आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करून त्यांनी एक प्रयोग केला. ‘युरेका, युरेका’ म्हणत अभिमानाने त्याने भारत सरकारकडे धाव घेतली, आपल्या प्रयोगावर शिक्कामोर्तब झाला की देशाचं नाव जगाच्या नकाशावर झळकेल, जे भल्या भल्यांना जमलं नाही ते आपण कोणत्याही साधनांविना करून दाखवलं यासाठी संपूर्ण जग आपली दखल घेईल या महत्त्वाकांक्षेपायी त्यांनी सुरु केलेला प्रवास पुढे इतकं भयावह वळण याची त्यांना कल्पनाच नव्हती. ज्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी ते झगडत होते त्याच देशाच्या सरकारने त्यांची वाट रोखली, सहका-यांनी पाय खेचले, वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी त्यांची मुस्काटदाबी केली आणि अखेर त्यांतच त्यांनी प्राण गमावले.
ही कथा आहे एका ध्येयवेड्या भारतीयाची, एका हुशार संशोधकाची, ज्या प्रयोगासाठी तो झुंज देत होता त्याच स्वप्नाने त्याचा बळी घेतला, मात्र त्याचे मारेकरी नेमकं कोण? तत्कालीन भारत सरकार? वैद्यकीय क्षेत्र? की भारतीय मनोवृत्ती?…
१९७८ सालची गोष्ट, बंगालमधील एका रुग्णालयात एका महिलेची प्रसुती होत होती. डॉक्टरांसह सर्वांच्याच चेह-यावर चिंता होती मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर जगाच्या इतिहासात हा क्षण कोरला जाणार होता. प्रगत तंत्रज्ञान असलेल्या देशांना जे जमलं नव्हतं त्यावर भारत आपला हक्क सांगणार होता.
शस्त्रक्रिया सुरु होताच अवघ्या काही मिनीटात एका लहानग्या मुलीच्या रडण्याने डॉक्टरांच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले. अनेक वर्षांच्या प्रयत्नांचं नाजूक फलित त्यांच्या हातात आलं होतं.
भारतात पहिल्यावहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता. हा चमत्कार घडवला होता भारतीय डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांनी.
कोण आहेत डॉ सुभाष मुखोपाध्याय?
आजही अनेक भारतीयांना हे नाव ठाऊक नसणं हीच त्यांची खरी व्यथा आहे. हजारीबाग येथिल सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या सुभाष यांनी कलकत्त्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी पूर्ण केली. त्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी परदेशात गेले मात्र त्यानंतर आपले कार्य भारतात करावे या विचारांनी शिक्षण संपताच मायदेशी परतले.
केवळ डॉक्टरकी न करता पुढील अनेक पिढ्यांना त्याचा फायदा होईल असे काम व्हावे या ध्येयाने त्यांनी एका आगळ्यावेगळ्या प्रकल्पाला सुरुवात केली.
भारतात वंध्यत्वाची समस्या असलेल्या महिलेला अनेक दिव्यांतून जावे लागते हे पाहिल्यानंतर अशा महिलेलाही मातृत्वाचे सुख मिळावे यासाठी त्यांनी आपले सहकारी डॉ सुनीत मुखर्जी आणि डॉ सराेज कांति भट्टाचार्य यांच्यासह काम सुरु केले.
डॉ सुभाष यांचे काम सुरु असतानाच त्यांचे परदेशातील सहकारी रॉबर्ट एडवर्ड आणि पैट्रिक स्टेपटाे की यांच्या संशोधनातून जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जाेय ब्राउन या जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता.
जागेची वानवा, आर्थिक चणचण, कोणतीही सुसज्ज साधनं नव्हती, मात्र यापैकी कोणतेही संकट त्यांची जिद्द हरवू न शकल्याने अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर त्यांनी प्रणाली विकसित केली. त्यानंतर या दाम्पत्यावर याचा प्रयोग करण्यात आला.
–
- त्या युद्धात ४७०० भारतीय सैनिकांनी बलिदान दिले पण दुर्दैवाने त्यांचे शौर्य अज्ञातच राहिले!
- आर्य खरंच बाहेरून आले होते का? संशोधनानंतर शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा
–
३ ऑक्टोबर १९७८ साली ज्या लहान मुलीचा जन्म झाला तिने डॉ मुखोपाध्यायांचे ध्येय पूर्ण केले होते. दुर्गा ही भारतातील पहिली आणि जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी भारतातील एका लहानश्या हॉस्पिटलमध्ये जन्मली होती ती देखील केवळ मोजक्या भारतीयांच्या स्वबळावर.
आपल्या या अविष्काराला सरकारी मान्यता मिळावी आणि त्यानंतर जगभर हा शोध मांडला जावा यासाठी डॉ सुभाष यांनी बंगाल सरकारकडे धाव घेतली. आपला प्रयोग सिद्ध केला. मात्र त्यानंतर त्यांचा खरा संघर्ष सुरु झाला.
सरकार दरबारी सामान्यांची उपेक्षा केली जाते ही बाब तुम्ही ऐकली असेल, अनेकांनी अनुभवली असेल मात्र शासकीय उदासिनतेमुळे एखाद्याला आपला जीव गमावावा लागतो यासारखे दुसरे दुर्दैव नाही नेमके हेच दुर्दैव डॉ सुभाष यांच्या नशिबी लिहीले होते.
टेस्ट ट्यूब बेबीचा कवळ अहवाल नव्हे तर जिवंत नमुना घेऊन गेलेल्या डॉ सुभाष यांची बंगाल सरकारने चेष्टा केली. कोणत्याही साधनांविना टेस्ट ट्यूब बेबी बनवणं अशक्य असल्याचं सांगत सरकारने डॉ सुभाष यांच्या अहवालाला केराची टोपली दाखवली.
सरकारचं समाधान करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणा-या डॉ सुभाष यांनी जिद्द सोडली नाही, मात्र ते पाहून तत्कालीन सरकार चांगलेच उखडले. केंद्र सरकारचं समाधान व्हावं यासाठी बंगाल सरकारने तज्ञांची एक कमिटी स्थापन केली. या कमिटीच्या अहवालानुसार डॉ सुभाष यांच्या प्रकल्पावर निर्णय होणार होता.
संबंधित कमिटीने डॉ सुभाष यांचं कोणतंही म्हणणं ऐकून न घेता, त्यांचे पुरावे न पाहता त्यांचा प्रस्ताव रद्द केला. किंबहूना अशा खोट्या अफवा पसरवून सरकारचा वेळ वाया घालवण्याबाबत त्यांना सजाही सुनावली गेली.
यावेळी मात्र डॉ सुभाष सरकारची असलेली ही स्पर्धा पूर्णपण हरले होते. आपला हा प्रयोग किमान परदेशातील सहका-यांना दाखवण्ययासाठी ते ब्रिटनला निघाले, मात्र त्यांचा हा उद्देशही सरकारने पूर्ण होऊ दिला नाही. त्यांचा पासपोर्ट स्थगित केल्याने त्यांची परदेशवारीही टळली.
केवळ सरकारचे नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ञांनी त्यांच्या या प्रयोगाला दुजोरा दिला नाही. प्रत्येकाकडून होणारा अवमान, प्रयोग न पाहता केवळ त्यावर केली जाणारी टिका आणि भुतकाळातील अथक परिश्रमांना न मिळाणारे यश यांमुळे अखेर डॉ सुभाष यांनी आपली जिद्द सोडली किंबहूना त्यांना ती सोडावी लागली. दरम्यान त्यांवा हार्ट अटॅकही आला मात्र यातून त्यांचे प्राण वाचले.
१९ जून १९८१ मध्ये डॉ सुभाष यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. “झालेल्या अपमानामुळे मी थकलो असून आता मृत्युसाठी आणखी एका हार्ट अटॅकची वाट पाहू शकत नाही” हे त्यांचे अखेरचे शब्द त्यांचे दुर्दैव मांडण्यासाठी पुरेसे होते.
असा घेतला शोध
१९८६ साली आयसीएमआरचे सदस्य डॉ टीएन आनंद कुमार यांचच्या प्रयत्नांतून हर्षा हा टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. तेंव्हा सर्वांनीच या प्रयत्नांचं प्रचंड गौरव केला आणि या घटनेला भारतातील पहिला शोध म्हणून मान्यता दिली.
प्रत्यक्षात मात्र या कौतुकावर, प्रसिद्धीवर डॉ सुभाष यांचा हक्क होता. डॉ आनंद कुमार यांनाही सुभाष यांच्या संघर्षाबाबत माहिती होती, आपला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्यांनी डॉ सुभाष यांच्या सहका-यांशी संपर्क साधला, त्यांचे शोधपत्र, पुरावे तपासले.
डॉ सुभाष यांनी वापरलेले तंत्रज्ञान, त्यांची माहिती या सर्वांची पुर्नतपासणी करण्यात आली. डॉ आनंद कुमार यांनाही ठाऊक नसलेले प्रयोग करण्यात आले होते.
याबाबत आणखी सखोल चौकशी व्हावी यासाठी डॉ आनंद यांनी डॉ सुभाष यांच्या प्रयत्नांतून जन्मलेल्या बाळाची, आईची तपासणी केली. यावेळी आईच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी एक धक्कादायक बाब त्यांच्यासमोर आली.
या आईला बीजायशच नव्हते त्यामुळे ही महिला नैसर्गिकरित्या आई होणं निव्वळ अशक्य होतं, हे सिद्ध झालं. मात्र आज त्याच आईच्या कुशीत तिची स्वतःची लाडकी लेक विसावली होती.
यानंतर आणखी तपासणी करण्यात आली. या दोघींचे डिएनए तपासण्यात आले आणि त्या रिपोर्ट्समुळे शिक्कामोर्तब झाला की दुर्गा ही आपल्या आईचीच लेक आहे ती देखील टेस्ट ट्यूब प्रणालीतून जन्मलेली. आणि त्यानंतर त्यांना जो साक्षात्कार झाला तो त्यांनी सरकारदरबारी मांडला.
डॉ सुभाष यांचे विधान खरे होते, १९८६ ला नव्हे तर १९८१ साली भारतात पहिला प्रयोग यशस्वी झाला होता.
त्यानंतर डॉ सुभाष यांचे कार्य जगासमोर आले. अनेकांनी आपली चूक मान्य केली, मात्र याबाबत कुणालाही शिक्षा झाली नाही. सरकारी अनास्था असं म्हणत अवघ्या काही महिन्यात या प्रकारावर पडदा पडला.
–
- मूल होत नाही म्हणून टेस्टट्यूब बेबीचा विचार करताय? मग हे कायदे तुम्हाला माहीत हवेत
- जखम झाल्यास नुसती हळद न लावता करा हा उपाय… भारतीय शास्त्रज्ञाचा भन्नाट शोध!
–
प्रसिद्धीपासून वंचित
२०१० साली रॉबर्ट एडवर्ड आणि पैट्रिक स्टेपटाे यांना नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले, मात्र त्यांचयानंतर अवघ्या ६७ दिवसांनी, मुख्यतः अत्यल्प साधनांसह भारतात हा प्रयोग यशस्वी करणा-या डॉ सुभाष यांना हे पारितोषिक, हे यश, कौतुक कधीही अनुभवता आले नाही.
त्यानंतर अनेकांनी डॉ सुभाष यांचे कौतुक केले, कामाची दखल घेतली, मात्र हे सारं पहायला डॉ सुभाष हयात नव्हते.
‘एक डॉक्टरकी मौत’ या चित्रपटाआधारे डॉ सुभाष यांचा जीवनप्रवास मांडला गेला, त्यानंतर गौरवलाही गेला, मात्र जेंव्हा डॉक्टरांना जीवंतपणी हा मान मिळाला असता तर कदाचित ते आजही आपल्या हयात असते.
वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर यशापासूव वंचित राहिलेले, आपल्याच देशाकडून झालेल्या अवमानामुळे खचलेले. निराश झालेले डॉ सुभाष यांचे दोषी कोण? या राजकीय अनास्थेने आणखी किती. कोणत्या निरपराधांचे बळी घेतले? यांची गणनाच नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.