आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अंतर्वस्त्रे ही आता आपल्या रोजच्याच जीवनाचा भाग आहेत. स्त्रियांना आणि पुरुषांना अंतर्वस्त्रे लागतातच. आपली शारीरिक स्वच्छता जपण्याकरिता यांचा वापर होतो. तरीही पुरुषांची अंतर्वस्त्रे कधीही फारशी चर्चेत येत नाहीत. अगदीच नाही म्हणायला त्यांच्या दोन-चार जाहिराती असतील. पण त्यामुळं समाजमन ढवळून निघत नाही.
परंतु स्त्रियांचे अंतर्वस्त्रे मात्र नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. याचं अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे दिल्लीतल्या एका शाळेने मुलींच्या ड्रेस बाबत एक नवीन नियम बनवला. ज्यानुसार मुलींनी ब्रा घातली तर ती स्कीन कलरची घालणं आणि त्याच्यावर स्लीप घालणं अनिवार्य केलं. जेणेकरून ड्रेसच्या आतली ब्रा दिसायला नको. यावर,’ मुलींनाच अशी बंधनं का’? यावरून बराच गदारोळ झाला. त्यावर शाळेचे म्हणणं होतं की त्या ‘ वयातील ‘ मुलं या गोष्टींनी “विचलित” होऊ शकतात.
या विषयावर चार्वितचर्वण करायला लोकांना आवडतं. बिकिनीतली हेरॉईन सगळ्या पुरुषांची आवडती असते. त्यात तिची फिगर कशी दिसते, मादक सौंदर्य कसं खुलतं वगैरे यावर लोक जाहीर चर्चा करतात. अमेरिकन सैनिक कसे आपल्या बायकोचे अंतर्वस्त्र सोबत नेतात याच्या बातम्या वाचतात. त्या बातम्या वाचून एफबी, ट्विटर वर वाट्टेल त्या कमेंट पण करतात.
तसं म्हटलं तर स्त्रियांची अंतर्वस्त्रे हा विषय मुळातच लैंगिक अवयवांशी निगडीत असल्यामुळे इतका सेन्सिटिव्ह बनवला गेलाय, त्यामुळे तो दबक्या आवाजात बोलला जातो. अगदी होजियरीच्या दुकानात जर पुरुष विक्रेता असेल तर बायकांना त्याच्याकडून ब्रा, पॅंटी घ्यायला कसंनुस होतं.
चारचौघात आपल्या मैत्रिणीची ब्रा ची पट्टी दिसली तर तिला खुणेनेच सांगितलं जातं. अगदी कपडे वाळत घालताना देखील ब्रा टॉवेलखली किंवा इतर मोठ्या कपड्याखली झाकली जाते. ही गोष्ट पुरुषांच्या अंडरगारमेंट बरोबर केली जाते का? तुम्ही स्वतः च्या घरात याचं निरीक्षण करू शकता.
परंतु आताच्या काळातल्या स्त्रियांच्या पोशाखात अनिवार्य असलेल्या ब्रा कधी अस्तित्वात आल्या, याचा इतिहास मात्र रंजक आहे. कुठल्याही फॅशनची सुरुवात फ्रान्स मधल्या पॅरिस मधूनच होते. ब्रा देखील तिथूनच आल्या.
१८६९ मध्ये ‘हार्मनी कॅडोल’ नावाच्या महिलेने जॅकेटचे दोन तुकडे जोडून ब्रा बनवली, आणि त्याची विक्री चालू केली. पण या ब्रा ला खरी प्रसिद्धी मिळाली ती १९०७ मध्ये अमेरिकेत!
ब्रेसियर या शब्दाचं लघुरूप म्हणजे ब्रा. तिथल्या एका ‘वोग ‘नावाच्या फॅशन मासिकाच्या मुखपृष्ठावर ब्रा घातलेल्या तरुणीचा फोटो छापून आला. त्यानंतर जगभरातल्या स्त्रियांनी याच अनुकरण केलं.
१९१३ मध्ये अमेरिकेतल्या मेरी फेल्प्सनी दोन रेशमी रुमाल आणि रीबिनीचा वापर करून ब्रा बनवली आणि त्याचं पेटंट घेतलं. पण या ब्रा सगळ्या मुलींना सूट होणाऱ्या नव्हत्या. या एकाच साइज मध्ये उपलब्ध होत्या आणि त्या स्तनांना सपोर्ट पण करत नव्हत्या.
१९२१ मध्येच मग अमेरिकेत निरनिराळ्या कप साईजच्या ब्रा बनवण्याच्या आयडिया आल्या. त्यानंतर कुठल्याही आकाराच्या महिलेसाठी ब्रा बनवायला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र ह्या ब्रा खूप प्रसिद्ध झाल्या, आणि आजपर्यंत आपली लोकप्रियता टिकवून आहेत.
–
हे ही वाचा – आईच्या वेदना पाहून त्याने जे केलं त्यासाठी जगभरातील महिला त्याचे आभार मानतील
–
ह्या ब्रां ची प्रसिद्धी वाढली तशीच या विरोधात पण आवाज उठायला लागले. विशेष म्हणजे ह्या विरोधात महिलांनीच आवाज उठवायला सुरुवात केली. महिलांनी सुंदर दिसावं याकरिता हे वापरलं जातं, त्यामुळे महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहिलं जातं असा या महिलांचा आक्षेप होता.
१९७० मध्ये अमेरिकेत याचा विरोध वाढला. ब्रेसिअरला विरोध करण्यासाठी महिलांनी मोर्चा काढला. महिलांनी या ब्रा रस्त्यावर पेटवून दिल्या, त्याला ‘ब्रा बर्निंग’ असं नाव दिलं गेलं. या ब्रा, हाय हिल्स सँडल, मेकअपच सामन कचराकुंडीत फेकले गेले त्याला ‘फ़्रीडम ट्रैश कैन’ म्हटलं गेलं.
ब्रा नाही घातल्या तर फार काही आभाळ कोसळणार नाही यासाठी आवाज उठला. याचं कारण ठरलं ते २०१७ मध्ये अमेरिकेतल्या एका शाळेत एका मुलीने ब्रा न घालता जाणं. तिला तिच्या प्रिन्सिपलने ब्रा न घालता फक्त टॉपच का घातला, असा प्रश्न विचारला. ही घटना त्या मुलीने सोशल मीडियावर शेअर केली. आणि तो इश्यू इंटरनेट वर गाजला. लोकांनी ब्रा न घालण्याच समर्थन केलं. तिथूनच मग ‘नो ब्रा नो प्रोब्लेम’ ही मोहीम सुरू झाली.
ब्रा घालणं, न घालणं यावर अनेक मतभेद आता निर्माण झाले आहेत. काहींच्या मते ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो. पण केवळ ब्रा मुळे कॅन्सर होतो याला काहीही शास्त्रीय आधार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
खूप टाईट ब्रा घातली तर दम कोंडल्यासारखा होतो हे खरं आहे. पण आता बाजारात वेगवेगळ्या साईझेसची ब्रा मिळतात. मुली आपल्याला सूट होईल अशा ब्रा घालत आहेत. अर्थात चोवीस तास ब्रा घालणं योग्य नाही. निदान रात्री झोपताना तरी मोकळे, ढगळ कपडे घालून झोपणे फायदेशीर आहे असं आता डॉक्टर सांगतात.
तसं पाहिलं तर इजिप्तशियन, रोमन, भारतीय संस्कृतीत आधी पासूनच स्त्रिया ब्रा सदृश्य गोष्टी वापरत होत्या. युरोपात देखील याचा वापर व्हिक्टोरियन काळापासून सुरू झाला.
भारताचा विचार करता सम्राट हर्षवर्धनच्या काळात स्त्रिया अशा ब्लाऊज सारख्या गोष्टींचा वापर करत याचे पुरावे आहेत. वयात आलेल्या मुली याचा वापर करत. याच्या वापराने स्तन झाकले जातात आणि शरीर सुडौल दिसते.
–
हे ही वाचा – ९० च्या दशकातल्या ‘या’ जाहिराती लागल्या की पालक लगेच टीव्हीचा रिमोट शोधायचे!
–
तसं पाहिलं तर भारतात लैंगिकता आणि कामुकता या विषयावर सरळ विचार मांडलेले दिसतात म्हणजे निसर्गानेच स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराची ठेवण विशेष हेतू ठेवून केली आहे हे मान्य केलेलं दिसतं. अनेक मंदिरातील नक्षीकाम पाहताना हे लक्षात येते. अनेक बारकावे त्यात आहेत पण कुठेही अश्लीलता नाही.
स्त्रियांची अंतर्वस्त्रे हा विषय लोकांनी सेक्स आणि अश्लीलता याच्याशी जोडल्यामुळे तो आता अनेकांना उघडपणे बोलताना अवघडल्यासारखे वाटते. अगदी स्त्रियांना देखील तो सहज बोलता येत नाही. घरातदेखील यावर चर्चा घडत नाही. म्हणूनच हा विषय अजूनही कुजबुजून बोलण्यापुरता मर्यादित आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.