Site icon InMarathi

दुसऱ्याचा ‘सामना’ बाळासाहेबांनी या पद्धतीने जिंकला होता…!

balasaheb thackrey inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बाळासाहेब ठाकरे हे नाव महाराष्ट्रालाच काय देशाला पण परिचित आहे. आपल्या जहाल आणि परखड वक्तृत्वाने ते ओळखले जातात. मराठी माणसांच्या हक्कांच्या लढ्यासाठी त्यांनी शिवसेना निर्माण केली. शिवसेना म्हणजे बाळ ठाकरे, किंवा बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेना हे समीकरण सगळ्यांनाच माहीत आहे.

संपूर्ण देशात त्यांचा दरारा होता. ते आपली कोणत्याही विषयावरची भूमिका जाहीरपणे व्यक्त करत, मग ते कुणाचीही भीडभाड ठेवत नसत.

 

 

तसं बाळासाहेब ठाकरे हे मनस्वी व्यंगचित्रकार होते. देशातल्या कुठल्याही घटनेवर ते मार्मिक व्यंगचित्र काढत असत. प्रबोधनकार ठाकरेंयासारख्या समाज सुधारकांचे पुत्र म्हणूनही त्यांची ओळख आहे. घरातच त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडू मिळाले होते. घरामध्ये निरनिराळ्या स्वभावांच्या माणसांचा वावर असायचा. त्या सगळ्याचे निरीक्षण बाळासाहेब करायचे. ज्या चर्चा चालायच्या त्या चर्चा ऐकायचे. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

मुंबईमध्ये मराठी माणसाचं खच्चीकरण होत आहे ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणूस त्यांच्याकडे आपल्या मागण्या किंवा तक्रारी घेऊन जाऊ लागला आणि थोड्याच दिवसात लोकांच्या लक्षात आलं की बाळासाहेबांकडे गेल्यावर आपल्याला न्याय मिळतो.

 

हे सगळं जरी होत असलं तरी आपले विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी मार्मिक हे पाक्षिक सुरु केलं. त्यामध्ये त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत. एखाद्या मोठ्या राजकीय घटनेवर छोट्याशा व्यंगचित्रातून योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जायचा.

तरीही बाळासाहेबांना असं वाटत होतं की आपल्या पक्षाचे म्हणजेच शिवसेनेचे एक मुखपत्र असावं म्हणजेच एक वर्तमानपत्र सुरु करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे दररोज दूरवरच्या लोकांपर्यंत आपले विचार पोहोचतील.

त्या दृष्टीने मग शिवसेनेत विचारमंथन सुरू झालं. वर्तमानपत्र तर काढायचं नक्की ठरलं, पण त्याचं नाव काय असावं हे मात्र ठरत नव्हतं. योगेंद्र ठाकूर यांच्या ‘शिवसेना समज-गैरसमज’ या पुस्तकासाठी सुभाष देसाई यांनी याबद्दलची आठवण सांगितली आहे. अनेकांनी वेगवेगळी नावं सुचवून पहिली पण बाळासाहेबांना एकही नाव पसंत पडेना. शेवटी बाळासाहेबांनीच “सामना” हे नाव सुचवलं.

त्याआधी ‘ सामना ‘ नावाचा एक राजकारणावरील चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेलांनी काढला होता, आणि तो खूप गाजला होता.

 

 

कुठलंही दैनिक काढायचं असेल तर त्याची नावनोंदणी करावी लागते. ते नाव पूर्वी कुणी वापरलेलं नसावं. त्या नावाचे हक्क कुणाकडे नसावेत हे पाहिलं जातं आणि जर हे नाव आधी नोंदवलं गेलं असेल तर ते नाव ज्यांनी नोंदवलं आहे त्यांच्या सहमतीने ते नाव वापरता येतं किंवा त्या व्यक्तीकडून ते हक्क घेता येतात.

मग ‘सामना’ची नावनोंदणी करण्यासाठी सुभाष देसाई दिल्लीला वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात गेले. तिकडे त्यांना कळलं की सामानाची नावनोंदणी आधीच झालेली आहे. सामना हे नाव बार्शी-सोलापूर येथे राहणाऱ्या वसंत कानडे यांच्या नावावर आहे.

कानडे हे सोलापूरमधील माढ्याचे. ते एक संपादक पत्रकार होते, आणि त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलं होतं ज्याचं नाव ‘सामना’ असं होतं. त्यांनी हे साप्ताहिक १९७५ साली सुरू केलं होतं. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता तसंच इतर राजकीय नेत्यांबरोबर त्यांची उठबस होती.

आता या कानडे यांना भेटणं गरजेचं होतं. देसाईंनी सोलापुरातील आपल्या शिवसैनिकांना त्यांची माहिती काढायला सांगितली. कुर्डुवाडीतील शिवसेना नेते प्रकाश गोरे, कानडेंना ओळखत होते. त्यांच्या मार्फत देसाई कानडेंना तुळजापुरात भेटले.

तिथे कानडेंना सांगण्यात आलं की तुमच्या साप्ताहिकाचे नाव बाळासाहेबांना त्यांच्या वृत्तपत्रासाठी हवं आहे. त्यावर कानडे म्हणाले की, मला ‘सामना’ हे नाव हस्तांतरीत करायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला बाळासाहेबांना भेटायचे आहे.

 

 

आता कानडे आणि त्यांच्या पत्नीची मुंबईला जायची सोय सोलापुरातल्या शिवसैनिकांनी केली. मुंबईला आल्यावर त्यांना मातोश्रीवर नेण्यात आलं. जिथे ठाकरे कुटुंबियांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.

बाळासाहेबांची भेट घेऊन कानडे समाधानी झाले होते. पण कितीही झालं तरी कानडे यांनी अत्यंत मेहनतीने ‘सामना’ साप्ताहिक सुरू केलं होतं. आता त्याचं हस्तांतरण बाळासाहेबांकडे करताना त्यांच्याही मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या.

नावाचे हस्तांतरण करताना कानडे बाळासाहेबांना म्हणाले की,” मी माझं मूल तुम्हाला देतोय त्याचा नीट सांभाळ करा”. त्यांनी सामना हे नाव बाळासाहेबांकडे हस्तांतरीत केलं, तो दिवस होता १२ ऑगस्ट १९८८.

 

 

बाळासाहेबांनी कानडे यांना विचारलं की या बदल्यात तुम्हाला काही रक्कम हवी आहे का? त्यावेळी कानडे म्हणाले की, या बदल्यात मला एक रुपयाही नकोय. पण मला ‘सामाना’चा सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करायला आवडेल. त्यांची ही मागणी बाळासाहेबांनी ताबडतोब मान्य केली आणि सामना वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती केली.

२३ जानेवारी १९८९ या दिवशी सामना हे वृत्तपत्र शिवसेनेचे मुखपत्र म्हणून पहिल्यांदा प्रकाशित झाले. पहिल्या दिवशी सामानाच्या दीड लाख प्रती काढण्यात आल्या. अशा तऱ्हेने सामना सुरू झाला.

 

 

पहिल्या अंकापासूनच बाळासाहेबांनी ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका जाहीर केली. सुरुवातीला बाळासाहेब आठवड्यातून दोन तीनदा सामनाच्या कार्यालयात जाऊन बसायचे. तिथे बैठका घ्यायचे, सूचना करायचे. सुरुवातीचे काही दिवस सामना जयंत साळगावकर यांच्या कालनिर्णयच्या कार्यालयातूनच प्रिंट व्हायचा.

बाळासाहेब आपली राजकीय भूमिका जाहीरपणे व्यक्त करत असत. अगदी रामजन्मभूमीच्या प्रश्नावर बाळासाहेबांची भूमिका सगळ्यांना माहीत होती. जेंव्हा बाबरी ढाचा पाडला गेला तेंव्हा त्याची जबाबदारी कोणी घेत नव्हते, तो कारसेवकांनी पाडला की कोणी?! अशी संदिग्ध परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव नेते होते, ज्यांनी जाहीरपणे सामनामधून सांगितलं की तो वादग्रस्त ढाचा माझ्या शिवसैनिकांनी पाडला आणि मला त्यांचा अभिमान आहे.

त्यामुळे एखाद्या घटनेवर सामनामधून काय लिहून येतंय यावर सर्वांचे लक्ष राहू लागले. फक्त राजकीय पक्षच नव्हे तर इतर वर्तमानपत्रे देखील सामनामध्ये काय लिहून येतंय याच्यावर लक्ष ठेवायचे. सामना मधल्या बातमीची बातमी इतर वृत्तपत्रात यायची. अगदी आजही सामानाचे अग्रलेख, हेडलाईन्स काय आहे यावर माध्यमांमध्ये उत्सुकता असते.

 

 

पण मधल्या काळात शिवसेना खूप आक्रमक असताना, इतर कोणत्याही वृत्तपत्रात बाळासाहेबांविरुद्ध किंवा शिवसेनेविरोधात काही छापून आलं तर मात्र शिवसैनिक त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात जावून तिथल्या संपादकाला पकडुन चोप द्यायचे. त्यांच्या ऑफिसची तोडफोड करायचे.

सामनाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचले. त्यातूनच सत्ता मिळवण्यापर्यंत शिवसेनेचा प्रवास अधिक समृद्ध झाला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version