Site icon InMarathi

या ४ खेळाडूंना “भन्नाट फॉर्म” गवसला, तर ऐतिहासिक “कसोटी अजिंक्यपद” आपलंच!

wtc final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

जून महिना म्हणजे माझ्यासारख्या क्रिकेट चाहत्यांसाठी नुसती चंगळ आहे, असं म्हणायला हवं. आजच इंग्लंड विरुद्ध भारत हा महिला संघाचा कसोटी सामना सुरु झाला आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताचा महिला संघ कसोटी सामना खेळतोय ही महत्त्वाची बाब आहे.

शिवाय अनेकांप्रमाणेच माझ्याही दिलाची धडकन असणाऱ्या स्मृती मंधानाला पांढऱ्या जर्सीमध्ये फलंदाजी करताना पाहता येणार ही आणखी एक विशेष महत्त्वाची गोष्ट ठरते.

या मालिकेला जेवढं महत्त्व आहे, त्याहून कैक पटीने अधिक महत्त्व उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या पुरुष संघाच्या सामन्याचं आहे. नाही, तो पुरुषांचा सामना आहे म्हणून नाही, तर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना म्हणून!

 

 

यानिमित्ताने विराट आणि विल्यमसन पुन्हा आमनेसामने आले आहेत. २००८ साली युवा विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात विल्यमसनने काढला. याची परतफेड करण्याची संधी आता विराटकडे चालून आली आहे.

अर्थात, हे काम सोपं मुळीच नाहीये. एक भारतीय चाहता म्हणून भारतानेच जिंकावं असं वाटणं वेगळं आणि न्यूझीलंडच्या तगड्या संघाविरुद्ध अंतिम सामन्यात विजय मिळवणं वेगळं. त्यातच न्यूझीलंड संघाने इंग्लंड विरुद्ध नुकतीच कसोटी मालिका खेळली असल्यामुळे त्यांचा चांगला सरावही झालाय.

बरं नुसताच सराव नाही, तर यजमानांना त्यांच्याच देशात गारद केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सुद्धा भलताच वाढला असणार यातंही शंका नाही.

एकूणच काय, तर भारताला अजिंक्य राहणं गरजेचं आहे, पण परिस्थिती कठीण आहे. असो, भारत सरकारचे चाहते जसं ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ म्हणतात, तसं आपण क्रिकेट चाहत्यांनी ‘कोहली हैं तो मुमकिन हैं’ असं म्हणूयात. अर्थात हे शक्य करण्यासाठी टीमवर्क हवं आणि त्यासाठी या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करायला हवं.

 

 

१८ ते २२ जून दरम्यान चालणार असलेल्या या अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी कर्णधारांचे जर्सी नंबर सुद्धा १८ आणि २२ असावेत, हा एक अफलातून योगायोग जुळून आलाय, हीदेखील विशेष बाब!

===

हे ही वाचा – पुरुष संघ तुपाशी… महिला संघ उपाशी… हे दुटप्पी धोरण कधीपर्यंत सुरु राहणार?

===

हिटमॅनवर नजरा…

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पहिला डाव महत्त्वाचा ठरणार असल्याचं, दस्तरखुद्द सचिन तेंडुलकरने सांगितलं आहे. विराट कोहली आणि नाणेफेक यांचा छत्तीसचा एकदा पाहता, सामन्याची सुरुवात भारताच्या मनाजोगती होईल का, हे सांगणं कठीणच आहे.

नियतीच्या मनात सारं आलबेल असावं आणि भाग्य भारताच्या पारड्यात पडावं अशी अपेक्षा आपण नक्कीच करूयात. पण रोहित आणि शुभमन यांनी डावाची सुरुवात भारताच्या बाजूने होईल याची काळजी घेणं नक्कीच आवश्यक आहे.

 

 

लाल चेंडूच्या स्पर्धेतसुद्धा रोहित अप्रतिम सलामीवीर बनू शकतो हे जरी त्याने एव्हाना सिद्ध केलं असलं, तरी नवख्या शुभमनला सांभाळून घेत भारताची गाडी सुरवातीलाच डिरेल होणार नाही याची काळजी यावेळी रोहितला घ्यावी लागेल.

यावेळी हिटमॅनला शिखर धवनची साथ मिळणार नाही. लंकेला जाणाऱ्या संघाचा कर्णधार म्हणून शिखरची निवड झाली असली, तरी इंग्लंडमध्ये भारतीय संघाला विजयाचं शिखर गाठायचं असेल, तर रोहितने मजबूत पायाभरणी करणं गरजेचं आहे.

 

 

‘अजिंक्य’ राहायचं असेल तर…

लखलखता हिरा असूनही भारतीय संघात कायमच डावलला जाणारा खेळाडू म्हणजे अजिंक्य रहाणे! भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल, तर उपकर्णधार अजिंक्यची कामगिरी सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे हे नक्की…

विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ ‘अजिंक्य’ राहिला त्यात रहाणेच्या कर्णधारपदाचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय संघ कधीही अमलात आणत नाही, अशी मल्टिपल कॅप्टन्सी अमलात आणायची ठरवली तर माझ्या नजरेत तरी, कसोटी प्रकारचा कर्णधार अजिंक्यच असायला हवा…

 

 

अर्थात यावेळी कर्णधारपदाचा काटेरी मुगुट त्याच्या डोक्यावर नसला, तरीही उपकर्णधार आणि भारतीय फलंदाजीचा एक मुख्य आधारस्तंभ म्हणून अजिंक्यला त्याची जबाबदारी पार पाडावीच लागेल. रोहित, गिल, पुजारा, विराट यांनी रचून दिलेल्या धावसंख्येवर पाऊल ठेऊन न्यूझीलंडला आणखी मागे ढकलण्यासाठी त्याची फलंदाजी आवश्यक आहेच.

दुर्दैवाने भारतीय संघाची सलामी गारद झालीच, तर पडता डोलारा सांभाळण्यासाठी याचे सक्षम खांदे नसतील, तर ‘अजिंक्य रहाणे’ कठीण…

‘रन’भूमीवरील ‘किंग’

सेनापती रणभूमी गाजवत नसेल, तर इतरांना हुरूप येत नाही. मग भारतीय संघाच्या या सेनापतीने त्याच्या बॅट रुपी तलवारीला धार देऊन ‘रन’भूमीवर धुमाकूळ घालायला हवाच, नाही का!

भारतीय संघ एकखांबी तंबू उरलेला नाही ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. तरीही विराटची कामगिरी भारताच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण आहे. ‘लिडिंग फ्रॉम द फ्रंट’ ही संकल्पना याआधी अनेकदा सत्यात उतरवणाऱ्या कोहलीसाठी आत्ताही ते अशक्य नाही. तसंही या सामन्यासाठी आपला नारा हाच आहे ना, ‘कोहली हैं तो मुमकिन हैं’…

डोलारा सावरण्याची किंवा अधिक मजबुतीने पुढे नेण्याची जबाबदारी जशी अजिंक्यवर आहे, तशीच विराटच्या खांद्यावर सुद्धा आहे. हे त्याला माहित असेलच, आपण वेगळं काय सांगणार म्हणा.

 

===

हे ही वाचा – भारतीय क्रिकेटमधील “या” भन्नाट गोष्टी कदाचित तुम्हाला माहितच नसतील…

===

अहो पंत जरा जपूनच

रिषभ पंतच्या फलंदाजीचा मी आधीपासूनच चाहता आहे. त्याचं काहीसं अपुरं ठरणारं यष्टिरक्षण आणि आततायी स्वभाव हे मात्र चिंतेचे विषय आहेत. पंत तसे आता बरेच सुधारले आहेत. स्वतःवर थोडा ताबा ठेवण्याची कला आत्मसात करू लागलेत. मागच्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या खेळाचा दर्जाही अव्व्ल झालाय. पण तरीही त्यांना एकच सांगावंसं वाटतं, “अहो पंत जरा जपूनच”.

 

 

अर्थात, रिषभ पंतची फलंदाजी भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. त्याचे स्फोटक आणि घणाघाती हल्ले न्यूझीलंडच्या गोलंदाजीच्या चिंध्या करू शकतात. यष्टिरक्षणात चुकीचे होणार नाहीत याची खबरदारी मात्र त्याला घ्यावी लागेल.

रिषभची धोनीची तुलना होणं शक्य नाही. ती कधीही केली जाऊ नये, हे त्याने स्वतः आणि त्याचबरोबरीने त्याचे चाहते, हितचिंतक आणि त्याचा तिरस्कार करणारे, या सगळ्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला हवं.

त्याने उत्तम कामगिरी करून भारतीय संघाच्या विजयात वाटा उचलायला हवा, हे वेगळे सांगणे न लगे…

सर आप भी…

भारतीय संघ समतोल ठेवण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, तो म्हणजे रवींद्र जडेजा! ३ जलदगती गोलंदाज, २ फिरकीपटू, १ यष्टीरक्षक आणि उर्वरित ५ फलंदाज अशी उत्तम टीम सांधायची असेल, तर जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीची नक्कीच गरज पडेल! सहाव्या फलंदाजाची जागा घेऊन फलंदाजी तोकडी पडणार नाही याची खबरदारी त्याने घेतली, तर मग हाय काय अन् नाय काय…

 

 

क्षेत्ररक्षणात तो सहसा हिरमोड करत नाही. तशीच दर्जेदार गोलंदाजी त्याला करावी लागेल. भारताने ४ गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला, तर ही जबाबदारी आणखीच वाढेल. ५ गोलंदाजांमध्ये ४ वेगवान गोलंदाज खेळणार असतील, तर मग जडेजा एकटाच फिरकीपटू ठरेल. थोडक्यात काय, तर चांगली गोलंदाजी करण्यावाचून ‘सर जडेजा’ यांना दुसरा पर्याय नाही.

जस्सी जैसा नहीं

यॉर्कर मास्टर असणाऱ्या जसप्रीत बुमराहची गोलंदाजी न्यूझीलंडची फलंदाजी रोखण्यासाठी फारच गरजेची आहे. या धारदार आणि तेजतर्रार खेळाडूला इतरांनी साथ दिली, तर मग विजय आपलाच आहे. जसप्रीत हा मुख्य गोलंदाज ठरणार असला, तरी इतर गोलंदाजांवरही मोठी भिस्त आहे.

 

 

शर्माजी का बेटा

जसप्रीत, इशांत आणि शमी किंवा सिराज अशी गोलंदाजीची फळी संघात असायला हवी असं मला वाटतं. या पार्श्वभूमीवर, उंचपुरा आणि अनुभवी इशांत शर्मा सुद्धा खूपच महत्त्वाचा ठरेल. इशांतला अंतिम ११ मध्ये घ्यावं की नाही यावर अनेकांचं दुमत असेल, पण माझ्या ११ जणांच्या यादीत त्याला गृहीत धरलं गेलंय.

त्याचा अनुभव, वेग आणि उंची भारतीय संघाला वेगाने विजयाच्या उंचीवर नेण्यासाठी आवश्यक आहे, असं माझं प्रांजळ मत आहे. अनुभवाच्या जोरावर शमी संघात असणार, हेही नक्की! म्हणजे तीनच वेगवान गोलंदाज खेळणार असतील, तर मी तरी मोहम्मद सिराजचा पत्ता कट करीन. सिराजही चांगला गोलंदाज आहे यात दुमत नाही, पण अनुभवाच्या तराजूचं झुकतं माप इतर तिघांकडे वजनी आहे.

 

 

विराटच्या संघातील सगळ्यांचं तुफान कामगिरी करावी आणि न्यूझीलंडला धोबीपछाड देऊन, एकहाती विजय मिळवावा अशी भारतीय चाहता असल्याने इच्छा आहे. पण माझ्यातल्याच क्रिकेट चाहत्याला विचाराल, तर कसोटी अजिंक्यपदाची माळ कुणाच्याही गळ्यात पडो, पण क्रिकेटची हार होऊ नये.

तेव्हा भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा देऊया आणि विराट विरुद्ध विल्यमसन अशा एका नव्या युद्धासाठी सज्ज होऊया…!!

===

हे ही वाचा – भारताच्या सर्वात पहिल्या कसोटी सामन्याची रोमहर्षक गोष्ट प्रत्येकाला माहिती पाहिजेत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version