंसं केलं. इथपर्यंतचा इतिहास आपल्याला तोंडपाठ आहे.

 

Tanaji feature Inmarathi

 

मात्र इतिहासाचे यापुढचे पान अधिक तेजस्वी आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही.

लग्नानंतरही रायबांवर महाराजांचे लक्ष होते. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तानाजींच्या पत्नी सावित्रीनेही मुलाचे शिक्षण निगुतीने पाहिले. वेळोवेळी राजगडावर रायबांची वारी होत होती.

रायबा मोठे होत होते, आणि वडील तानाजींप्रमाणेच शस्त्रविद्येत आपलं कौशल्य सिद्ध करत होते. तरुण वयातील रायबांना पाहताना महाराजांना तानाजींचाच भास होत असे. महाराजांच्या विश्वासातील मात्तबर मावळ्यांनी रायबांना अधिक उत्तम प्रशिक्षण दिलं, घडवलं.

स्वभावाने धाडसी आणि शूर असलेल्या रायबांचे कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांच्यावर पायदळाच्या तुकडीचे सरनौबतपद सोपवले. याकाळी एवढी मोठी जबाबदारी पेलणारे ते सर्वात लहान सेनापती होते.

ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पेलणा-या रायबांना पाहताना महाराजांनी त्यांच्या भविष्यासाठी आणखी काही योजना आखल्या होत्या.

पारगडावर नाव कोरले गेले 

रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पराक्रमी, विश्वासू सेनापतींसह महाराज स्वराज्याच्या दक्षिण मोहिमेवर निघाले. अर्थातच यात रायबा सामील झाले. स्वराज्याची दक्षिण बाजू अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु झाले होते.

मोहिम आटपून परतताना दक्षिणेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा पाहिल्यानंतर महारांना कल्पना सुचली. यातील किमान एक गड स्वराज्याच्या ताब्यात घेत तेथे मावळ्यांचा मुक्काम हलवला तर केवळ स्वराज्याच्या आतील नव्हे तर सीमेबाहेरील शत्रुंनाही रोखण्यात यश मिळेल या दूरदृष्टीने महाराजांनी एका गडाची निवड केली.

 

shivaji maharaj inmarathi

 

कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध तालुका अशी ओळख असलेल्या चंदगडमध्ये दिमाखाने उभा राहिलेला एक किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला. चारही दिशांनी गर्द झाडीत लपलेल्या या किल्ल्याला सुरक्षेसाठी निसर्गाचं वरदान लाभलं होतं.

सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असलेला हा किल्ला स्वराज्यातील इतर किल्ल्यांपासून दूर होता. किंबहूना स्वराज्याच्या नियोजित सीमेपार असलेल्या या किल्ल्याचे यावरूनच १६७४ साली किल्ल्याची डागडुजी पूर्ण झाल्यावर ‘पारगड’ नामकरण करण्यात आले.

 

parghad inmarathi

 

मात्र स्वराज्याच्या टोकाला असलेल्या या किल्ल्याचे प्रतिनिधित्व नेमकं कुणाला देणार? या सर्वांच्याच प्रश्नावर महाराजांनी नाव उच्चारले, ‘रायबा मालुसरे’! तरुण वयातच रायबांवर आणखी एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली, मात्र रायबांसाठी महाराजांचा शब्द अंतिम होता.

ज्या दिवशी पारगडची किल्लेदारी रायबांच्या हाती सोपवली त्यावेळी महाराजांनी त्यांना आणखी एक आज्ञा केली, ” जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत पारगडचं रक्षण करा, हा किल्ला अभेद्य ठेवा, त्याची सेवा करा ”. महाराजांचे हे शब्द रायबांसाठी गुरुमंत्र होता. त्याक्षणापासून पारगडावर रायबांचे नाव कोरले गेले.

 

shivaji maharaj 1 inmarathi

 

उमरजहून मालुसरेचं संपूर्ण परिवार पारगडावर स्थलांतरित झाला. त्यांच्यासह तानाजी मालुसरेंचे निष्ठावंत असलेले शेलार मामा, शिंदे, होळकर, पेठे, कुबल आदी मावळेही कुटुंबासह पारगडावर आले.

स्वराज्य सुरक्षित रहावा यासाठी त्याच्या सीमेबाहेरील असलेल्या शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी रायबांनी आखलेली रणनिती, मावळ्यांची बसलेली घडी पुढील अनेक वर्ष भक्कम राहिली.

मोहिमांवर निघालेले महाराजही अनेकदा पारगडावर वास्तव्य करत रायबांचे काम पहायचे, त्यांचे भरभरून कौतुक करायचे, मात्र दरवेळी ‘हा पारगड अभेद्य राखा’ असा सल्ला द्यायचे, याचे कारण म्हणजे सीमांच्या सुरक्षेसाठी पारगडचे असलेले महत्व!

रायबांच्या प्रयत्नांमुळे केवळ पारगडचं नव्हे तर स्वराज्य आणि त्याच्या सीमाही कायम मजबूत राहिल्या. सीमेवर आलेल्या शत्रूंना आधी पारगड पार करावा लागेल, जो त्यांना शक्य नाही या विचारांनी रायबांनी सुरक्षायंत्रणांचे नियोजन केले होते. स्वराज्यासाठी त्यांचे हे योगदान अत्यंत महत्वाचे ठरले.

सुरक्षेच्या विस्ताराने कालांतराने शिवखान्यातील तोफखान्याचे प्रमुख, घोडदळ पथकप्रमुख या पदांवरील अनेक सेनापतींचाही पारगडावर मुक्काम होता.

महाराजांच्या मृत्युनंतरही रायबांनी पारगड जपला. एक, दोन नव्हे तर तब्बल साठ वर्ष रायबा पारगडावर राहून स्वराज्याच्या सीमांवर दक्ष होते.

आपल्या या कर्मभुमीतच रायबांनी अखेरचा श्वास घेतला, मात्र त्यापुर्वी आपल्या मुलांच्या हाती पारगडचे व्यवस्थापन सोपविले होते. रायबांनंतर मुंबाजी, येसाजी, अप्पाजी अशा मालुसरेंच्या अनेक वंशजांनी पारगड्याचे अधिपत्य राखले.

 

pargadh fort inmaarathi

 

आजही मालुसरेंची एक पिढी पारगडावर मुक्कामी आहे. त्यांच्यासह शेलार मामांचे वंशज तसेच अनेक मावळ्यांच्या वंशजांनीही पारगडावर ये-जा असते.

साडेतीनशेंहून अधिक वर्ष सरली, अनेक हल्ले पचवून स्वराज्य बळकट राहिले, स्वराज्याची नवी पिढी आज हे स्वातंत्र्य अनुभवत आहे, मात्र राजांनी दिलेला सल्ला रायबांनी त्यांच्या मृत्युनंतरही जपला.

आजपर्यंत पारगडावर कोणतंही आक्रमण टिकलं नाही, कोणत्याही परकीय शत्रूंना पारगड जिंकता आला नाही, परिणामी स्वराज्याचा अभेद्य किल्ला अशी पारगडने ओळख मिळवली. चंद्र, सुर्य असेपर्यंत पारगड अभेद्य रहावा ही महाराजांची साद आणि या हाकेला उत्तर देणारे रायबा यांचा इतिहास पारगडावर आजही सुवर्णाक्षरांनी लिहाला आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?