Site icon InMarathi

भगवान धन्वंतरींना आयुर्वेदाचे जनक का मानले जातात? जाणून घ्या

dhanvantari final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण पाहतो, खेडे असो की गाव किंवा शहर एक तरी धन्वंतरी क्लिनिक असतेच असते. मग ते क्लिनिक आयुर्वेदिक औषधालय असो की आलोपथी दवाखाना. अथवा होमिओपॅथी क्लिनिक.

बर्‍याच डॉक्टर लोकांच्या टेबलवर हातात कुंभ, शंख, चक्र आणि ग्रंथ असलेली एक तेजस्वी, हसतमुख मुर्ती उभी असते. तेव्हा सहजच आपल्या मनात हा विचार येतो कोणाची असेल ही मुर्ती?

 

 

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना भगवान धन्वंतरी हे नाव ऐकून माहिती असेल. आपण दिवाळीमध्ये धनत्रयोदशी दिवशी भगवान धन्वंतरी यांचे पूजन करतो. हे ही तुम्हाला माहितीच असेल पण कोण आहेत हे धन्वंतरी?

वैद्यकशास्त्राची कोणतीही शाखा असो तिथे हे पूजनीय का आहेत? असे प्रश्न नक्की तुम्हाला पडत असतील. या लेखातून आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेवू.

आयुर्वेदाची देवता धन्वंतरी कोण होते?

आयुर्वेदाची देवता म्हणजेच धन्वंतरी हे भगवान विष्णूंचा १२ वा अवतार समजला जातो. धन्वंतरीची उत्पत्ती ही समुद्रमंथनाच्या वेळेस झाली असा संदर्भ हिंदू पुराण कथांमध्ये सांगितला जातो. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश घेऊन धन्वंतरी बाहेर पडले होते तेव्हा देव आणि असुरांमध्ये या कलशावरून संघर्ष पेटला होता.

 

हे ही वाचा – छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

धन्वंतरी हे चारभुजा धारी होते. त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ/ जळू , एका हातामध्ये औषधी कलश (अमृत कलश), एका हातामध्ये जडी बुटी आणि एका हातामध्ये शंख होता असे मानले जाते. या सार्‍या गोष्टींचा वापर करून मनुष्यजातीला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी उपचार केले जातात असं समजले जाते.

दरम्यान भारतामध्ये वेदांची निर्मिती झाली असून आयुर्वेद हा त्यामधील पाचवा महत्त्वाचा वेद आहे. ज्याची देवता म्हणून धन्वंतरी यांची नेमणूक करण्यात आली होती.

असे मानले जाते की ज्या व्यक्तीने त्याच्या हयातभर आयुर्वेदाचा पुरस्कार केला असेल त्याला धन्वंतरी म्हंटले जाते. भारतीय धर्मशास्त्रानुसार चार युगे आहेत आणि या युगांमध्ये आजवर तीन धन्वंतरी होवून गेले.

 

 

समुद्र मंथनावेळी उत्पन्न झालेले प्रथम धन्वंतरी , धन्व यांचा पुत्र धन्वंतरी द्वितीय आणि काशीराज दिवोदास हे तृतीय धन्वंतरी. वैदिक काळात जे महत्व अश्विनीकुमार यांना होते तेच महत्व नंतर धन्वंतरीना मिळाले होते.

दिवोदास यांनी काशी मध्ये पहिले शल्यचिकित्सा करणारे महाविद्यालय बनवले होते,ज्याचे आचार्य सुश्रुत हे प्रधानाचार्य होते. त्यांनी लिहिलेला ‘सुश्रुत संहिता’ हा ग्रंथ शल्यचिकित्सेचा आदिग्रंथ मानला जातो. काशी नरेश दिवोदास हे धन्वंतरींच्या वंशातले मानले जातात.

चरक ,सुश्रुत हे त्यांचे शिष्य होते असे मानले जाते. दिवोदास यांनी आयुर्वेदाचे आठ भागात विभाजन केले होते.त्यातील चिकित्सातत्ववीजनमा, चिकित्सादर्शन यांचे लेखन केले आहे. अशी ही एक कथा आहे की तिसरे धन्वंतरी हे राजा विक्रमादित्य यांच्या नवरत्नांपैकी एक होते. त्यांनी ‘ धन्वंतरी निघंटु’ या ग्रंथाची रचना केली. जे आयुर्वेदावरील सर्वोत्तम पुस्तक म्हणून मानले जाते. यात ३७३ प्रकारच्या औषधी वनस्पतींचा व रोगांवरील उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे.

 

 

पुराणातील आणखी एका कथेनुसार ब्रह्मवैवर्त पुराणात असा उल्लेख आहे की धन्वंतरीने आयुर्वेदाचे धडे सूर्यदेवाकडे गिरवले होते. त्यानंतर त्यांनी सृष्टीला आयुर्वेदातील विज्ञानाची ओळख करून दिली होती.

सगळ्यात प्रसिद्ध कथा आहे ती समुद्रमंथनाची, ज्यामधे असे मानले गेले की या मंथनातून धन्वंतरी हातात अमृत कलश घेवून समुद्रातून उत्पन्न झाले. पण त्यांच्या हातातील तो अमृत कलश पाहून असुरांच्या मनात मोह उत्पन्न झाला आणि त्यांनी तो कलश धन्वंतरींच्या हातातून हिसकावून घेतला.

या झटापटीत अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले जिथे आता कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मंथंनानंतर धन्वंतरी यांची देवांचे चिकित्सक म्हणून नेमणूक करण्यात आली व त्यांना आयुर्वेदाची देवता मानण्यात आले.

गरुड पुराण , मार्कंडेय पुराण , ब्रह्म पुराण , तसेच चरक संहिता, धन्वंतरी संहिता , कश्यप संहिता , सुश्रुत संहिता , अष्टांगहृदय अशा अनेक ग्रंथांमध्ये धन्वंतरीचा उल्लेख आहे. श्रीविष्णुंच्या आशीर्वादाने उत्पन्न झालेल्या धन्वंतरीनी आयुर्विज्ञानाच्या प्रसारासाठी महत्तम कार्य केलेले आहे.

 

 

भारतामध्ये गुजरात , केरळ ,तमिळनाडू आदि राज्यांमध्ये धन्वंतरीचे मंदिर आहे. धन्वंतरी देवता असोत,वैज्ञानिक असोत की, अलौकिक सामर्थ्य असलेला महामानव एवढे नक्की आहे की समस्त मानवजातीला आधीव्याधी मुक्त करण्याचा आणि मानवाच्या निरामय आरोग्य जगण्याचा मार्ग दाखवून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याचे रक्षण करण्यासाठी धन्वंतरी यांनी सांगितलेल्या आरोग्य नियमांचे पालन करून आपण आपले आरोग्य निरामय करूया.

 

हे ही वाचा – हा घरगुती आयुर्वेदिक काढा तुम्हाला ठेवेल कोणत्याही रोगापासून दूर!!

ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः।

सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम॥
कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम।
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम॥

ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप
श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥

धन्वंतरींचे हे स्तोत्र त्यांचे आयुर्वेदातील करी आणि महत्व विशद करते. आज अॅनटिबायोटिक्स मुळे  होणार्‍या साईडएफेक्टमुळे देखील अनेक नवे रोग जन्माला येत आहेत, अशावेळी आपल्या परंपरागत आयुर्वेदाची कास धरत निरामय जगण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो. हा लेख तुम्हाला कसं वाटला ते कॉमेंटबॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि धन्वंतरीचे स्मरण करून आरोग्यपूर्ण जगण्याचा नक्की विचार करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version