' अस्तित्वात नसलेल्या ‘चपाती चळवळ’ मुळे ब्रिटिशांना घाम फुटल्याची गमतीशीर सत्य-घटना – InMarathi

अस्तित्वात नसलेल्या ‘चपाती चळवळ’ मुळे ब्रिटिशांना घाम फुटल्याची गमतीशीर सत्य-घटना

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

१८५७ साली स्वातंत्र्याचा पहिला उठाव झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्या उठाव दरम्यान एक चळवळ अशीही झाली होती की तिने ब्रिटिशांना चांगलेच कोड्यात टाकले होते.

‘चपाती चळवळ’ असे त्या चळवळीचे नाव आहे.

नाही नाही! ह्यात ब्रिटिशांना पोळ्या करायला किंवा खायला शिकवण्याचा काहीही संबंध नाही.

ह्या चळवळीबद्दल Dr. Gilbert Hadow ह्या आर्मी सर्जनने त्याच्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. ते लिहितात की

“सध्या ह्या भारत देशात काहीतरी अनाकलनीय गोष्टी सुरु आहेत. कोणालाही ह्या गोष्टीचा अर्थ माहित नाही. कोणीही त्या मागचा उद्देश जाणत नाही. ह्या गोष्टीची सुरुवात प्रथम कोणी केली हे कोणालाही माहित नाही.

“ही गोष्ट कुठल्या धार्मिक प्रथेशी किंवा एखाद्या सिक्रेट सोसायटीशी निगडीत आहे का हेही सांगता येत नाही.

भारतातील माध्यमे ह्या विषयी अनेक तर्कवितर्क करीत आहेत पण कोणालाही ह्यामागचे लॉजिक कळत नाहीये की नेमके हे काय आणि का चाललेय? ह्या चळवळीला ‘चपाती चळवळ’ असे म्हणतात.”

 

chapati-movement-marathipizza
thebetterindia.com

 

Dr. Gilbert Hadow ह्यांनी ह्या चळवळीचे वर्णन केले आहे की,

ह्या चळवळीत लोक विचित्रासारखे हजारो पोळ्यांचे एकमेकांच्या हातात वाटप करीत असत आणि ह्या पोळ्या एका गावातून दुसऱ्या गावात पोचवल्या जात असत.

हे सगळे १८५७ साली स्वातंत्र्य उठावादरम्यान घडत होते.

विचित्र ह्यासाठी वाटते कारण ह्यामागचे कारण कोणालाच माहित नव्हते. Dr. Gilbert Hadow ह्यांच्या पत्रावरून असे लक्षात येते की ह्या पोळ्यांच्या वाटपामागचे कारण न कळल्याने ब्रिटीश चांगलेच कोड्यात पडले होते. चक्रावून गेले होते.

ह्या साध्या सरळ दिसणाऱ्या निरुपद्रवी गोल पोळ्या ब्रिटिशांना चांगलाच ताण देत होत्या.

 

chapati-movement-marathipizza01
dualnoise.com

 

१८५७ साली भारतीय व इंग्रज ह्यांचात तणाव निर्माण झाला होता. इंग्रजांच्या जुलुमी राजवटीला कंटाळून पारतंत्र्यात त्रास सहन करत असलेल्या भारतीयांची सहनशक्ती संपली होती.

म्हणूनच त्यांनी गुप्त रित्या उठाव करण्याचे ठरवले होते. पण ह्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात एक विचित्र गोष्ट घडू लागली.

रात्रीच्या वेळी हजारो साध्या दिसणाऱ्या, कुठल्याही खुणा नसलेल्या पोळ्या गुप्त संदेशवाहक लोकांच्या घरी आणि पोलीस चौकीवर आणून देऊ लागले. संपूर्ण भारतात असे घडू लागले. आणि –

ज्यांच्याकडे ह्या पोळ्या दिल्या जात, ते त्यांच्याकडून त्या पोळ्यांच्या संख्येमध्ये आणखी भर घालून पुढे पाठवत असत.

ह्या चळवळी बद्दल सर्वात पहिल्यांदा Mark Thornhill ह्यांच्या लक्षात आले. ते मथुरा शहराचे दंडाधिकारी होते.

त्यांनी ह्याबद्दल अधिक तपास केला असता त्यांच्या लक्षात आले की ह्या पोळ्या रात्रभरात तब्बल ३०० किमीचा प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी पोचवल्या जात असत.

कधी नर्मदा नदीच्या पलीकडे दक्षिणेत, तर कधी उत्तरेत नेपाळ मध्ये सुद्धा ह्या पोळ्या पोचवल्या जात असत.

पोळ्यांच्या ह्या रहस्यमयी देवाण घेवाणी मुळे Mark Thornhill ह्यांना पक्की खात्री झाली की ह्यात काहीतरी काळेबेरे आहे. नक्कीच कुठल्यातरी गुप्त कार्याची योजना व त्यासाठी संदेशांची देवाणघेवाण सुरु आहे.

ह्यानंतर ब्रिटिशांनी कडक तपास सुरु केला कारण जितक्या जलद ह्या पोळ्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचत असत तितक्या जलद तर ब्रिटीशांची पोस्टाची सेवा सुद्धा काम करत नव्हती.

ह्या विचित्र गोष्टींचा लोकांनी अनेक प्रकारे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच हाती लागले नाही. कारण ह्या पोळ्या अगदी साध्या दिसणाऱ्या नेहमीच्या पोळ्या होत्या.

त्यावर कुठलीही खुण नव्हती किंवा कुठलाही संदेश लिहिलेला नव्हता.

ब्रिटिशांना ह्या पोळ्या घेऊन जाणाऱ्या संदेशवाहकांना अटक सुद्धा करता येत नव्हती कारण त्यांच्याविरुद्ध ब्रिटीशांकडे कुठलाही पुरावा नव्हता.

बऱ्याच वेळा तर हे संदेशवाहक ब्रिटीश पोलिसात काम करणारे चौकीदारच असायचे. ह्यामुळे ब्रिटीशांचा संताप वाढू लागला.

पण नुसते बघत बसण्याखेरीज त्यांच्या हातात काहीही नव्हते. कुठलाही पुरावा सापडत नव्हता की ह्या पोळ्यांच्या देवाणघेवाणी मागच्या गुप्त योजनेची उकल होत नव्हती.

 

chapati-movement-marathipizza02
thebetterindia.com

 

ह्या सगळ्यात जेव्हा ह्या पोळ्या इकडून तिकडे पोचवणाऱ्या संदेशवाहकांची ब्रिटिशांनी कसून चौकशी केली तेव्हा कळले की ह्या संदेशवाहकांना सुद्धा आपण नेमके काय करत आहोत आणि कशासाठी करत आहोत ह्याची काहीच कल्पना नव्हती…!

त्या पोळ्या खऱ्या होत्या – पण त्या घेऊन जाणाऱ्यांना त्या आपण कशासाठी इकडून तिकडे नेत आहोत ह्याबद्दल काहीही माहित नव्हते…!

हे पोलीस चौकीदार दोन इंच व्यासाच्या पोळ्या तयार करून त्यांचे आपल्या सहकाऱ्यांमध्ये वाटप करत असत. ते सहकारी त्यात आणखी भर घालून त्या पोळ्या शेजारच्या गावातील आपल्या सहकाऱ्यांकडे पोचत्या करत असत.

१८५७ च्या घटनांची नोंद असलेल्या एका दुर्मिळ दस्तऐवजांमध्ये अशी नोंद केली आहे की –

“५ मार्च १८५७ पर्यंत ह्या पोळ्या भारतात लांब लांबच्या ठिकाणी पोचवल्या गेल्या होत्या. ह्या पोळ्या अवध किंवा रोहिलखंड मधून दिल्लीपर्यंत पोचवल्या होत्या.

ह्या पोळ्या पोचवण्याच्या कार्यात ९०,००० पोलीस कर्मचारी सहभागी आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ह्या पोळ्या पोचल्या आहेत हे बघून ब्रिटीश अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली.

“त्यांच्या काळजीचे कारण हे सुद्धा होते कि पोस्टाच्या पत्रांपेक्षा पोळ्यांची वाहतूक जास्त जलद वेगाने होते आहे…!

हे ब्रिटीश इतके गोंधळलेले होते की त्यांना वाटले ह्या पोळ्या म्हणजे एक प्रकारचा गुप्त सांकेतिक संदेश आहे आणि ह्या संदेशाप्रमाणे लोकांना ब्रिटिश सरकार विरुद्ध उठाव करण्याची सूचना दिली जात आहे.

ह्या पोळ्या नेमक्या कुठून येतात ह्या बद्दल सुद्धा अनेक मते होती. काही लोकांचे असे मत होते की ह्या पोळ्या पूर्वेतील कोलकाताजवळून पाठवल्या जातात.

“काही लोकांचे म्हणणे होते की उत्तरेतल्या अवधहून ह्या पोळ्या पाठवल्या जातात तर काही लोक असे समजत होते कि ह्या पोळ्या देशाच्या मध्यभागी असलेल्या इंदोरहून सगळीकडे पाठवल्या जातात.

पण कोणाकडेही ह्याचा ठोस पुरावा नव्हता…!”

 

chapati-movement-marathipizza03
economictimes.indiatimes.com

 

थोडक्यात, ह्या पोळ्यांच्या भानगडीमुळे ब्रिटीश राजवट मुळापासून हादरली होती.

ह्या ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून तब्बल २५ कोटी भारतीय जनतेला केवळ १ लाख अधिकारी व सैनिक ह्यांच्या जोरावर पारतंत्र्यात अडकवून ठेवले होते.

त्यांना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की भारतीयांनी एकत्र येऊन उठाव केला तर केवळ १ लाख लोकांच्या जीवावर ते भारतातील जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यापासून अडवू शकत नाहीत.

म्हणूनच जेव्हा भारतीय लोक एकमेकांशी कुठलाही गुप्त प्रकारचा संपर्क करीत असत किंवा त्यांच्या योजने बद्दल ब्रिटिशांना कळण्याचा मार्ग नसे तेव्हा त्यांना संशय येत असे आणि भीती वाटत असे.

असे मानले जाते की ह्या चपाती चळवळीमुळे देशात एक प्रकारची तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि जेव्हा १० मे १८५७ रोजी मीरत मध्ये पहिल्यांदा उठाव झाला त्या मागे ही चपाती चळवळ आहे असा निष्कर्ष काढला गेला .

काही वर्षांनी जे.डब्ल्यू. शेरार ह्यांनी त्यांच्या Life During the Indian Mutiny ह्या पुस्तकात असे लिहिले आहे की,

जर ह्या चळवळीचा उद्देश फक्त देशात रहस्यमयी वातावरण तयार करून ब्रिटिशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे इतकाच असेल तर ही चळवळ यशस्वी झाली असे म्हणावे लागेल. ह्या चळवळीने ब्रिटीशांचे मानसिक खच्चीकरण झाले.

असे म्हणतात की तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई ह्यांच्या सैन्याला ह्या चळवळीचा फायदा झाला.

तसेच गनिमी काव्याने ब्रिटीशांशी लढा देणारे कुंवर सिंग हे नेहेमी त्यांच्या काही सैनिकांसह ह्या गावाहून त्या गावाला जात असताना ह्या गावांत थांबत असत. तिथे ते तूप लावलेल्या पोळ्या, गूळ आणि पाणी ही शिदोरी ते घेत असत.

 

chapati-movement-marathipizza04
thebetterindia.com

 

सर्व पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला आहे की ह्या पोळ्या हा फक्त साध्या पोळ्या होत्या. त्यांच्यावर कुठलाही संदेश वगैरे लिहिलेला नसून त्या फक्त खाण्यासाठी तयार केलेल्या पोळ्या होत्या.

गेल्या काही वर्षात झालेल्या अभ्यासात असे लक्षात येते की पोळ्यांचा ब्रिटीशांशी काहीही संबंध नव्हता. त्या फक्त कॉलराने आजारी लोकांना पोट भरण्यासाठी देण्यात येत होत्या…!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?