' जेंव्हा एका घोड्यावरून प्रभु राम आणि शंकर यांच्यात युद्ध पेटलं! – InMarathi

जेंव्हा एका घोड्यावरून प्रभु राम आणि शंकर यांच्यात युद्ध पेटलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अश्वमेध यज्ञ… असा राजा, ज्याचं अधिपत्य कोणीही सहज मान्य करेल, जो जगज्जेता असेल आणि संपूर्ण पृथ्वीवर ज्याचं शासन असेल असा चक्रवर्ती राजाच हा यज्ञ करू शकत होता. अश्वमेध यज्ञ अनेक राजांनी केला पण हा यज्ञ पूर्णत्वास नेणारे, आपल्या सगळ्यांना ठाऊक असलेले दोन राजे प्रभु श्रीराम आणि युधिष्ठिर.

रामचंद्रांना राज्याचं वर्चस्व वाढवून, त्याच्या सीमा विस्तृत करून जगाच्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचा सल्ला अनेक ऋषी मुनी आणि देवांनी दिला. तो सल्ला स्वीकारत प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध करण्याचं ठरवलं.

 

ashwamedh yag inmarathi

 

या यज्ञात एका अश्वाला एक वर्षभर स्वच्छंद फिरण्यासाठी सोडले जाते. अश्वाच्या पाठीवर अश्वमेधाबद्दल माहिती देणारी शाल सुद्धा घातलेली असते. ज्या ज्या राजाला यज्ञ करणाऱ्या राज्याचं अधिपत्य मान्य असते त्यानी अश्वाला आपल्या राज्यातून पुढे जाण्यास परवानगी द्यायची असते. ज्या राज्याला अधिपत्य मंजूर नसते त्यांनी अश्व आपल्या ताब्यात घेऊन, अश्वमेध करणाऱ्या राजाला आव्हान द्यायचे असते. आव्हान दिल्यास, आपली कुशलता सिद्ध करण्यासाठी युद्ध होते, जर आव्हान देणारा राजा परास्त झाला तर त्याला अधिपत्य स्वीकार करावेच लागते. हे अश्वमेधाचे काही नियम!

श्रीरामांनी सुद्धा या नियमानुसार एक अश्व आयोध्येबाहेर सोडला. काही राजांनी हा घोडा अडवला असता, अयोध्येच्या सेनेशी त्यांना युद्ध करावे लागले. त्यात शत्रुघ्न, हनुमान, सुग्रीव आणि भरत पुत्र पुष्कल सहित अनेक महारथी होते. राजे काय, देवांना सुद्धा ह्या योध्याना पराभूत करणे अवघड होते.

गमन करता करता अश्वमेधाचे अश्व राजा वीरमणिच्या, देवपूर राज्यात आले. राजा वीरमणी हे महादेव आणि स्वयं रामाचे भक्त होते. धर्मनिष्ठ राजा म्हणून चारी दिशांत त्यांची ख्याती होती. याच बरोबर, त्यांना महादेवाचे वरदान प्राप्त असल्याने कोणत्याही शत्रूचे त्यांच्याकडे डोळे वर करून बघण्याचे धाडस नव्हते.

घोडा जेव्हा त्यांच्या सीमांमध्ये आला तेव्हा राजकुमार रुक्मांगद यांनी नकळत हा घोडा अडवला आणि घोडा पाठवणाऱ्या, शत्रूघ्नाला युद्धाचे आव्हान दिले. हा घोडा श्रीरामांचा आहे हे त्यांना ठाऊक नव्हते.

 

ashwmedh horse inmarathi

हे ही वाचा – रुसलेल्या मेव्हण्यामुळे भगवान शंकराला मिळाली हक्काची सासुरवाडी…!

ही वार्ता जेव्हा रुक्मांगदाने आपले वडील, वीरमणि यांना सांगितली तेव्हा ते चिंतीत झाले. चिंतातुर होऊन ते रुक्मांगदाला म्हणाले की “तू हे काय केलेस? श्री रामचंद्र आपले मित्र आहेत. त्यांना अडवण्याचा किंवा त्यांच्याशी वैर स्विकारण्याचा आपला कधीच कोणताही हेतू नव्हता. म्हणून तू घोडा सोडून दे.” हि गोष्ट रुक्मांगदाला समजली मात्र त्याआधीच त्याने युद्धाचे आव्हान केले होते.

कोणत्याही क्षत्रियासाठी एकदा आव्हान केल्यावर ते मागे घेणे शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने युद्धासाठी सज्ज व्हावे लागले.

देवपूरच्या या आव्हानाला स्वीकारून अयोध्येत युद्धाची रणनीती आखली जाऊ लागली तेव्हा हनुमंत शत्रूघ्नाला म्हणाला की “देवपूरवर आक्रमण करणे म्हणजे ब्रम्हावर आक्रमण करण्यासारखे आहे. देवपूर नगरी स्वतः महाकालचे रक्षा कवच आहे. त्यामुळे आधी आपण राजा वीरमणिशी चर्चा करून घोडा सोडवून आणू. जर त्यांनी ऐकलं नाही, तर श्री रामांच्या आज्ञेनुसार कार्य करू.” हा प्रस्ताव मंजूर होऊन, अयोध्येने देवपूरशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.

पण जसे बाण आणि शब्द हे पुन्हा फिरवता येत नाहीत तसेच क्षत्रियाने केलेले आव्हानही परत घेता येत नाही. त्यामुळे अयोध्येने निःसंकोच पणे राजधर्माचे पालन करावे असे ठरले. देवपूर कडून, राजा वीरमणि, त्यांचे बंधू वीरसिंह आणि दोन्ही पुत्र रुक्मांगद आणि शुभंगद हे युद्धात उतरले आणि घनघोर युद्ध सुरू झाले.

 

war inmarathi

 

अयोध्येच्या योद्ध्यांना पराजित करणे देवपूरसाठी कठीण होत होते. नागपाश, मोठी दिव्यास्त्रे, ह्यांचा सगळ्यांचा वापर केला जाऊ लागला. हनुमान विरसिंहाशी लढत होते, रुक्मांगद आणि शुभांगद हे शत्रूघनावर तुटून पडले होते, भरत पुत्र पुष्कल आणि स्वयं वीरमणि ह्यांच्यात घनघोर युद्ध होत होते. पुष्कलने वीरमणिवर आठ बाणांनी प्रहार केला. हा प्रहार सहन न झाल्याने राजा वीरमणि बेशुद्ध होऊन आपल्या रथावरून कोसळले.

इकडे विरसिंहाच्या कोणत्याच अस्त्राचा हनुमानावर परिणामच होत नव्हता. हनुमानाने एक भले मोठे वृक्ष उपटून विरसिंहावर टाकले. इतक्या मोठ्या वृक्षाचा मार सहन न झाल्याने ते जखमी झाले. यातच त्यांची शुद्ध हरपली.

तिकडे वीरमणिना पुन्हा शुद्ध आल्यावर त्यांच्यासह त्यांच्या पुत्रांशी आता शत्रुघ्न लढू लागले. त्यांना हरवण्यासाठी काहीच पर्याय नसल्याने शत्रुघ्नाने वीरमणिच्या दोन्ही पुत्रांना नागपाषात बांधून टाकले आणि पाहता पाहता राजा वीरमणि, त्यांची सेना पराभूत होऊ लागली.

आपण पराजित होतो आहोत हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शिवशंकराचे स्मरण केले. वीरमणिला दिलेल्या वरदानामुळे, शंकराने वीरभद्राच्या नेतृत्वाखाली नंदी, भृंगी सहित आपल्या संपूर्ण गणांना राजा वीरमणिची मदत करण्यास पाठवले. महाकालचे सगळे सैनिक “जय महाकाल” हा जयघोष करत एखाद्या वादळाप्रमाणे अयोध्येच्या सेनेवर तुटून पडले. ह्या वादळाला पाहून आयोद्धेच्या सैनिकांना धडकीच भरली.

 

virbhadra inmarathi

 

प्रत्यक्ष विरभद्राला रणात बघून शत्रुघ्नने हनुमानाला म्हटले की ज्या वीरभद्राने अगदी सहजपणे राजा दक्ष प्रजापतिचे मस्तक छाटले होते, आणि महादेवाच्या समान असलेल्या त्यांच्या अंशाला आपण कसे पराजित करणार? यावर पुष्कल म्हणाले “हे तात आता आपल्याकडे लढण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे आपण सरळ त्यांच्यावर प्रहार करणेच योग्य ठरेल” सगळ्यांचे ह्यावर एकमत झाले व पुन्हा युद्ध सुरू झाले. विरभद्राने पुष्कल, अनेक राजकुमारांना मारून टाकले व एखाद्या रक्तासाठी तहानलेल्या योध्यासारखा तो संपूर्ण सेनेवर तुटून पडला.

पाहता पाहता आता अयोध्या पराजित होऊ लागली. अशातच हनुमानाने श्री रामाचे स्मरण केले. श्रीराम, लक्ष्मण आणि भरत युद्धभूमीवर पोहोचले. स्वयं श्रीराम युद्धात उतरल्याने पाहून वीरमणिसग संपूर्ण सेनेला चिंता वाटू लागली. पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले व आता श्रीराम शंकराच्या सेनेला पराभूत करू लागले. हे पाहून स्वतः महाकाल रणांगणात उतरले.

 

shree ram inmarathi

 

स्वयं महारुद्र महादेव अवतरल्याचे बघून श्रीरामांनी आपल्या शास्त्रांचा त्याग केला. “महादेव मी आपल्याशी कसा लढू”, हा प्रश्न त्यांनी महादेवांना केला. यावर महादेव म्हणाले “हे राम, आपण स्वतः श्री हरीचा अवतार आहात. आपल्यात काहीच वैर नाही. पण मी वीरमणिला दिलेल्या वचनाचा बांधील आहे. त्यामुळे निःसंकोच युद्ध करा.” महादेवांच्या ह्या शब्दांनी आश्वस्त होऊन श्री रामांनी पुन्हा एकदा धनुष्य उचललं आणि घनघोर युद्ध पेटलं.

स्वयं हरी आणि शिव हे महायोध्ये युद्ध करत होते. श्रीरामांनी अनेक अस्त्रांचा, दिव्यस्त्रांचा वापर केला. पण त्यांच्या कोणत्याही अस्त्रप्रयोगाने महादेव संतुष्ट होत नव्हते.

शेवटी श्रीरामांनी, स्वयं महादेवांनीच त्यांना दिलेल्या पाशुपतास्त्राचा वापर, महादेवांची आज्ञा घेऊनच केला. महादेवांच्या ह्या अस्त्राला कोणताही देव, दानव पराभूत करू शकणार नाही असं श्री रामांना वरदान होते. त्यामुळे हे अस्त्र सरळ महादेवांच्या हृदयात सामावले आणि महादेव प्रसन्न झाले. आणि युद्ध संपुष्टात आले.

 

ram shankar inmarathi

 

दोन महान योद्धांमध्ये झालेले हे युद्ध फारसे कुणाला ठाऊक नाही मात्र तरिही ही लढाई इतिहासातील एक महान घटना समजली जाते.

हे ही वाचा – रामायणातील या ‘७’ गोष्टी शिकल्याशिवाय आजच्या कॉर्पोरेट जगात यश मिळणं अशक्यच!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?