Site icon InMarathi

“किल्ल्यावर भगवा फडकवल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही”, बापलेकांची अशीही प्रतिज्ञा

maratha war

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहासात राजाला अर्थात नेतृत्वाला जसे महत्व आहे तितकेच महत्व आपल्या राजासाठी प्राणांची बाजी लावणा-या त्याच्या योद्धांना आहे. सोळाव्या वर्षी स्वराज्य उभे करणा-या शिवरायांच्या भोवती असलेला ध्येयवेड्या मावळ्यांंनी त्यांची साथ कधीही सोडली नाही तर त्यानंतर पेशव्यांच्या कार्यकाळातही हजारो मराठ्यांनी आपल्या राजाचे रक्षण करण्यासाठी वेळप्रसंगी जीवही धोक्यात घातला, म्हणूनच स्वराज्य, ‘स्वातंत्र्य हे कुणा एकाचं नसून एकीचं बळ आहे’ असे म्हटले जाते ते काही खोटे नाही.

तर ज्या लाखो खंबीर हातांशिवाय, मजबूत बाहूंशिवाय इतिहासातील हजारो मोहिमा फत्ते होणं शक्यच नव्हतं त्यातील एक म्हणजे तारापूरचा रणसंग्राम.

पेशव्यांना काहीही अशक्य नाही या अभिमानाने मिरविल्या जाणा-या बिरुदाला तारापूरचा किल्ला हा मात्र अपवाद होता. या किल्ल्यापायी मराठ्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरत होते. वसई, ठाणे, केळवे, डहाणू अशा एकाहून एक अवघड मोहिमा फत्ते करणाऱ्या मराठ्यांचा भगवा तारापूर किल्ल्यावर कधी फडफडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

तारापुर म्हणजे पोर्तुगांचे व्यापारी केंद्र, सुरतपाठोपाठ हे ठिकाण पोर्तुगिजांसाठी अतिशय महत्वाचं असल्याने ते काबीज करणं मराठ्यांची गरज बनली होती.

 

 

राजा बिंब कडून पोर्तुगिजांनी हा किल्ला अनेक वर्षांपुर्वी काबीज केला अशी अख्यायिका आहे. त्यानंतर स्थानिक राज्यकर्त्यांकडून या किल्ल्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न वेळवेळी झाला मात्र कुणालाही त्यात यश मिळवता आले नाही. यामुळेच मराठ्यांमध्ये अस्वस्थता होती.

हे ही वाचा – इंग्रज असो वा मुघल, शस्त्रांनी नव्हे, कुशाग्र बुद्धीने शत्रूशी लढणारा पेशवाईतील चाणक्य

विजयाशिवाय अन्नग्रहण नाही

ही गोष्ट आहे १७३९ सालाची.  बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा हे त्यांच्या मात्तबर सैनिकांसह पुण्यात चर्चा करत होते. मल्हारराव होळकर, बिरवार कुलकर्णी, खंडोजी मानकर यांसह त्यांचा कोकणचा दौरा सुरु होता.

विचारविनिमय, चर्चा, दौऱ्याचे पुढचे नियोजन अहोरात्र सुरु होते, बैठका रंगत होत्या, अशातच सगळी मंडळी एकदा जेवणाच्या पंगतीला एकत्र बसली, चिमाजी आप्पाही सोबत असल्याने मंडळी अत्यंत अदबीने, शांततेने जेवण करत होती.

 

 

वाढप्यांकडून पदार्थ वाढण्याची लगबग सुरु होती. खमंग पदार्थांचा वास दरवळत असतानाच एक तरुण वाढपी सरदारांच्या पानातील भातावर तूप वाढण्यासाठी आला. पंंगतीतील एका सरदाराकडे न पाहताच खालमानेने तो तूप वाढण्यासाठी झुकला आणि तेवढ्यात त्या सरदाराचा पारा चढला. त्याने वाढप्याचा हात झटकला आणि त्याकडे रागाने बघत आपली नाराजी दर्शवली. तूप शिळे असल्याचे सांगत त्याने वाढप्याच्या दिशेने वाटी भिरकावली. मात्र आपले हे कृत्य सरदारांसह खुद्द चिमाची आप्पा पहात आहेत याचे त्याला भान राहिले नव्हते.

या कोपीष्ट सरदाराचेनाव होते बाजी भिवराव रेठरेकर कुलकर्णी. राग अनावर झालेल्या या बाजी भिवरावांना पाहून पंगतीतील सारेच शांत झाले. चिमाजी आप्पा या सरदाराला नेमकी कोणती शिक्षा देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

चिमाजी आप्पा यावर काहीच बोलले नाहीत मात्र पंगतीतील एकजण कुत्सितपणे म्हणाला,”आमच्या सरदारांना तूप साजूक नसल्याचा राग येतो, मात्र वारंवार प्रयत्न करूनही तारापूरचा किल्ला जिंकता येत नसल्याचा राग मात्र येत नाही ही मोठी गंभीर बाब आहे. युद्ध, मोहिमा, यश यांपेक्षा ताटातील साजूक तूप आमच्या सरदारांना इतके महत्वाचे होईल असे वाटले नव्हते”.

मुळातच घुश्शात असलेल्या बाजी भिवरावांनी हे टिका ऐकली आणि हातातील घास पुन्हा ताटात ठेवत ते ताडकन उभे राहिले. बाजी आता पुढे काय बोलणार, काय करणार याची धास्ती वाटणारे काही सरदार त्यांना रोखण्यास पुढे सरसावणार इतक्यात बाजी मोठ्याने म्हणाले, “आता किल्ला हस्तगत केल्यानंतरच आम्ही अन्नग्रहण करू” बाजीच्या एकंदरित स्वभावानुसार त्यांची प्रतिज्ञा किंवा त्यांनी दिलेला शब्द हे अंतीम असतो हे जाणणारे चिंतेत पडले कारण आता बाजी किल्ला जिंकल्याशिवाय अन्नाला स्पर्शही करणार नाहीत आणि किल्ला जिंकणे इतके सोपेही नाही अशी विचित्र कोंडी त्यांच्या लक्षात आली होती.

इतकेच नाही तर ही प्रतिज्ञा करताना बाजीने त्याच पंगतीत बसलेल्या आपल्या तरुण मुलालाही उठण्याची आज्ञा करत आपल्या निश्चयात सहभागी करून घेतले. वडिलांच्या आज्ञेत असलेला आणि वडिलांनाच आदर्श मानणा-या या अठरा वर्षीय तरुणानेही आपले ताट बाजूला सारलेे.

या दोघांनी आपआपल्या सैन्याला आदेश दिला आणि या दोन्ही तुकड्यांनी किल्ल्याच्या भक्कम तटबंदीला पहिली धडक दिली.

 

 

मराठ्यांची ही विजयी नांदी केवळ पोर्तुगिजांनाच नव्हे तर खुद्द चिमाजी आप्पांच्याही लक्षात आली. पुढे त्यांच्याच आदेशाने या पितापुत्राला मदत करण्यासाठी सगळ्या तुकड्या एकत्र झाल्या.

हे ही वाचा – “बचेंगे तो और भी लडेंगे” अशी डरकाळी फोडणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या अतुलनीय शौर्याची कहाणी

गनिमी कावा आणि बेधडक हल्ला

शिवरायांचा विजयी मंत्र असणारा गनिमी कावा इथेही वापरण्यात आला. खंडोजी मानकर या सरदाराने गुराख्याचा वेश धारण करत किल्ल्यात प्रवेश मिळवला आणि कुणाचाही लक्षात यायच्या आत किल्ल्यातील अनेक महत्वपुर्ण माहितीचा साठ बाजी भिवरावांपर्यंत पोहोचवला.

राणोजी भोसले यांनी आपली हातोटी असलेल्या सुरुंगाचा वापर करत तटाच्या दोन भिंतींना भगदाड पाडले. बाजींच्या सल्ल्यानुसार मराठ्यांच्या काही तुकड्या या खिंडीतून किल्ल्यात घुसल्या तर काहींनी उर्वरित दोन भिंतींवरून चढण्याचा प्रयत्न केला. चारही बाजूंनी आता मराठ्यांचा विळखा घट्ट होऊ लागला होता.

 

 

प्रत्येक तुकडी आपले दिलेले काम पुर्ण करत होती. “हर हर महादेव” च्या गजराने केवळ किल्ल्याच्या भिंतींनाच नव्हे तर आतील पोर्तुगीज राज्यकर्त्यांनीही भितीचा हादरा बसत होता. त्याच रागात एका गो-या सैनिकाने किल्ल्याच्या बुरुजावरून झाडलेली गोळी थेट बाजी भिवरावांना लागली आणि बाजी भिवराव खाली कोसळले.

वडिलांची ही अवस्था पाहता त्यांचा मुलगा बापुजी त्या परिस्थितही लढत राहिला. धारातिर्थी पडलेल्या वडिलांकडे पहात, हर हर महादेवचा गरज करत तो लढत राहिला. सगळ्या तुकड्या एक झाल्या, शक्य त्या सर्व मार्गाने किल्ल्यावर आक्रमण झाले आणि अखेर किल्ल्याच्या बुरुजावर भगवा फडकलाच.

 

 

तोपर्यंत बाजी भिवरावांचे श्वास सुरु होते, फडणा-या भगव्याकडे पहात त्यांनी समाधानाने डोळे मिटले.

बाजी गेल्याची वार्ता पुण्यात वा-यासारखी पसरली. ही बातमी खुद्द बाजीराव पेशव्यांच्या कानी आली आणि नकळत त्यांच्याही डोळ्यांतून अश्रु वाहू लागले.  “आमचा सरदार नव्हे तर माझा भाऊ गेला” असं म्हणत त्यांनी बाजी भिवरावांचे घर गाठले.

दोन पिढ्यांचा स्नेह 

असे म्हणतात बाजी भिवरावांचे वडिल आणि बाळाजी विश्वानाथ यांची जीवाभावाची मैत्री होती. क-हाड तालुक्यातील एका लहानशा गावात राहणा-या बाजी भिवरावांच्या वडिलांना कुलकर्णी ही पदवी देण्यात आली होती. तेंव्हापासून बाळाजी विश्वनाथांसह त्यांचा स्नेह होता.

बाजी भिवरावांच्या नावावरूनच पेशव्यांनी आपल्या मुलाचेही नाव बाजी असे ठेवले होते. पुढे बाजी भिवराव आणि बाजीराव पेशवे तसेच चिमाजी आप्पा यांच्यातही तीच घनिष्ट मैत्री कायम राहिली.

बाजी भिवरावांच्या निधनाचे जेवढे दुःख त्यांच्या कुटुंबियांना झाले तितकाच शोक पेशव्यांच्या वाड्यातही सर्वांना झाला.

 

 

शिवरायांचे मावळे असो वा पेशव्यांचे सरदार, प्रत्येकाने आपआपल्या परिने, निष्ठेने लढा दिला. समोरील शत्रु प्रत्येकवेळी वेगळा होता, मात्र मराठ्यांची निष्ठा ही स्वराज्याप्रति कायम होती, त्याचबळावर आज आपण स्वराज्य, स्वतंत्र भारत अनुभवत आहोत.

हे ही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहीला गेला!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version