आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मेहुणा म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक विशिष्ट चित्र तयार होते. अनेक चित्रपटांमध्येही मेहुणा असं एक खास पात्र दाखवतात, कधी हा मेहुणा कारस्थानी असतो, तर कधी बहिणीसाठी काहीही करू शकणारा, बहिणीवरील मायेमुळे अगदी पिचलेला, दुर्बल, बिचारा वगैरे… कधी वाचाळ, कधी विनोदी तर कधी अगदीच काही उद्योग न करता बहिणीच्या घरी पडीक असलेला… आपल्या भावोजींना पिडणारा मेहुणा तर हल्ली सिरीयलमध्येही दाखवतात…
पण दंतकथा सांगतात की एक मेहुणा असाही आहे जो देवादीदेव साक्षात महादेवांवर नाराज झाला होता, आश्चर्य वाटतंय ना? जाणून घेऊयात मेहादेवांच्या सासुरवाडीची एक सुरस कथा.
धर्मनगरी असलेल्या काशीचा इतिहास किती जुना आहे हे सांगण्याची गरज नाही. भगवान शंकरांचा येथे मुक्कामही दीर्घकाळ झाला आहे, परंतु आपणास माहित आहे काय की देवादीदेव महादेवांची सासुरवाडी काशीमध्येच आहे? आणि ते येथे त्यांच्या मेव्हण्याबरोबर राहतात? हो, पूर्वजांच्या म्हणण्यानुसार हे एकदम खरे आहे…
वाराणसी म्हणजे महादेवाची नगरी! मात्र मेहादेवाच्या मेहुण्याचे मंदिर येथून अगदी जवळ असूनही बऱ्याचजणांना त्याची माहिती नाही. काशीपासून जवळ असलेल्या सारनाथ येथे हे एकमेव मंदिर असून ते सारंगनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात मेहादेव आणि त्यांचा मेहुणा सारंगनाथ दोघेही पिंडीच्या स्वरूपात विराजमान आहेत.
सारंगानाथ मंदिराचे महंत मनोज कुमार हे याविषयी माहिती देतात. पूर्वजांकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्ष प्रजापतीने आपली मुलगी सती हिचा विवाह संपन्न केला तेव्हा तिचे बंधू सारंगऋषी त्यावेळी उपस्थित नव्हते. ते तपश्चर्येसाठी बाहेर गेले होते.
तपस्येनंतर जेव्हा सारंगऋषी तेथे पोहोचले तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या वडिलांनी आपल्या बहिणीचे लग्न कैलास येथे राहणाऱ्या एका भणंगासोबत केले आहे. स्वतःच्या बहिणीचा विवाह कैलासात राहणाऱ्या, अंगाला भस्म लिंपणाऱ्या एका अघोराशी झाल्याचे समजून सारंगऋषी अत्यंत नाराज झाले.
–
हे ही वाचा – देवांचा देव भगवान शंकराच्या “तिसऱ्या डोळ्याविषयी” या काही आख्यायिका जाणून घ्या!
–
बहिणीला सुखात बघण्याचे प्रत्येक भावाचे स्वप्न असते, त्यामुळेच सारंगऋषी कपडालत्ता, धन-धान्य, सोने-नाणे, दागदागिने असे सगळे बहिणीला द्यायला निघाले. प्रवासात दमल्यामुळे त्यांनी, जिथे मंदिर आहे तिथे थोडी विश्रांती घेण्याचे ठरवले. निद्रेमध्ये असतांना त्यांना स्वप्नात असे दिसले की अख्खी वाराणसी सोन्याने मढलेली आहे. जाग आल्यावरही त्यांना तेच दिसलं ‘सोन्याने मढलेली, नटलेली, समृद्ध असलेली वाराणसी नगरी!’
सारंगऋषींना त्यांनी केलेल्या गैरसमजाचे फार वाईट वाटले. आपण मेहादेवांबद्दल काय विचार केला आणि सत्य काय निघाले याचा त्यांना फार पश्चात्ताप झाला. या झालेल्या पाश्चातापामुळे त्यांनी निश्चय केला की “महादेवांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केल्यावरच आपली बहीण सती हिला भेटेन!”
पुढील कथेनुसार, सारंगऋषी तपस्या करीत असताना, त्यांच्या शरीरातून एखाद्या ज्वालामुखीतून सांडणाऱ्या लाव्हासारखे डिंक बाहेर येऊ लागले. तरीही सारंगऋषींनी हजारो वर्षे तपश्चर्या सुरूच ठेवली, शेवटी, एवढ्या अखंड आणि कठोर तापश्चर्येनंतर महादेव सारंगऋषींवर प्रसन्न झाले. आणि त्यांनी सतीसमवेत सारंगऋषींना दर्शन देत तेथून प्रस्थान करण्यास सांगितले तेव्हा सारंगऋषी म्हणाले की आता आम्हाला येथून जायचे नाही, हे जगातील सर्वोत्तम स्थान आहे. हे ऐकून महादेव अधिकच प्रसन्न झाले. त्यांनी सारंगऋषींना वर मागायला सांगितले.
त्यावर सारंगऋषी उद्गारले “तुम्ही माझ्यासोबत रहा!” यावर भगवान शंकरांनी त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले की भविष्यात तुम्हाला सारंगनाथ म्हणून ओळखले जाईल आणि कलियुगात तुमच्या पिंडीवर डिंकाचा अभिषेक करण्याची प्रथा असेल आणि जो ही चर्मरोगी तुमच्या पिंडीवर मनापासून डिंकाचा अभिषेक करेल त्याचा आजार बरा होईल.
यानंतर सारनाथ येथें दोन स्वयंभू शिवलिंगे तयार झाली. त्यातील एक सारंगनाथ व दुसरे सोमनाथ म्हणून पूजले जाऊ लागले. सारंगनाथाची पिंड लांबीला अधिक आहे तर महादेवाची पिंड उंचीला अधिक आहे.
असे म्हणतात की महादेव श्रावणात सारनाथ येथे वास्तव्यास येतात आणि ज्या भक्ताला काही कारणास्तव, काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेता आले नाही, त्याने जर सारनाथ येथील सारंगनाथ येथे जाऊन दर्शन घेतले तर त्याला काशी विश्वनाथ मंदिरात केलेल्या जलाभिषेकाने मिळते तेच पुण्य सारंगनाथच्या दर्शनाने देखील मिळेल.
या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. येथे लग्नानंतर लगेच दर्शन घेतले तर सासर माहेरातील संबंध चांगले राहतात असे मानले जाते. तसेच मेहुण्याबरोबर नाते अधिक घट्ट होते. येथे दर्शन घेतल्याने त्वचा रोग बरे होतात तर ४१ सोमवार दर्शन घेतले तर सुवर्ण धनाविषयीच्या इच्छा पुर्ण होतात अशीही अख्यायिका आहे.
आपण कितीतरी अश्या दंतकथा ऐकल्या/वाचल्या आहेत ज्या वाचून थक्क व्हायला होतं. कारण भक्ती ही अशी भावना आहे जिला कसलेच बंधन नाही. काही जण अश्या कथांवर अपरिमित विश्वास ठेवतात, काही जण अजिबात विश्वास ठेवत नाहीत. पण, भक्ती मात्र तशीच राहते, अबाधित! कारण परमेश्वर त्या सगळ्यांवर प्रेम करतात जे मनापासून भक्ती करतात.
तर अशी ही कथा, महादेवांची सासुरवाडी असलेल्या सारनाथ येथील सारंगनाथ मंदिराची आणि मेहादेवांच्या मेहुण्याची! जय शिव शंभो, जय महादेव! जय सारंगनाथ!
–
हे ही वाचा – भगवान शंकराचा जन्म कसा झाला? कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.