आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – ईशान पांडुरंग घमंडे
===
झी मराठी, कलर्स मराठी अशा वेगवेगळ्या वाहिन्यांवर अमर ओक, वरद कथापूरकर असे प्रसिद्ध बासरीवादक आपण बऱ्याचदा पाहतो. वैयक्तिक बासरीवादनाचे विशेष कार्यक्रम सुद्धा टीव्हीवर अनेकदा होतात. मात्र या बासरीवादनाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर कुणी मिळवून दिलं असेल, तर ते पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी!
नाजूक फुंकरीमधून अवघ्या रसिकवर्गाला मोहित करणारे हरिप्रसादजी हे पैलवान गडी झाले असते, असं जर तुम्हाला सांगितलं तर?
हरिप्रसादजींचं बालपण
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म १ जुलै १९३८ रोजी उत्तर प्रदेशातील सध्या अलाहाबाद नावावर ओळखल्या जाणाऱ्या शहरात झाला. त्यांचं बालपण इतरांसारखंच अंगाईगीत ऐकण्यात गेलं. त्यांना शांत झोप लागावी म्हणून आई अंगाई गीत गात असायची.
या अंगाई गीतांची जादू मात्र निराळीच निघाली. त्याचवेळी हरिप्रसाद यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. झाले असं म्हणण्यापेक्षा आपोआप होत गेले, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. दुर्दैवाने या मुलाची माउली त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षीच स्वर्गवासी झाली. डोक्यावरील एक छत्र तर हरपलं, पण तिने दिलेली देणगी मात्र त्यांच्यासोबत कायम राहिली, अगदी आजतागायत…
===
हे ही वाचा – लता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं
===
लपूनछापून संगीत शिकले
हरिप्रसाद चौरसिया यांनी संगीत शिकावं अशी त्यांच्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती. उलट वडील त्यांना नियमितपणे आखाड्यात घेऊन जात असत. त्यांनी कुस्ती शिकावी आणि उत्तम पैलवान व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
हरिप्रसाद वडिलांसोबत आखाड्यात तर जात असत, मात्र त्यांच्या आणि नियतीच्या मनात काही निराळंच होतं. एकीकडे आखाड्यात सराव सुरु असताना, दुसरीकडे संगीतात गती मिळावी यासाठी हरिप्रसादजी प्रयत्न करत होते.
असं असलं, तरी त्या सरावाचा फायदा झाला असल्याचं पंडितजी नेहमी म्हणतात. आखाड्यातील सरावातून प्राप्त झालेली एकाग्रता, चुणूक आणि श्वासोच्छवासावरील पकड यामुळे आज बासरी वाजवणं सोपं जात असल्याचं चौरसिया नेहमी म्हणतात.
संगीत हा श्रीमंतांचा थाट
हरिप्रसादजी मंदिरात भजन गात असत. नेहमी सगळ्यांसोबत भजन गाणाऱ्या या मुलाला पुजाऱ्यांनी एक दिवस अचानक एकट्याने गाण्यास सांगितलं. त्यांचं भजन ऐकताना सगळेच मंत्रमुग्ध झाले.
दुसऱ्याच दिवशी, हा सगळा अहवाल त्यांच्या वडिलांपर्यंत पोचला. त्यांचा मुलगा उत्तम गात असून, त्याचं भविष्य संगीत क्षेत्रात उज्वल असेल, असं हरी यांच्या वडिलांना सांगण्यात आलं.
संगीत हा श्रीमंती थाट असून, हे क्षेत्र सामन्यांसाठी नाही असा त्यांच्या वडिलांचा ठाम विश्वास होता. आखाड्यातच आपल्या मुलाचं भविष्य आहे, या मतावर ते ठाम होते.
===
हे ही वाचा – स्वतः गायलेल्या गाण्यांचीसुद्धा रॉयल्टी न घेणारा नव्या पिढीतील ‘फकीर गवैया’!
===
वडिलांचे डाव कामी आले
हरिप्रसाद यांचे वडील चांगले कुस्तीपटू होते. मुलाला सुद्धा कुस्तीपटू करायचं ठरवलं होतं त्यामुळे नवे डाव शिकवणं साहजिक होतं. वडिलांचा विरोध करणारा तो लहानगा मुलगा, त्यांच्ग्या म्हणण्याखातर कुस्तीचे हे डाव शिकत गेला. मात्र यामुळे त्यांची फुफ्फुसं अधिक सुदृढ झाली.
फुफ्फुसांची क्षमता वाढणं, त्यांना बासरीवादनात फारच फायदेशीर ठरलं, हे वेगळं सांगायची गरज नाही. उत्तम बासरी वाजवायची असेल, तर श्वासांचा मेळ साधला जाणं गरजेचं असतं, आणि ते हरिप्रसाद यांना शक्य झालं, याचं एक कारण म्हणजे कुस्तीचा सराव…
म्हणजेच नकळतपणे हरिप्रसाद यांच्या वडिलांनी सुद्धा हा बासरीवादक जादूगार घडवण्यात वाटा उचलला आहे.
बालपणापासून संगीत शिक्षण
तरुण वयात असतानाच, अलाहाबादमधील पंडित राजा राम यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. संगीतक्षेत्रात निपुण होण्याची इच्छा निर्माण होऊ लागली. त्यांचा प्रवास स्वप्नांच्या दिशेकडे सुरु झाला.
अर्थात, त्यांचं सांगीतिक आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून गेलं, ते वाराणसीचे पंडित भोला नाथ यांच्या गायनामुळे. खरं तर तोवर पंडित चौरसिया यांचा संगीतक्षेत्रातील प्रवास सुरू झाला होता. त्यांचं पहिलं सादरीकरण होऊन, एक वर्षाचा काळ लोटला होता. मात्र, पंडित भोलानाथ यांच्या गायनामुळे आयुष्याला नवी दिशा मिळाली, असं हरिप्रसादजी आवर्जून सांगतात.
त्यांच्या आयुष्याला नुसतीच कलाटणी मिळाली नाही, तर आज सर्वश्रेष्ठ बासरीवादक म्हणून त्यांचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं.
===
हे ही वाचा – बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!
===
शिव-हरीची जोडी खास
बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया अनेक संगीतप्रेमींचे लाडके आहेत, यात शंकाच नाही. त्याच बरोबरीने संतूरवादक शिवकुमार शर्मा यांच्यासह त्यांची खास जोडी जमली.
बॉलिवूडमधील काही अजरामर संगीत कलाकृती या दोघांच्या युतीतून निर्माण झाल्या. ऐंशीच्या दशकातील सिलसिला आणि चांदनी असोत, किंवा नव्वदीतील, लम्हे आणि डर; शिव-हरीची जोडी आगळी जादू करून गेली. त्यांच्या संगीताने रसिकांना भुरळ घातली.
त्यांच्या कार्यक्रमांना दर्दी रसिक नेहमीच गर्दी करत. तो संगीत सोहळा म्हणजे कानांची तृष्णा भागवण्याची एक सुवर्णसंधीच! आताशा वयोमानाने ही जोडी फारशी एकत्र दिसत नाही, मात्र अशी संगीत मेजवानी पुन्हा अनुभवण्याची इच्छा आजही रसिकांना आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.