Site icon InMarathi

एकमेव हिंदी सिनेमा बघण्याआधी गांधीजींनी डॉक्टरांची परवानगी का घेतली होती, ते वाचा

mahatma gandhi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मनोरंजनाची गरज असते. काही व्यक्तींना ते मनोरंजन गाणे ऐकण्यातून मिळतं, तर काहींचं सिनेमा किंवा एखादा खेळ बघून मनोरंजन होतं.

क्रिकेट खेळाडू आणि राजकारणी लोक सिनेमा बघतात की नाही? याबद्दल आपल्या मनात नेहमीच कुतूहल असतं. राजकीय मंडळी जेव्हा एखाद्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावतात तेव्हा आपण त्यांचा सिनेमाबद्दलचा संवाद लक्ष देऊन ऐकत असतो.

“भारताच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार महात्मा गांधी यांनी कोणता सिनेमा बघितला आहे का?” हे पण एक कुतूहल काही वर्षांपूर्वी लोकांना होतं.

ज्या बापूंची जीवनशैली, शिकवणीबद्दल असंख्य सिनेमे तयार करण्यात आले, साहित्य लिहिण्यात आलं, “बंदे मे था दम” सारखं समर्पक गाणं तयार करण्यात आलं त्या बापूंनी यापैकी किंवा कोणतीही भारतीय कलाकृती बघितली की नाही? ही उत्सुकता प्रत्येक कलाकाराला असणं सहाजिक आहे.

 

 

मोहनदास करमचंद गांधी यांनी १९४४ मध्ये मायकेल कुर्तीझ यांचा ‘मिशन टू मॉस्को’ हा हॉलीवूडचा चित्रपट सर्वप्रथम बघितल्याची नोंद आहे.

भारतीय सिनेमा त्यावेळी कात टाकू बघत होता. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’पासून सुरू झालेला प्रवास आता चलतचित्र, बोलपटापर्यंत मजल मारण्यास सज्ज झाला होता.

१९४३ मध्ये प्रदर्शित झालेला विजय भट्ट दिग्दर्शित ‘राम राज्य’बद्दल तेव्हा खूप चर्चा सुरू होती. देशातील जनतेला ‘राम राज्य’ हा सिनेमा प्रचंड आवडला होता. अमेरिकेत प्रीमियर झालेला हा पहिला भारतीय सिनेमा होता.

 

गांधींनी सिनेमा पाहिला कारण…

प्रेम आदिब आणि शोभना समर्थ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा १९४३ चा बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये तिसऱ्या क्रमांकावरचा सिनेमा होता. ऋषी वाल्मिकी यांच्या ‘रामायण’वर बेतलेल्या या सिनेमाची पटकथा कानु देसाई यांनी लिहिली होती. १३२ मिनिटांच्या या सिनेमाचं संगीत शंकरराव व्यास यांनी दिलं होतं.

महात्मा गांधींपर्यंत सुद्धा या सिनेमाची महती गेली होती. त्यांना सिनेमा पाहण्याची इच्छा झाली, पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून ते केवळ ४० मिनिटं देऊ शकणार होते.

महात्मा गांधी यांनी आपली ही इच्छा दिगदर्शक विजय भट यांच्याकडे व्यक्त करून दाखवली. दिगदर्शक आणि ‘राम राज्य’च्या टीम साठी ही फार आनंदाची बाब होती. गुजरातच्या पलितानाचे रहिवासी असलेले विजय भट हे आजचे सुप्रसिद्ध दिगदर्शक विक्रम भट यांचे ते आजोबा होते.

 

 

विजय भट यांनी बापूंच्या वेळेचा मान राखत जुहू येथे २ जून १९४४ रोजी बापूंसाठी ‘राम राज्य’च्या ‘स्पेशल स्क्रिनिंग’चं आयोजन केलं. बापू तिथे आले, त्यांनी ‘राम राज्य’ हा पहिला भारतीय सिनेमा टॉकीजमध्ये बघितला आणि तो एक ऐतिहासिक सोहळा झाला. ४० मिनिटांसाठी टॉकीज मध्ये आलेले महात्मा गांधी हे ९० मिनिटं थांबले होते.

“सिनेमा गृहातून बाहेर पडतांना बापू खूप आनंदात होते, टॉकीजमधून बाहेर पडतांना त्यांनी माझी पाठ थोपटली” असं विजय भट यांनी प्रेस सोबत बोलतांना सांगितलं होतं.

या सिनेमाचं मार्केटिंग पुढे, ‘महात्मा गांधींनी पाहिलेला पहिला हिंदी सिनेमा’ या धर्तीवर करण्यात आलं होतं. 

कोण होते विजय भट?

विजय भट हे अत्यंत गरीब परिवारात जन्मलेले होते. त्यांचे वडील हे भावनगर येथे ‘रेल्वे गार्ड’ होते. आपल्या सिनेमाच्या आवडीसाठी त्यांनी आपला भाऊ शंकरभाई यांच्यासोबत १९२० मध्ये मुंबई गाठली होती. मुंबईच्या सेंट झेवीयर्स कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कला क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं होतं.

 

 

विजय भट यांनी ‘राम राज्य’ नंतर कधीच मागे वळून बघितलं नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ‘प्रकाश पिक्चर्स’ ही स्वतःची सिनेमा कंपनी सुरू केली. ही कंपनी त्यांनी नंतर आपला भाऊ शंकर याला विकली. कोणताही नवीन सिनेमा तयार करतांना विजय भट हे त्यातील कलात्मक बाजू बघायचे तर शंकर हे व्यावसायिक बाजू बघायचे.

तीन भाषांमध्ये मिळून त्यांनी एकूण ६४ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. १९४० च्या दशकात पुरणोत्तर कथांवर सिनेमा तयार केल्यानंतर १९५४ मध्ये त्यांनी ‘बैजू वावरा’ हा भारतीय संगीतावर आधारित सिनेमा तयार केला. रशियामध्ये झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिवल साठी ही भारताची पहिली एन्ट्री होती.

गांधींचं सिनेमाविषयी मत

‘राम राज्य’ सिनेमा रिलीज होण्याच्या काही वर्षांपूर्वी जेव्हा महात्मा गांधी यांना सिनेमा, टॉकीजबद्दल मत विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, की “बंद हॉलमध्ये बसून राहणं” हे काही मला कधीच जमणार नाही असं सांगितलं होतं.

त्यावेळच्या सिने अभिनेत्रीचे पेपरमधील फोटो बघून ते व्यथित व्हायचे. “सिनेमा थिएटरपेक्षा खादी विणण्याचं थिएटर काढणं मला आवडेल” अशी प्रतिक्रिया सुद्धा बापूंनी एका वर्तमानपत्राला दिली होती.

 

 

‘राम राज्य’ बघायला जातांना महात्मा गांधी यांचं वय ७४ वर्षांचं होतं. तब्येत काहीशी नाजूक होती. टॉकीजमध्ये जाऊन सिनेमा बघण्यापूर्वी त्यांनी आपल्या डॉक्टरचा सुद्धा सल्ला घेतला होता. डॉक्टरने परवानगी दिल्यानंतर मगच बापूंनी या आयोजनास अनुमती दिली होती.

महात्मा गांधींच्या सिनेमा बघण्याने परिस स्पर्श झाल्याप्रमाणे भट परिवाराचं पुढील करिअर बॉलीवूडमध्ये चमकत गेलं. महेश भट हे सुद्धा विजय भट यांच्याच घराण्यातील आहेत. विजय भट यांचा वारसा आजही सुरू आहे आणि अविरत सुरू राहील हे नक्की.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version