Site icon InMarathi

“बच्चा आहेस. घरी जाऊन दूध पी!”, आणि सचिनने पाकिस्तानमध्ये केलेला भीम पराक्रम!

Young sachin_tendulkar InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक किरण माने

किरण माने सुप्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांच्या फेसबुकवरून खालील पोस्ट घेतली आहे

 

बेटा, बच्चा आहेस. घरी जाऊन दूध पी !

पाकिस्तानातल्या पेशावरच्या ‘नियाज स्टेडियम’मध्ये तू येताच प्रेक्षकांनी तुझी टर उडवायला सूरूवात केली…

 

 

तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नव्हते रे! तू दहावीची परीक्षाही दिली नव्हतीस. आम्हाला बारावीत जाईपर्यंत ‘सिझन बाॅल’ची भिती वाटायची…तू तर १५-१६ वर्षांचा होतास.

नीट मिसरूडही फुटलेले नसते पोरांना आणि तू थेट जगातल्या सर्वोत्तम बाॅलर्सपुढे जाऊन, तेही थेट त्यांच्याच देशात – पाकिस्तानात – जाऊन बॅट हातात घेऊन मैदानात उतरलास !!! आमच्याच काळजाचा ठोका चुकलावता…

…त्याच दौर्‍यातल्या एका प्रदर्शनीय मॅचमध्ये पेशावरच्या नियाज स्टेडियममध्ये तू येताच प्रेक्षकांनी तुझी चेष्टा करणारे फलक हातात धरले. सगळे तुला पाहून हसत होते.

 

 

आम्हाला मनापासून वाईट वाटत होते आणि तुझी काळजीही वाटत होती. पहिल्या मॅचमध्ये वकार युनूसचा बंदुकीच्या गोळीसारखा आलेला एक बाॅल तुझ्या नाकावर लागला होता. ती आठवण ताजी होती. तू तरीही जिद्दीने खेळला होतास, हा भाग वेगळा…

…खेळपट्टी फिरकीला साथ देणारी. मुश्ताक अहमद, जवळपास तुझ्या वयाचा असेल किंवा थोडा मोठा. तू त्याला दोन सिक्सर ठोकलेस. आम्ही जपून आरडाओरडा केला. कारण नंतर अब्दुल कादिर येणार होता !

अग्ग्गाय्याय्या ! अब्दुल कादिरच्या फिरकीने त्या काळात भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. सातार्‍यात, माझ्या घरात टी.व्ही. पुढे मी आणि डिप्लोमाचे माझे ओरिसाचे क्लासमेटस् असे सगळे बसलो होतो.

ए किरन, ये लोडका ओभी गया. कोन शिलेक्शन कोरता है रे बच्चोंका? वो भी इम्रान, ओक्रम के शामने??

 

 

प्रोदिप मोहोंती नेहमीप्रमाणे पचकला. आम्ही त्याला गप्प केला. अब्दुल कादिर बाॅलींग करायला यायच्या आधी तुझ्यासमोर आला आणि हातवारे करत तुझ्याशी काहीतरी बोलला. नंतर समजले की तो म्हणाला होता,

 बच्चों को (मुश्ताक को) क्यों मार रहा है? दम है तो मुझे मार के दिखा.

आईशप्पथ ! तू शांतपणे स्टान्स घेतलास……आणि त्यानंतरचे सहा बाॅल होईपर्यन्त आम्ही सगळ्यांनी घर डोक्यावर घेतले होते! एका ओव्हरमध्ये तब्बल चार सिक्सर आणि एक फोर !!
6 , 0 , 4 , 6 , 6 , 6 !!!

जगातील एका महान क्रिकेटवीराचा जन्म होतानाचे आम्ही साक्षीदार होतो ! पुढच्या पिढ्यांना अभिमानाने सांगण्यासारखी एक गोष्ट आमच्या पोतडीत जमा झाली होती…!

तुझ्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय मॅचपर्यंत प्रत्येक मॅच आम्ही डोळे भरून पाहिली…आठवत नाही किती वेळा तू आमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणलेस !

माज केला भावा आम्ही तू होतास तोपर्यंत… जगावर राज्य केले आम्ही ! ज्या पाकिस्तानकडून, आॅस्ट्रेलियाकडून पुर्वी आम्ही अपमानकारक पराभव स्विकारले होते, त्याच पाकिस्तान-आॅस्ट्रेलियासहित जगभरातल्या सगळ्यांना तू खडे चारलेस.

 

 

तुझी दहशत होती लगा. शेन वाॅर्नच्या तू स्वप्नात यायचास. अक्रमला तू सिक्सर ठोकल्यावर त्याचा पडलेला चेहरा बघून लै लै लै भारी वाटायचे. तुझा सगळ्यात ‘फेवरेट बकरा’ शोएब अख्तर ! आगायायायाया …काय फोडलावतास तू त्याला !!!

 

भावा…

तू आम्हाला जिंकायला शिकवलंस…
तू आम्हाला आत्मविश्वास दिलास…
तू आम्हाला कित्येक आनंदाचे-अभिमानाचे क्षण दिलेस…
तू आमची स्वप्नं साकार केलीस…

सचिन, जोपर्यंत जगात क्रिकेट आहे तोपर्यंत तू त्या खेळाचा अनभिषिक्त सम्राट असशील!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version