' भारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास! – InMarathi

भारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय वायुसेनेचे पहिले चीफ एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी ह्यांची कहाणी ही सर्वांसाठीच प्रेरणादायक आणि थरारक आहे. ते एक महान नेते होते, त्यासोबतच त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी खर्ची केले.

जगभरातील माणसे आजही त्यांचा आदर करतात आणि भारतातील लोक त्यांना वंदनीय मानतात. त्यांच्या दूरदृष्टीचे आणि माणुसकीचे अनेक लोक जगभरात दाखले देतात त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे आज भारतीय सशस्त्र दलांपैकी एक म्हणजे भारतीय वायुसेना दिमाखात उभी आहे आहे आणि देशाचे प्राणपणाने रक्षण करते आहे.

 

subrato-mukharjee-marathipizza
subrotocup.com

एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी ह्यांनीच भारतीय वायुसेनेचा पाया रचला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच त्यांना भारतीय वायुसेनेचे जनक म्हटले जाते.

कोलकाता मधील एका सुविख्यात कुटुंबात ५ मार्च १९११ साली सुब्रतो मुखर्जी ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे वडील म्हणजेच त्यांचे आजोबा डॉ. प्रसन्न कुमार रॉय हे कोलकाताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजचे पहिले भारतीय मुख्याध्यापक होते.

त्यांचे आजोबा निबरन चंद्र मुखर्जी हे सामाजिक व शिक्षण क्षेत्रात महत्वाच्या सुधारणा घडवून आणण्याचे कार्य करीत असत. ते ब्राह्मो समाजाचे सदस्य होते. त्यांच्या आजी सरला रॉय ह्यांनी गोखले मेमोरियल स्कूलची स्थापना केली होती. त्यांचे वडील सतीश चंद्र मुखर्जी हे इंडियन सिव्हील सर्विस मध्ये १८९१ सालापासून कार्यरत होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव चारुलता मुखर्जी असे होते. त्यांच्या मामांना म्हणजेच इंद्रलाल रॉय ह्यांना पहिल्या महायुद्धात Royal Flying Corps मध्ये मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल Distinguished Flying Cross ने सन्मानित करण्यात आले होते. हा गौरव प्राप्त करणारे ते पहिले भारतीय होते.

सुब्रतो मुखर्जी हे त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात धाकटे होते. त्यांच्या भावंडांनी सुद्धा आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केले होते. त्यांच्या ज्येष्ठ भगिनी रेणुका रॉय ह्या स्वातंत्र्य सेनानी होत्या.

त्यानंतर त्या संसदेमध्ये निवडून आल्या आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अनेक महत्वाची कामे केली. त्यांचे मोठे बंधू प्रसंतो मुखर्जी हे रेल्वे बोर्डाचे चेअरमन होते. ते सर्वात लहान असल्याने त्यांना त्यांच्या भावंडांची कामे करावी लागत असत. शिवाय लहान असताना घरात सुद्धा ते सर्वांना कामात मदत करीत असत.त्यांच्या भगिनी नीता सेन म्हणतात की,

सुब्रतो घरात सर्वात धाकटा असल्याने त्याला घरात सर्व लोक कामे सांगत असत. आम्ही त्याला कधीही सिरीयसली घेतले नाही. तो एयर मार्शल झाला तरी आमच्यासाठी तो आमचा लाडका धाकटा भाऊच होता.

 

subrato-mukharjee-marathipizza01
frontline.in

ते अवघ्या तीन महिन्यांचे असताना त्यांना इंग्लंडला नेण्यात आले होते. नंतर त्यांनी त्यांचे बालपण बंगालच्या कृष्णानगर आणि चिन्सुरा येथे व्यतीत केले. लहानपणापासूनच त्यांना सेनेमध्ये जायची इच्छा होती.

त्यांच्यावर त्यांच्या मामांचा म्हणजेच इंद्रलाल रॉय ह्यांचा प्रभाव होता. सुब्रतो मुखर्जी ह्यांचे शिक्षण कोलकाता मधील Diocesan school आणि Loreto Convent येथे झाले. त्यांनी काही काळ इंग्लंडच्या Hampstead मध्ये सुद्धा शिक्षण घेतले.

त्यांनी matriculation ची परीक्षा Howrah Zila School मधून १९२७ साली उत्तीर्ण केली. त्यानंतर ते एक वर्षासाठी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये होते आणि नंतर ते पुढील शिक्षणासाठी Cambridge University ला गेले.

सुरुवातीला त्यांच्या घरच्यांचे म्हणणे होते की त्यांनी मेडिसिन मध्ये करियर करावे. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. तेव्हा भारतीय लोकांच्या सततच्या आग्रहामुळे ब्रिटीश सरकारने घोषणा केली की ते इंडियन एयर फोर्स ची स्थापना करणार आहेत, ह्यात फक्त भारतीय लोक काम करतील.

भारतीय लोकांची अशी इच्छा होती की ब्रिटीश सैन्यात त्यांनाही वरची पदे मिळावी. म्हणून ते लोक सतत ब्रिटीशांकडे ह्या गोष्टीचा आग्रह करीत होते. अखेर ब्रिटीश सरकारने हा निर्णय जाहीर केला आणि सुब्रातोंच्या वडिलांनी त्यांना हे कात्रण पाठवले. ते कात्रण बघून त्यांना तीव्रतेने वाटले की आपण ह्या ठिकाणी जॉईन व्हावे. त्यांच्या मातोश्री ह्यासाठी अनुकुल नव्हत्या.

परंतु त्यांनी १९२९ साली Cranwell entrance examination आणि London Matriculation ह्या परीक्षा दिल्या व ह्यामध्ये ज्या सहा भारतीय उमेदवारांची निवड झाली त्यापैकी एक सुब्रतो होते.

subrato-mukharjee-marathipizza02
bharat-rakshak.com

८ ऑक्टोबर १९३२ साली सहा कॅडेट्सना युकेच्या रॉयल एयर फोर्स मध्ये प्रवेश मिळाला आणि योगायोगाने त्याच दिवशी भारतीय विधानसभेत इंडियन एयरफोर्स ऍक्ट पास झाला आणि भारतीय वायुसेनेचा जन्म झाला. सुब्रतो ह्यांची पायलट म्हणून निवड झाली.

Cranwell येथे ट्रेनिंग पूर्ण केल्यावर भारतीय वैमानिक Wiltshire येथील Old Sarum मधील Army Cooperation School येथून उत्तीर्ण झाले. येथे ट्रेनिंग घेत असताना त्यांनी तिथे काम करणाऱ्या भारतीयांसाठी एक भारतीय ग्रंथालय तयार करण्यास मदत केली. त्यांच्या मातोश्रींना पत्र लिहून त्यांनी त्यांच्या घरची काही पुस्तके पाठवण्याची विनंती केली. नंतर त्यांनी RAF squadrons म्हणून काम केले व नंतर ते भारतीय वायुसेना जॉईन करण्यासाठी भारतात परत आले.

१ एप्रिल १९३३ साली भारतीय वायुसेनेच्या पहिल्या स्क्वाड्रनची पहिली फ्लाईट कराची येथे तयार करण्यात आली. ह्या फ्लाईट मध्ये जाण्याची संधी ज्या पाच पायलटना मिळाली त्यातील सुब्रतो हे एक होते. त्या फ्लाईट मध्ये चार Westland Wapiti biplanes होते.

१९३९ साली त्यांना squadron leader हे पद मिळाले. ह्या पदावर निवड होणारे ते पहिले भारतीय ठरले आणि १९४२ साली त्यांनी RAF stationचे नेतृत्व केले. असे करण्याची संधी मिळणारे ते पहिले भारतीय होते. १९४५ साली त्यांची Order of the British Empire (OBE) च्या ऑफिसरपदी निवड झाली. इतके सगळे कर्तृत्व गाजवून सुद्धा भारतीय वायुसेनेमध्ये भरती करणाऱ्यांनी रॉयल एयर फोर्स साठी काम करणाऱ्या भारतीयांबरोबर भेदभाव केला असे दिसून येते.

सुब्रतो ह्यांच्यासह जे इतर भारतीय रॉयल एयर फोर्स आणि नंतर भारतीय वायुसेनेसाठी काम करत होते त्यांना अनेकवेळा अपमान आणि मानसिक छळ सहन करावा लागला. इतके असून सुद्धा त्यांनी त्यांची कामात कसूर होऊ दिली नाही. उलट त्यांच्या कामात ते उत्कृष्ट कामगिरी बजावत होते.

१९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय वायुसेनेमध्ये सुब्रतो मुखर्जी हे सर्वोच्च अधिकारी होते. अपार कष्ट करून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणी झाल्याने भारतीय वायुसेनेला सुद्धा काही गोष्टी आणि अधिकारी पाकिस्तानला द्यावे लागले आणि सुब्रतो व इतर अधिकाऱ्यांवर ब्रिटीश सोडून गेलेल्या कामांची व अधिकारांची जबाबदारी आली.

subrato-mukharjee-marathipizza03
frontline.in

असे म्हणतात की भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन ह्यांनी सुब्रतो ह्यांना विचारले होते की,

वायुसेनेतील सिनियर ब्रिटीश अधिकाऱ्यांना किती दिवस भारतात राहू द्यावे?

तेव्हा सुब्रतो ह्यांनी उत्तर दिले की

पाच ते सात वर्षांसाठी ह्या अधिकाऱ्यांना भारतात राहण्याची परवानगी मिळावी. ह्या काळात भारतीय वायुसेनेला पुनर्रचनेसाठी कालावधी मिळेल.

खरं तर असा निर्णय घेऊन ते स्वत:चेच प्रमोशन तब्बल अर्ध्या दशकासाठी लांबणीवर टाकत होते. पण त्यांनी स्वत:चा विचार न करता देशाचा व वायुसेनेच्या भल्याचा विचार केला. त्यांचा स्वभाव हा असाच नि:स्वार्थी होता. त्यांनी कधीही स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही. ह्या काळात त्यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजेच Sir Thomas Elmhirst KBE, CB, AFC, Sir Ronald Ivelaw Chapman, KBE, CBE, DFC, AFC, and Sir Gerald Ernest Gibbs, KBE, CIE, MC, ह्या अधिकाऱ्यांना भारतीय वायुसेनेच्या पुनर्रचनेसाठी मोलाची मदत केली. त्यानंतर १९५२ साली ते त्यांच्या पुढील ट्रेनिंग साठी इंग्लंडच्या Imperial Defence Collegeला गेले.

तिकडून १९५४ साली परत आल्यानंतर ते अधिकृतपणे भारतीय वायुसेनेचे कमांडर इन चीफ झाले. हे पद बदलून १९५५ साली Chief of the Air Staff, IAF असे करण्यात आले.

ह्या दोन्ही पदांवर कार्य करणारे सुब्रतो मुखर्जी हे पहिले भारतीय होते. १९५७ साली व्ही के कृष्ण मेनन भारताचे संरक्षण मंत्री झाले होते. त्यांनी भारतीय सशस्त्र दलावर संशय घेतला होता. ह्या परीक्षेच्या काळात सुब्रतो ह्यांच्या सौम्य स्वभावाचे सर्वांना दर्शन झाले. त्यांनी त्यांच्या वागण्यातून कधीही त्यांना रोज सहन करावा लागणारा तणाव जाणवू दिला नाही.

त्यांनी व त्यांच्या पत्नीने कायम त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांचे हित बघितले व शक्य तेवढी काळजी घेतली. भारतीय वायुसेनेत काम करणाऱ्या सर्वांची काळजी घेण्याबद्दल त्यांचा कटाक्ष होता.

subrato-mukharjee-marathipizza04
vinoba.org

त्यांचा विवाह १९३९ साली एका मराठी मुलीशी म्हणजेच शारदा पंडित ह्यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. शारदा पंडित ह्या सुद्धा समाजकार्य करणाऱ्या होत्या. त्यांनी गुजरात व आंध्र प्रदेश ह्या दोन राज्यांच्या राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचे २००७ साली मुंबई येथे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले.

सुब्रतो मुखर्जी हे एयर इंडियाच्या पहिल्या फ्लाईटचे प्रवासी होते. हे विमान नोव्हेंबर १९६० साली टोकियोला गेले होते. ८ नोव्हेंबर १९६० रोजी सुब्रतो मुखर्जी त्यांच्या एका मित्राबरोबर टोकियो मध्ये जेवत असताना त्यांच्या श्वासनलिकेत अन्नाचा तुकडा अडकला आणि श्वास न घेता आल्याने जीव गुदमरून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांचे मित्र म्हणजे भारतीय नौसेनेतले अधिकारी होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे पार्थिव नवी दिल्लीतील पालम एयरपोर्ट वर आणले गेले आणि २० नोव्हेंबर १०६० रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांना सशस्त्र दलातील नियमाप्रमाणे सलामी देण्यात आली. एकूण एकोणपन्नास विमानांनी त्यांना सलामी दिली. ते गेले तेव्हा त्यांचे वय अवघे एकोणपन्नास वर्ष इतके होते.

 

subrato-mukharjee-marathipizza05
topyaps.com

मुखर्जी ह्यांच्यानंतर १ डिसेम्बर १९६० रोजी अस्पी इंजिनिअर हे वायुसेनेचे Chief of Air Staff झाले. त्यांनी मुखर्जी ह्यांना श्रद्धांजली वाहून त्यांना भारतीय वायुसेनेचे जनक असे संबोधले.

वायुसेनेमध्ये काम करून देशाची सेवा करण्याखेरीज त्यांना फूटबॉल मध्येही रस होता. ते of Mohun Bagan Athletic Club चे सदस्य होते. त्यांनी आंतरशालेय अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा घेण्याची कल्पना व्यक्त केली. ही स्पर्धा त्यांच्या निधनानंतर सुरु करण्यात आली. ह्या स्पर्धेला सुब्रतो कप फूटबॉल असे म्हणतात. आजही ह्या स्पर्धेतून भारताला शाळांतून चांगले फुटबॉलपटू निवडण्यास मदत होते.

subrato-mukharjee-marathipizza06
subrotocup.com

एयरमार्शल सुब्रतो मुखर्जी ह्यांच्या अकाली निधनाने भारतीय सशत्र दलाची फार मोठी हानी झाली. त्यांचे कार्य अतुलनीय आहे आणि आज त्यांच्याच मेहनतीमुळे भारतीय वायुसेना दिमाखात उभी आहे व देशाचे अहर्निश संरक्षण करीत आहे.

सुब्रतो मुखर्जी ह्यांना Grand Salute !

हे देखील वाचा : (प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचावणाऱ्या भारतीय वायूसेनेबद्दल काही रंजक गोष्टी)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?