युवीने बदला घ्यायचं ठरवलं, म्हणून दादाने थेट कप्तानी सोडण्याचा विचार केला होता…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय क्रिकेटचा लोकप्रिय कर्णधार सौरव गांगुलीबद्दल प्रत्येकाच्या मनात एक आदर आहे. क्रिकेट बोर्डासमोर नेहमीच आपल्या टीममधील खेळाडूंची बाजू घेणारा हा ‘दादा’ माणूस आपल्या कारकिर्दीत खेळाडूंना सन्मानाने रहायचं शिकवून निवृत्त झाला.
सौरव गांगुली म्हटलं, की प्रत्येकाला आठवते ती लॉर्ड्स येथे खेळली गेलेली नॅटवेस्ट सिरीजची फायनल आणि त्यानंतर ‘दादा’ने केलेला जल्लोष. इंग्लंडचा अष्टपैलू फ्लिंटॉफने भारतात सिरीज जिंकल्यावर जे केलं त्याचं ते प्रत्युत्तर होतं.
काहींना सौरव गांगुलीने टी-शर्ट काढून केलेला जल्लोष पटला देखील नसेल. पण, त्यावेळच्या तरुणाईला, खेळाडूंना तो क्षण म्हणजे अभिमानाने उर भरून आणणारा वाटला होता.
सौरव गांगुलीने त्या कृतीतून एका अर्थाने संपूर्ण क्रिकेट विश्वाला हा संदेश दिला होता, की “आम्हाला हलक्यात घेऊ नका…” परिणाम साध्य झाला होता. टीमचं मनोबल उंचावलं होतं, त्यानंतर झालेले कर्णधार धोनी, विराट कोहली यांनी हीच विश्वासपूर्ण देहबोली मैदानावर दाखवली ज्यामुळे आज आपला भारतीय क्रिकेट संघ जगात मानाने ओळखला जातो.
===
हे ही वाचा – क्रिकेटविश्वातला ‘काळा दिवस’ : जेव्हा क्रिकेट ‘हरलं’ आणि टीव्ही चॅनल्स ‘जिंकली’!
===
आज बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया (बीसीसीआय) चा प्रेसिडेंट असलेल्या सौरव गांगुलीने, मागे एका मुलाखतीत त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या ‘एप्रिल फुल’बद्दल सांगितलं होतं. हा पूर्ण प्रसंग वाचून आपल्या क्रिकेट खेळाडूंचं तेव्हापासून एकमेकांसोबत किती दृढ मैत्रीचं नातं आहे याचा प्रत्यय येतो.
हा किस्सा आहे २००० सालचा… युवराज सिंग हा केनिया विरुद्धची मॅच खेळून आपल्या करिअरला सुरुवात करणार होता. आपल्या टीममधील प्रत्येक नव्या, जुन्या खेळाडू सोबत तितक्याच आत्मीयतेने बोलणाऱ्या ‘दादा’ने युवराज सिंगची गंमत करायचं ठरवलं. त्याने मॅचच्या आदल्या रात्री जेवण करतांना युवराज सिंगला विचारले, की “उद्याच्या मॅचमध्ये माझ्यासोबत ओपनिंग बॅटिंग करशील का?”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच सामना आणि त्यामध्ये ओपनिंग बॅटिंग हे ऐकून युवराज सिंगला टेन्शन आलं होतं. रात्री झोप लागत नव्हती. झोप लागण्यासाठी त्याने झोपेची गोळी घेतली होती.
सकाळ झाली. सगळे खेळाडू नाश्ता करण्यासाठी एकत्र आले. तिथे सौरव गांगुलीने युवराज सिंगला सांगितलं, की “मी काल रात्री तुझी गंमत केली होती.”
युवराज सिंगने सुटकेचा निःश्वास सोडला. दोघेही हसले. युवराज सिंगला दादाचा स्वभाव कळला. तो फक्त एक कर्णधारच नाही तर एक उत्तम व्यक्ती सुद्धा आहे याची खात्री पटली.
===
हे ही वाचा – जेव्हा लक्ष्मणच्या ‘बाथरूम सिंगिंग’मुळे अख्ख्या भारतीय संघाला घाम फुटला होता…
===
दादाच्या नेतृत्वात युवराज सिंगचं करिअर बहरत होतं. २००५ मध्ये पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात आला होता. सौरव गांगुली तेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता आणि त्यामुळे तो खूप नाराज होता. आपल्या कर्णधाराला हसवण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी टीमने त्याच्या सोबत एक गंमत करायचं ठरवलं.
कोचीमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ तिथे पोहोचला होता. ड्रेसिंग रूममध्ये बसलेले असतांना युवराज सिंग, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सहेवागने एका वृत्तपत्रातील एका बातमीचा कागद टीम मॅनेजर आणि सौरव गांगुलीच्या हातात दिला.
सौरव गांगुलीने दिलेल्या एका मुलाखतीचा अंश म्हणून त्यात असं लिहिलं होतं, की दादाला त्याच्या टीमकडून अपेक्षित असा खेळ मिळत नाहीये.
ही बातमी बघून दादा अगदीच चाट पडला होता. कोणत्याही मुलाखतीत आपल्या सहकाऱ्यांबद्दल असं बोललो नसल्याची दादाला खात्री होती.
त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये एक भयाण शांतता पसरली होती. दादा प्रत्येक खेळाडूकडे जाऊन “मी असं कधीच बोललो नाही. ज्या टीमच्या पाठीशी मी सतत उभा असतो, त्यांच्याबद्दल मी असं कसं बोलेन?” हे सांगत होता. ही मीडियाची चूक आहे ,असं तो परत परत म्हणत होता.
सौरव गांगुली हे एक संवेदनशील आणि करारी व्यक्तिमत्वाचं मिश्रण आहे. ही बातमी बघून दादा खूप नाराज झाला आणि त्याने लगेच ड्रेसिंग रूममध्येच कप्तानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
भारतीय संघातील दुसरं संवेदनशील व्यक्तिमत्व ‘राहुल द्रविड’ तेव्हा समोर आलं आणि त्याने सौरव गांगुलीला “हा पेपर खोटा आहे. आम्ही तुझ्यासोबत गंमत केली” असं सांगितलं. काही क्षणातच हरभजन सिंगने “एप्रिल फुल” म्हणत हसायला सुरुवात केली.
दादा हे ऐकून इतका चिडला होता की, प्रत्येक खेळाडूच्या मागे बॅट घेऊन पळत होता. थोड्या वेळात सर्व खेळाडूंच्या सह्या असलेला एक कागद सौरव गांगुलीला देण्यात आला. त्या कागदावर लिहिलं होतं, “दादा, वी ऑल लव्ह यु.”
हा कागद बघून दादा अजूनच भावुक झाला आणि त्याने प्रत्येकाला मिठी मारली. आपल्या जागेवर येऊन दादाने सर्वांना सक्त ताकीद दिली, की “पुन्हा अशी गंमत कधीच करायची नाही.”
===
हे ही वाचा – क्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी!
===
या सगळ्या गमतीशीर प्रसंगाची कल्पना युवराजची होती. दादाने पदार्पणातच घेतलेल्या फिरकीचा त्याने अशाप्रकारे बदला घेतला होता.
कोणत्याही सांघिक खेळात खेळाडूंमध्ये इतकी घट्ट मैत्री असल्यावर तो संघ चांगला खेळेल यात शंकाच नाही. दादा ने हा दिवस ‘एप्रिल फुल’ म्हणून लक्षात न ठेवता ‘सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रेमाचा दिवस’ म्हणून लक्षात ठेवला.
सौरव गांगुलीला खेळाडू म्हणून या कृतीचा असा फायदा झाला की, त्याचा हरवलेला फॉर्म परत आला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दादाने आपल्या नेहमीच्या फलंदाजीच्या शैलीत गोलंदाजांचा समाचार घेतला.
जो गंमत करतो, तो गंमत सहन करण्याची सुद्धा ताकद ठेवतो असं या प्रसंगातून आपल्याला म्हणता येईल. आपल्या क्रिकेट संघात अशीच एकी आणि खेळमेळीचं वातावरण राहो अशी आशा करूयात आणि आपल्या संघाला प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर राहण्यासाठी शुभेच्छा देऊयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.